Friday, September 26, 2025

११४ वे रक्तदान... हेच आहे जीवनदान.... मित्रांच्या संगतीने रक्तदानाचे प्रेरणादायी पर्व..

११४ वे रक्तदान... हेच आहे जीवनदान... मित्रांच्या संगतीने रक्तदानाचे प्रेरणादायी पर्व...

रोटरियन नागेश सोपारकर याने रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबईच्या माध्यमातून बेलापूर येथील भारती विद्यापीठात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात भाग घेण्याचा योग आला...

आमंत्रण मिळाले... तेव्हाच नागेशला सांगितले या कार्यक्रमाला नक्की येणार... शारदाश्रम १९७६ बॅच मधला रघुनंदन श्रोत्रीय याला सुद्धा नागेशने निमंत्रित केले होते... 

रक्तदान हेच जीवनदान हे ब्रीद जपणाऱ्या शारदाश्रम शाळेतील दोन माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा रक्तदान उपक्रम आयोजित करण्यात आला होता...

 वातावरणात उत्साह, जिव्हाळा आणि सेवाभावाची उर्जा पसरली होती. विशेष म्हणजे शाळकरी मित्र दिनेश नाडकर्णी, मकरंद चव्हाण आणि शरद पाटील यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहून मैत्रीची पर्वणी अधिक संस्मरणीय केली होती...

कार्यक्रमाच्या प्रारंभी नागेशने परिचय करून देताना सांगितले...
 प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देत संपूर्ण भारत भ्रमंती करणारा प्रेरणादायी सायकलिस्ट सतीश जाधव यांने नुकतीच काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहीम विक्रमी वेळात पूर्ण केली आहे... तसेच आतापर्यंत ११३ वेळा रक्तदान केले आहे... ८० हजार किमी सायकलिंग करणारा सतीश हा माझा शाळेतील मित्र आहे हे अभिमानाने सांगितले...

तसेच दुसरा शाळकरी मित्र श्री. रघुनंदन श्रोत्रीय याने १०३ वेळा रक्तदान केले आहे.. तसेच ७५ हजार किलो कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करून पर्यावरण संवर्धनात अमूल्य योगदान दिले आहे... विविध NGO सोबत काम करून आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात रघुनंदनने नवा आदर्श निर्माण केला आहे...

विशेष म्हणजे हा कार्यक्रम आयोजित करणारा रोटरी क्लब ऑफ स्पोर्ट सिटी नवी मुंबईचा सक्रीय सदस्य नागेश सोपारकर, प्रेरणादायी सायकलिस्ट सतीश जाधव आणि पर्यावरण योद्धा रघुनंदन श्रोत्रीय... हे तिघेही शारदाश्रम विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी आहेत... याची उपस्थितांना माहिती दिली...

या कार्यक्रमाचा आणखी एक ऊर्जा देणारी उपस्थिती होती पुण्याचा उमेश कणकवलीकर याची... आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त १२५ व्या वेळी रक्तदान करणार होता उमेश... मोटीवेशनल स्पीकर म्हणून कॉर्पोरेट जगतात ज्याची दखल घेतली जाते असा उमेश या उपक्रमाचा उत्सव मूर्ती होता...


शारदाश्रमच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे हा उपक्रम अधिक भावपूर्ण झाला. .. या उर्जायुक्त वातावरणात मला ११४ व्यांदा रक्तदान करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली... मित्रांच्या सहवासात रक्तदान करण्याचा आनंद म्हणजे खरी पर्वणीच होती... रोटरी क्लब ऑफ क्लीन सिटी नवी मुंबई तर्फे शाल श्रीफळ आणि मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला...


नवी मुंबई रोटरी क्लबने माझा सहकुटुंब सन्मान केला... हे रक्तदानाचे सर्वश्रेष्ठ दान शक्य झाले ते माझ्या पत्नीमुळेच... तिच्या पाठिंब्यामुळेच मी ११४ वेळा रक्तदान करू शकलो... याची प्रांजळ कबुली दिली...

