Friday, April 8, 2022

जगण्याला फुटले पंख... दि. १ ते ३ एप्रिल २०२२

जगण्याला फुटले पंख
दि. १ ते ३ एप्रिल २०२२

विपरीत परिस्थिती अंगावर घेत तिच्यातून मार्गक्रमण करणे... त्यातून आनंद शोधणे... हा छंदच जडला आहे जीवाला...

उत्तरेकडून उष्ण वारे वाहत असल्यामुळे एप्रिल महिन्यातील पहिला आठवडा प्रचंड उष्ण असे भाकीत होते. अशा परिस्थितीत दिवसा राईड करायची असे मनाने ठरविले... कडक उन्हात राईड करू शकतो काय... याचा अनुभव घ्यायचा होता...

गुढीपाडव्याला पुण्यात गो नी दांडेकर (आप्पा) यांचा माहितीपट दाखविला जाणार होता. नक्की झाले... मुंबई ते पुणे सायकल राईड करायची... सोबत यायला अतुल तयार झाला.

पुण्याच्या काशिनाथ जाधव आणि सोपान नलावडेंना कळविले... येतोय म्हणून... 

एक एप्रिलला सकाळी पहिली लोकल पकडून खोपोलीला पोहोचलो... गाडीने कर्जत सोडल्यावर घरून घेतलेले खरवस आणि अतुलने आणलेले मोड फोडलेल्या मूगाची न्याहारी केली आणि सकाळी साडेसात वाजता खंडाळ्याच्या घाटाची चढाई सुरू केली... 

उन्हाळ्याच्या दिवसात वळणावळणाचा आणि वर चढत जाणारा अवघड घाटाचा रस्ता सकाळीच चढण्यासाठी सुसह्य असतो... सडसडीत अतुल सरसरत दोन वळणे चढून एकदम पुढे गेला. पुढे जाऊन अतुल सायकलिंगचे व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी थांबला होता. 

 सकाळच्या वातावरणात सुखावणारी शांतता असते... शीतल सकाळ म्हणजे आनंद सोहळा असतो...
या आनंदाच्या लहरीवर झुलत चार अवघड वळणे पार करून पाऊण तासात  शिंग्रोबा मंदिर गाठले... शिंग्रोबाचा प्रसाद मिळाला आणि माठातले थंडगार पाणी पिऊन पुढच्या चढाईला सुरुवात केली... 

साडेआठ वाजल्या नंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या... सतत पाणी पीत पीत घाटमाथा  राजमाचीला पोहोचलो... "निसर्ग नका हरवू... पर्यावरणाचे जतन करू " हे स्लोगन वाचून खूप आनंद झाला... वसुंधरेला आपलं म्हणण्यासाठी निसर्गाशी मैत्री करायला हवी... म्हणूनच या उन्हाशी मैत्री करण्यासाठीच आमची राईड होती...

उन्हाचा पारा एकदम चढलेला होता. आता खंडाळ्या पासून  लोणावळ्या पर्यंत ग्रॅज्युअल चढाचा रस्ता होता... परंतु रखरखीत उन्हामुळे घाटापेक्षा भारी वाटला... 

लोणावळ्यात काशिनाथ जाधव सायकलसह वाट पाहत थांबला होता... काशिनाथ पुण्याहून आला होता आम्हाला कंपनी द्यायला... 

सुरू झाली भर उन्हातून सायकलिंग राईड.. एक गोष्ट ठरवली होती; उन्हातील पुढची राईड फक्त फलाहार करून करायची... हायवेला असलेली रहदारी,  सावलीचा अभाव तसेच मध्ये मध्ये बाजूच्या रानात लागलेले छोटे छोटे वणवे; सायकलिंग आणखी खडतर करत होते... परंतु वाटेत कलिंगड, द्राक्ष, केळी इत्यादी फलाहार सायकलिंगची ऊर्जा कायम राखत होते... 

लोणावळ्यावरून पुण्याला जाणार जुना हायवे तसा चढचा रस्ता आहे... एका विशिष्ट वेगाने तिघेही चाललो होतो... काशिनाथची ही पहिलीच मोठी राईड होती... भर उन्हात राईड करताना फळांनी मोठी साथ दिली... खरंच आम्ही ऊन एन्जॉय करत होतो... मित्रांच्या साथीने काशिनाथची सुद्धा एनर्जी लेव्हल उच्च होती... वाटेत कलिंगडाचा फडशा पाडला...

कार्ल्याच्या एकविरा  देवीच्या गेटजवळ पोहोचलो...
पाणी पिण्यासाठी थांबलो... आगरी-कोळ्यांचे आराध्य असलेल्या एकविरा देवीच्या कमानीजवळ फोटो काढून पेडलिंग सुरू केले... 

