Sunday, April 26, 2020

अंतरा सेलबोट साहसी सफर

07.03.2020   ते  09.03.2020
*अंतरा सेल बोट साहसी सफर*
शिडाच्या नावेतून एकट्याने जगप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय  *कमांडर दिलीप दोंदे*  यांच्या समवेत शिडाच्या नावेतून मुंबई ते गोवा सफर करण्याचा दुर्मिळ योग माझे मित्र श्री सतीश टंकसाळे उर्फ बाबा यांच्यामुळे जुळून आला.

या सफरीत माझ्यासह सतीश टंकसाळे, राजेश कांबळे, अनंत दाभोलकर हे परममित्र होते. तर कमांडर दिलीप दोंदेसह त्यांच्या सहकारी सुचेता जाधव होत्या.

सकाळी  नऊ वाजता गेट वे ऑफ इंडियाला पोहोचलो. दिलीप आणि सुचेताची भेट येथेच झाली.  तेथून कुलाबा यॉट क्लबच्या छोट्या बोटीने *अंतरा* सेल बोटीवर दाखल झालो.
सकाळी सव्वादहा वाजता अंतरा बोटीवर पोहोचलो. भर पाण्यात गेल्यावर अंतरा बोटीचे सेल  (प्रचंड मोठा कापडी पडदा) उघडण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले. वाऱ्याने हलणाऱ्या सेलबोटीवर छोट्याच्या कापडी खुर्चीत बसून मी अवकाशात तरंगायला लागलो. नभाच्या निळाईत अंतरावर तरंगत शिडाचे दोर सोडणे, एकदम थ्रिलिंग काम होते. माझ्या नंतर राजेशने सुद्धा सेल सोडण्याचे काम केले.

आता सुरू झाली सेल बोटीवरची साहसी सफर. स्टीलचे मोठे गोल ड्रायव्हिंग व्हील सेल बोट चालविण्यासाठी होते. प्रथमत: टंकसाळे बाबांनी बोटीचे ड्रायव्हिंग चाक ताब्यात घेऊन बोट हाकारायला सुरवात केली. थोडे स्थिरस्थावर झाल्यावर, कॅप्टन दिलीप आणि सहकारी सुचेता यांनी अंतरा सेल बोटीची माहिती दिली. अतिशय हायटेक होती अंतरा सेलबोट. डेकवर सहा जणांची बसण्याची व्यवस्था होती तर आतील भागांत पाच बंक बेड तसेच अद्ययावत किचन होते.

किचनमध्ये बोटीच्या हेलकाव्यासह हलणारी गॅसची शेगडी होती, त्यामुळे तिच्यावर ठेवलेले भांडे आणि त्यातील पदार्थ शेगडीबाहेर  पडण्याचा धोका नव्हता. अगदी छोट्याच्या बाथरूममध्ये विमानात असतो तसा कमोड होता. त्याचा फ्लश म्हणजे बोअरवेल मधून पाणी काढण्याचा पंप होता. परंतु हा पंप कमोड मधील पाणी, मैला बाहेर टाकण्यासाठी होता.
सेलमध्ये स्वयंचलित दिशा दर्शक होते तसेच समुद्रातून गोव्याला जाणाऱ्या मार्गाची परिपूर्ण माहिती संगणकात स्टोअर केलेली होती. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे बोटीवरचे शीड फिरवावे लागत होते.
आज वारा बारा नॉटिकल मैल वेगाने वाहत असल्यामुळे, बोट प्रचंड हेलकावे खात होती. बोटीवर व्यवस्थित उभे राहणे सुद्धा मुश्किल होते.
बोट लागणे, हा प्रकार माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अनुभवला. सकाळी केलेला सर्व नास्ता पोटातून पाण्यासकट बाहेर आला. सर्व आतड्या पिळवटून निघाल्या. या प्रकारामुळे दुपारी काहीही जेवण न घेता मी फक्त ज्यूस आणि ताक प्यायलो. थोड्याच वेळात ते सुद्धा
चूळ भरल्यासारखे बाहेर आले. संध्याकाळच्या वेळी संत्र खाल्ले आणि पोटाला आराम पडला. आता हलके हलके वाटत होते.
या दरम्यात सेल बोटीवरील सर्व ऍक्टिव्हिटी टंकसाळे बाबा, राजेश आणि अनंत यांनी दिलीपच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या. सेल बोट चालविताना मासेमारी आरमार आणि त्यांची जाळी यांचे अतिशय काटेकोरपणे निरीक्षण करावे लागत होते. टॅकिंग किंवा जायबिंग मध्ये (वाऱ्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने) सेल चालविण्याची दिलीपची सरांची अदाकारी, हिऱ्याला पैलू पडणाऱ्या कसबी कलाकारासारखी नजाकतदार होती.
संध्याकाळी थंड वारे सुरू झाले. आता भर समुद्रातून सेलबोट प्रवास करीत असल्यामुळे किनाऱ्यावरील डोंगरच दिसत होते. अलिबाग जवळचे खांदेरी उंदेरी किल्ले दुपारीच ओलांडले.  मुरुड जंजिरा  पार करताना संध्याकाळ झाली होती.
सायंकाळच्या सूर्याच्या संधीप्रकाशात राजेश आणि मी बोटीच्या पुढील भागात डेकवर आलो. सेलबोटीच्या भल्यामोठ्या पडद्याच्या बॅगराऊंडवर आता फोटोसेशन सुरू झाले. अंतरा सतत हलत असल्यामुळे एका हाताने दोर पकडून, तोल सांभाळत फोटो काढणे म्हणजे एखाद्या स्टंट चित्रपटात काम करण्यासारखे होते.

