Friday, October 15, 2021

लडाख सायकलिंग भाग ३दि. ३१ जुलै ते ०२ ऑगस्ट

लडाख सायकलिंग भाग ३

दि. ३१ जुलै ते ०२ ऑगस्ट
सकाळी BRO कॅम्प मध्ये आलूपराठा आणि गरमागरम चहा मिळाला. सर्व BRO चे जवान आणि अधिकाऱ्यांचे आभार मानून चांगमार वरून राईड सुरू केली. जवान, जय भगवान देव आम्हाला सोडायला गेट पर्यंत आला होता. त्याच्या मनीचे भाव जाणले... गेट जवळ त्याच्या हातात सायकल देऊन एक राऊंड मारून यायला सांगितले... जय एव्हढा खुश झाला की , "वापस आते समय हमारे BRO कॅम्प मे जरूर रुकाना" असे प्रेमाचे आमंत्रण दिले... प्रसंगी वज्रापेक्षा कठोर होणारे हे आर्मीचे जवान, माणसांच्या सहवासाला किती आसुसलेले असतात याचा अनुभव आला.

एक किमी पुढे चांगमार गावाच्या वेशिजवळ आलो. येथे श्योक नदीच्या जोरदार प्रवाहाने एक छोटा पूल वाहून नेला होता. BRO ने तातडीने हा पूल बांधला होता. मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या ओढे आणि नाल्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दगड माती रस्त्यावर आणली होती. त्यामुळेच BRO ना रस्त्याची डागडुजी सतत करावी लागते. 

अर्ध्या तासात श्योक नदीला ओलांडणाऱ्या विशाल लोखंडी ब्रिज जवळ आलो. मागच्या वर्षी नदीला पूर आला तेव्हा जुना ब्रिज ढासळला होता. BRO ने आता तेथे नवीन लोखंडी पूल बांधून त्याचे नाव दुर्गा ब्रिज ठेवले आहे. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीमध्ये कोणताही पिलर न बांधता लोखंडी रोपच्या सहाय्याने हा झुलता ब्रिज बांधला आहे. या पुलाच्या मधोमध थांबलो... वाऱ्याच्या झोताबरोबर पूल हलत होता. आम्ही जणूकाही झोपाळ्यावरच बसलो होतो. पलीकडच्या बाजूला पुलाचे लोखंडी रोप कसण्यासाठी हिमालयाच्या कपारीत मोठमोठया भिंती बांधल्या होत्या. ह्या भिंतीचा दुहेरी फायदा होता. डोंगरावरून होणारी लँड स्लाईडींग अडवली जाणार होती. तसेच पुलाचे संरक्षण होणार होते. 

सकाळी ९  वाजता सुद्धा कडक ऊन जाणवत होते.  दोन्ही सायकली रस्त्यावर आडव्या करून संजयने रस्त्यावरच बसकण मारून हायड्रेशन ब्रेक घेतला. मागे असलेला बडा हिमालय आणि त्याच्या माथ्यावर भटकणाऱ्या ढगांमुळे एक छान पैकी लँडस्केप चित्र तयार झाले होते... संजयने सायकल आणि हिमालय याच्या लोकेशन वर कमरेवर हात ठेवून विजयी विराच्या अविर्भावात फोटो काढले.  दोन्ही हात पसरून निसर्गाला कवेत घेण्याचा आनंद काही औरच होता. 

ऊन, वारे, थंडी या सर्वांचा अनुभव एकाच वेळी घेत होतो. वातावरण अतिशय आल्हाददायक होते. दोन दोस्त एकदम मजेत आणि वेगात पेडलिंग करत होते. पाऊण तासात बोगडांगच्या  अलीकडे मिलिटरी "चेकपोस्ट ९" जवळ पोहोचलो.  येथे परमिट तपासले गेले. जवळच असलेल्या जवानांच्या कॅन्टीनमध्ये समोसा, जिलेबी आणि चहाचा आस्वाद घेतला. येथे बंगलोरहून  आलेल्या मोटरसायकलिस्ट सरोजची भेट झाली. जम्मू वरून निघालेला सरोज लेह मार्गे आज  तुरतुकला जाणार होता. संपूर्ण लडाख फिरून मनाली मार्गे चंदीगड पर्यंत राईड करणार होता. सोलो राईड हा त्याचा शौक आहे. असे निसर्गात रममाण होणारी माणसे " मै जिंदगीका साथ निभाता चला गया" अक्षरशः जीवन मजेत जगत असतात. 

