धोदाणी धबधबा... निसर्गाचा श्वास... सायकल निसर्ग संगम...
दि. २९ जुलै २०२५
खांदेश्वर स्टेशन जवळ विकास कोळी पहाटेच सायकलवरून आला... काल अचानक ठरलं... पनवेल जवळच्या धोदाणी धबधब्याला भेट द्यायची ती सुद्धा सायकल वरून...
खांदेश्वर स्टेशन पासून 22 किमी अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या नयनरम्य धबधब्याला भेट देण्याचे खूप दिवस मनात होते... आणि काल विकासचा फोन आला... सर उद्या मला सुट्टी आहे... जायचं का धोदाणीला... नेमकी विजयची सुट्टी रद्द झाली... त्यामुळे एकट्यानेच विकासला होकार दिला...
आज खास सखी सोबतीला होती... नवीन पनवेल सोडलं आणि हिरवळीचा रस्ता सुरू झाला... दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, भुरभूरणारा पाऊस... मंद धुंद वारा... पक्षांची किलबिल... भुंग्यांचा गुंजारव... पारिजातकाचा सुगंध... या बेहोशीत वाटेतील गाडेश्वर मंदिरात पोहोचलो...
शिवलिंगाची पूजा सुरू होती... निवांत दर्शन झाले...
आता हळूहळू चढाचा रस्ता सुरू झाला... नेरे गाव सोडले आणि एकपदरी परंतु सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावरून पेडलिंग सुरू होते... मागून एस टी महामंडळाची लाल पारी आली आणि तिला वाट देण्यासाठी मातीत उतरून सायकल थांबवावी लागली...
धोदाणी गावातील मंदिराकडे पोहोचलो... गावातील चिंचोळ्या रस्त्यावरून वळणे घेत एका ओढ्याजवळ आलो... बाजूच्या घराच्या पडवीत सायकल ठेवून ट्रेकिंग सुरू झाले... डोंगरातून वाहणारे तीन ओढे पार केले...
आणि अनंत चौधरीच्या निसर्ग वडापाव सेंटरकडे पोहोचलो...
आता धबधब्याचा आवाज येऊ लागला... दूरवर दिसणारे डोंगराच्या कपारीतून बरेच धबधबे खाली कोसळत होते...
पुढे एकत्र होऊन धोदाणी धबधब्याचा प्रचंड झोत जमिनीवर अवतीर्ण होत होता...
धबधब्याची एक कड हवेत उंच झेप घेत होती...
माथेरानच्या पायथ्याशी, घनदाट जंगलात दडलेलं एक अनोखं रत्न… धोदाणी गावाजवळचा हा धबधबा म्हणजे निसर्गाचा उत्कट आविष्कार आहे...
पावसाच्या सरी अंगावर घेत होतो... टेकड्यांमधून कोसळणाऱ्या शुभ्र जलधारेचा आवाज म्हणजे जणू पृथ्वीच्या हृदयाची स्पंदने होती...
धोदाणी धबधब्याजवळ पोहोचलो... आणि निसर्ग अधिकच बोलका झाला. वाऱ्याच्या तालावर झाडांची पानं नाचत होती... ढग जमिनीवर उतरत होते... धोदाणी धबधब्याचा लयीत खळखळणारा... तो आवाज मनाच्या खोल कप्यात दडलेल्या शांततेचा होता...
त्या जलतुषारांचं सौंदर्य इतकं तरल होत की, काही क्षणांत त्यांनी धुक्याची एक स्वप्नवत चादर विणली... त्या चादरीतून उगवली एक पांढऱ्याशुभ्र पंखांची जलपरी... नजरेत क्षणभर तरंगणारी, आणि पुढच्याच क्षणी हवेत विरून जाणारी... ती कुणालाच सापडणारी नव्हती... अनुभव देणारी होती... अंतर्मनाला स्पर्श करून जाणारी होती... आणि त्या स्पर्शातून उठत होते अनेक तरंग... भावनांचे, आठवणींचे, रम्य शांततेचे...
जेव्हा ही दृश्यं मनाच्या कप्प्यांत साठतात...तेव्हा धोदाणीचा धबधबा फक्त नजरेत राहात नाही... तो हृदयात वाहतो...
खरं सांगायचं तर... इथे आल्यावर मोबाईल विसरावासा वाटला... कारण डोळ्यांच्या कॅमेराने टिपलेली दृश्यंच चिरकाल टिकतात...
जलाशयात उतरलो प्रचंड झोत आणि तुषारांची बरसात अनुभवण्यासाठी... त्यात वाऱ्याचा लपंडाव... सर्व कसे अवर्णनीय... नखशिखांत चिंब झालो होती... पण मन भरत नव्हते...
विकास मोबाईल सांभाळत लांबूनच फोटो काढत होता... जवळपास अर्धातास पाण्यात खेळत होतो... आता सपाटून भूक लागली... मधला दिवस असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजणारे पर्यटक होते त्या परिसरात...
निसर्ग सेंटरवर गरमगरम कांदापोहे आले त्यात विकासने आणलेला डाएट चिवडा टाकून क्षुधा शांत केली... चहा घेतला आणि परतीची सफर सुरू झाली...
गाडेश्वर धरणाजवळ आलो, आणि एक फलक नजरेस पडला... देहरंग धरण... क्षणभर थांबलो... अहो, काय कल्पक नाव... जेथे निसर्गाचे असंख्य रंग मुक्तपणे खेळतायत... जल, नभ, डोंगर, हिरवळ, आणि पक्षी यांचे रम्य मिश्रण... तेथे देहरंग नावच शोभून दिसते...
वाटेतल्या गप्पा सुद्धा... वाऱ्याच्या झुळुकीसारख्या हळुवार होत्या...कधी मन हलकं करत होत्या... तर कधी जीवनाचे सार सांगत होत्या... या गप्पांच्या ओघात अण्णाच हॉटेल कधी आलं कळलंच नाही...
खांदेश्वर येथे येऊन अण्णाच्या हॉटेल मध्ये डोसा, उत्तप्पा आणि कॉफी घेतली... आजची सर्व ट्रीट विकासची होती...
परममित्र विकासचा निरोप घेऊन घराकडे परतीची सफर सुरू झाली...
आजची ५२ किमीची राईड निसर्गाला अर्पण केली...
जर शांततेचा शोध घेत असाल, तर हे ठिकाण उत्तर आहे.... आणि जर थोडं साहस हवं असेल, तर धोदाणी त्यासाठीही तयार आहे... मग थांबू नका… पावसाच्या सरी झेलत, हिरवळीच्या कुशीत एक दिवस स्वतःला हरवून बघा... धोदाणी धबधबा एकदा तरी अनुभवायलाच हवा...सतीश जाधव
7977690693