पश्चिमेला सागराच्या क्षितीजाला शिवणाऱ्या सूर्याचे मनोहारी रूप मी आणि राजेश डोळ्याच्या कॅमेऱ्याने मनाच्या गाभाऱ्यात साठवत होतो. चारही बाजूला क्षितिज आणि हेलकावे खाणारी अंतरा,  अंतरंगात सामावून गेली होती. किनाऱ्याला लाटांसह खळखळाट करणारा सागर, किनाऱ्यापासून दूर शांत, ध्यानस्थ संतासारखा भासत होता.
सोनेरी प्रकाशाच्या प्रभा आसमंतात भरून, सागरावर परावर्तित होत होत्या. अशा प्रसंगी मनाच्या अंतरंगाचा ठाव घेण्याची उर्मी उफाळून आली. राजेश आणि मी ध्यानस्थ झालो ... त्या हलणाऱ्या डेकवर.
अंतरावर;  अंतरंगात डोकावणे म्हणजे सागराच्या अथांगपणाचा ठाव घेणे होते.   तासभर कसा गेला कळलेच नाही.

सूर्य मावळताना एक विहंगम दृश्य नजरेस भावले. पूर्वेकडे चंद्राचा उदय आणि पश्चिमेकडे सूर्यास्त. सूर्याच्या सोनेरी छटांनी पांढराशुभ्र चंद्रसुद्धा आरक्त झाला होता. होळी पौर्णिमा दोन दिवसांवर होती त्यामुळे पूर्ण गोलाईकडे झुकलेला त्रयोदशीचा गोरागोमटा चंद्रमा;  सुर्यप्रभेमुळे एखाद्या शडोषवर्षीय तरुणी प्रमाणे लाजून लालेलाल झाला होता.

निसर्ग भरभरून देतो निरपेक्षपणे, मग मानव ती दानत ठेवतो काय. मी माझ्या मनाला प्रश्न केला;  ध्यानस्थ अवस्थेत.  उत्तर आले: सामावून जा निसर्गात!  याच निसर्गाकडून दातृत्व मागून घे. भरभरून देण्यासाठी.
थंड वारे वाहू लागले होते.  बाबांची हाक आली, 'लवकर खाली या'. अंतरावरचा हा अविस्मरणीय अनुभव मर्मबंधातली ठेव होती.
अथांग सागरातील शिडाच्या नावेवरची आजची पहिली रात्र होती. नितळ चंद्रप्रकाशात सागराच्या लाटा पाचूसारख्या चमचम करीत होत्या. कमांडर दिलीप यांनी सप्तर्षी, ध्रुव तारा, शुक्र आणि गुरू ग्रहांची तसेच इतर तारकांची माहिती दिली. सेलबोटीवरून ग्रह ताऱ्यांचे दर्शन म्हणजे संगीत-नृत्याची मैफिल होती. नभांगण डोलतेयं की बोट हलतेयं ह्याचा भ्रम व्हावा.
कमांडर दिलीप आणि सुचेता आता आळीपाळीने बोटीची धुरा वाहत होते. आम्ही चौघे आलटून पालटून त्यांच्या सूचनांचे पालन करीत होतो.
या सफरीच्या अनुषंगाने कमांडर दिलीप दोंदे यांचा खूप जवळून सहवास मिळाला. त्यांची ऐतिहासिक सागर परिक्रमा आणि त्या बाबतचे अनुभव या बाबत संवाद साधता आला. अतिशय साधे आणि निरासक्त व्यक्तिमत्व, निसर्गावर असलेले अथांग प्रेम;  या वरून जाणवले की हा माणूस सागरासाठीच जन्माला आला आहे.