एक छोटीशी घाटी चढल्यावर पोस्ट ९ चे वॉर मेमोरियल लागले. या ठिकाणी पाकिस्तान विरुद्ध १९७१ चे युद्ध झाले होते. आपली सीमा बोगडांग पर्यंत होती. या युद्धात तुरतुक आणि पुढे त्याक्षी पर्यंतचा भूभाग भारताने पादाक्रांत केला. हा  सियाचीनचा भूभाग  १२ हजार फूट उंचीवर आहे. मुख्य स्मारकाकडे जाताना सुद्धा धाप लागत होती. वाटेत बर्फावर चालणाऱ्या स्की-कार  वर पांढरे थर्मल घातलेल्या जवानांचे स्मारक होते.  युद्धात शाहीद झालेल्या आपल्या जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ हे शाहीद स्मारक बांधण्यात आले आहे. अशा दुर्गम ठिकाणी आपले सैनिक देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण समर्पण करतात... त्या शूर हृदयांना मानाचा मुजरा... सियाचीन वॉरीयर्स यांचे ब्रीद आहे, "Courage and Fortitude"  शहीद झालेल्या जवानामध्ये मराठा रेजीमेंटचे सुद्धा सैनिक आहेत. मराठी नावे वाचताना ऊर भरून आले.  अशा स्थळांना प्रत्येक भारतीयाने आवर्जून भेट द्यायला हवी. 

आता उताराचा रस्ता सुरू झाला. समोरून येणारे हेडविंड मागे ढकलत होते . एका बाजूला श्योक नदी तर दुसऱ्या बाजूला अक्राळविक्राळ हिमालय ... तासभराची राईड झाली आणि "रॉक फॉल" एरिया सुरू झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगडांचे ढीग पडले होते. त्यांना सुद्धा व्यवस्थितपणे रस्त्याच्या किनारपट्टीला रचून BRO ने कलात्मकता दाखविली होती. डोंगर कपारी फोडून रस्ते बनविले होते. त्यामध्ये सायकलिंग करताना प्रचंड आकाराच्या अजगराच्या जबड्यात जात आहोत असा भास झाला.

चढ उताराच्या रस्त्यावरून जवळपास दिड तास राईड केली. गराडी गावात मुसाभाईच्या "बाल्टि कॅफे" मध्ये पेटपूजा करायला थांबलो. चटपटीत बोलणाऱ्या मुसाभाईने पटकन ऑम्लेट  आणि चपाती नाश्ता दिला. मुसा म्हणाला "यहा का लोकल ब्रो धान का  "किसीर डोसा" जरूर खाना. हे धान्य गव्हासारखे पण राखाडी रंगाचे असते. येथील लग्नसमारंभात ब्रो चे पीठ उकडवून त्याचा "जान" हा पदार्थ बनवितात, त्याला मख्खन बरोबर खातात. 

मुसा बरोबर गप्पात आम्ही रंगलो. त्याचे दादाजी नदीवरचा मालाचा गंडोला (गराडी) ओढण्याचे काम करायचे. ती जागा दाखविली. त्यामुळेच या गावचे नाव गराडी पडले आहे. हे गराडी गाव मुसाच्या परिवारातील माणसांचे आहे. 
 
 मुसा त्याचा बगीचा दाखवायला  घेऊन गेला. जरदाळूच्या  बगिच्यात आम्हाला सोडले. तुम्ही हवे तेवढे जरदाळू खा... बरोबर सुद्धा न्या... याच बागेत सफरचंद अक्रोड आणि द्राक्षाची झाडेसुद्धा होती. संपूर्ण शेती सेंद्रिय खतापासून केली होती. मुसाने उन्हाळ्यात राहण्यासाठी बांधलेले बांबूचे घर सुद्धा दाखविले. बांबूच्या या घरात उन्हाळ्यात थंडावा असतो. त्याच्या शेतात कांदा, बटाटा, तौमेटो, कोबी, फ्लावर इत्यादी सर्व प्रकारच्या भाज्या पिकविल्या जातात. लेह बेरीचे झाड पाहिले. हे डायबिटीज वर उत्तम औषध आहे. त्याच्या बागेत होणारी डिलीशियस सफरचंद मिलिटरीचे अधिकारी घेऊन जातात.  अतिशय अप्रतिम आहेत ही सफरचंद...

 मुसाने माशांची फार्मिंग सुद्धा केली आहे. येथील नदीत मिळणारे ट्रोट माश्यांची मशागत चष्मेशाही मधून पाणी येणाऱ्या एक  छोट्या तलावात केली होती. जेव्हा गावात दावत असते तेव्हा या माशांचा फडशा पडला जातो. एका छोट्या गावात राहणाऱ्या मुसाचे हे पर्यावरण पूरक वैभव पाहिले की आपल्यापेक्षा किती तरी पट समृद्ध आहे याची जाणीव होते. या परिसरात मॅगपई पक्षी मोठया प्रमाणात दिसले. कावळ्याच्या प्रजातीतील पण शेपूट आणि पंखाच्या मधील भाग पांढरा असलेले पक्षी उडताना झकास दिसतात.
 
 वाटेत बोगडांग गाव लागले. येथे मशीनद्वारे गव्हाचे दाणे रोपापासून वेगळे केले जात होते. हे गाव पूर्वी POK मध्ये होते. येथील भाषा बाल्टि आहे. हा प्रदेश पूर्वी गिलगीट बाल्टिस्तानचा भूभाग होता. येथील लहान लहान मुले त्यांच्या सायकली सह आम्हाला साथ देत होते. 
 
येथून तुरतुक 7 किमी अंतरावर होते. वाटेत लँड स्लाइडिंगचा रस्ता लागला. संपूर्ण रस्ता दगडगोट्यांनी आणि वाळूनी भरलेला, त्यात ओढ्याचे वाहणारे थंडगार पाणी... यातून सायकल पेडलिंग करणे म्हणजे तारेवरची कसरत होती.
ती पूर्ण करत तुरतुकच्या वेशिजवळ पोहोचलो. "Well Come to Turtuk"या माईल्स स्टोनने आमचे स्वागत केले. येथे भारत सरकार टुरिझम खात्यातर्फे मोठे हॉटेल बांधले जात आहे. येथे जवळ विमानाची धावपट्टी सुद्धा तयार होते आहे. ज्या टुरिस्ट ना थेट नुब्रा व्हॅली मध्ये यायचे आहे त्यांना ही पर्वणी आहे. 

तुरतुक नाल्याजवळ पोहोचलो तेथे दिल्ली वरून कार घेऊन आलेले चार तरुण भेटले. सोबत आणलेल्या गॅस सीलेंडर वर ही मुले  मॅगी बनवत होती. मॅगी मध्ये आम्हाला पण सामील केले. लडाख मधील सायकल सफरीचे त्यांना अप्रूप वाटत होते.
 संजयने "कारपो होम स्टे" मध्ये राहण्याची व्यवस्था केली. रूमवर सामान टाकून उडन ब्रिज कॅफे मध्ये केशर चहा प्यायलो या सोबत मध सुद्धा देण्यात आले होते. अतिशय उत्साहवर्धक होती हा चहा. आता संध्याकाळ झाली होती म्हणून आणखी एक दिवस  तुरतुक मध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

