Showing posts with label भटकंती.... Show all posts
Showing posts with label भटकंती.... Show all posts

Tuesday, August 20, 2024

अंबरीश गुरव आणि शतकी राईड... दि. २० ऑगस्ट २०२४

अंबरीश गुरव आणि शतकी राईड...

दि. २० ऑगस्ट २०२४

काल संध्याकाळी विजयचा फोन आला... उद्या मुलुंड पर्यंत राईड करायची काय... मंगळवारी विजयला सुट्टी असते... त्यामुळे मंगळवार खास त्यांच्यासाठी राखून ठेवलेला असतो... 

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने घरात कौटुंबिक कार्यक्रम होता... खूप नातेवाईक म्हणजे भरपूर गप्पा... रात्री उशिरा पर्यंत कार्यक्रम चालणार हे ठरलेले होते... तरीही विजयला आश्वासन दिले... भेटूया सकाळी सहा वाजता... महेश्वरी उद्यानाजवळ... सायकलिंग म्हटले की तहान भूक आणि झोप सुद्धा हरपते...

काल सायंकाळी नारळी पौर्णिमेनिमित्ताने  नवनीतने वरळी कोळीवाड्यात सागराला सोन्याचा नारळ देण्याचा कार्यक्रम पहायला बोलावले होते... तेथे अंबरीशची भेट झाली... अंबरीश सुद्धा मुलुंडला सायकलिंगसाठी यायला तयार झाला...

आज सकाळी सहा वाजता माटुंगा महेश्वरी उद्यानाजवळ विजयची भेट झाली... अंबरीश नुकताच वरळीवरून निघाला असल्यामुळे त्याने सायकलिंग करत पुढे जाण्यासाठी सांगितले...

पावसाचा  भुरभुरत वर्षाव सुरू होता... तो सुद्धा थांबत थांबत पडत होता... सायनला वर्षाव तर कुर्ला सुके... पुढे घाटकोपरला पाऊस धारा तर विक्रोळीला  तेज वारा... पावसाने भिजलो आहे की घामाने... याचा पत्ता लागत नव्हता... पावसामुळे सायकलिंगची सावधानता वाढली होती... बऱ्याच ठिकाणी साचलेल्या पाण्यातून सायकल चालविताना खड्डे टाळण्यासाठी अतिशय हळू मार्गक्रमण सुरू होते...

आज मोबाईल कव्हर घ्यायचे विसरल्यामुळे मोबाईल रुमालात गुंडाळून ठेवला होता...  त्यामुळे वाटेत फोटो काढले जात नव्हते... मुलुंडला पोहोचता पोहोचता... अंबरीशने आम्हाला गाठले होते...  

मुलुंड म्हाडा कॉलनीतील भटाची चहा टपरी आमचा हायड्रेशन पॉइंट होता... भटाने बनविलेला फर्मास उकाळा पिताना मोबाईल बाहेर काढला तर आतापर्यंत २५ किमी राईड झाली होती...  अंबरीश म्हणाला आज शंभरी गाठायची काय... तात्काळ होकार दिला... 

 आज सुट्टीच्या दिवशी घरगुती कामे आटपायची असल्यामुळे विजय घराची वाट धरणार होता... पन्नास किमी वर समाधान मानणार होता... 

परतीची राईड सुरू झाली... आणि विक्रोळी सर्व्हिस रोडवर दिपक नीचितची भेट झाली... फिटनेस फ्रिक दिपक ५८ किमी मॅरेथॉनची तयारी करतोय... हिमालयात सहकुटुंब फिरताना त्याचा डावा हात दुखावला होता... त्यामुळे दोन महिने पोहणे बंद होते... पण चालणे, धावणे सुरू आहे... अशी चळवळी माणसे नेहमीच कार्यरत असतात... उत्तम फिटनेस आणि काळ्या केसांमुळे तो आणखी तरुण दिसायला लागला आहे... 

दिपक एकदा बोलायला लागला की ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नसते त्याला थांबविणे... पण हाडाचा शिक्षक असलेल्या  दिपकचे बोलणे नेहमी ऐकत रहावेसे वाटते... आम्हाला शंभरी गाठायची आहे... हे समजल्यावर त्याने रजा घेतली...

कुर्ल्याच्या प्रियदर्शनी पार्ककडून फ्री वे कडे वळलो... वडाळ्याला विजयने कलटी मारली आणि घरी गेला...  अंबरीश बरोबर आता राईड सुरू झाली... BPT मधून फ्री वे खालून जाणाऱ्या रस्त्यावर गाड्यांची रहदारी कमी असल्यामुळे झकास राईड सुरू होती... 

गेटवे ऑफ इंडिया गाठले तेव्हा ६२ किमी राईड झाली होती...

तेथेच अंबरीशच्या सायकल मधील  मागच्या चाकातली हवा कमी झाली होती... रेडिओ क्लब कडून मुख्य रस्त्यावर येऊन पेट्रोल पंपावर चाकात हवा भरली... 

तेथून नेव्ही नगरचे शेवटचे टोक गाठले... पुन्हा हवा कमी झाल्यामुळे सायकल पंचर झाली आहे हे नक्की झाले...   RC चर्च जवळील दुसऱ्या पेट्रोल पंपावर पुन्हा हवा भरली आणि कैलास परबत जवळच्या सायकल शॉपवर सायकल आणली... मागच्या चाकात  दोन तीन ठिकाणी बारीक बारीक तारा सापडल्या... दोन ठिकाणी ट्यूब पंचर झाली होती.. नवी प्रेस्टा  ट्यूब दुकानात उपलब्ध नव्हती... त्यामुळे दोन पंचर पॅच लाऊन सायकल तयार झाली... 

भूक लागली होती... त्यामुळे ncpa जवळील मनिज् मध्ये नाष्टा करायचे ठरले... मनिज्  कडे नाष्टा करायला आलो... तेव्हा समजले ट्यूबने दगा दिलेला आहे... आता सायकल ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.. डोसा आणि उत्तपा नाष्टा करून अंबरीश सायकल ढकलत ncpa चौपाटी वरून रमतगमत वरळीला निघाला...

 माझा थोडासा हिरमोड झाला होता... पण अंबरीशने ठरविलेले टारगेट पूर्ण करण्याचे मनावर घेतले होते... मग निघालो गिरगाव चौपाटी वरून पेडर रोड मार्गे सुसाटत वरळीला... तेथून सिद्धिविनायक मंदिर गाठले... आज मंदिरात खूप गर्दी होती... म्हणून तेथे ट्रॅफिक जाम झाली होती... त्यात कोणीतरी VIP येणार म्हणून पोलिसांनी रस्ते बंद केले होते... सायकलसह कसाबसा सटकलो आणि वांद्रे सिलींक गाठले... 

सीलिंकच्या अलीकडच्या वळणावर महर्षी व्यास मुनींचा ध्यानमुद्रेतला मोठा पुतळा आहे... तो पाहिला आणि पुन्हा अंबरीशची आठवण झाली... तेथून घरी येई पर्यंत १०० किमी पूर्ण झाले होते...

 पण अंबरीश डोक्यातून जात नव्हता... कसं घडवलंय परमेश्वराने या माणसाला... अतिशय मितभाषी... पण जेव्हा बोलतो तेव्हा ते नेमक आणि मार्मिक असतं... दापोली सायकलिंग क्लबची धुरा गेली पाच वर्ष समर्थपणे सांभाळत असलेला अंबरीश अजातशत्रू आहे... इतरांसाठी त्याचा मदतीचा हात सतत तत्पर असतो... त्याला कधीही रागावलेला पाहिला नाही... प्रत्येक घटनेवर त्याची अतिशय सौम्य आणि मृदू प्रतिक्रिया असते... आणि सदा हसतमुख...

आज त्याच्या ट्यूबने दगा दिला... पण चौपाटी वरून चालताना... त्याच्या चेहऱ्यावर निराशेचा लवलेश नव्हता... मस्तपैकी निसर्गाचा आनंद  घेत तो एकदम मजेत मार्गक्रमण करत होता... असं व्यक्तिमत्त्व माझ्या जीवनात मित्र म्हणून लाभणं हे माझं भाग्यच आहे...

निव्वळ त्याच्या साठीच आज १०० किमी राईड पूर्ण केली होती...


तेरा तुझको अर्पण...

जय श्री राम....

Sunday, August 18, 2024

२० किमी सायकलिंग आणि ११४ वे रक्तदान... दि.१८ ऑगस्ट २०२४

२० किमी सायकलिंग आणि ११४ वे रक्तदान...  दि. १८ ऑगस्ट २०२४

उमलिंगला पास करून आल्यावर रक्तदान करायचे डोक्यात होते... आणि नेमकी मुंबई अल्ट्रा रक्तदान मोहीमेची पोष्ट वाचनात आली... दादर शिवाजीपार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आज हे रक्तदान शिबिर होते... मनातली गोष्ट प्रत्यक्षात उतरणार... या पेक्षा मोठा आनंद काय असू शकतो...

या वेळी एक छान गोष्ट घडली होती... ती म्हणजे रक्तदानासाठी ऑन लाईन रजिस्ट्रेशन होते... कालच याची नोंदणी केली होती...  आज सकाळी साडेआठची वेळ नक्की केली... आज रविवार असल्यामुळे खूप सायकल मित्रांच्या गाठीभेटी होतील याची खात्री होती...

सकाळी घरीच न्याहारी करून सायकल सखीसह स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात निघालो... मोठी राईड करून जर रक्तदान करायला गेलो  तर रक्तदाब वाढलेला असतो... ते टाळण्यासाठी रमतगमत केंद्रावर पोहोचलो... 

अहो आश्चर्यम् ...!!! जायंट सायकल क्लब, पेडल वॉरियर्स आणि दक्षिण मुंबई डिकॅथलॉन गृप मधील खूप सायकलिस्ट मित्र भेटले... खूप दिवसांनी रवी अग्रवालची भेट झाली होती...


माझ्या सायकलिंग पोष्ट वाचणारे कित्येक जण भेटत होते... हात मिळवत होते आणि फोटो काढत होते...


मराठी द्रष्ट्या विर सावरकर यांच्या स्मारकात भरलेल्या या रक्तदान शिबिरात इंग्रजी बोलणारे खूप तरुण तरुणी भेटले... त्यांच्याशी मराठीत बोलायला सुरुवात केल्यावर... आपसूकच ही मंडळी मातृभाषा मराठीत बोलू लागली...   तुमचे इंग्रजी समजत नाही हे बोलल्यावर... त्यांना हसू येत होते...

साऊथची सौदामिनी भेटली... म्हणते कशी... सर हिंदिमे बात करो... तिला विचारले... साऊथ मध्ये हिंदी बोलतात का ग... मुंबईत येऊन हिंदी शिकलीस ना तसेच मराठी पण शिक... 

एक जाणवले... आपणच सार्वजनिक ठिकाणी आपली मातृभाषा विसरून इंग्रजीत किंवा हिंदीत बोलतो... हे आपल्यापासूनच बदलता येईल... असो...

या मुलांनीच माझा फॉर्म भरला... खरं तर ऑन लाईन रजिस्ट्रेशन केल्यावर असे फॉर्म भरण्याची पाळी येऊ नये... सर्व माहिती भरून... त्या फॉर्मवर सही केली... त्या नंतर हिमोग्लोबिन तपासले... ते १४.५ ग्रॅम प्रती डेसी लिटर भरले... चक्क दोन ग्रॅम जास्त... रक्तदाब सुद्धा नॉर्मल होता... याचा अर्थ प्रकृती ठणठणीत आहे आणि अजूनही रक्तदान करायला सक्षम आहे... याची खात्री झाली...

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील ब्लड बँक डॉक्टर आणि कर्मचारी रक्त घ्यायला तत्पर होते... एक रंगीत रबरी चेंडू हातात देऊन दाबायला सांगितला... तेव्हढ्यात उजव्या हाताच्या मधल्या भागात नाजूकपणे  सुई  टोचली... बारीक मुंगी चावल्याचा भास झाला...

  

   माझे  ११४ वे रक्तदान आहे हे तोपर्यंत माझ्या सायकलिस्ट मित्रांनी तेथील कार्यकर्त्यांना सांगितले होते...

मग काय... मुंबई अल्ट्रा रक्तदान शिबिराचे सदस्य, कार्यकर्ते, फोटोग्राफर... अभिनंदन करायला सरसावले... माझे रक्तदान चालू असतानाच... माईक हातात आला... सर्वांना सांगितले की... रक्तदानासाठी सक्षम असणे... म्हणजे आपण सुदृढ असण्याचे लक्षण आहे... तसेच रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होते... ऊर्जेचे संक्रमण होते... बोलत असतानाच रक्ताची पिशवी कधी भरली ते कळले सुद्धा नाही...

रक्तदान केल्यावर एकदम कॉन्टिनेन्टल अल्पोपहार मिळाला... ब्रेड आणि जाम बटर, केळी, बिस्कीट, मिठाई आणि गरमागरम कॉफी... त्यानंतर मिळाली गुडी बॅग... त्यात एनर्जी ड्रिंक होते आणि Run Donate and Save Life हे स्लोगन असलेले टीशर्ट मिळाले...

शेवटी मोठी घंटा तीन वेळा वाजविण्याची मान मिळाला... या घंटेच्या निनादाने... माझे रक्तदान कार्य सर्वांपर्यंत पोहोचले होते...

या वेळी माझ्या बऱ्याच सायकलिस्ट मित्रांनी सुद्धा रक्तदान केले... आज झालेली २० किमी सायकल राईड सुद्धा हेच सांगत होती... रक्तदान केल्यामुळे कसलाही थकवा येत नाही...

हे रक्तदान नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी असेल...

जय श्री राम...

Monday, April 29, 2024

दापोली सागरी सायकल सफर आणि चिपळूण उन्हाळी सायकलिंग... २८.०४.२०२४

दापोली सागरी सायकल सफर आणि चिपळूण उन्हाळी सायकलिंग... २८.०४.२०२४

मोटारकारच्या  मागे सायकल लावून... मुंबई वरून पहाटे साडेचार वाजता सहकुटुंब दापोलीला पोहोचलो...

सायकल उतरवून घेतली... कुटुंबिय चिपळूण येथील खेर्डी गावात गेले... पहाटे दापोली सायकल क्लबचा सक्रिय कार्यकर्ता अंबरीश गुरव स्वागताला तयारच होता... सायकल असेंबल करायला त्याने मदत केली... 

ताबडतोब फ्रेश  होऊन पहाटे साडेपाच वाजता सुरू होणाऱ्या  दापोली समर  सायक्लोथॉन साठी तयार झालो....

हळूहळू या सायकल वारीत भाग घेणारे सदस्य येऊ लागले...  मुंबई वरून डॉ. चिमा, प्रवीण कुलथे, महेश दाभोळकर, छत्रपती संभाजीनगरचा  अनंत सहस्त्रबुध्ये, खेडचा विनायक वैद्य, मुंबई वरून सायकलिंग करत आलेला चिन्मय फोंडबा, तसेच धनंजय, सुवर्णा आणि हर्षदा यांच्या भेटी झाल्या... जेव्हा  घनिष्ट मित्र वेगळ्या प्रदेशात सायकलिंग साठी एकत्र येतात तेव्हा आनंदाला पारावर रहात नाही...

दापोली वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर चमू आमच्या सेवेला हजर झाला...  बघता बघता जवळपास २०० सदस्य... या सायकल वारीसाठी एकत्र आले होते... 

दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांनी गणपती बाप्पा मोरया घोषणा देऊन सकाळी साडेपाच वाजता वारीची  सुरुवात करून दिली... 

पहाटेच्या वेळी दापोली ते हर्णे पर्यंत वळणावळणाचा आणि उताराचा रस्ता भन्नाट वेगाचा होता... सायकल कंट्रोल करत या मार्गावर सायकलिंग करणे अतिशय कुशल काम होते... जुक बॉक्स वर "हरहर शंभोचा" नारा देत...  हा पल्ला सफाईदारपणें पार झाला होता...


पाजपंढरी येथील राम मंदिरातील ... रामधुन ऐकून मन एकदम प्रसन्न झाले... तेथून पुढे जाणारा  घाट रस्ता टाळुन जुईकर गावाच्या समुद्र किनाऱ्याने जोग नदीवरील अंजर्ले पुलावर आलो... 

सव्वा सहा वाजता छान उजाडले होते... जोग नदीच्या खाडीत समुद्रातून आलेल्या मासेमारी नौका विसावल्या होत्या... अशा सुंदर लोकेशनवर फोटो काढणे क्रमप्राप्त होते...


सोबत धनंजय, सुवर्णा आणि हसरी हर्षल होती... अंबरीशने लवकर पुढे यायच्या सूचना दिल्या...

अर्ध्या तासात आंजर्ले ताडाचाकोंड येथील समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो... येथून डॉल्फिन दर्शन होते... अतिशय सुंदर अशा धुकाळलेल्या वातावरणात सागराची गाज ऐकणे ही पर्वणी होती...

पूर्वेकडून आसमंतात उगवणाऱ्या सूर्याला... सागर लाटांच्या गाजेने खुणावत होता ... मित्राला साद घालत होता... आंजर्ले द्वीपगृहाच्या मागून उदयाला येणारा सूर्य आपल्या तांबूस सोनेरी किरणांनी सागराला प्रतिसाद देत होता...

आपल्या प्रभा किरणांचा वर्षाव आसमंतात करत होता...  निसर्गाच्या या विविधरंगी लपंडावाने... मनाची सूरमयी सतार झांकरत होती... ऊर्जेचा स्रोत रोमरोमात ठासून भरत होती...

अशा वेळी हर्षलचे बालपण एकदम खुलत होते... लहानपणी सायकल बरोबर केलेली मस्ती... ती पुन्हा जगत होती... 

आता आंजर्ले ते आडे सायकल सफर सागरी किनाऱ्याने सुरू होती... चढ उताराच्या नितांत सुंदर अशा  आंजर्ले समुद्र किनाऱ्यावरून हर्षल आणि सुवर्णा प्रथमच राईड करत होत्या... पहाटेची ओहटी जुक बॉक्सवर लागलेल्या गाण्यांना... दूरवर आवाज करत पसरणाऱ्या लाटांनी पार्श्वसंगीत देत होत्या...  प्रभात वाऱ्यातून संगीताचे तराणे झुळझुळत होते... विहंगांचे चिवचिव गाणे... सायकलवर तरंगणाऱ्या जिवाला मदहोश करत होते...

याच बोहोषीमध्ये आडे पुलावर पोहोचलो... 

पुलावर हायड्रेशन पॉइंटवर अल्पोपहार आणि सरबत होते... तब्बेतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर टीम हजर होती... डोक्यावर सरबताचे ग्लास ठेऊन जाखडी नृत्य केले...


तरुण डॉक्टर मंडळी एकदम भारावून गेली होती... "आम्ही अँब्युलन्स घेऊन येण्या ऐवजी तुमच्या बरोबर सायकलिंग करायला हवे होते... असे उद्गार डॉ. मारकड यांनी काढले... सायकलिंगसाठी तरुणांना प्रेरित करणे हा आम्हा वरिष्ठ तरुणांचा उद्देश सफल होत होता... येथे तीस किमीची सफर पूर्ण झाली होती...  परममित्र संजय सावंत भेटण्यासाठी खास केळशी वरून आला होता...

परतीच्या सफरीत आंजर्ले पुलावरून घाटाच्या रस्त्याने गेलो... चिपळूण जवळील कुंभार्ली घाट सायकल वारीची तयारी त्यामुळे होणार होती... सर्वांना एका दमात... न थांबता तो घाट चढायला सांगितला... आणि सर्वांनी तो पूर्ण पण केला...

त्यानंतर आंजर्ले मधील व्हीसलिंग व्हेवज आणि साई सावली रिसॉर्टवर अल्पोपहाराची व्यवस्था होती...

येथील खडकाळ किनाऱ्यावरून  सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या लोकेशन वर मनमुराद फोटग्राफी केली...

सालदुरे गावावरून दापोली घाट सुरु झाला... हा नऊ किमीचा घाट न  थांबता न थकता चढायचा होता... सर्व साथीदारांनी हे आव्हान तासाभरात सहज पार केले...  

सकाळी साडेपाच वाजता सुरू झालेली ६० किमीची दापोली सायकल वारी  पावणे दहा वाजता... सव्वाचार तासात सुफळ संपूर्ण झाली होती... सर्वांनी झोकात ही वारी पूर्ण केली होती... 

उपमा, केळी, चहाचा अल्पोहार घेतल्यावर सन्माननीय पाहुण्यांना मेडल आणि प्रशस्ती पत्रकासह दापोली सायकल क्लबचे सन्मानचिन्ह सुध्दा देण्यात आले... सर्वांचे फोटो सेशन सुरू झाले...  

पुढील  सायकल वारीसाठी दापोली सायकल क्लबला भरगोस शुभेच्छा दिल्या आणि अंबरीश गुरवला जादुकी झप्पी दिली... आणि चिपळूण जवळील खेर्डीकडे खडतर सायकल सफर सुरू झाली... 

दापोली ते चिपळूण ही पुढील ६२ किमीची राईड भर उन्हात करायची होती..

बऱ्याच जणांनी अशा उन्हात सायकलिंग करू नका असा सल्ला दिला होता...

जगातील सर्वात उंचावराचा रस्ता... लडाख मधील उमलींगला पास  (१९०४५ फूट)...  येथे सायकल सफर करणार आहे जुलै महिन्यात... त्याच्या पूर्व तयारी साठी विपरीत परिस्थितीत सायकलिंग करण्याची मानसिकता अजमावण्यासाठी... रखरखत्या उन्हात ४० अंश सेल्सिअस मध्ये सायकलिंग करण्याचे स्वतःलाच आव्हान दिले होते...

सोबत भरपूर पाणी होते... चॉकलेट आणि केळी होती... 

दापोली ते खेड भरणा नाका पर्यंतचा रस्ता चढ उताराचा आणि  झाडाझुडपातून जाणारा  होता... उन्हाचा तडाखा सुसह्य वाटत होता... खेड बस स्टँड जवळील भूषण सूर्वेच्या हॉटेल मध्ये थंडगार सोलकढी  तर भरणा नाक्यावर स्मार्ट बाजारात अमुल ताक आणि लस्सी प्यायलो... भरणा नाक्यावरून वळल्यावर मुंबई गोवा हायवेवर आता खरा कस लागणार होता... 

दुपारचा एक वाजला होता... भोस्ते घाट सुरु झाला... वेडीवाकडी वळणे, सिमेंटचा रस्ता... कठीण चढ आणि उन्हाचा भर... यात घाट चढण्याचे आव्हान होते... दर दहा मिनिटांनी थांबून केळी, चॉकलेट, पाणी खात-पित होतो...


अर्ध्या तासात घाट पार करून एका राजस्थानी धाब्यावर थांबलो... नेमका त्याच्याकडे अर्धा लिटर ताकाचा सॅचे होता.. मालक दिनेशने स्वतःसाठी आणलेला सॅचे मला दिला... आपण जेव्हा एखादं काम मनापासून करतो...  तेव्हा सर्व सृष्टी तुम्हाला मदत करते... याची प्रचिती आली... सर्व पाणी संपले होते... ब्लॅडर भरून घेतला... हात पाय डोके पाण्याने ओले केले... आणि पंधरा मिनिटे विश्रांती घेऊन पुढील सफर सुरू झाली...

