Wednesday, February 5, 2020

*संजय कोळवणकर एक भारदस्त मित्र*

04  फेब्रुवारी 2020

*संजय कोळवणकर एक भारदस्त मित्र*

आज, परममित्र संजय कोळवनकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. माझ्या सोबत विजय, शरद आणि यशवंत हे तीन सायकालिस्ट मित्र होते. संजय आमची वाट पाहतच होता. ठाण्याच्या पारिजात सोसायटीमध्ये पटांगणात सायकल लॉक करून संजयच्या घरी आगमन झाले. प्रशस्त आणि नीटनेटक्या हॉलमध्ये प्रवेश केल्यावर मन प्रसन्न झाले. प्रतिभा वहिनीने आम्हा सर्वांचे आनंदाने स्वागत केले. 

संजयचा मुलगा संकेत कामावर नऊ वाजता निघतो. त्याची भेट घेण्यासाठी आम्ही पावणे नऊ वाजताच संजयकडे आलो होतो. संकेत तयारी करून हॉल मध्ये आला. आम्हाला नमस्कार करून तो कामाला निघाला. संकेत आय टी क्षेत्रात काम करतो.
मुंबई वरून सायकलिंग करत येऊर आणि तेथून ठाणे पूर्व एवढा प्रवास झाल्यावर सपाटून भूक लागली होती. गरमागरम इडल्या, चटणी आणि सांबर असा फक्कड न्याहारीचा बेत होता. त्या नंतर मसाले चहा आला. मन तृप्त झाले. 

इतक्यात संजयची मुलगी स्वातीचे आगमन झाले सोबत नातू शौर्य होता. आम्हाला पाहून शौर्य दरवाजातच थबकला.  स्वातीची सुद्धा ओळख झाली. तीला  सुद्धा कामावर जायचे होते.

"तुझे नाव काय शौर्य" असे शौर्यला विचारताच. मी "शौर्य कल्पेश फोंडे" असे चटकन शौर्य म्हणाला. अतिशय चुणचुणीत आणि आजोबांचा लाडका होता शौर्य.
नास्ता करतानाच माझे bpt मधील सायकलिस्ट मित्र यशवंत जाधव आणि संजयच्या गप्पा सुरू झाल्या. संजय कार्यकर्त्यांची तरुण पिढी तयार करतोय, हे ऐकून छान वाटले. संघटनेच्या अनुषंगाने त्याचे फिरणे होतेच, पण सहकुटुंब सुद्धा संजय फिरत असतो. फार्म हाऊसवर महिन्यातून एक फेरी असतेच. जवळच्या तलावात रोज अर्धा किमी पोहतो संजय. 

हो !  आणखी एक मस्त सवय संजयला आहे. तो बोलण्याच्या भरात एक डोळा मिचकाऊन समोरच्याला आपलेसे करतो. 

गप्पा मध्ये तासभर कसा गेला कळलेच नाही. आम्हा सर्वांना संजयने नवीन वर्षाची डायरी भेट दिली. संजय आणि प्रतिभाला माझ्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन आम्ही निरोप घेतला.
आम्हा सर्व सायकालिस्टना सी ऑफ करण्यासाठी संजय आणि शौर्य खाली पटांगणात आले होते. संजयची बिटवीन सायकल खालीच लॉक करून ठेवली होती. सायकलिंग सुद्धा सुरू करतोय हे आश्वासन संजयने दिले. 

सर्वांचा एकत्र फोटो काढून परतीचा प्रवास सुरू झाला. वाटेत सायकालिस्ट शरद म्हणतो, " आज खूप मोठ्या आसामीची ओळख झाली". या शब्दांनी मला माझ्या मित्राचा "संजयचा" खूप अभिमान वाटला.
*सायकलिंगने आणखी एक छान गोष्ट माझ्या जीवनात आणलीय. ती म्हणजे सायकलिंग करता, करता मित्रमंडळी, आप्तस्वकीय यांच्या घरी भेट देणे. व्हाट्स अँप फेसबुकच्या व्हर्च्युअल जगातून बाहेर पडून आपण जेव्हा एकमेकांना प्रत्यक्ष भेटतो, तेव्हा मैत्रीचा जिव्हाळा, आनंदाची देवाणघेवाण आणि कुटुंबातील इतर सदस्यांची ओळख यामुळे स्नेहभाव वृद्धिंगत तर होतोच आणि प्रेमाचे नाते अधिक दृढ होते.*


सतीश विष्णू जाधव


घोडबंदर सायकलिंग लूप

21 जानेवारी 2020

*घोडबंदर सायकलिंग लूप*

आज दादर, बोरिवली, घोडबंदर, ठाणे आणि दादर अशी 80 किमी सायकल राईड करायचे मी आणि विजयने ठरविले. कुठेही हॉटेल मधले खायचे नाही म्हणून सोबत मसाले दूध आणि सुकामेवा घेतला होता.