सकाळीच तुरतुक मधील मॉनेस्ट्री पाहायला गेलो. संपूर्ण गावात मुस्लिम वस्ती आहे आणि त्यात उंच टेकडीवर ही बौद्ध मॉनेस्ट्री आहे. नाल्यावरील लाकडी पूल ओलांडून भर गावातून मॉनेस्ट्रीकडे जायचा रस्ता होता. पुढे जरदाळूच्या बगीचातुनच ही वाट जात होती. येथे जरदाळू म्हणजे रानमेवा होता. हवे तेवढे काढा आणि खा. टप्पोरे टप्पोरे जरदाळूने अर्धी सॅक भरली. साधारण दोन किमी चढाचा रस्ता पार करून मॉनेस्ट्री मध्ये पोहोचलो. १९७१ च्या युद्धात जेव्हा तुरतुक भारताचा भाग झाला तेव्हा येथे असलेल्या लामाने हे बौद्ध मंदिर बांधले. मंदिरातून  संपूर्ण तुरतुक गाव आणि बाजूने वाहणारी श्योक नदी चा परिसर अतिशय विहंगम दिसत होता. मंदिराच्या चारही बाजूला पवित्र पताका लावल्या होत्या. 

तुरतुक मधील प्रसिद्ध "याबगो राजवटीच्या" राजाच्या राजवाड्यात गेलो. आता ह्याला राजवाडा आणि म्युझियम असे स्वरुप आहे. सध्याचा राजा याबगो मोहम्मद खान यांची भेट झाली. १३ व्या शतकात याबगो राजवट उदयाला आली. तुरतुक हे गाव व्यापार उदिमासाठी अतिशय मोक्याचे ठिकाण होते. चारही बाजूला जाणार सिल्क रस्ता तुरतुक मार्गे जात होता. चीन, तिबेट, अफगाणिस्तान, रशिया आणि भारत यांना जोडणारा रस्ता येथूनच होता. बाल्टिस्तनात तयार होणारे रेशीम (पष्मीना) याच मार्गे सर्व देशात जात असे. त्यामुळे बाल्टिस्तनाचा याबगो राजा काही महिने तुरतुक मध्ये वास्तव्य करत होता. आता राजाचे वंशज तुरतुक मध्ये आहेत आणि त्याचे राज्य बाल्टिस्तान POK मध्ये आहे. मोहम्मद खान यांचे म्हणणे आहे की, गिलगीट बाल्टिस्तान अतिशय निसर्गरम्य प्रदेश असून; हा स्वतंत्र देश होता;  ना की तो काश्मीरचा भाग होता.  म्हणून त्याला POK न म्हणता POB म्हणायला हवे. म्युझियम मध्ये राजाचे भरजरी कपडे, आभूषणे, शस्त्रे, भांडी, फोटो सर्व पाहायला मिळाले. 
नास्ता करायला होम स्टे मध्ये आलो. आज दिदींने किसीर डोसा आणि समीक (दही मध्ये लोकल हर्बल घालून बनविलेली चटणी) आणि आमलेट तसेच गुडगुड चहा आणि साखरेचा चहा असा मस्त बेत होता. भरपेट किसीर डोसा खाल्ला. गराडीच्या मुसाची आठवण झाली. 

आता सुरू झाली सायकल राईड त्याक्षी गावाकडे... हे भारताच्या सीमेवरच गाव; तुरतुक पासून चार किमी वर आहे.  येथे मिलिटरी चेकपोस्ट आहे. चेकपोस्ट पासून त्याक्षी हे मूळ गाव येथून दिड किमीवर पहाडात आहे. पहाडी रस्ता पूर्णतः खड्ड्याखुड्ड्याचा आणि दुर्गम चढाचा होता. येथे दोन मोटरसायकलिस्ट भेटले त्यांनी त्याक्षी गावापर्यंत आम्हाला सोडले. गावातून एक किलोमीटर चालत गेल्यावर, एका शाळेत पोहोचलो. ती शाळा पाकिस्तानने बांधलेली आहे आणि आता भारतीय मुलं येथे शिकत आहेत. जवळच चहा नास्त्याचे निसर्गरम्य हॉटेल होते. समोर मोठी दरी त्या पलीकडच्या डोंगरावर एका बाजूला भारतीय बंकर तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी बंकर दिसत होते.  "बॉर्डर विव्ह कॅफे" हॉटेलवाल्याच्या प्रांगणात तिरंगा फडकत होता. तेथे जोरदार सिंहगर्जना केली...
"भारतमाता की जय", जी पाकिस्तानी बंकर पर्यंत ऐकायला गेली असेल.  हॉटेल मध्ये एप्रिकोट सूपचा स्वाद घेतला. खाली दरीत दिसणारी श्योक नदी भारत ओलांडून POK मध्ये जात होती. मनोमन इच्छा झाली... लवकरच हा POK भारताच्या अधिपत्याखाली यावा मग येथूनच सायकलिंग करत गिलगीट बाल्टिस्तान मध्ये जाता येईल. चेकपोस्ट पासून पुढे चार किमी वर थांग गाव आहे. परंतु ते टुरिस्ट साठी खुले झालेले नाही. 
त्याक्षी गावाची लोकवस्ती साधारण हजार भर आहे. येथील लोक सरकारी नोकरीत आहेत, तसेच आर्मीसाठी पोर्टर म्हणून काम करीत असतात. येथे आक्रोड, जरदाळू आणि सफरचंदाच्या बागा आहेत. आता बरेच टुरिस्ट या गावाला भेट देतात. येथे होम स्टे ची सुद्धा व्यवस्था आहे. गव्हाची शेती प्रमुख आहे. भारत POK सीमेवरील निसर्गरम्य गाव म्हणून याला आता बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. 