हायवे सुद्धा चढ उताराचा होता... ऊन एकदम बहरात आले होते... वाफाळलेले वारे वहात होते... घामाच्या धारा ओसंडून वहात होत्या... काचा बंद करून गाड्यानीं जाणारी माणसे... काच खाली करून स्तिमित नजरेने न्याहाळत होती...  पुढच्या पेट्रोल पंपावर पुन्हा ब्लॅडर पाण्याने भरून घेतले...संपूर्ण अंग ओले केले...  अतिशय धीम्या गतीने  पेडलींग सुरू केले... 

लोटे परशुराम घाटाच्या पायथ्याला शिरकाई गुळाचा चहा मिळाला...


टप्पा आवाक्यात आल्यामुळे ऊन आनंददायी झाले होते... वारे गुलाबी झाले होते... 

लोटे गावातून परशुराम घाट चढणे सोपे होते... परंतु उतारावर सायकल कंट्रोल करणे जिकरीचे होते... पुढे बहाद्दूर शेख नाक्यापर्यंत धुळीच्या रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागले... दुपारी साडेचार वाजता घामाने आंघोळलेल्या परिस्थितीत खेर्डीला भाचे जावई सुनीलच्या घरी पोहोचलो... 

आज दिवसभरात १२१ किमी राईड झाली होती...

आदल्या रात्रभर मोटारकारने सफर करून पहाटे पासून सायंकाळपर्यंत सायकलिंग करताना वातावरणातील बदल आनंदाने अनुभवले होते... 

स्वतःला दिलेले एक अवघड आव्हान... सहज पेलले होते...

विपरीत परिस्थितीत... आणि प्रचंड उन्हात सायकलिंग करू शकतो... याची तपासणी झाली होती...त्यात पूर्ण यशस्वी झालो होतो...

मन कणखर असेल तर सर्व शक्य आहे...

जिंदगी एक सफर है सुहाना...

जय श्री राम* 🚩🚩

Wednesday, April 24, 2024

बोईसर फ्लायर्स सायकल संमेलन... आणि मुंबई-ठाणे ते बोईसर सायकल वारी... दि. २० एप्रिल २०२४

बोईसर सायकल संमेलन... आणि मुंबई-ठाणे ते बोईसर सायकल वारी... दि. २० एप्रिल २०२४

सायकल संमेलनासाठी... बोईसर पर्यंत राईड करत येणार... हे ऐकूनच बोईसर फ्लायर्सच्या सदस्यांना आनंद झाला होता... आम्हा पाच जणांच्या टीम मध्ये दोन महिला आहेत... हे समजल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही...

सुवर्णा, हर्षदा आणि संभाजी या तीन जणांच्या टीमने पहाटे चार वाजता ठाण्यावरुन तर माझ्यासह नवनीतने  पहाटे साडेतीन वाजता मुंबईच्या सिध्दीविनायक मंदिराकडून सुरुवात केली... ते निव्वळ दुपारच्या उन्हाचा तडखा  लागू नये या साठीच... सर्वजण बरोब्बर साडेपाच वाजता घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेल जवळ एकत्र आले...

प्रचंड ट्रॅफिक मध्ये पुढील राईड सुरू झाली... एकमेकांना फॉलो करत... तासातासाने हायड्रेशन घेत राईड सुरू होती... दहा वाजायच्या आधी हायवे पार करायचा असा निर्धार होता...

सुवर्णा आणि हर्षदा आता पट्टीच्या रायडर झाल्या होत्या... सुवर्णाची तर ही पहिलीच शतकी राईड होती... उन्हातान्हात कशी राईड करणार याची घरच्यांना चिंता होती... त्यावर महिलांनी तोडगा काढला होता... काही अडचण आली तर ट्रेनमध्ये सायकल टाकू आणि पुढे जाऊ... परंतु राईड पूर्ण करायची हाच मनोमन  निर्धार होता... 

प्रचंड धूळ आणि ट्रॅफिक यांचा सामना करत पावणेनऊ वाजताच सकवार येथील रामकृष्ण मिशन केंद्रात गेलो... अतिशय शांत, निर्मळ आणि अध्यात्मिक वातावरणात सर्वजण एकदम प्रसन्न झाले... नवनीतच्या ओळखीमुळे केंद्रामध्ये अल्पोपहाराची व्यवस्था झाली... कांदापोह्या सोबत फलाहार आणि चहा मिळाला...

येथील बाबाजी आणि माताजींची भेट झाली...

हे केंद्र पंचक्रोशीतील गावकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवते... तसेच गावातील आदिवासी आणि गरीब मुलांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देते... मुलांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करते... सर्व उपक्रम मोफत चालविले जातात... मुलांसोबत फोटो काढले... विशेष म्हणजे या सर्व मुलांना सायकल चालवता येत होती...