 सकाळी 5.20 ला दादरच्या सेनाभवन कडून राईड सुरू झाली. वांदऱ्यावरून हायवे ला न जाता, स्वामी विवेकानंद रस्त्यावरून सायकलिंग करत तासाभरात बोरिवली गाठले. सकाळच्या कमी रहदारीमुळे सायकलिंग करायला धम्माल आली. 

अहो आश्चर्य!  वाटेत सायकलिंग करताना अतुल सापडला. सकाळ सकाळी क्रिकेट खेळायला निघाला होता. दहिसर स्टेशन जवळच्या बस स्टॉप जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला.  दूध, सुकामेवा आणि सिद्धिविनायक बुंदी लाडू खाऊन अतुलला टाटा करून पुढची राईड सुरू केली.  

घोडबंदर जवळील फाउंटन हॉटेल पार केले आणि घाट चढाई सुरू झाली. ट्राफिक किंचित वाढली होती घोडबंदर ते ठाणे पूर्व द्रुतगती महामार्ग हे 16 किमी अंतर धडाक्यात पूर्ण करण्यासाठी सायकलचा स्पीड वाढवला. तेव्हढ्यात कासारवाडी जवळ  विजय मागून मोठ्याने हाक मारत होता. त्याच्या सायकल मधून चर.. चर.. आवाज येत होता. थांबून, मागचे चाक खोलले. ब्रेक पॅड घासून निकामी झाले होते. आता येऊरला समर्पयामि शॉपीवर जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
येऊर चढालाच सायकालिस्ट स्नेहा आणि गोगटे यांची भेट झाली. 

समर्पयामि शॉपी वर पोहोचलो. शरद, यशवंत जाधव, आदित्य काका आणि हिरेन ने झकास स्वागत केले. काकाने ताबडतोब ग्लासभर मसाले दूध दिले. 

समर्पयामि शॉपीचे एक  वैशिष्टय आहे. येथे आल्यावर पॉजिटिव्ह व्हायब्रेशन मिळतात. सायकलींगचे नवीन प्लॅन्स तयार होतात. काकाने मुंबई ते मंगलोर सायकलिंगचा प्लॅन तयार केला. तर यशवंत जाधव लेह मनाली सायकल सफर करण्याच्या तयारीत आहेत.

 चिरागने तातडीने विजयची सायकल उलटी करून ब्रेक पॅड बदलले आणि  येणारे सर्व आवाज बअँड करून सायकल टकाटक करून दिली. 

आता आदित्य आम्हाला अपूर्वाची मिसळ खायला घातल्या शिवाय सोडायला तयार नव्हता.

तीन हात नाक्यावरच्या सुरुची हॉटेल मध्ये पोहोचलो. मी तिखट मिसळ तर विजय आदित्य आणि यशवंत ने मिडीयम मिसळ चा आस्वाद घेतला. 

आदित्यला मिसळ बरोबर भाकरी खायची हुरहुरी आली. पाव मराठी जेवणातील भाग नसल्याने मिसळ भाकरी असे कॉम्बिनेशन हवे, असे आदित्य म्हणाला. 

गावाला शेतात काम करणारा शेतकरी तिखट उसळ आणि भाकरी खायचा त्याचेच शहरी रूप मिसळ पाव आहे. हे आदित्यचे बोलणे मला भावले. ग्रांट रोड येथील नाना चौकात, पोळा उसळ खाण्याचे आमंत्रण आदित्यला दिले.

सुरुची हॉटेलच्या फळ्यावर आदित्यने मिसळ भाकरीचे म्हणणे लिहिले. त्याचा फोटो हॉटेल मालकाला पाठवला. आदित्यला सिद्धिविनायकचा प्रसाद दिला तर त्याने सर्वांना वाटला. विजयने दिलेला प्रसादाचा लाडू घरच्यांसाठी बॅगेत ठेवला.

आदित्याच्या परोपकारी स्वभावाला मानले. तसेच आपले म्हणणे विनयशील पद्धतीने मांडणे, ही कला त्याच्या कडून शिकण्यासारखी आहे.