Pok मधील गिलगीट परिसरात K2 हे जगातील दोन नंबरचे उंच शिखर आहे. खरोखरच भारताचे हे अति उत्तरेकडचे टोक लडाखला जाणाऱ्या प्रत्येक भारतीयाने पाहिले पाहिजे. 

त्याक्षी गावातून खाली उतरताना मोटरसायकलने भारत भ्रमण करणारे यु ट्युबर किरण-सचिन दाम्पत्याची भेट झाली. सायकलिंग करत येथवर आलोय, यांचे त्यांना खूप अप्रूप वाटले. त्यांनी यु ट्यूब साठी छोटीसी मुलाखत पण घेतली. वळणावळणाच्या पहाडी रस्त्याने परतीची सायकलिंग सुरू झाली. आमचे एक सायकलिस्ट सहकारी डॉ. भगत तुरतुक ते कन्याकुमारी अशी सायकल सफर करणार आहेत. त्यानी ती सफर त्याक्षी पासून सुरू करावी... तेथील तिरंग्याला वंदन करून...

आज सायकलिंगच्या बरोबरीने ट्रेकिंग सुद्धा झाले होते. तुरतुक मध्ये आजचा मुक्काम होता. तसेच ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्यावर पुन्हा परतीचे सायकलिंग टाळण्यासाठी तुरतुक वरून कॅम्पर करायचे नक्की केले. या साठी गावात फेरफटका मारला. जरदाळू आणि सफरचंदाचा फार मोठा व्यापार तुरतुक गावातून चालतो.  लाकडी पुलावर फोटो काढले. 

कापरो हॉटेलची मालकीण बानू हिने घरातील मेहमान आहेत असेच समजून आमचे जेवणखाण आणि राहण्याची व्यवस्था केली. "आपके दोस्त आये तो यह रुकनेके लिये बोलना" अशी विनंती सुद्धा केली.  बानू दिदीने स्कॉर्पियो गाडीची व्यवस्था करून दिली.
सकाळी नास्ता करून, कादिरच्या स्कॉर्पिओ गाडीवर सायकल बांधून अघम पर्यंत प्रवास करणार होतो. गाडीची सफर सुद्धा एन्जॉय करत होतो. गराडी, हुंडर या गावातून जाताना सर्व आठवणी जागृत होत होत्या. दिस्किटला चहा साठी थांबलो येथे गराडी च्या मुसा भाईची भेट झाली.  सायकल शॉपीवाला सोनम ची आठवण झाली. लांबूनच मैत्रेय बुद्धाला नमन केले. खालसर वरून एक फाटा खरडूनगला मार्गे लेहला जातो तर दुसरा पेंगोंग सो कडे जातो.  येथे पोलिसांनी अडवले आणि पेंगॉन्ग रस्ता बंद असल्याचे सांगितले. अघम पर्यंत जाऊन पुढे सायकलिंग करणार आहे हे सांगितल्यावर सोडले. अघम ते श्योक रस्ता लँड स्लाइडिंग मुळे एक आठवडा बंद होता. परंतु सायकलींना अशा रस्त्याची सवय झाली होती. अघम गावच्या सिमेवर पोहोचायला दुपारचे तीन वाजले होते. भूक लागली होती. 

