Tuesday, September 20, 2022

भेटली माऊली माझी....भेटला विठ्ठल माझा...

भेटली माऊली माझी....भेटला विठ्ठल माझा... 

शारदाश्रम शाळेतील १९७४,  एसएससी बॅच च्या आम्ही सर्व मित्रांनी शाळेतील शिक्षकांना भेटण्याचे नक्की केले. 
तो योग जुळून आला मित्र शरद पाटीलच्या अथक प्रयत्नाने. पुण्याजवळील औंधला स्थाईक झालेल्या तळवळकर बाईना भेटण्याचे नक्की झाले. मित्र गृपवर सर्वांना मेसेज पाठवला. 

आज सकाळी  एका गाडीतून माझ्यासह विकास होशिंग, कुणाल ठाकूर, कैलास गौड तर दुसर्‍या गाडीतून दिनेश नाडकर्णी, शरद पाटील, नागेश सोपारकर आणि संजय कोळवणकर पुण्याकडे निघाले. माधव केळकर थेट बाईंच्या घरी येणार होता.  गाडीत गप्पांना बहर आला. 

खालापूर टोल नाक्याजवळील फूड मॉल मध्ये प्रभु गौर गोपाल दासजी महाराजांची भेट झाली. 


शाळेतील गुरूंना भेटायला निघालो असताना आध्यात्मिक गुरुजींची भेट व्हावी हा  शुभ शकुन होता. तळवळकर बाईंना फोन लावला आणि तासाभरात पोहोचतोय... याची वर्दी दिली. उडपी फूड मॉल मध्ये  बटाटा वडापाव आणि इडली वडा सांबार वर ताव मारला. फक्कड चहा पिऊन औंधला निघालो. 

घराच्या खिडकीत आमची वाट पहात बाई थांबल्या होत्या... बाईंनी दरवाजा उघडला... शुभ्र पेहराव आणि गोर्‍यापान चेहर्‍यावर आनंदमय तेज मनाला एकदम भावले... सर्वजण नतमस्तक झालो... अठ्ठेचाळीस वर्षानंतर बाईंची भेट झाली होती... नव्वदीतील हसतमुख तळवळकरबाई क्षणार्धात आम्हा सर्वांना शारदाश्रम शाळेच्या आठवणींच्या वर्गात देऊन गेल्या... 


प्रत्येकाने आपली ओळख करून दिली आणि बाईं बरोबर व्यतीत केलेल्या शाळेतील आठवणी शेअर केल्या.  या वयात सुद्धा बाई अतिशय खुष होत्या... सकारात्मकतेचे  तेजोमय वलय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवले... सर्वजण भारावून गेलो होतो... भरभरून बोलत होतो... 

आज आम्ही विद्यार्थी झालो होतो... आवर्जून शाळेचा युनिफॉर्म घालून बाईंच्या घरी आलो होतो... तुम्ही सर्वजण आठवणीने भेटायला आलात या बद्दल त्यांना खूप खूप आनंद झाला होता... बाईंच्या घरातले सात्विक वातावरण गुरुप्रेमाच्या उत्कटतेने भारून गेले होते... शाळेतील गप्पांना बहर आला होता. मुख्याध्यापक गवाणकर गुरुजींची आठवण निघाली. शाळेत केलेल्या गमतीजमती, खोड्या... गुरुजींचा खाल्लेला मार... प्रत्येकजण भरभरून सांगत होता... ते निखळ आनंदाचे दोन तास जीवनाचा अत्युच्च ठेवा झाले होते. 


बाईंचा निरोप घेताना त्यांना सांगितलं... तुमच्या शंभराव्या वाढदिवसाला आम्ही सर्वजण पुन्हा भेटायला येणार आहोत. आनंदाचा प्रचंड साठा मनात साठवून बाईंचा निरोप घेतला... 

खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत...  ज्यांनी आम्हाला घडविले... त्यांचे प्रेम पुन्हा मिळविण्याची संधी परमेश्वराने आम्हाला दिली... 

त्या गुरुंचरणी आणि ईश्वरचरणी भावांजाली... 

चुकलो जिथं मी...  तिथं  दाविली तू वाट... 

तुझामुळं उमगलो... मीच मला थेट... 

सुखदुःख एकमेकां वाटलं वाटलं... 

भेटली गुरुमाऊली माझी....भेटला विठ्ठल माझा... 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे...