हेमंत सामंत : भ्रमंतीच्या वाटेवर भेटलेला एक ‘अनसंग हिरो’ दि. २६ सप्टेंबर २०२६
काही माणसं आपल्याला भेटतात आणि त्यांच्याशी बोलून झाल्यावर लक्षात येतं... अरे, आपण एका माणसाशी बोललो की चालत्या-बोलत्या ग्रंथालयाशी...
हेमंत हा त्यापैकीच एक...
त्याच्याशी गप्पा मारताना सुरुवात पुस्तकापासून झाली, मग स्वातंत्र्यलढ्यावर पोहोचली, तिथून पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा, स्वातंत्रवीर सावरकर, इंडिया हाऊस असा प्रवास करत अचानक एखाद्या गावातील चुलीवरच्या जेवणापर्यंत आली...
मध्येच पाच-सहा राज्यं, दोन-चार लेखक, काही सायकलस्वार, एखादं विद्यापीठ आणि एखादं विस्मृतीत गेलेलं ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व सहज भेटून गेलं...
हेमंत याची खरी ओळख एका पदाने किंवा व्यवसायाने करून देणे म्हणजे समुद्राला ‘पाण्याचे मोठे तळे’ म्हणण्यासारखे होईल...
त्याच्यात लेखक आहे, संशोधक आहे, शिक्षक आहे, शिक्षणतज्ज्ञ आहे, भ्रमंती करणारा भटक्या आहे, इतिहासाचा शोधक आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणसांना जोडणारा एक विलक्षण माणूस आहे...
हेमंतने मराठी वर्तमानपत्रातील लेखनातून अनेक विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा लोकांसमोर आणल्या. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांच्या निमित्ताने त्याने ‘नवशक्ती’मध्ये ७५ लेखांची मालिका लिहिली.
इतिहासाकडे जिवंत अनुभवांच्या दृष्टीने पाहणाऱ्या हेमंत याच्या ‘भारतीय स्वतंत्रता आंदोलन की अनकही कहानियां’ या पुस्तकाने उल्लेखनीय साहित्य हा मान मिळवला आहे.
या पुस्तकाला मुंबईच्या वंदना प्रकाशन तर्फे ‘आशीर्वाद पुरस्कार–2024’ ने सन्मानित करण्यात आले. संकीर्ण ऐतिहासिक अनुवाद या साहित्य प्रकारातील या पुस्तकाचे हिंदी भाषांतर डॉ. मीना श्रीवास्तव यांनी केले आहे...
या लेखमालेची खरी खासियत म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील मुख्य प्रवाहासोबतच, छोट्या-छोट्या गावांत उमटलेल्या प्रेरणादायी पाऊलखुणांचा त्याने घेतलेला शोध... त्या गावांतील माणसं, त्यांचं धैर्य, त्याग आणि स्वातंत्र्याच्या चळवळीतील योगदान हेमंतने आपल्या लेखणीतून प्रकाशात आणलं...
इतिहासात काही नावं मोठ्या अक्षरात लिहिली जातात. काही नावं मात्र इतिहासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर, पेन्सिलीने लिहिल्यासारखी राहून जातात...
हेमंत अशाच नावांच्या शोधात फिरत असतो... म्हणूनच त्यांच्या कथांमधील नायक ‘अनसंग हिरोज’ आहेत.
एखाद्या छोट्याशा गावाने स्वातंत्र्यलढ्यात केलेले योगदान असो, साताऱ्याचे पत्री सरकार असो किंवा परदेशात भारताच्या स्वातंत्र्याची ज्योत जिवंत ठेवणारे कार्यकर्ते असोत... हेमंत त्या कथांना पुन्हा प्रकाशात आणतात.
इतिहास म्हणजे जिवंत माणसांची प्रेरणादायी गाथा आहे... ही गोष्ट हेमंतच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवते...
त्यांच्यासाठी इतिहास म्हणजे पुस्तकातील तारीख, सन आणि नावांपलीकडे जाऊन त्या काळातील माणसांचे विचार, ध्येय, धैर्य, कर्तृत्व आणि देशासाठी त्यांनी घडवलेल्या प्रेरणादायी कार्याची जिवंत गाथा आहे...