जवळच असलेल्या टपरी वजा "ज्योमसा कॅफे" मध्ये पराठा आमलेट खाता खाता मालक नामग्याल याला कुठे राहायची व्यवस्था आहे का, तसेच गावात कायकाय पाहण्यासारखे आहे याची चौकशी केली.  गावातच त्याच्या घरातच व्यवस्था होईल हे सांगितले. तसेच येथून अकरा किमीवर पहाडातील तंगीयर गावात खूप जुनी मॉनेस्ट्री बघण्यासारखी आहे असे सांगितले. आम्ही लडाख मध्ये सायकलिंग करतोय, याचा नामग्याल ला  आनंद झाला होता.  पुढे एक किमी वर अघम गावात कादिरने आम्हाला सोडले. नामग्यालच्या घरातच एका खोलीत आमची राहण्याची व्यवस्था झाली. 
थोड्या वेळातच नामग्याल त्याची मारुती इको गाडी घेऊन आला. त्याच्या बरोबर  तंगीयरची जुनी मॉनेस्ट्री पाहण्यासाठी निघालो.  नामग्याल पंजाब युनिव्हर्सिटी मधून सोशियालॉजी मध्ये मास्टर्स करतोय. आता व्हेकेशन मध्ये घराचा हॉटेल व्यवसाय सांभाळतोय.  घरात आई वडील आणि दोन बहिणी आहेत. श्योक नदीच्या किनारी वसलेले चांगमा आणि पोपलारची खूप झाडे असलेले हे अधम गाव फक्त चार घरांचे आहे. गावातील सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. जवळच्या पाच गावांचा मिळून एक सरपंच आहे. दुर्गम ठिकाणी वसलेले एव्हढे छोटे गाव पण शिक्षणाबद्दल अतिशय जागरूकता बघून खूप आनंद झाला. 

वाटेत लेह बेरीची झाडे लागली. याची पाने वाळवून त्याचा चहा बनवितात त्याला " सिबाक थोन टी" म्हणतात. लेह बेरी च्या बियापासून तेल काढतात. ते मार लागणे, जखम होणे, सूज येणे या साठी औषधी तेल म्हणून वापरतात. लेहबेरीच्याफळापासून ज्यूस बनवितात. हे तेल आणि ज्यूस फक्त स्पिती व्हॅली मध्ये उपलब्ध होते. 
 पूर्वी चरवाहे लोकांच्या बकऱ्या खायला स्नो लेपर्ड यायचे त्यांना पकडण्यासाठी आतल्या बाजूला मोठा आणि वर छोटा आकार असलेला एक चंबूसारखा खड्डा वाटेत लागला.
याला नेपाळी भाषेत 'शंगडोम' म्हणतात. यात एक बकरी ठेऊन स्नो लेपर्डला आकर्षित केले जाते. पण खड्यात पडल्यावर त्याला बाहेर पडता येत नसे. आता वन्य प्राण्यांना पकडणे मारणे प्रतिबंधित आहे. 
 
अकरा किमी चा वळणावळणाचा घाटातील रस्ता अतिशय दयनीय अवस्थेतील होता. जसे काही आम्ही होडीत बसलो आहोत. या गाडीत तंगीयार गावात राहणाऱ्या भाजीवाल्या महिलांना सुद्धा घेतले होते. विरंगुळा म्हणून या महिला नेपाळी गाणी म्हणत होत्या. 

