Tuesday, March 10, 2026

जाता संतांच्या गावा” दि. ०८ मार्च २०२६

जाता संतांच्या गावा”  दि. ०८ मार्च २०२६

घुमान सायकल वारीचे संयोजक सूर्यकांत भिसे गुरुजी यांचे सुपुत्र स्वामीराज भिसे यांनी संतपरंपरेचा सखोल  अभ्यास करून लिहिलेल्या “जाता संतांच्या गावा” या ग्रंथाचे प्रकाशन काल रानडे इन्स्टिट्यूटचे सभागृह, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे येथे संपन्न झाला. 

मा. डॉ. सदानंद मोरे... अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मा. राजेश पांडे... संचालक, राष्ट्रीय पुस्तक न्यास, मा. डॉ. संजय विष्णू तांबट... अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मा. सचिन परब... संपादक, वार्षिक रिंगण, मा. कृष्णकुमार गोयल... अध्यक्ष, खडकी शिक्षण संस्था, मा. डॉ. संजय चाकणे... सहसचिव, खडकी शिक्षण संस्था, कॅप्टन आत्मसिद्ध भिसे... चेअरमन, मा.सै. सह. पतसंस्था दिघी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. 

संतांच्या ओव्या, अभंग, समाधी स्थळे, मंदिरे आणि संतपरंपरेचा विद्यमान समाजजीवनावर असलेला प्रभाव यांचा सखोल अभ्यास करून स्वामीराज भिसे यांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून हा ग्रंथ साकार केला आहे. संतसाहित्याचा आशय, त्यामागील अध्यात्मिक विचार आणि समाजजीवनातील प्रेरणादायी भूमिका यांचे अभ्यासपूर्ण चित्रण या ग्रंथात आढळते. त्यामुळे हा ग्रंथ संतपरंपरेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार आहे.

या प्रकाशन सोहळ्याला पंढरपूर ते पंजाब... घुमान सायकल वारीचे सर्व सक्रिय सदस्य मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. संतपरंपरेचा वारसा जतन करण्याच्या या उपक्रमाचे सर्वांनी मनापासून स्वागत केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वामीराज भिसे यांच्या संशोधनपर कार्याचे कौतुक करत संतविचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या या प्रयत्नाला मोठे महत्त्व असल्याचे सांगितले.

स्वामीराज सूर्यकांत भिसे लिखित जाता संतांच्या गावा...  या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक अत्यंत अर्थपूर्ण चित्र आणि त्यासोबत एक चिंतनशील कवन दिसते...

संत केवळ मंदिरातच सापडत नाहीत; ते भेटतात रस्त्यावर, गर्दीत, विसरलेल्या गल्ल्यांमध्ये आणि आपल्या मनाच्या खोल तळाशी...

या ओळींतून संतत्वाचा व्यापक अर्थ उलगडतो. संत हे केवळ मंदिरात पूजले जाणारे व्यक्तिमत्त्व नसून ते जीवनाच्या प्रत्येक प्रवाहात अनुभवता येणारे चैतन्य आहेत. समाजाच्या गजबजाटात, दैनंदिन जीवनाच्या धावपळीत आणि माणसाच्या अंतर्मनात त्यांचे विचार सतत मार्गदर्शन करत असतात...

चित्रात दिसणारी होडी या विचारांचीच प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. चारही बाजूंना पसरलेली पाने, जणू संतांच्या अभंगांची, ओव्यांची आणि त्यांच्या अनुभवसंपन्न वाङ्मयाची आठवण करून देतात. त्या ज्ञानसमुद्रात ही छोटीशी होडी आपला मार्ग शोधत पुढे सरकत आहे...

होडीवरील भगवा ध्वज संतपरंपरेतील त्याग, अध्यात्म आणि प्रेरणेचे प्रतीक आहे... जशी होडी लाटांमधून वाट काढते, तशीच संतवाणी जीवनातील गोंधळातून माणसाला योग्य दिशा दाखवते...

या चित्राचा आणि कवनाचा  एकत्रित भावार्थ असा की, संतांचा शोध घेण्यासाठी दूर जाण्याची आवश्यकता नाही. संतविचार समाजाच्या प्रत्येक प्रवाहात आणि माणसाच्या अंतर्मनात जिवंत असतात. त्या विचारांच्या दिशेने प्रवास सुरू झाला की जीवनालाही नवी दिशा आणि नवे प्रकाशपथ प्राप्त होते...

संतांचा विचार, त्यांची शिकवण आणि समाजजागृतीचा संदेश यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे “जाता संतांच्या गावा” हे पुस्तक निश्चितच वाचकांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. 

सतीश विष्णू जाधव, सायकलिस्ट

7977690696