Wednesday, February 5, 2020

*संजय कोळवणकर एक भारदस्त मित्र*

04  फेब्रुवारी 2020

*संजय कोळवणकर एक भारदस्त मित्र*

आज, परममित्र संजय कोळवनकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. माझ्या सोबत विजय, शरद आणि यशवंत हे तीन सायकालिस्ट मित्र होते. संजय आमची वाट पाहतच होता. ठाण्याच्या पारिजात सोसायटीमध्ये पटांगणात सायकल लॉक करून संजयच्या घरी आगमन झाले. प्रशस्त आणि नीटनेटक्या हॉलमध्ये प्रवेश केल्यावर मन प्रसन्न झाले. प्रतिभा वहिनीने आम्हा सर्वांचे आनंदाने स्वागत केले. 

संजयचा मुलगा संकेत कामावर नऊ वाजता निघतो. त्याची भेट घेण्यासाठी आम्ही पावणे नऊ वाजताच संजयकडे आलो होतो. संकेत तयारी करून हॉल मध्ये आला. आम्हाला नमस्कार करून तो कामाला निघाला. संकेत आय टी क्षेत्रात काम करतो.
मुंबई वरून सायकलिंग करत येऊर आणि तेथून ठाणे पूर्व एवढा प्रवास झाल्यावर सपाटून भूक लागली होती. गरमागरम इडल्या, चटणी आणि सांबर असा फक्कड न्याहारीचा बेत होता. त्या नंतर मसाले चहा आला. मन तृप्त झाले. 

इतक्यात संजयची मुलगी स्वातीचे आगमन झाले सोबत नातू शौर्य होता. आम्हाला पाहून शौर्य दरवाजातच थबकला.  स्वातीची सुद्धा ओळख झाली. तीला  सुद्धा कामावर जायचे होते.

"तुझे नाव काय शौर्य" असे शौर्यला विचारताच. मी "शौर्य कल्पेश फोंडे" असे चटकन शौर्य म्हणाला. अतिशय चुणचुणीत आणि आजोबांचा लाडका होता शौर्य.
नास्ता करतानाच माझे bpt मधील सायकलिस्ट मित्र यशवंत जाधव आणि संजयच्या गप्पा सुरू झाल्या. संजय कार्यकर्त्यांची तरुण पिढी तयार करतोय, हे ऐकून छान वाटले. संघटनेच्या अनुषंगाने त्याचे फिरणे होतेच, पण सहकुटुंब सुद्धा संजय फिरत असतो. फार्म हाऊसवर महिन्यातून एक फेरी असतेच. जवळच्या तलावात रोज अर्धा किमी पोहतो संजय. 

हो !  आणखी एक मस्त सवय संजयला आहे. तो बोलण्याच्या भरात एक डोळा मिचकाऊन समोरच्याला आपलेसे करतो. 

गप्पा मध्ये तासभर कसा गेला कळलेच नाही. आम्हा सर्वांना संजयने नवीन वर्षाची डायरी भेट दिली. संजय आणि प्रतिभाला माझ्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन आम्ही निरोप घेतला.
आम्हा सर्व सायकालिस्टना सी ऑफ करण्यासाठी संजय आणि शौर्य खाली पटांगणात आले होते. संजयची बिटवीन सायकल खालीच लॉक करून ठेवली होती. सायकलिंग सुद्धा सुरू करतोय हे आश्वासन संजयने दिले. 

सर्वांचा एकत्र फोटो काढून परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत सायकालिस्ट शरद म्हणतो, " आज खूप मोठ्या आसामीची ओळख झाली". या शब्दांनी मला माझ्या मित्राचा "संजयचा" खूप अभिमान वाटला.
*सायकलिंगने आणखी एक छान गोष्ट माझ्या जीवनात आणलीय. ती म्हणजे सायकलिंग करता, करता मित्रमंडळी, आप्तस्वकीय यांच्या घरी भेट देणे. व्हाट्स अँप फेसबुकच्या व्हर्च्युअल जगातून बाहेर पडून आपण जेव्हा एकमेकांना प्रत्यक्ष भेटतो, तेव्हा मैत्रीचा जिव्हाळा, आनंदाची देवाणघेवाण आणि कुटुंबातील इतर सदस्यांची ओळख यामुळे स्नेहभाव वृद्धिंगत तर होतोच आणि प्रेमाचे नाते अधिक दृढ होते.*


सतीश विष्णू जाधव


No comments:

Post a Comment