रघुनंदन आणि उमेश सारख्या प्रेरणादायी व्यक्तींना भेटल्यामुळे रक्तदानाच्या क्षेत्रात आणखी कार्य करण्याची ऊर्जा मिळाली... विशेष करून तरुणांनी नियमित रक्तदान करावे म्हणून भारती विद्यापीठातील तरुणांना आवाहन केले... नियमित रक्तदान करा आणि आरोग्यदायी भारत घडवा...

आजचा दिवस... रक्तदान कार्यक्रमासोबत... मैत्री, समाजसेवा आणि पर्यावरण जाणीव या सगळ्या मूल्यांचा एकत्रित उत्सव होता...

रक्तदानातून प्रचंड ऊर्जा... मित्र भेटीतून जुन्या सुखद आठवणी आणि समाजसेवेतून अपरिमित आनंद या भावनांचा आज त्रिवेणी संगम झाला होता...

सतीश जाधव
7977690693


Tuesday, September 16, 2025

सुरांच्या सोहळ्यात सुवर्णक्षण साकारणारी सोगोप्रीत संगीत संध्या... रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५

सुरांच्या सोहळ्यात सुवर्णक्षण साकारणारी सोगोप्रीत संगीत संध्या...
 रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५

गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा हमे तुमसे प्यार कितना या एकल गाण्याच्या कार्यक्रमाची घोषणा झाली... गेले नऊ महिने सततच्या सायकलिंग इव्हेंटमुळे सोगो परिवारात सामील होता आले नव्हते... परंतू ठरवले होते... सायकलिंग कार्यक्रमाला थोडी बगल देऊन या सोगो संगीत सोहळ्यात सामील व्हायचे... त्यामुळे तातडीने वर्गणी भरली... 

सायकलिंग जसे फिटनेस आणि भारताच्या पर्यावरणासाठी करतो आहे... तसेच गाणे आत्म्याला स्वच्छ, हलके आणि आनंदी बनविण्यासाठी गातो आहे... दोन्हीही माझे पॅशन आहे... जीवनाला निरोगी, उत्साही आणि अर्थपूर्ण दिशा देणारे...

पहिलं गाणं मिळालं... मैं हूं झूम झूम झूम झूम झुमरू... किशोरदांच्या खास अंदाजात गाण्याचा सूर पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला... हे उडत्या चालीतले गाणे जमू लागले पण किशोरदाच्या उडली साठी घसा हट्टीपणे साथ देत नव्हता... प्रीती दीदींच्या हे लक्षात आले... 

त्या अपूर्णतेतूनच पुढचं पाऊल उचललं गेलं... सोगोने दुसर गाणं दिलं... आणि मग  रामपूर का बासी हुं मैं लक्ष्मण मेरा नाम या गाण्याचा सराव सुरू झाला...

सोमवार - बुधवार हे गाण्यासाठी ठरलेले सरावाचे दिवस होते... सायकलिंगच्या सकाळच्या प्रॅक्टीस सोबत गाण्याचा सराव सुरू झाला... 

दरम्यान आग्रा ते राजगड या महत्वाच्या सायकल इव्हेंटमुळे दोन आठवडे प्रॅक्टीस चुकली होती... तरी घरी सराव करत गाण्याची नाळ तुटू दिली नाही.... 

घराजवळच नवीन कराओके स्टुडिओ सुरू झाला होता... एकदा सरावासाठी त्या स्टुडिओत हजेरी लावली... तेव्हा जाणवलं की चुका दाखवणारा डोळस मार्गदर्शक तेथे नव्हता... त्यामुळे गाण्यातील खाचाखोचा, आलाप इत्यादी साठी असलेले सूक्ष्म बारकावे लक्षात येत नव्हते...

