Thursday, August 22, 2019

सायकलिंग कृष्णसखा आणि मेघदूत

सायकलिंग, कृष्णसखा आणि मेघदूत

आज रविवार, सुट्टीचा दिवस. प्रशांतने सायकलिंग साठी झक्कास प्लान केला होता, घोडबंदर जवळील गायमुखला भेट देण्याचा. सकाळी कॅडबरी जंक्शन जवळ प्रशांत, लक्ष्मण, चिराग आणि किशोरीची भेट झाली.
वातावरण पावसाळी होते. सर्वजण सेफ्टी गियरसह तयारीतच होते. पाऊस सुरू झाल्यामुळे सावध गतीने सायकलिंग सुरू झाले. रविवार असल्यामुळे रहदारी कमी होती.

आज लक्ष्मण जोशातच होता. रप रप करीत हायब्रीड सायकल पळवत होता. गडबडीत तो मोबाईल घरी विसरला होता. चिरागची आज प्रथमच भेट झाली होती. हसतमुख चिराग प्रथम भेटीतच भावला. मला म्हणाला, काका तुमच्या सायकलिंग प्रवास वर्णनाच्या पोष्ट मी वाचत असतो.

कॅडबरी नाक्यावर येताना किशोरीच्या सायकलमधून  टेल लाईट रस्त्यावर पडली. मागे वळून आणे पर्यंत,  एक गाडी गेल्यामुळे टेल लाईटचा चक्काचूर झाला होता. परंतु तिच्या चेहऱ्यावरील हास्य तसूभरही कमी झाले नव्हते. प्रशांतने मला सकाळीच फोन केला, मी एकटाच येतोय का हे नक्की करण्यासाठी.

पाऊस थोडा कमी झाला आणि सर्वांनी सायकलींना वेग दिला. पाऊण तासातच गायमुखला पोहोचलो. सुखद वातावरण आणि कमी रहादरीमुळे घोडबंदरच्या फाउंटन हॉटेल पर्यंत सर्वानी जायचे ठरविले. आता घाट सुरू झाला. परंतू सर्व सायकलिस्ट "घाट घाट का पानी" प्यालेले असल्यामुळे, हा घाट म्हणजे हाताचा मळ होता. थोड्या वेळातच फाउंटन हॉटेलकडे पोहोचलो.

सर्वानी मिसळ पाव  आणि चहा नास्ता केला. बिल पाहिल्यावर आमचे डोळे पांढरे झाले. एक मिसळ पाव 130 रुपये आणि चहा 40 रुपये. वाटाण्याची उसळ आणि त्यात गाठीया, अतिशय बकवास मिसळ होती फाउंटन हॉटेल मधली.

आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून गोरेगाव पवई मार्गे राऊंड पूर्ण करायचा असे ठरले.  परंतु किशोरीला काही कामानिमित्त घरी लवकर जायचे होते,  म्हणून ती माघारी ठाण्याकडे निघाली. उर्वरित आम्ही चौघे बोरीवलीकडे सायकलिंग सुरू केले. चिराग खुश झाला होता. तर किशोरीची काळजी प्रशांतला लागली होती. लक्ष्मणला त्याच्या दोन मित्रांना भेटायचे होते. पण मोबाईल घरी विसरल्यामुळे त्याची पंचाईत झाली होती. प्रशांतने लक्ष्मणला विचारले, बायकोला फोन लावून देऊ काय!  पण लक्ष्मणाला बायकोचा मोबाईल पाठ नव्हता,  याचे प्रशांतला आश्चर्य वाटले. परंतू माझाकडे त्याच्या सर्व कुटुंबियांचे फोन नंबर होते. त्यामुळे लक्ष्मणने घरून फोन नंबर घेऊन मित्रांना फोन केले.

सायकलिंग सुरू करताच जोरदार पाऊस सुरू झाला. आम्ही काश्मीरा घाटामध्ये एका टपरी जवळ थांबलो, तसे हॉटेलमध्ये ग्लोव्हज विसरल्याचे लक्ष्मणच्या लक्षात आले. हॉटेलमध्ये शिरताना सायकल जवळ चष्मासुद्धा लक्ष्मण विसरला होता. आज त्याच्या विसराळूपणाचा दिवस होता.