तासाभरात विकास लालगुडेच्या जय मल्हार हॉटेल जवळ थांबलो... घरून आणलेले तहान लाडू आणि केळी खाल्ली... पाण्याचा  अंगावर शिडकावा मारला हात पाय डोके भिजवून पेडलिंग सुरू केले... 

पाऊण तासातच  तळेगावला एका डेरेदार झाडाखाली रस्त्यावरच थांबलो... आजूबाजूला हिरवाई पसरली होती... एका दगडावर अतुल झोपाळे आसन करण्यात मग्न झाला होता... काशिनाथने आणलेली केळी खाल्ली...  सोमाटणे टोलच्या पुढे एक्सप्रेस वे जवळ थंडगार ताक मिळाले... तर बालेवाडी जवळ रसरशीत कलिंगडाने क्षुधा शांती केली... 

आणखी तासाभरात चांदणी चौकात पोहोचलो. येथे पुलाचे बांधकाम सुरू होते... एक कामगार पुलाच्या गर्डर्सना तोटीने पाणी मारत होता. अतुलने पाण्याची तोटी डोक्यावर घेऊन चक्क आंघोळ  केली. मग काशिनाथ कसा मागे राहील... तिघांनी सचैल स्नान करून पुढची राईड सुरू केली. 

 येथून वारजे मार्गे खडकवासला पर्यंत जायचे होते...  खडकवासला जवळील मुकाई नगरातील नव्या फ्लॅट मध्ये राहण्याची सोय काशिनाथने केली होती.. 

आजची उन्हातील राईड खडतर होती... परंतु ती आनंदात पूर्ण झाली होती... त्याचे श्रेय अतुलला द्यायला हवे... "उन्हात राईड करताना आपण जेवण न घेता फळे आणि ड्रायफ्रूट खाल्ली तर राईड सहज पूर्ण करता येईल" हा त्याचा सल्ला आम्ही पाळला त्यामुळे काशीनाथने सुद्धा ही राईड आरामात पार केली...  भर उन्हात कशा पद्धतीने राईड करावी याची शिकवण मिळाली होती...

सायंकाळी पेडलिंग करत खडकवासला धरणाकडे निघालो.. वाटेत विश्रांती अमृततुल्य चहा हॉटेल लागले... कुरकुरीत कांदाभजी आणि चटपटीत उपिट (उपमा) खायला मिळाले. वर फर्मास चहाने बहार आणली...

पहिल्यांदा खडकवासला धरण पाहिले... सायंकाळच्या वेळी  वाऱ्याच्या झोतावर पाण्याच्या लाटा नृत्य करत होत्या...  अस्ताला गेलेल्या सूर्याच्या तांबूस प्रभा लाटांवर डोलत होत्या... सोनेरी आकाशात पक्षांच्या माळा पूर्वेकडे झेप घेत होत्या...

समोरच्या तीरावर लागलेल्या विजेच्या दिव्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब आकाशातील लुकलूकणाऱ्या तारकांसारखे भासमान होत होते... निसर्गाचा हा नयनरम्य सोहळा पाहत किती वेळ तेथे बसलो कळलेच नाही...
  

काशीनाथच्या फोनने त्या समाधी अवस्थेतून बाहेर आलो...  रात्री एका खानावळीत सात्विक जेवणाचा आस्वाद घेतला... 

उद्या गुढीपाडव्याला पुण्याच्या सायकलिस्ट बरोबर १०० किमी राईड करायची आहे असा निरोप सोपान नलावडे यांना दिला होता... "आपल्याला उद्या आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घ्यायचे आहे" हे सोपानरावांनी कळविल्यावर खूप आनंद झाला... नववर्षाच्या पहिल्या दिवशी माऊलींचे दर्शन घेणे हे परमभाग्य होते... 

सकाळी पाच वाजता राईड सुरू झाली... वारजेला विकास भोरच्या घरी सर्व सामान ठेऊन  विकास सोबत कोथरूडच्या शिवाजी पुतळ्या जवळ आलो...
तेथे सोपानराव नलावडे आणि विजयकुमार सरजीने यांची भेट झाली... सकाळीच सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या... 