माताजी पद्मा ताई यांनी विवेकानंद केंद्र संचालित नालासोपारा येथील शारदा शिशु निकेतनला भेट देण्याचे निमंत्रण दिले... सायकलने बोईसरला निघालोय यांचे त्यांना खूप अप्रूप वाटत होते...

स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचे प्रत्यक्षिकच पाहायला मिळाले...  रामकृष्ण मिशन केंद्रात सेवा देण्याचे मनी ठरविले...  बाबाजी आणि माताजींचे  आशीर्वाद घेऊन पुढे मार्गक्रमण केले...

नंतर हायवे सोडून वरई येथे पालघर रस्त्याकडे वळसा घेतला... .. वैतरणा नदीवरील अरुंद पुलावर पोहोचायला साडेदहा वाजले होते... जेमतेम एक गाडी जाईल एव्हढाच हा पूल आहे... त्यामुळे सिग्नल होते...  पुलाच्या  दोन्ही बाजूला असलेल्या पाईपच्या लोकेशन वर मस्त फोटोग्राफी केली...

पुढे दोन दोन ग्लास उसाचा रस प्यायलो....

ऊन वाढत होते... अंग घामाने भिजून चिंब झाले होते... आणि आता आले सूर्या धरण... धरणातून ओसंडणारे फेसाळलेले पाणी पाहूनच मन आनंदाने बेभान झाले... सायकल कठड्याला लाऊन झोकून दिले सर्वांनी धरणाच्या पाण्यात...

अंगावर पडणाऱ्या जलधारा... संपूर्ण शरीराला मसाज करत होत्या... नाचणे, बागडणे, हुंदडणे, मस्ती करणे, ओरड घालणे... सर्वजण अक्षरश: बालपणात गेले होते... बेहोश झाले होते...


जवळपास पाऊण तास पाण्यात खेळत होतो... कशानेही कोमेजू नये असे एक सुंदर शैशव, बालमन  सर्वांना  लाभले होते... 

तीच बालपणीची प्रचंड ऊर्जा घेऊन ओल्या कपड्यांनीच सर्वजण एका दमात घाट चढले ... वाघोबा मंदिरात पोहोचायला भर दुपारचा एक वाजला होता... पाण्यात भिजल्यामुळे उन्हाचा दाह कोणालाच जाणवला नाही... सुवर्णा आणि हर्षलमध्ये तर आता सायकलिंग करतच बोईसरला पोहोचायचे हा आत्मविश्वास दृढ झाला होता... वाघोबा मंदिराजवळ खूप माकडे असल्यामुळे येथे काहीही खाण्याचे टाळले... 

सोबत घेतलेले ताडगोळे, कलिंगड, आणि रानमेवा जाम शेलवाडी गावाजवळच्या  गर्द वनराईत बसून हडप केले...  बालपण अजूनही ताजे होते... त्यामुळेच झाडाच्या एका फांदीवर सुवर्णा आणि हर्षल उभ्या राहिल्या होत्या...

येथून बोईसर चौदा किमी होते... टप्पा आवाक्यात आला होता... पालघर जवळील शिवाजी चौकाला  वळसा मारून बोईसर गाठले... 

स्टेशनजवळ हसतमुख अक्की उर्फ  आकाश रुपटक्के आम्हाला घ्यायला आला होता... 


तेथून सायकल दुकानाजवळ आलो...   सायकल दुकानदार आणि सायकलिस्ट प्रियेश बरनवाल बोईसरच्या सर्व सायकलींचा डॉक्टर आहे... त्याने फक्कड चहा पाजला... त्याचा भाऊ वरुणकुमार  IAS अधिकारी आहे.

बोईसर फ्लायर्सचे अतिशय आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व सायकलपटू रामदास जाधव यांनी सर्वांचे जंगी स्वागत केले... शाल आणि आंबा सरबत देऊन सन्मान केला...

आदल्या दिवशीच रामदासने बोईसर ते मुंबई आणि परत बोईसर अशी दोनशे पंच्याहत्तर किमी सायकलवारी अनवाणी केली होती... विकास कोळीसह बोईसर फ्लायर्सचे बरेच सदस्य आमच्या स्वागताला तत्पर होते...  प्रचंड सायकलिंग केल्यामुळे आता काहीही पचणार होते...

सुवर्णाचे बॅचमेट बोईसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मॅरेथॉनपटू  श्री पवार साहेब यांना भेटायला  पोलीस स्टेशनला गेलो... सुवर्णा भर उन्हात सायकलिंग करत बोईसरला आली याचं त्यांना खूप आश्चर्य वाटले... सर्वांचे त्यांनी कौतुक केले...


आणि झकास लस्सीचा पाहुणचार केला... पवार साहेबांचा निरोप घेताना पोलीस स्टेशनच्या गेट जवळ गृप फोटो काढला...