सोगो सरावात उत्तम गोवेकर ठामपणे सांगायचा... आज तुझा घसा बसलाय... प्रीती दिदी नजरेतून आणि हातवाऱ्यातून मोठ्या तानांचा संकेत द्यायची...

 एकदा उत्तमनं गंमतीत दिलेला सल्ला लक्षात राहिला... घशाला कामठी मारून घे!... त्या क्षणी त्याचा अर्थ कमीसा कळला... पण विचार पक्का झाला की गळ्याला ताकद द्यायची तर काहीतरी वेगळं करावं लागेल... सकाळी सायकल प्रॅक्टीस दरम्यान भारत माता की जय... गणपती बाप्पा मोरया... या तार स्वरात दिलेल्या घोषणांमुळे गळ्यावर अतिरिक्त ताण पडत होता... त्यामुळे गाण्याच्या सरावात... उच्च सुरातला अंतरा गाताना आवाज बसत होता...

भावाला विचारलं... तो गाण्याचा तज्ञ असल्याने त्याने एक सोपा मंत्र दिला... दररोज शंख वाजव...

त्यानंतर ज्या दिवशी प्रॅक्टीस असायची त्या दिवशी सकाळी तीन वेळा शंख वाजवण्याची प्रॅक्टीस सुरू झाली... रंगीत तालीमपूर्वी आठवडाभर अर्धा मिनिट अखंड शंख वाजवायचा संकल्प घेतला आणि त्याचा परिणाम थेट जाणवला... मोठी तान अधिक सहज, अधिक खुल्या स्वरूपात येऊ लागली...

रंगीत तालीम जोमदार झाली... गाण सुव्यवस्थित गायलं गेल होत... आणि पसंतीची... शाबासकीची थाप उत्तम गोवेकरने दिली... त्यामुळे आता ग्रँड फिनालेला गाणं खुलणारच हे निश्चित झालं होतं...

 शो च्या दिवशी तोच अनुभव प्रत्यक्षात उतरला... गाणं सुरू होताच प्रेक्षकांचा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद मिळू लागला... विशेषत: “खद्दर की छाया मे भारत जागा है” या ओळींवर मजरुह सुलतानपूरी यांचा मुलगा अंदलीब एव्हढे भारावून गेले की त्यांनी उस्फूर्तपणे टाळ्यां वाजवून वातावरण भारून टाकले.... नंतर अंदलीब यांनी स्टेजवरील भाषणात माझ्या गाण्याचा आवर्जून उल्लेख केला... तो क्षण माझ्यासाठी फार मोठा अनमोल गौरव होता...

जाणकारांची दाद ही कलाकारासाठी सर्वांत मोठी शाबासकी असते... आणि ती मिळाल्यावर आत्मविश्वास दुणावतो...

या अनुभवातून सिद्ध झालं की सातत्यपूर्ण सराव, योग्य मार्गदर्शन आणि आपल्या जवळच्या लोकांचा पाठिंबा मिळाला की बाथरूममध्ये गाण गुणगुणणारा साधा गायक सुद्धा स्टेजवर उत्कृष्ट परफॉरमन्स करतो... ठाम उभा राहू शकतो... 

पेडणेकर आणि त्यांच्या टीमने केलेला देखणा मेकअप... त्यामुळे चेहरा मोहरा बदलून गेला होता... स्टेजवरील लाईटमध्ये आर्टिस्ट - परफॉर्मर म्हणून लाईम लाईट मध्ये येण्यास त्यांनी हातभार लावला होता... पेडणेकरचा वाढदिवस सुद्धा सर्व गायक कलाकारांनी जोरकसपणे साजरा केला...

फोटोग्राफर संतोष प्रधान याने केलेली... गाण्याचा प्रत्येक क्षण टिपणारी कॅन्डीड फोटोग्राफी एकदम अफलातून होती... माझेच फोटो मला ओळखता येत नव्हते... एवढे बहारदार होते... त्यांनी गाण्याला अधिक देखणं रूप दिलं...