परमेश्वराने प्रत्येक माणसाला विशेष व्यक्तिमत्व बहाल केले आहे. ज्याने ते जाणले, अंगिकारले तोच असामान्य कामगिरी करतो, याची जाणीव कमांडर दिलीप दोंदेच्या कर्तृत्वाने समजते.

पृथ्वी प्रदक्षिणेचे प्रचंड काम केल्यावर  गर्वाचा लवलेशसुद्धा जाणवला नाही. यातच त्यांची महानता आहे. सर्व सामान्यांना सुद्धा शिडाची बोट, सागर सफर याची माहिती व्हावी म्हणूनच नेव्हीतून सेवानिवृत्त झाल्यावर, त्यांनी स्वतःची सर्व पुंजी अंतरा बोटीवर खर्च केली आहे. सागराबद्दलचे सर्व भ्रम दूर होऊन जनमानसात ह्या साहसी खेळाची आवड निर्माण व्हावी, हीच त्यांची इच्छा आहे.
रात्री सेल बोट ऑटोवर असल्यामुळे समोरून येणारे मोठे शिप्स, मासेमारी जहाज, ट्रॉलर यांच्या वेगाचा अंदाज घ्यावा लागत होता. मासेमारीच्या दहा बारा बोटी एकत्रित जाळी टाकून मासेमारी करतात. त्या जाळ्यांचा अंदाज घेऊन नाव पुढे पुढे न्यावी लागत होती. रात्रीच्या वेळी मासेमारी करणारे ट्रॉलर्स एकत्रित रिंगण करून जाळी टाकतात. त्या जाळ्यांची वरील टोके चमचम करतात, ते त्याला बांधलेल्या फ्लूरोसंट डब्यांमुळे.  या डब्यांच्या मागोवा घेत, सेलबोटला हाकारणे डोळ्यात तेल घालून करावे लागत होते.
जी पी एस सिस्टीममुळे समोरील बोटीचा वेग, दिशा, अंतरापासूनचे अंतर रडारवर दिसत होते. त्या अनुषंगाने सेलबोटीला दिशा देण्याचे काम, सहाय्यक कप्तान सुचेता मॅडम सुद्धा अतिशय सराईतपणे करत होत्या.  या रात्र सफरीत गाण्यांची मैफिल सुद्धा जमली.

त्यानंतर गप्पांची सुरुवात झाली.  'तुम्ही जग प्रवास केलात, त्या बोटीचे नाव  *म्हादेई*  हे गोव्यातील मच्छीमारांच्या देवी वरून दिलेय', याचा उल्लेख तुमच्या  *"फर्स्ट इंडियन"*  पुस्तकात आलाय. 'मग या बोटीचे नाव  *अंतरा*  कसे दिले?',  मी दिलीप सरांना विचारले.
'गाण्यात पहिला मुखडा असतो, त्या नंतर अंतरा येतो,  म्हादेई माझ्या सागर संगीत सफरीचा *मुखडा* होती, तर माझ्या निवृत्ती नंतर आणलेला सागर सफरीचा हा *"अंतरा"* आहे, गालात हसून कमांडर दिलीप सर उत्तरले.

     एव्हढ्या प्रचंड मोठ्या भारत वर्षात तुमच्या अगोदर कोणीच कशी सेलबोटीतून जग परिक्रमा केली नाही?   हा प्रश्न त्यांना सर्व ठिकाणी विचारला गेला होता. त्या मुळेच कमांडर दिलीपना  सेलिंग हा साहसी क्रीडा प्रकार आता तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे. पूर्वीच्या काळात सागर ओलांडून जाणें निषिद्ध मानले जायचे. त्यामुळे असे साहस कोणी केले नसावे.
*जगाची सफर त्यांनी अमावास्येला सुरू केली. त्या बद्दल त्यांच्या आईने सांगितले होते,  " प्रत्येक दिवस शुभ दिवस असतो". सेल बोटीने माझा मुलगा जगाची परिक्रमा पार करणारच, हा आपल्या मुलावर असलेला प्रचंड विश्वास कमांडर दिलीपने सार्थ केला.*
म्हादेई या शिडाच्या बोटीने 19 ऑगस्ट 2009 रोजी मुंबईहुन एकट्याने सुरू केलेली जगाची सागर सफर 19 जून 2010 मध्ये त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. या बद्दल भारत सरकारने त्यांना  *शौर्यचक्र*  देऊन गौरविले आहे.
दिलीप सरांनी त्यांचे *" सागरी परिक्रमेचा पराक्रम"* हे पुस्तक भेट दिले होते. त्या अनुषंगाने आम्ही काही प्रश्न दिलीप सरांना विचारले. रात्री कडक कॉफीचे घुटके घेत त्यांनी खुमासदार उत्तरे दिली.