BARC च्या गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती... विकास म्हणाला...चिंचणी बीच वर जायचे काय... सर्वांनी एकसाथ होकार दिला...सायकलपटू सरिता जारोली हिने डबा भरून कलिंगड काप आणले होते... ते फस्त करून आणि पाऊण तासात तयार होऊन सर्वजण निघाले चिंचणी समुद्रकिनारी... 

सोबत सायकलिंग करत... सरिता, रामदास आणि विकास होते... वाटेत रामदास सोबत गप्पा रंगल्या... एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व संपर्कात आले होते... त्याच्याकडे खच्चून सकारात्मक भाव भरभरून आहे... कमीत कमी खर्चात सायकलने मोठे पल्ले कसे गाठायचे... हे समजले... आपल्या मुलाला राष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक मिळेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असे व्रत आहे रामदासचे... आणि दररोज पन्नास किमी सायकलिंग करतोय पठ्ठ्या... दोन चार दिवस कामामुळे सायकलिंग करता आली नाही तर... एकदम दोन तीनशे किमीचा टप्पा एका दिवसात पार करतो... आहे की नाही ध्येय वेडा... निव्वळ आणि निव्वळ मुलाला प्रोत्साहन मिळावे आणि "तुझ्या मेहनती सोबत मी सुद्धा इप्सित ठेवले आहे" याचीच सतत मुलाला जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न आहे... खरंच या सायकलिंगमुळे  प्रचंड व्यक्तिमत्त्वाची भेट झाली होती... रामदास बरोबरच त्याची नत्थुलाल जैसी मिशी खूप भावली...

वाटेत तारापुरचे अणुवीज केंद्र पाहिले...


जवळपास पंधरा किमी राईड करून चिंचणी बीचवर पोहोचलो... तेथे भेट झाली सहकुटुंब विशाल आणि पूनम राऊतची... 


सूर्यास्ताचे विहंगम दृश्य डोळ्याच्या कॅमेऱ्यात साठवले... भलामोठा लाल तांबूस गोळा हळूहळू सागरात विसर्जित होताना डोळ्याचे पारणे फिटले... 

समुद्रावर खूप वेळ बसून राहिलो... सृष्टीचे मुक संगीत ऐकत.....अगदी मंत्रमुग्ध होऊन... सर्व सायकल मित्रांच्या गराड्यात सुद्धा एकांतात गेलो होतो... कुठल्यातरी एका अगदी अज्ञात अपार्थिव अशा प्रदेशात वावरत होतो...


जिथे मी आणि सागरात डुंबणारा रवी यांखेरीज दुसरे काहीही नव्हते... त्या क्षणाचा कृतार्थतेचा आनंद डोळ्याच्या झरोक्यातून ओसंडून वाहत होता...


चमचमीत आणि चटणीदार वडापावमुळे...
एकांतवास संपवून जनसागरात दाखल झालो... आणि मारला ताव गरमागरम वडापाव वर... 

कृतार्थ मनाने परतीची राईड सुरू झाली... सरिताच्या साथीने भन्नाट वेगात BARC गेस्ट हाऊस मध्ये  पोहोचलो... 

आजच्या दिवसाचा हाय लाईट अजून शिल्लक होता...

रात्रीच्या जेवणात विकास कोळीचा घरातून आलेले पदार्थ रसनेच्या राज्यात घेऊन गेले... भरलेले पापलेट आणि सुरमई फ्राय, घोळीचे कालवण, सुके चिकन, तांदळाची लुसलुशीत भाकरी आणि भात... त्याच्या वर विकासच्या मित्राने... राहुल पाटीलने आणलेली जायकेदार पुरणपोळी या सर्व पदार्थांनी भुकेची तारांबळ उडाली होती... हे खाऊ की ते... असेच काहीसे झाले होते... सर्वांनी जेवणाचा फर्मास आस्वाद घेतला...

बोईसर फ्लायरच्या प्रचंड आदरतिथ्याने  आम्ही सर्वजण स्तिमित झालो होतो... त्यात आजची १४० किमीची सायकल राईड कुठल्याकुठे विरून गेली होती... 

तऱ्हेतऱ्हेच्या सुगंधी फुलांनी भरलेल्या परडीसारखे हे बोईसर फ्लायर्स होते... प्राजक्ताचे झाड हलवल्यावर फुलांचा टपटप सडा पाडवा तसा या बोईसर फ्लायर्सचे सदस्य आमच्या सेवेला तत्पर होते...

सायकल आणि निसर्गावरच्या उत्कट प्रेमाचा साक्षात्कार घडला होता... आणि अकृत्रिम जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले होते...

उद्याच्या बोईसर पालघर ड्रीम राईडसाठी निद्रादेवीच्या अधीन झालो...