इतिहास म्हणजे माणसं... त्या स्वतंत्र सैनिकांची स्वप्नं, त्यांचे धाडस, त्यांचे निर्णय, त्यांची चूक-बरोबरची धडपड आणि काळाच्या पुढे जाऊन त्यांनी केलेले काम...
पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, इंडिया हाऊस, मादाम कामा, मदनलाल धिंग्रा, स्वातंत्रवीर सावरकर अशा व्यक्तिमत्त्वांच्या संदर्भातून ते इतिहासाकडे पाहतात तेव्हा इतिहास अचानक आपल्या समोर जिवंत होतो...
मादाम कामांसारख्या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास सांगताना त्यांच्या लेखणीतून एक महत्त्वाची जाणीव पुढे येते... मोठ्या इतिहासामागे असंख्य छोट्या भूमिका असतात...
कोणी पत्र लिहितं... कोणी संदेश पोहोचवतं... कोणी ध्वज तयार करतं... कोणी एखाद्या तरुणाला दिशा देतं... आणि मग त्या छोट्या कृतींचा इतिहासाच्या प्रवाहावर मोठा परिणाम होतो...
स्वतः फिरणारा आणि दुसऱ्यांना फिरवणारा माणूस... हेमंतची भ्रमंती ऐकताना ही गोष्ट लक्षात येते... त्यांने भारत पाहिलेला आहे, पण ‘पर्यटकाच्या खिडकीतून’ नाही तर गावात राहून, लोकांना भेटून, त्यांच्याबरोबर जेवून, त्यांच्या संस्कृतीत मिसळून भारत समजून घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे...
शनिवार-रविवार मुंबईत राहण्यापेक्षा कुठल्यातरी गावाच्या वाटेवर निघून जाणे त्याला अधिक आवडते.
फाईव्ह स्टारमध्ये राहण्याची सवय असलेला हा माणूस टपरीवरच्या चहातही तितकाच रमतो आणि वनभोजनातही... यालाच म्हणतात खरी भ्रमंती...
कारण पर्यटनात आपण ठिकाणं पाहतो; भ्रमंतीत आपण माणसांना भेटतो...
स्वतःची भटकंती आणि इतरांच्या प्रवासाची काळजी हा त्याचा आणखी एक सुंदर पैलू आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या प्रवासात तो स्वतःचा अनुभव ओततो...
एखादा सायकलस्वार लांब मोहिमेवर निघाला, तर हेमंत त्याला फक्त ‘ऑल द बेस्ट’ म्हणत नाही.. त्याच्यासाठी रस्ता शोधतो... माणसं शोधतो... गावातील संपर्क आणि राहण्याची व्यवस्था कोण करेल हे पाहतो...
त्याला स्थानिक व्यक्तींशी जोडून देतो... आणि सायकलस्वार किंवा प्रवासी गावात पोहोचेपर्यंत त्याच्या स्वागतासाठी माणसं तयार असतात...
एका लेखकाच्या दीर्घ प्रवासात हेमंतने सिंधुदुर्गपासून गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रापर्यंत संपर्कांचे जाळे उभे केले. एखाद्या गावात वीस-पंचवीस माणसं स्वागतासाठी उभी केली... महाविद्यालयात त्याचा व्याख्यानाची व्यवस्था केली...
हेमंत स्वतः प्रवास करतो... पण त्यांच्यामुळे इतरांचाही प्रवास समृद्ध होत असतो...
त्याची शिक्षण क्षेत्राशी चार दशकांची असलेली ओळख अत्यंत विलक्षण आहे... अनेक पदव्या, विविध विषयांचा अभ्यास, लेखन आणि शिक्षण क्षेत्रातील काम यामुळे त्यांचा अनुभव अतिशय व्यापक झाला आहे.
शिक्षणशास्त्रावर त्यांची सहा पुस्तकं आहेत. हजारो शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींशी त्याचा संबंध आहे. भारतातील सुमारे १९०० शाळांशी संबंधित कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि अनेक प्राचार्य घडवण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग राहिला आहे...
इथे गंमत अशी की, शिक्षणशास्त्राचा पारंपरिक विद्यार्थी नसतानाही शिक्षणशास्त्रावर पुस्तकं लिहिणारा हा माणूस स्वतःच्या अनुभवातून शिक्षणविश्वाचा सखोल अभ्यास करून, त्या अनुभवाला अभ्यासपूर्ण लेखनाची सुंदर जोड देणारा लेखक आहे.