"भरती-ओहोटी समुद्र किनाऱ्याला असते खोल समुद्रात त्याचा काहीही परिणाम जाणवत नाही. समुद्रातील अंतरप्रवाह आणि वाहणारे वारे याचा सेलबोटीच्या वेगावर परिणाम होतो." हे दिलीप सरांनी सांगितले.

दुसरा दिवस उजाडला तेव्हा आम्ही रत्नागिरी पार केले होते. सकाळी बाबांनी आणलेले घारगे, पापड्या राजेशने आणलेल्या पुरणपोळ्या दाभोलकरांचे ठेपले आणि कंदापोहे नास्ता होता.  इन्स्टंट चहा-कॉफीचे डेकवर उभे राहून घोट घेणे आणि सागराच्या लाटा न्याहाळणे यात वेगळीच नशा होती. चारही बाजूला समुद्रपार दिसणारे गोलाकार  क्षितिज आणि फक्त अंतरा बोट;   जणू काही पृथ्वीच्या मध्यावर आम्ही आहोत असेच वाटत होते.  अशा वेळी मन शांत होते आणि निसर्गाची वेगवेगळी रूपे मनपटलावर उमटतात.

वाऱ्याच्या दिशेप्रमाणे सुकाणूची डिगरी रडारवर बदलावी लागत होती. गेली दोन वर्ष आम्ही गोव्यात ज्या सेलबोट चालविल्या त्या मॅन्युअल होत्या. प्रत्यक्ष वाऱ्याच्या गती आणि दिशेप्रमाणे शिडांची दिशा सुकाणू द्वारे बदलावी लागत असे. अंतरामध्ये ही जबाबदारी संगणकामार्फत केली जात होती. मुख्य काम म्हणजे समोरून बाजूने येणाऱ्या बोटी आणि मासेमारी जाळी यांच्याकडे लक्ष ठेवणे. समुद्रात असणाऱ्या छोट्या टेकड्या, खडक;  त्या पासूनचे अंतर याची इत्यंभूत माहिती समोतील क्रिनवर मिळत होती. त्यामुळे प्रत्यक्ष सुकाणू धरून बोट चालविण्याची आवश्यकता नव्हती.
उन्हे चढायला लागली तशी वाऱ्याने दिशा बदलली आणि सेल जाईब करावे लागले.  समुद्राची खळखळ वाढली होती.
इतक्यात समुद्राच्या पृष्ठभागावर शेपटीच्या आधारे धावणारा/ उडणारा  मासा दृष्टीस पडला. या समुद्र पृष्ठावरील माशांना पकडण्यासाठी सीगल पक्षांचा  चिवचिवाट सुद्धा मनमोहक होता. ऑस्टिन रिडले कासवाचे दर्शन झाले. ही कासवे हरिहरेश्वर जवळच्या आंजर्ले, हर्णे बंदरावर अंडी घालण्यासाठी  जातात.
वाऱ्याची गती वाढल्यामुळे छोटे शिड फडफडत होते तर मोठ्या शिडामधून  बुम, बुम आवाज संगीत जल सफरीचा अंतरा सुरू झाल्याची जाणीव करून देत  होता.  दोन डॉल्फिन सुद्धा अंतराच्या भोवती आपली कलाकारी दाखवत होते. त्यांचे समुद्रामध्ये लयबद्ध उद्या मारणे एखाद्या कसरतपटूला लाजवेल असे होते. हे सगळं नाविन्यपूर्ण होते.
दुपारच्या जेवणा नंतर राजेश आणि मी आंघोळ करायचे ठरविले. चालत्या अंतराच्या मागच्या रेलिंगवर आम्ही दोघे बसलो कमांडर दिलीप सरांनी पंप चालू करून पाईपद्वारे समुद्राच्या पाण्याचा वर्षाव आम्हा दोघांवर सुरू केला. चालणाऱ्या बोटीतून पाय समुद्रात सोडून डोक्यावर समुद्र घेणे ही पर्वणीच होती. खूप वेळा किनाऱ्यावर सुमुद्रस्नान केले आहे. पण आजची,  नितळ समुद्रातील आंघोळ बेधुंद करणारी होती.
सायंकाळी पाचच्या दरम्यात मालवण किनारा दिसू लागला. त्याच्याच बाजूला दाभोलकरांचे भोगावे गाव आहे.  येथेच चिपी विमानतळ सुद्धा तयार होतंय.