स्टुडिओ 99 चे पवन गोसावी यांचे... दोन व्हिडिओ कॅमेऱ्याने प्रत्येक क्षणाची लाईव्ह व्हिडिओग्राफी करणे तसेच व्हिडिओचे मिक्सिंग करून ते यूट्यूब चॅनलवर अपलोड करणे... हे काम अतिशय सफाईदारपणे चालले होते...

साउंड मिक्सिंग का क्या कहना... आवाजातला बेस आणि गोडवा एकदम खुलून आला... ही निखिल पांचाल त्यांच्या हाताची जादू होती... 
कार्यक्रमाची सूत्रसंचालिका तन्वी हिने सायकलिंगबद्दल केलेला छोटासा उल्लेखही गाण्याला अतिरिक्त रंग भरून गेला. 

संकेतने मोबाईल व्हिडिओ शूटिंगचे काम चोख बजावले होते... तर साक्षी काही हवं का याची प्रेमाने चौकशी करत होती... दोघेही आता सोगो कुटुंबाचे प्रेमाचे घटक आहेत.

पत्नीने जयपूरहून आणलेला राजस्थानी साफा तसेच जावयाचं पितांबरी धोतर आणि मुलीने आणलेला गुलाबी सदरा गाण्याच्या वेळी परिधान करून मिरवता आले... त्यामुळे सादरीकरणाला एक वेगळीच झळाळी मिळाली होती...

मध्यंतरानंतर ताबडतोब गाणं असल्यामुळे रुचकर उपम्याचा आस्वाद पुरेसा घेता आला नव्हता... गाणं संपलं आणि उपमा सुद्धा... पण चव आणि स्वर दोन्हींची लज्जत मनात रेंगाळत राहिली...

हा कार्यक्रम बहारदार गाण्यांच्या सोबत... मित्रांच्या मैत्रीचा... कुटुंबाच्या सहकार्याचा... आणि अतूट नात्यांचा सोहळा होता... 

प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या गाण्याचं सोन केलं होतं.. ते सोनचाफ्याप्रमाणे फुलवलं त्यामुळेच हा सोहळा मोगऱ्याच्या सुगंधाने दरवळला .... तसाच आयुष्यभरासाठी मनात साठून राहिला...


सोगोप्रीत यांच्या अथक परिश्रम आणि समर्पणामुळे हा सुरेल सोहळा उजळून निघाला... प्रत्येक क्षण नव्या ऊर्जेने भरून गेला.. कार्यक्रमाला अभूतपूर्व उंची लाभली आणि सर्वांच्या हृदयात कायमस्वरूपी आनंदाची आठवण कायमची कोरली गेली...

या सोहळ्यासाठी अविश्रांत मेहनत घेणारे सोगोप्रीत यांना त्रिवार अभिनंदन...

सतीश जाधव
7977690693




Saturday, September 13, 2025

मित्रमैफिल जमली… 🌧️☕🐟दि.१३.०९.२०२५

मित्रमैफिल जमली… 🌧️☕🐟

दि. १३.०९.२०२५

पुण्याचा परममित्र सतीश टंकसाळे उर्फ बाबा आणि गिरगावचा अनंत दाभोलकर यांची भेट झाली... खूप महिन्यांनी...

सतीश उर्फ बाबा काल प्रतिथयश गायिका शोभा मुदगल ह्यांचा बारिश हा शास्त्रीय उपशास्त्रीय गाण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी चर्नी रोड येथील रॉयल ऑपेरा हाऊस थिएटर मध्ये आला होता... 

आम्हा मित्रांना खास भेटण्यासाठी आज मुंबईत बाबा थांबला होता...  सायंकाळी बरोबर पाच वाजता रिगल पॅलेस हॉटेल मधील सूट नंबर ११७ मध्ये अनंत दाभोलकर सह एन्ट्री घेतली... 