सुरू झाली आळंदीकडे सायकल सफर... माऊलीच्या दर्शनाला आतुरलेले मन सायकल पुढे पळत होते...  खडकी मिलिटरी विभागातून  भरारी सुरू होती... अतिशय सुबक आणि प्रशस्त रस्ते सायकलिंगचा आनंद द्विगुणित करत होते...  प्रातःकालची कोवळी आणि आल्हाददायक सूर्य किरणे अंगावर घेत राईड सुरू होती... 
तासाभरात दिघी गावाजवळ पोहोचलो. येथून आळंदी दहा किमी अंतरावर होते..
भेटीलागी जीवा... लगीलीसे आस...  

माऊलीच्या दर्शनाची आस आता पराकोटीला पोहोचली होती... आजच्या मोठ्या दिवशी ज्ञानोबा माऊलीची भेट होणार याचा अगणित आनंद झाला होता... 

पाऊण तासात आळंदीच्या पुण्यनगरीत सखी पोहोचली... तडक माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केला... दारात एका वारकरी बाबांनी डोक्यावर नाम काढले... त्यावर गुलाल अबीराचा गंध लावून आशीर्वाद दिला... मंदिरात प्रचंड गर्दी होती... भारावलेल्या स्थितीत पायरीवरून संजीवन समाधीचे दर्शन झाले... "हेचि दान देगा देवा... तुझा विसर न व्हावा" अशी मनोमन प्रार्थना करून नतमस्तक झालो... भावनांचा कल्लोळ मनात उमटला होता... हसू आणि आसू असे संमिश्र भाव हृदयात उचंबळून आले...

 सोपानरावांनी "ज्ञानेश्वरांची" भेट घडवून आणली होती... प्रदूषण मुक्तीच्या दिशेने भारताचा "विकास" व्हावा...  हीच "विजय" पताका हाती घेऊन "अतुलनिय" साहस करत मुंबई पुणे राईड भर उन्हात केली होती... काशिनाथच्या साथीने... ती आज फळाला आली होती... धन्य झालो.... माऊलींच्या दर्शनाने... सखी सुद्धा सुखावली...

कालच छत्रपती संभाजी महाराजांची ३३३ वी पुण्यतिथी होती... त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे योजिले होते... आळंदी पासून श्रीक्षेत्र तुळापूर दहा किमी अंतरावर होते... वाटेत वडापावची न्याहारी झाली... ऊन वाढायला सुरुवात झाली होती... भराभर तुळापूरकडे पेडल करत होतो... मनात विठ्ठलाचे नाम घोळवत उंच सखल रस्त्यावरून मार्गक्रमण सुरु होते... तुळापूर  केव्हा मागे पडले कळलेच नाही... चार किमी पुढे लोणीकंदला पोहोचलो... सायकलिस्ट मित्र महादेव पाटील आणि अनिल सवाने आमची तुळापूरला वाट पाहत होते.

श्रीक्षेत्र तुळापूरला पोहोचलो... महादेव आणि अनिलला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या... छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन जड अंतःकरणाने घेतले... अत्यंत निघृर्ण पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांचा वध करण्यात आला होता... हिंदू धर्म संरक्षणासाठी त्यांचे बलिदान होते... म्हणूनच फाल्गुन कृष्ण अमावस्या हा दिवस बलिदान दिन म्हणून साजरा करतात... 

श्रीक्षेत्र तुळापूरच्या स्वयंभू महादेवाचे दर्शन घेतले...
येथे भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांचा त्रिवेणी संगम आहे... मंदिराच्या व्हरांड्यात क्षणभर विश्रांती घेतली... एक विशेष गोष्ट झाली... वाया न घालवता सफरचंद कसे कापायचे याचे प्रात्यक्षिक महादेवने करून दाखवले...  छोटीसी बाब पण अतिशय उपयुक्त होती... फिरणे ही एक शाळाच असते याचा प्रत्यय आला...

कोथरूडला परतीचा प्रवास सुरु झाला... वाटेत आळंदी मरकळ रस्त्यावर अनिलची सायकल पंचर झाली... महादेव ट्यूब बदलत असताना अतुलने सर्वांना अमूल लस्सीची ट्रीट दिली... उन्हाचा दाह वाढल्यामुळे लवकर पुणे गाठायचे ठरले... नाशिक फाट्यावर महादेव आणि अनिल यांना रामराम केला आणि कोथरूड कडे निघालो...

शिवाजी नगरला कैरी पन्हे आणि लिंबू सरबताची मेजवानी झाली... मेजवानी काय जुगलबंदीच होती.. दोन दोन ग्लास कैरी पन्हे पिऊन मदहोश झालो...
 शिवाजी पुतळ्याजवळ विजय आणि सोपान यांना टाटा करून वारजेला विकासच्या घरी पोहोचलो...
 