किनाऱ्यावरील चमचमणाऱ्या दिव्यांच्या रांगा आकाशातील ताऱ्यांशी स्पर्धा करीत होत्या. आता महत्वाचे लक्ष होते; वेंगुर्ला रॉक पार करण्याचे. मालवण परिसरातून मासेमारी करायला निघालेल्या बोटी, त्यांची जाळी  चुकवून समुद्रात घुसलेला वेंगुर्ला रॉक पार करायचा होता. वाऱ्याच्या गतीमुळे तसेच आंतरप्रवाहामुळे अंतरा  रॉकच्या जवळ जवळ जात होती.  अतिशय थंड डोक्याने आणि प्रचंड आत्मविश्वासाने कमांडर दिलीप सेल हाकारत होते.  अल्ट्रा साउंड सिस्टीममुळे रॉक पासूनचे अंतर समजत होते. निव्वळ पाचशे फुटावरून अंतरा वेंगुर्ला रॉक पार करीत होती. सायंकाळी सातच्या दरम्यान वेंगुर्ला रॉक पार झाला आणि आम्ही सर्वांनी जल्लोष केला.
एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सुरू झाली खाद्य मैफिल.  स्मोक चिकन तंदुरी,  हर्ब चिकन तंदुरी, वर पुरण पोळी आणि साजूक तूप सोबत अँप्पल ज्यूस फर्मास खादीची चळवळ सुरू झाली.
गोव्यावरून मुंबईला प्रवासी वाहतूक करणाऱ्या *आंग्रीया* जहाजाचे दर्शन झाले. पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चंद्राचा प्रकाश आसमंतात परावर्तीत होत होता. मध्ये मध्ये पुनवेचा चंद्र ढगाआड लपंडाव  खेळत होता. त्यावेळी त्याच्या प्रकाशरेषा अंतरावर आम्हाला न्हाऊ घालत होत्या.
आता आळीपाळीने जागायचे होते. दिलीप सरांशी आमच्या गप्पा सुरू झाल्या. वाचन, गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे हे त्यांचे छंद. तर बोटीवर त्याचे प्रचंड प्रेम. टंकसाळेबाबांनी बोटीवर असलेल्या सर्व सेफ्टी डिव्हाईस बद्दल माहिती जाणून घेतली. गप्पा मारताना सुद्धा दिलीप सरांचे लक्ष पुढच्या टप्प्याकडे होते. भर रात्री तेरेखोलची खाडी पार करून अंतराने गोवा हद्दीत प्रवेश केला होता.
वाऱ्याची गती मंदावली होती, त्यामुळे सेलबोट संथपणे मार्गक्रमण करीत होती. पहाटे पहाटे वातावरण आल्हाददायक आणि थंड होते.
सहा वाजता टकटकीत उजाडले. सकाळच्या नाश्त्याला मल्टीग्रेन  ब्रेड,  भुर्जी,  सॉस,  घारगे, ठेपला हॅजलनट कोल्ड कॉफी असा बेत होता.
आता डोनापावला बंदरावर पोहोचण्याची वेळ जवळ येऊ लागली, तसे मन उल्हसित होऊ लागले. दिलीप सरांचा सहवास संपत आल्याबद्दल मन थोडे खट्टू सुद्धा झाले.
गोव्याच्या राजभवनाच्या अलीकडेच दोन्ही शीड गुंडाळण्याचे काम पूर्ण केले. आतील सामानाची आवराआवर केली. राजभवन ओलांडून डोनापावला बंदरात दुपारी अडीच वाजता अंतरा बोट शिरली.
मुंबई ते गोवा, शिडाच्या नावेने केलेली  एक आगळी वेगळी साहसी सागर सफर,  विक्रमवीर कमांडर दिलीप सरांच्या सहवासात पूर्ण झाली होती. जग प्रवासाच्या छोट्या सागर सफरीची झलक माझ्या अनुभवात सामील झाली होती.
*सतीश विष्णू जाधव*