काशीमिरा घाटात गाड्याची गर्दी होती त्यामुळे सायकल सावधपणे चालवाव्या लागत होत्या. पहिला मुक्काम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ घेतला. आत उद्यानात प्रवेश करण्यासाठी 58 रुपये प्रवेश फी झाली आहे. आम्ही प्रवेशद्वाराजवळ फोटो काढून पुढे प्रस्थान केले.

संजय गांधी उद्याना जवळच खास महिलांसाठी अत्याधुनिक प्रसाधन गृह बांधण्यात आले आहे आणि समोरील बोर्डावर लिहिले होते,  " महिला स्वच्छता गृह आणि सॅनिटरी नैपकीन मशीन". स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ही सर्व व्यवस्था स्थानिक आमदारांनी  केली होती. अतिशय सुंदर संकल्पना आहे ही.
कांदिवली जवळील ठाकूर कॉम्प्लेक्सच्या पुढे एका भिंतीवर "सत्यमेव जयते" असे मोठ्या अक्षरात लिहिले होते आणि ती भली मोठी भिंत हिरवे गवत आणि रंगीत झाडाझुडपांनी सुशोभित केली होती. तर आणखी पुढे एक्सपिरियन सिटी तर्फे मोठे भिरभिरणारे पंखे लावण्यात आले होते. आता मेट्रो प्रकल्पाबरोबर हायवेचा परिसर सुद्धा सुशोभित होत आहे. आणखी पुढे मातीच्या मडक्यांची मांडणी करण्यात आली होती. सुबक पद्धतीने रचलेल्या मडक्यांजवळ फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.  पुढे मालाड हायवे जवळ डोंगराचा काळा तुकतुकीत पाषाण आणि त्याच्या बाजूची हिरवळ आम्हाला फोटो काढायला खुणावत होती, तिचा मान राखून चिराग फोटो काढायला पुढे सरसावला.

मालाडला बहिणीच्या घरी आम्ही पोहोचलो. खूप आनंदाने आमचे स्वागत झाले. आम्ही सायकल घेऊन आल्यामुळे आणि राखी पौर्णिमेनंतर आवर्जून भेटल्यामुळे  बहीण खूप खुश झाली होती. माझा भाचा, त्याची पत्नी आणि दोन लहान मुले खूप आनंदली. एव्हढ्यात चिराग म्हणाला, गोरेगावला माझ्या आजोबांना सुद्धा भेटायला जाऊया.

बहिणीकडून आम्ही सर्व सायकलिंग करत, ओबेरॉय मॉल कडून दिंडोशीला चिरागचे आजोबा, चिंतामणराव देशपांडे साहेबांच्या घरी आलो.  नव्वदीच्या आजोबांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे, आज सकाळीच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. घरात आजी आणि मामी होत्या. तेव्हढ्यात घरात मामाची एन्ट्री झाली. देशपांडे आजोबांना जवळच्या हॉस्पिटलमध्येच भरती केले होते. मामी आम्हाला जेवणाचा आग्रह करीत होती, परंतु आम्हाला आजोबांना भेटायचे होते. मामा सोबत तडक रुग्णालयात गेलो. आजोबांची भेट घेतली.  नातू चिराग मित्रांसह ठाण्याहून सायकलवरून  भेटायला आल्याचा त्यांना खूप आनंद झाला होता. नाकाला ऑक्सिजनची नळी लावली होती, तरी सुद्धा आमची गप्पांची मैफिल रंगली. तुम्हाला शंभरी गाठायची आहे हे त्यांना सांगितले. मी सतीश जाधव मुंबई महापालिकेतून 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालोय,  हे सांगितल्यावर आजोबा म्हणाले मी सुद्धा महापालिकेतून हेड फार्मासिस्ट म्हणून 32 वर्षांपूर्वी रिटायर झालो आहे. आम्हा सर्वांचा अवतार पाहून त्या हॉस्पिटलमधील सिस्टर आणि इतर स्टाफ आम्हाला पाहायला आला होता. आम्ही आजोबांसह फोटो काढले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.