 आजच्या दिवशी सुग्रास जेवणाने गप्पांना सुद्धा बहार आली... ओंकार आग्रह करून वाढत होता... जेवण झाल्यावर नर्मदा परिक्रमा सायकल वारीच्या गमती जमती, आलेले अनुभव सर्वांना शेअर केले.... अनुभवाचा सुखद खजिना सर्वांना वाटल्यावर... खजिना त्या आठवणींनी आणखीनच भरत जातो... वेगवेगळे पैलू सापडतात... आनंदाचे हे असेच असते... जेव्हढा वाटावा तेवढा शतपटीने परत येतो... 

सायंकाळी गो नी दांडेकर यांचा "किल्ले पाहिलेला माणूस" हा माहितीपट पाहायला एस पी कॉलेज मध्ये सायकलने गेलो... हॉल तुडुंब भरला होता... म्हणून पायरीवर बसून कार्यक्रम पहिला...

 गोनीदां नी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली... आपले संपूर्ण आयुष्य दुर्ग भ्रमंती साठी झोकून दिले होते... दुर्गमहर्षी गोपाळ निळकंठ दांडेकर यांच्या दुर्गभ्रमंतीच्या जीवन प्रवासावर "किल्ले पाहिलेला माणूस" हा अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक संघटना निर्मित माहितीपट पाहताना; मागील कालावधीत केलेल्या दुर्गभ्रमंतीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या... किल्ले हे स्वराज्यासाठी लढलेल्या आणि प्रणाहूती दिलेल्या मावळ्यांचा आणि मराठेशाहीचा भौगोलिक वारसा आहे... ती आपली स्फुर्ती स्थाने आहेत... किल्ले कसे पहावेत याची समग्र माहिती मिळाली...  या प्रेरणा स्थानांमुळे तरुण पिढीला नक्कीच अपरिमित ऊर्जा मिळेल...
या महितीपटाचा दुसरा शो पाहण्यासाठी बाहेर प्रचंड गर्दी होती... हे गोनिदा वरचे प्रेम उमडून आले होते...

सायकलिंग करत मेहुणा सतीश मोहिते याला सरप्राईज भेट दिली...  नातेवाईकांच्या गाठीभेटी ही आनंदाची खाण असते... माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठा असलेल्या सतीशने सुद्धा अख्खा सह्याद्री आणि हिमालय पालथा घातला आहे... तासभर हसत खेळत गप्पा झाल्या...

कोथरुडच्या पृथ्वी हॉटेल मध्ये पोहोचलो... मग सुरू झाली कोथरुडच्या पृथ्वी हॉटेलमध्ये सायकलिस्ट मित्रांसोबत गप्पांची मैफिल... ६०० किमी BRM यशस्वीपणे पूर्ण करणारे विजयकुमार सरजीने आणि कोल्हापूरला आयर्न मॅनचा सन्मान प्राप्त करणारे सोपानराव नलावडे यांच्या सोबत... वयाच्या पन्नाशी नंतर त्यांनी हे  किताब मिळविणे सर्व तरुणांना स्फुर्तीदायक आहे... आता श्रीनगर लालचौक (काश्मीर) ते विवेकानंद स्मारक (कन्याकुमारी) ही सायकल सफर विक्रमी वेळेत करण्याचा  मानस आहे... नक्कीच त्यांच्या प्रयत्नांना यश येईल...

सकाळी पाच वाजता मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु झाला... एव्हढ्या सकाळी भोर वहिनींनी चहा बिस्किटांची न्याहारी दिली... विकास आमच्या सोबत निघाला... शिवाजी पुतळ्याजवळ विजय आणि सोपान... आज पण सायकल घेऊन आम्हाला कंपनी द्यायला आले होते...
भन्नाट वेगात सोमटणे नाक्यावर पोहोचलो... वाटेत बरेच रोडिओ सायकल स्वार भेटले... सर्वांनी मिळून छत्रपती शिवरायांचा जयघोष केला... MTB सायकल रोडिओ सारखी पळविणारा अतुल वाटेत भेटणाऱ्या हेल्मेट न घातलेल्या सायकल वीरांना बौद्धिक देत होता.  हसत हसत बोलण्याची त्याची खुबी खुपच प्रभावी आहे... त्याच्या पांढऱ्या शुभ्र दाढीमुळे तो सायकल महर्षी आहे याची जाणीव होते...

सोमाटणे नाक्यावर महादेव आणि अनिल यांची भेट झाली... नाक्यावर येवलेंचा फक्कड गुळाचा चहा आणि ओट बिस्किटांचा नजराणा पोटाला मिळाला... सर्व मित्रांसाठी "दिये जलते है, फुल खिलते है" गाणे गायले... बराच वेळ गप्पा मारल्यावर सर्वांना निरोप द्यायची वेळ आली... सर्वांना ३० एप्रिलला सायकलने रात्रीचे मुंबई दर्शन करण्यासाठी आमंत्रित केले... 