वेळेचा भोक्ता असणारा बाबा आम्ही पाच मिनिटे लवकर पोहोचल्यामुळे अतिशय खुश झाला होता... कडकडून मिठी.मारली... आज खूप दिवसांनी गळाभेट घेतली होती... 

चहाच्या घोटाबरोबर सुरू झाली गप्पांची मैफिल... बाबाला ऐकणे हिच भूमिका आम्ही दोघांनी घेतली होती... जुन्या गोड आठवणी... बाबा भरभर बोलत होता... आम्ही तुडुंब हसत होतो... त्याच्या बालपणीचा ज्योतिष  शास्त्रीबाबाचा जोक पुन्हा सांगताना सतीशबाबा जाम खुश झाला होता...

बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि इकडे बाबा गप्पांच्या धूमधडाक्यात जोरदार बरसत होता... बाबांसोबत आम्ही सुद्धा जुन्या आठवणीत हरपून गेलो होतो... 

पंचरत्न इमारती शेजारील रिगल हॉटेल मधून बाहेर पडून गिरगाव चर्च शेजारील श्रीराम हॉटेल मध्ये आलो... आता खाण्याबरोबर गप्पांची मैफिल रंगली... बाबाला सोलकढी थंड नको होती  म्हणून वेटरने एक आयडिया केली आमच्या फ्रेश लाईम  सोडा सोबत... थंड सोलकढी ओव्हन मध्ये ठेऊन गरम केली... बाबा एकदम खुश...

अनंताच्या आवडीचे मासे मिळण्याचे हे हॉटेल होते... उकडलेले चणे, फिश फिंगर, बोंबील आणि मांदेली या सोबत तीनचार चटण्या... नक्की गप्पांनी पोट भरले की मासे खाण्याने भरले ते कळलेच नाही... 

चौथा मित्र राजेशला पाठवण्यासाठी माशांचे फोटो काढले... कारण त्याला आम्ही खूप मिस केले होते...

अतिशय खुमासदार जेवणयुक्त स्टार्टर दिल्याबद्दल श्री राम हॉटेल मधील स्टाफला खूप धन्यवाद दिले... आणि बाहेर पडलो... पाऊस सुरूच होता... बाबा म्हणाला आज खूप दिवसांनी दिलखुलास हसलो... आता फार हलकं वाटतं आहे... 

तेथून पंचरत्न पानवाल्याकडे आलो... कलकत्ता मसाला पानाचा तोबरा तोंडांत भरला आणि आजच्या मित्र भेट मैफलीची सांगता झाली... 

रिगल हॉटेल जवळ बाबाचा निरोप घेताना... पावले जड झाली होती... आता पुढील मैफिल बाबाच्या पुण्याजवळील फार्म हाऊस वर होणार आहे... आणि त्यानंतर राजेशच्या कसारा येथील बंगल्यावर... या वयात मित्र का असावेत याची प्रकर्षाने जाणीव झाली...


सतीश जाधव

7977690693


@@@@@@@


Friday, September 12, 2025

"सायकलिंग, मित्र आणि मस्तीची सकाळ... दिनांक ११.०९.२०२५...

सायकलिंग, मित्र आणि मस्तीची सकाळ... दिनांक ११.०९.२०२५...

आज सकाळी सहा वाजता सुखदेव आणि बळवंत इमारतीच्या खाली हजर झाले... मूड भारी... सोबत सायकलिंगसाठी सज्ज झाले होते...

बळवंतच्या डोक्यात हेल्मेट नव्हते... त्याला सांगितले सेफ्टी फर्स्ट... पुढच्या वेळेस हेल्मेट नसेल तर राईड नाही...

सुरू झाली राईड... वरळी दूरदर्शन कडून वरळी नाका आणि महालक्ष्मी मंदिराकडून ताडदेव नाना चौक करून NCPA ला पोहोचलो... वाटेत भेटला रणजीत सिंग... जो येतोय घुमानच्या वारीला... आता त्याचा जोरदार सराव सुरू आहे...