चिरागच्या मामाचा निरोप घेऊन आमची सायकल सफर आरे कॉलनी मधून पवईला निघाली. आता जवळपास 50 किमी राईड झाली होती. निघताना चिराग म्हणाला, " आजच्या राईडचा मला काहीच त्रास झाला नाही".  हे वाक्य ऐकल्यावर चिरागला सांगितले, म्हणजे तुला असे म्हणायचे आहे,  "आज राइडची खूप मजा आली". चिरागने सुंदर स्माईल दिले. सकारात्मक मानसिक दृष्टिकोन सतत आपल्या मनात असेल तर नकारात्मक विचार आपल्या जवळपास सुद्धा फिरत नाहीत. या सकारात्मकते मन खंबीर राहते, या मुळेच मी मनाली लेह राईड पूर्ण करू शकलो, हे चिरागला सांगितले.

आता आरे कॉलनी मधून सायकलिंग सुरू झाले. अतिशय हिरवेगार वातावरण होते आरे कॉलनीतील त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला.   न्यूझीलंड हॉस्टेल जवळील एका तलावात काही पर्यटक बोटींगचा आनंद लुटत होते. तेथेच पांढरेशुभ्र राजहंस पाण्यात विहरत होते. ह्या संपूर्ण परिसराला   "छोटा काश्मीर" म्हणतात.  लहानपणी शाळेच्या सहलीतून छोटा काश्मीरला आल्याच्या आठवणी ताज्या झाल्या.

पुढच्या वळणावर एका मैदानात खूप तामिळी स्त्रिया लाल पिवळ्या साड्या नेसून घोळका करून होत्या. जवळ जाऊन पाहिल्यावर अतिशय मनमोहक दृश्य दिसले. तीन मोठ्या परातीमध्ये देवीच्या मूर्तीना फुलांनी आरास सुरू होती. चौकशी करता समजले, तेथे शक्तीमातेची पूजा होणार होती. समोरील टेकडीवर शक्तीमातेचे मंदिर होते. येथूनच देवीची मिरवणूक निघणार होती.  बाजूलाच छोटी छोटी मातीची घंगाळी लावून त्यात समिधा रचून ठेवल्या होत्या. खाली कडूलिंबाचा पाला पसरवून ठेवला होता. या सर्व आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे फोटो काढले. तामिळनाडू मधून आलेले हे सर्व परिवार भारतीय संस्कृतीचे प्रतीक वाटले. भारतीय परंपरा सर्व जनसामान्यांना एकत्र आणन्यासाठीच निर्माण झाल्या असाव्यात.

आमची सायकल सफर आता पुढे निघाली. पवई तलावाला वळसा घालून आम्ही जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर आलो. आता विहार तलावाचा परिसर दिसू लागला. तुडुंब भरलेला विहार तलाव नेत्रसुख देत होता. या विहारच्या सुद्धा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना हम्टी डम्टीला दिलेली भेट.  महापालिका के ईस्ट विभागात कार्यरत असताना विहार ओव्हर फ्लोमध्ये  केल्याच्या धम्माल आठवणी जागृत झाल्या. तलावात बांधलेल्या मचाणावर काही लोक ऊन खात बसले होते. पुढे कबूतरखाना लागला, कबूतरांमध्ये घुसून फोटो काढले.

आता आम्हाला IIT पवईच्या मुख्य गेट जवळ जायचे होते. आमचा सायकालिस्ट मित्र मनोज भेटणार होता. मनाली लेह सायकलिंग मध्ये त्याची ओळख झाली होती. पुण्याहून मुंबईला आल्यावर मनोजने आठवणीने लक्ष्मणाला फोन केला होता. मनाली लेह सायकलिंग मध्ये मनोज आमच्या बरोबर होता. या सायकलिंग मध्ये आम्ही पांग कॅम्पला पोहोचल्यावर वडिलांची तब्बेत बरी नसल्याचा निरोप आल्यामुळे, मनोजला लेह सफर अर्धवट सोडून विमानाने पुण्याला जावे लागले होते. त्यामुळे पुढील वर्षी हीच सायकल सफर पुन्हा करायची, असा त्याने संकल्प केला होता.