तंगीयार गावात पोहोचलो. मॉनेस्ट्री उंच पहाडावर होती साधारण पाचशे मीटर्सची चढाई होती. पलीकडे ग्लेशियर दिसत होते. वाटेत रंगटंग ची झाडे लागली. याची पाने खाल्ली तर नशा येते. हिमाचल मधील अफूच्या झाडांसारखा हा प्रकार असावा. वाटेत गुंफा पण लागल्या. पूर्वी लोक गुंफेत रहात होते.  घाटी चढून १४ हजार फुटारच्या प्राचीन मॉनेस्ट्री जवळ आलो.  जुन्या मॉनेस्ट्रीच्या बाजूलाच नवीन मॉनेस्ट्री बांधली आहे. चौदाव्या शतकात बांधलेली जुनी दगडी  मॉनेस्ट्री अजूनही भक्कम अवस्थेत आहे. मंदिरात भगवान गौतम बुद्ध आणि दलाई लमा याच्या मूर्ती आहेत. तसेच लडाखी धर्मगुरू बाकुलर एम्बोचे यांचा फोटो आहे. मंदिराच्या आसपास असलेल्या घरांची पडझड झालीय. येथील कुटुंब आता नदीकिनारी स्थलांतरित झाली आहेत. 
मॉनेस्ट्रीच्या प्रदक्षिणेला स्कोरा म्हणतात. "ओम मणी पद्मे हुम" हा पवित्र बौद्ध मंत्र आहे. हा मंत्र म्हणत प्रदक्षिणा केली जाते. नवीन मॉनेस्ट्रीच्या दरवाज्यावर वूड कारविंग गंदारी, तिबेटीयन आणि लडाखी संस्कृतीचे दर्शन देतात. दसऱ्याच्या कालावधीत येथे उत्सव असतो त्याला "तंगपेचुवा" म्हणतात. तंगीयार गावातील प्राचीन मॉनेस्ट्री पाहून आजच्या दिवसाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले. रात्री नामग्यालच्या समवेत हर्बल थुप्पा खाण्याचा योग आला. त्याच्या समवेत मॉनेस्ट्री पहिली याचा त्याला खूप आनंद झाला होता. 
अघम गावात येताच पुढचा रस्ता खुला झाल्याची बातमी मिळाली... 
भगवान बुद्धाच्या घेतलेल्या भेटीमुळे, परमेश्वरानेच आमचा पुढचा मार्ग सुकर केला होता.... 

सतीश जाधव
मुक्त पाखरे

6 comments:

  1. Very nice...keep it...stay healthy...

    ReplyDelete
  2. 🙏🙏 नमस्कार सर,
    अप्रतिम वर्णन, फोटोज, आणि सर्व काही !!!!
    या सर्वात तुमचा हातखंडा आहेच.
    दोघांचेही खूप खूप अभिनंदन.
    All the Very Best to you both.

    ReplyDelete
  3. परममित्र अभिप्राय..
    निसर्गरम्य परिसर आणि त्यात मनाजोगता केलेला सायकल प्रवास अन् त्याचे बहारदार वर्णन ....
    खूप छान वाटले.. वाचताना प्रवासाचा आनंद घेता आला..
    प्रवासात भेटलेली माणसे ,सैनिक त्यांच्या सोबत झालेली
    बातचीत, सोबतच्या पाहुणचारचे वर्णन वाचून खूप अत्यानंद झाला... प्रवासात प्रवासी एकमेकांची किती आपुलकीने विचारपूस करतात.
    कर्तव्य कठोर सैनिक ही त्याला अपवाद नाहीत ..
    यथार्थ वर्णन आणि फोटोतून दर्शन ...
    खूपच छान ..

    ReplyDelete
  4. . लेह लडाख पाहिले नाही पण लिखाण इतके अप्रतिम कि सगळी कडे मनाने फिरून आले. फोटो पण सुंदर पक्वान्नां च वर्णन वाचून तोडाला पाणी सुटलेच . प्रवासात भेटलेल्या व्यक्तिंची बारीक सारीक माहिती सर्वच अप्रतिम असे च लिहत रहा सुंदर फोटो पाठवत रहा

    ReplyDelete
  5. विजय कांबळेOctober 21, 2021 at 11:04 PM

    अप्रतिम प्रवास वर्णन. "सायकल धर्म" सर्वसाधारण माणसाच्या मनावर ठसवण्यासाठी जे कार्य केले आहे. ते खूप असामान्य आहे असेच म्हणावे लागेल.

    ReplyDelete