सायकल निवडण्यापासून चालविण्यापर्यंत तसेच सायकलिंगची बेसिक टेक्निक्स काय आहेत याची माहिती सुखदेव, बळवंत आणि रणजीतला दिली... 
सर्वसाधारणपने बऱ्याच इमारती खाली चांगल्या सायकली धूळ खात पडलेल्या दिसतात... त्याचे कारण एकच असते... सुरुवातीला आपल्या बजेट प्रमाणे छान सायकल घ्यायची... पण काही दिवसातच हात दुखतो, पाय दुखतो, मान, कंबर मनगट, कोपर दुखतो म्हणून सायकल चालवणे कमी होत जाते... मग ती सायकल धुळीच्या साम्राज्यात सामील होते... याचे एकमेव कारण आहे... घेतलेली सायकल तुमच्या बॉडी जोमेट्री प्रमाणे नसणे... 

त्यामुळे नवीन सायकल घेणाऱ्यांना एकच सांगणे आहे... सायकल घेताना सायकल टेक्निक्स माहिती असणाऱ्या मित्राची मदत घेऊन सायकल घ्यावी... आणि प्रथमच सायकलिंग सुरू करायची असेल तर मित्राची जुनी सायकल घेऊन प्रॅक्टीस करा आणि कालांतराने तुमच्या शरीराला योग्य असणारी सायकल घ्या...

हे सांगण्याचे कारण एकच होते... सोबत सायकलिंग करत असलेला सुखदेव नवी सायकल शोधतोय... सध्या त्याच्याकडे असलेली नॉन गियर सायकल सुद्धा अतिशय चांगली आहे... आणखी काही महिने चालल्यावर त्याच्या शरीरयष्टीला साजेशी गियर सायकल घ्यावी...

बळवंतला सुद्धा सायकल सीट वर घ्यायला सांगितली आणि लँडिंग टेक्निक शिकविले... सायकलचे बेसिक टेक्निक्स व्यवस्थित शिकून ती चालविली... तर वाचविण्याचा आनंद मिळतो आणि शारीरिक दुखापत न होता खूप काळापर्यंत सायकलिंग करता येते... 

तरुणांना क्रेझ असते स्पीडची... परंतु वेगात सायकल चालविणे म्हणजे अपघाताचा धोका आमंत्रित करणे होय... कुटुंबवत्सल व्यक्तींनी सतत एक गोष्ट ध्यानात ठेवावी... आपली घरी कोणीतरी वाट पाहतंय...

एवढ्यात आर्मी मॅन सर्वानंदची भेट झाली... सेलिंग आणि यॉटिंगचा कोच असलेला सर्वानंदने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे... तसेच त्याने एक व्रत घेतले आहे... सकाळी सायकलिंग करताना जितके सायकलिस्ट भेटतील त्यांना हर्बल चहा पाजणे... आज तर त्याने छोटे छोटे काचेचे ग्लास आणले होते... हर्बल काढ्याचा घोट घेताच राईडला मस्त ताजेपणा मिळाला...

पेडर रोडचा पूल चढताना सुखदेव अप्पर बॉडी जोरजोरात हलवत पेडलिंग करत होता... पुलाच्या वर येई पर्यंत धापा टाकू लागला... त्याला सांगितले... चढाव चढताना योग्य गियर सेट करून चढवावी लागते... त्यामुळे दम लागत नाही... नॉन गियर सायकल एका रिदमने चालविली तरीही पूल सहज चढता येतो... तसेच पायाच्या मध्यभागाने पेडलिंग न करता पायाच्या पंजाने पेडलिंग केले की जास्त जोर मिळतो... आणि पेडलिंग सोपे होते...