पुस्तकातून ज्ञान मिळतं... पण माणसांतून शहाणपण मिळतं... आणि हेमंतने दोन्ही गोष्टींचा भरपूर अभ्यास केलेला आहे...
भ्रमंती म्हणजे त्यांच्यासाठी विद्यापीठ आहे... २००८ ते २०१३ या काळात त्यांनी जवळजवळ साडेपाच वर्षे भारतभर भ्रमंती केली... घरी परतायचं ते सामान ठेवायला आणि धुतलेले कपडे घ्यायला...
हे ऐकताना साधारण माणसाला प्रश्न पडतो... मग याच घर कुठे आहे... बहुधा हेमंत यांच उत्तर असेल... "भारतभर"
देशभरातील मोठी शहरं, विविध संस्कृती, गावं, माणसं, संस्था, शाळा, शिक्षक, लेखक आणि इतिहासाच्या खुणा... या सगळ्यांनी त्यांच्या जीवनाच्या विद्यापीठात वेगवेगळे विषय शिकवले...
त्यांच्या अभ्यासक्रमाला सेमिस्टर नव्हते...परीक्षा नव्हती... पण अनुभव अमाप होता... आणि या सगळ्यामध्ये एक साधेपणा होता..
इतकं काम, एवढा प्रवास, एवढं लेखन आणि एवढा अनुभव असूनही त्याच्या बोलण्यात अहंकाराचा लवलेश जाणवत नाही...
गप्पा मारताना सहज एखाद्या गावातील माणसाबद्दल बोलतो...एखाद्या सायकलस्वाराबद्दल... लेखकाबद्दल उत्साहाने सांगतो...
विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकाची कथा सांगताना त्याच्या आवाजात आजही कुतूहल असतं...
आणि समोरचा माणूस कोण आहे यापेक्षा तो काय करतोय, काय निर्माण करतोय, त्याच्या कामामध्ये किती जिवंतपणा आहे... याला हेमंत महत्त्व देतो... हीच त्याच्या मोठेपणाची खरी खूण आहे...
अनसंग हिरो... म्हणजे ज्याच्या कामाची किंमत त्याच्या प्रसिद्धीपेक्षा मोठी असते... ज्याचं काम अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करतं, पण त्याचं नाव फार मोठ्या फलकावर दिसत नाही...
ज्याच्या संपर्कामुळे एखाद्या प्रवाशाला योग्य माणूस भेटतो... ज्याच्या संशोधनामुळे एखादा विस्मृतीत गेलेला स्वातंत्र्यसैनिक पुन्हा लोकांच्या स्मरणात येतो... ज्याच्या लेखणीमुळे इतिहासातील एखादं बंद दार उघडतं... ज्याच्या मार्गदर्शनामुळे एखाद्या विद्यार्थ्याला, शिक्षकाला, लेखकाला किंवा प्रवाशाला नवी दिशा मिळते.
अशा अर्थाने पाहिलं तर हेमंत सामंत हा नक्कीच एक ‘अनसंग हिरो’ आहे...
त्यांच्याशी पाऊण तास गप्पा मारल्या आणि भारताचा नकाशा अतिशय मोठा झाल्यासारखा वाटला... इतिहासाची पानं एकदम जिवंत झाली... आणि अजून किती माणसं भेटायची बाकी आहेत... असा एक सुंदर प्रश्न मनात उभा राहिला...
भ्रमंती करणारे अनेक असतात; पण आपल्या भ्रमंतीतून इतरांना दिशा देणारे फार थोडे असतात. हेमंत त्या थोड्या माणसांपैकी एक आहे... एक अनसंग हिरो आहे...
“हेमंतसारख्या अनसंग हिरोचा प्रवास पाहता येतो, त्याच्याकडून प्रेरणा घेता येते; आणि तो माझा मित्र आहे, ही आयुष्याच्या वाटेवर लाभलेली अभिमानाची अमूल्य शिदोरी आहे.”
(हेमंत सामंत...भ्रमणध्वनी:- 8104880214)
सतीश विष्णू जाधव
सायकलिस्ट