IIT पवई समोरील लक्ष्मी हॉटेल मध्ये मनोज आणि त्याचा सायकालिस्ट मित्र निनादची भेट झाली. आमचे दुपारचे जेवण मनोज आणि निनाद बरोबर झाले.  हॉटेल मध्ये जेवताना पुढील सायकलिंग प्लान बाबत चर्चा झाली. मनोज उटी सायकलिंग करतोय, तर लक्ष्मण मुन्नार सायकलिंग करायच्या विचारात आहे. माझ्या डोक्यात मुंबई ते गोवा सायकलिंग कोस्टल रोडने करायचे आहे. प्रशांत बँकेच्या नोकरीत असल्यामुळे त्याच्या मनाची घालमेल होत होती. तर चिरागच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता सांगत होती, मला कधी असे लांब लांब सायकलिंग करता येईल. जेवणाचे बिल मनोजने दिले. पुढील फुल प्रूफ सायकलिंग प्लान बनविण्याची जबाबदारी मला देण्यात आली. 

मनोज निनादला निरोप देऊन आम्ही  पवई वरून विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्गावर आलो. येथे प्रशांत आणि चिरागला बाय बाय करून मी आणि लक्ष्मण घाटकोपरला पोहोचलो. पंत नगर मध्ये राहणाऱ्या लक्ष्मणच्या मित्राच्या घरी भेट देण्याचे ठरले. लक्ष्मण फुल पॅन्ट घालू लागला. आपण आहोत त्याच पेहरावात तुझ्या मित्राच्या घरी गेलो तर काय होईल, हे मी विचारल्यावर, आपल्याला या अवतारात पाहून मित्राच्या घरातले काय म्हणतील,  हा प्रश्न लक्ष्मणला पडला होता. "क्या कहते है लोग, ये सबसे बडा रोग".  चा किस्सा लक्ष्मणला सांगितला. त्यामुळे आम्ही दोघे सायकलिंग अवतारातच गायकवाड मित्राच्या घरी गेलो.

BARC मध्ये सिनियर सायंटिफिक अधिकारी असणारे गायकवाड साहेब मला  खुप भावले. ते त्यांच्या अतिशय मृदू आणि संयमित बोलण्यामुळे. वहिनींनी फक्कड चहा बनविला. चहा पिताना एक गोष्ट लक्षात आली, की अख्खे गायकवाड कुटुंब विपश्यना साधक आहेत. मुलगा यश ला आशीर्वाद देऊन पंत नगर मधून घाटकोपर मानखुर्द हायवेकडे आलो. तेथे लक्ष्मणची रजा घेऊन मी मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु केला.
आज मुंबईमध्ये गणपती आगमनाच्या मिरवणुका निघाल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. सायकलमुळे सर्व वाहनांचे अडथळे पार करून घरी लोअर परेलला सायंकाळी साडेचार वाजता पोहोचलो.

आजच्या सायकलिंगचे मुख्य वैशिट्य म्हणजे,  ठाणे ते मुंबई व्हाया घोडबंदर हे परिभ्रमण करताना, निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. इतकेच नव्हे तर आप्तजनांच्या घरी भेटी दिल्यावर मानवी जीवनातील वेगवेगळ्या पैलूंचे सुद्धा दर्शन झाले. सायकलिंग मुळे क्रांतिकारी बदल माझ्या जीवनात झाले आहेत. आता सायकलिंग एक छंद न राहता, नात्यांचा गुंता सोडविणारा कृष्णसखा आणि माझ्या विचारांना गती देणारा मेघदूत झाला आहे.


सतीश विष्णू जाधव




































2 comments:

  1. झकास वर्णन, सतीश सर

    ReplyDelete
    Replies
    1. नमिता, खूप छान वाटले तुझा अभिप्राय वाचून.

      तुझ्या सोबत सायककलिंग करायचे आहे

      Delete