नवीन सायकलिस्टना बेसिक गोष्टी व्यवस्थित समजल्या की ते नक्कीच सायकलिंग मधला आनंद लुटू शकतील... याची खात्री आहे...

सुखदेव आणि बळवंत महालक्ष्मी स्टेशनकडे वळले आणि माझ्यासह रणजीत वरळी सागरी सेतू जवळ नव्या झालेल्या सायकल ट्रॅककडे आलो... येथील सायकल ट्रॅकवर सायकलिंग करणे म्हणजे पर्वणी होती... आता तर वरळी समुद्रकिनाऱ्याचे रूपच पालटून गेले आहे... भुयारी मार्ग आणि वळणावळणाचा पट्टे मारलेल्या सायकल ट्रॅक वरून सायकलिंग करायला वेगळीच मजा आली... 
सायकलिंग म्हणजे कर्डिओ व्यायाम तर आहेच... तसेच मित्र, मजा, सुखद आठवणी आणि अपार उत्साह यांचा संगम आहे.
दोस्तांच्या गराड्यात तीस किमी सायकलिंग कधी पूर्ण झाली ते कळलेच नाही..

सतीश जाधव
7977690693

Monday, September 8, 2025

ट्रॉम्बेच्या किनाऱ्यावर सापडला मायेचा खजिना...दि. ०८ सप्टेंबर २०२५...

ट्रॉम्बेच्या किनाऱ्यावर सापडला मायेचा खजिना...

दि. ०८ सप्टेंबर २०२५...

काल फोन आला विकासचा...‌ ट्रॉम्बेच्या ताईकडे खेकडे आले आहेत म्हणून... आणि ठरले उद्या सकाळी विकासची बहीण विद्याकडे ट्रॉम्बेला सायकलिंग करत जायचे... 

आज सकाळी सुरू झाली राईड ट्रॉम्बेकडे... प्रियदर्शिनी इमारतीजवळ मी हाय कोली... चा स्टॅच्यु लागला... 

योगायोग होता कोळीवाड्यात चाललो होतो... आणि कोळ्यांच आणि खेकड्याच दर्शन व्हावं...

पुढे चेंबूरला किसन भेटला... सायकलिंग करत सकाळच्या रपेटला चालला होता... डोक्यात ना हेल्मेट... ना हातात ग्लोव्हज... त्याला सांगितल्यावर म्हणतो कसा... आज छोटी राईड आहे ना... सांगितले राईड छोटी असो वा मोठी "सेफ्टी फर्स्ट"... आनंदाने कबूल झाला... 

बोलता बोलता त्याने हाताच्या मसाजचे टेक्निक दाखवले... इंटेन्स सायकलिंग करताना हात सुन्न पडले की जोरदार टाळी कशी वाजवायची हे शिकविले... माझ्या हातावर प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले... 

 ठेंगणा ठुसका... बोलण्यात चटपटीत... गाणी गाण्यात हुशार... मॅरेथॉन रनर...  शरीरशास्त्राची बारकाईने जाण असलेला प्रशिक्षित मालिशवाला... असा अष्टपैलू  आविष्कार असलेला किसनचा हात अतिशय तगडा होता... आणि त्यावरूनच जाणवलेले हस्तकौशल्य अफलातून... निव्वळ दहा मिनिटांच्या भेटीत त्याचे व्यक्तिमत्व अक्षरशः मोहित करून गेले...

आपल्याकडे आहे ते इतरांना देत राहावे” हेच त्याचे ब्रीद... किसनच्या त्या दिलखुलास स्वभावाने मन तर जिंकलेच… आणि त्याला मालिशसाठी घरी बोलवायचे मनोमन नक्की केले...

इतक्यात विकासाचा फोन आला... तो BARC गेट जवळ वाट पाहत होता... सकाळी पाच वाजता खांदेश्वर वरून पेडलिंग करत निघालेला विकास माझ्या भेटीसाठी थांबला होता... 