सोमाटणे वरून राईड सुरू करतानाच सूर्य नारायणाने आपला प्रताप दाखविणे सुरू केले होते... पट्टीचा सायकलिस्ट अतुल सरसरत पुढे गेला...  मागाहून विशिष्ट वेगाने त्याला गाठणे... पुन्हा तो पुढे जाणे असा लपंडाव करत दोन तासात लोणावळा गाठले...  लोणावळ्यातील A1 चिक्कीवाला राजीव सिंग व्यासची भेट झाली... भर उन्हातही आमच्या सायकलिंगमुळे प्रेरणा घेऊन राजीव  सुद्धा त्याची सायकल चकाचक करून राईड सुरू करतोय. त्याच्या हायटेक मोटारसायकल वर राजेशाही थाटात फोटो काढले... लोणावळ्यात नवीन दोस्त मिळाला आहे... 

खंडाळ्यातील बहारदार तलावाकडे आलो... तेथे मनमुराद फोटोग्राफी केली... राजमाचीचा निसर्ग डोळ्यात साठवून बोरघाट उतरायला सुरुवात केली...  दहा मिनिटात नॉनस्टॉप खाली खोपोलीत उतरलो...

महडच्या वरदविनायक गणपती मंदिराकडे वळलो... अतुल मागे राहिला होता... तो कलिंगड घेऊन आला... बाप्पाचे निवांत दर्शन घेऊन कलिंगडचा फडशा पडला... परतीचा प्रवास सुद्धा फळांचा आस्वाद घेत करायचा ठरविले होते... वाटेत खालापूर गावाजवळ, रसरशीत मोठे मोठे चिकू घेऊन एक मावशी बसल्या होत्या...  घराच्या साठी एक किलो चिकू घेतले... चिकू खाताना... त्याची अवीट गोडी डोळे मिटुनच आनंदावी... 

भर उन्हात सायकलिंग सुरू होती... पाणी पिण्यासाठी वीस पंचवीस मिनिटांनी थांबावे लागत होते.. बरवाई गावाजवळ रसवंती गृह लागले... स्वतः ऊसाचा  रस काढून तो पिण्यात काही औरच मजा असते... तेथील छोट्याशा फळीवर अतुलने मस्त पैकी अर्धा तास वामकुक्षी घेतली... जसे पनवेल जवळ येऊ लागले तशी रहदारी वाढू लागली... पनवेल ओलांडून खांदेश्वर हायवेला कोकम सरबत प्यायला रस्त्यावरच बसलो... तहान भागविण्यासाठी पाण्यासोबत सरबताची ट्रीट उन्हाचा दाह मुलायम करत होती...

लक्ष्मणला फोन केला... तो वाशी पुलाजवळ भेटणार होता... नेरुळाला येवले गुळाचा चहा आणि ओट बिस्किटे खाल्ली... लक्ष्मण वाशीला आमची वाट पाहून कासावीस होत होता... आमच्या साठी केळी फ्रुटीच्या प्रेमाचा भडिमार झाला... दोघांना घरी येण्यासाठी आग्रहाची पराकाष्ठा लक्ष्मणने केली... अतुल लक्ष्मण सोबत कोपरखैरणेला गेला... 

स्वतःच्या मस्तीत अगदी रमतगमत सायंकाळी साडेसहा वाजता घर गाठले...  भर उन्हात केलेली १७० किमी राईड... ही पुढील सोलो टूरची नांदी होती... प्रचंड उन्हात सुद्धा मजेत राईड करता येते... त्याचा हा परिपाठ होता... अतुलने सांगितलेली "फक्त फळे खाणे आणि सरबत पिणे" ही शक्कल अतिशय परिणामकारक ठरली... सर्व मित्रांची आणि सखीची साथ सुद्धा महत्वाची होती... 

विपरीत परिस्थितीत सुद्धा प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेता येतो... हेच मुंबई पुणे मुंबई सायकल सहलीचे फलित होते... 

आवरा बादल झूमने लगा है.. 
आसमान को तंग करने लगा है...

सूरज से भी खेलता है...
जमी पर भी डोलता है..

वादियोसे दिलके सहारे पा लिये...
जिनेको और क्या चाहीये... 

यालाच म्हणतात... 
जगण्याला फुटले पंख... 
आनंदाला फुलले रंग...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...