MTB सायकल घेऊन आला होता विकास... तेथून तडक ट्रॉम्बे जेटीवर गेलो...

ओहोटी असल्यामुळे मासेमारी बोटी जेट्टी पासून दूर अंतरावर उभ्या होत्या... 

जाळ्यात सापडलेले मासे छोट्या बोटीत टाकून किनाऱ्याकडे ढकलत आणण्याचे काम कोळी बांधव करत होते... ओल्या वाळूत होडीच्या ढकलण्यामुळे पाणवाट तयार झाली होती...

समोरून उगवणारा सकाळचा सूर्य मनात नीरव शांतता निर्माण करत होता... 

सोन्याच्या किरणांनी समुद्राचे दर्पण उजळले होते...आणि नवी उमेद घेऊन पहाटेचे आकाश खुलले होते... निसर्गाचे हे असंख्य रंग अनुभवत, त्यात मन हरपून जाण्याचा क्षण हिच संपन्नता असते... आणि त्या लयीत विरघळणे म्हणजेच अखंड आनंदाचे अविनाशी निधान होते...

तेथून अटल सेतूचे दर्शन झाले...  

सेतूच्या ह्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईचे दळणवळण आणि जनजीवन खूप सुसह्य झाले आहे...

तेथून मागे परतत ट्रॉम्बे कोळीवाड्यात विकासाच्या बहिणीकडे विद्याताईकडे जायला निघालो तर वाटेत विकासाची सायकल पंचर झाली... ती तशीच ढकलत विद्याकडे आलो... प्रथम पंचर काढले... आता विकास पंचर काढण्यात एकदम पटाईत झाला आहे... 

घरात शिरताच तव्यावर तळण्याचा खमंग सुगंध नाकात शिरला... हात धुण्याच्या बहाण्याने किचन मध्ये गेलो असता तळत असलेली भरली कारली सूरमयीच्या तुकडी सारखी भासली... तांदळाची लुसलुशीत भाकरी आणि हिरवी चटणी भरलेली कारली खाताना मन तल्लीन झाले...

ठक्कर बेकरीची बिस्किटे, ड्रायफ्रुट लाडू, आणि फक्कड चहा... विद्याताईच्या घरातली शाकाहारी मेजवानी एकदम भारी होती... विकासचे भाऊजी आणि भाचा यांची भेट झाली... दोघेही कामावर जाण्याच्या लगबगीत होते... भाच्याचे लग्न ठरल्यामुळे संपूर्ण घर खुशीत दिसत होते... 

आणि मग सुरू झाला मेजवानीचा दुसरा भाग... विद्या ताईने हसत हसत दोन पिशव्या हातात दिल्या. एका पिशवीत होते लाख भरलेले जिवंत खेकडे, तर दुसऱ्या पिशवीत खाडीची टवटवीत, फडफडीत कोळंबी... खास घरी न्यायला... पैसे घ्यायचं नावही नव्हतं... विद्या ताईला म्हटलं,  या पुढे मला पुन्हा ट्रॉम्बेत बोलवायचं असेल तर पैसे घ्यावेच लागतील...

एक मात्र हृदयात ठसले... मुंबईचे हे भूमिपुत्र एकदा का कुणाला आपलंसं मानतात... तेव्हा त्यांचं दिल खोलके प्रेम... पैशापेक्षा हजारपट श्रीमंत भासतं... आणि त्या निखळ मायेपुढे जगातील प्रत्येक व्यवहार क्षणात लहान ठरतो...

 विकाससह विद्याताईचा निरोप घेतला... BARC नाक्यावर विकास वाशीकडे वळला... त्याचा रामराम घेऊन भरभरून मिळालेल्या प्रेमाच्या सागरावर विराजमान होऊन परतीची सफर सुरू झाली...

आजची चाळीस किमी राईड मुंबईच्या समस्त भूमिपुत्रांना सादर अर्पण...

सतीश जाधव

7977690693