ठाण्यात राहत असून सुद्धा आदित्यने आम्हाला मुलुंड पर्यंत सायकल कंपनी दिली. एक भन्नाट व्यक्तिमत्वाच्या सहवासातील आठवणी घेऊन मुंबई पर्यतची राईड मनोहारी झाली

हॅट्स ऑफ आदित्याच्या सहिष्णुतेला.

सायकलिंगमुळे मनुष्य स्वभावाचे खूप जवळून आकलन होते.

सतीश विष्णू जाधव 


*जिव्हाळा प्रतिष्ठान सहल*

29 आणि 30 जाने 2020

खूप दिवस शालेय मित्र संजय कोळवणकरच्या फार्म हाऊसवर जाण्याचे ठरत होते. शाळेतील सर्व मित्रांना आवर्जून या आनंद मेळाव्याला सहकुटुंब यावे असे आग्रहाचे आमंत्रण शरदने दिले होते. काहींची कामे, काहींच्या अडचणी यामुळे शेवटी तयार झाले फक्त पाचजण. 

कुणाल सहकुटुंब येणार होता पण काही घरगुती अडचणीमुळे "संध्या" येऊ शकली नाही. पत्नी स्वप्नासह मी सकाळी कार घेऊन निघालो. दादरला कुणाल आणि दिलीपला पीकअप केले. मुलुंड ऐरोली नाक्यावर दिनेशला गाडीत  घेतले. महापेला शरद आणि आशू गाडी घेऊन आम्हाला भेटले. आता पुढचा रस्ता दाखविण्यासाठी शरदच्या खांद्यावर झेंडा दिला होता. 

शिळफाटा, बदलापूर पाईप लाईन, बारावी धरण मार्गे मुरबाडला आलो. पुढे सरळगाव ओलांडून इंदे गावाच्या अलीकडेच जिव्हाळा प्रतिष्ठानच्या फार्म हाऊस मध्ये प्रवेश केला. संजयने आमचे सहर्ष स्वागत केले. 
या जिव्हाळा प्रतिष्ठानचा संजय मुख्य विश्वस्त आणि अध्यक्ष आहे. कामगार नेते स्वर्गीय डॉ. दत्ता सामंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ या विश्रामधामाची निर्मिती झाली आहे. त्यांचा पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा या वास्तूत उभारला आहे. शे सव्वाशे गुंठ्याच्या या प्लॉटवर नारळ पोफळीची झाडे, केसर आंब्याची कलमे, सुंदर लॉन, जांभूळ पेरूची झाडे संजयने परिश्रमाने लावली आहेत. संकरीत भेंडीच्या शेतीची मशागत संजयचा केअर टेकर लक्ष्मण आणि त्याची पत्नी घेते. डोंगर उताराची जमीन jcb लावून समतल करून घेतली आहे.  परिसरातील गावकऱ्यांच्या कार्यक्रमासाठी हॉल आणि सर्व मित्र परिवारासाठी रेंन डान्सची व्यवस्था करायचे त्याचे प्लॅन आहे. 
 या वास्तूत एक विशेष गोष्ट जाणवली ती म्हणजे, प्रत्येक माडाचे झाड आपल्याला काहीतरी शिकविते आहे. संजयच्या कल्पकतेला दाद द्यायला हवी. प्रत्येक माडाच्या झाडावर एखादे सुभाषित, संजयने तयार केलेल्या चारोळ्या, एकांतात असताना मनात उमटलेले भाव,  काळ्या फलकावर लिहून झाडांवर लावले होते. त्या झाडांची छाया, मातीचा गंध, शरीरात सुखद संवेदना निर्माण करत होत्या,  तसेच या चारोळ्यानीं मन भावविभोर झाले होते. 

त्यानंतर बागेतील विहीर पहिली. चाळीस फूट खोल असलेली विहीर संजयने  दहाफुटी बांध घालून पक्की केली आहे. काळ्या कातळातून विहिरीत झरे आहेत. अतिशय नितळ आणि चवदार पाणी विहिरीला लागले आहे.  बाराही महीने या विहिरीला पाणी आहे. या विहीरीतील पाणी म्हणजे डॉ. सामंतांच्या प्रेमाचा जिवंत झरा आहे. डॉक्टरांच्या स्मृतीचे स्मारक संजय कडून त्या जगन्ननियंत्याने घडवून आणले आहे. स्वार्थ निरपेक्षवृत्तीने केलेले हे कार्य डॉ सामंतांपर्यंत केव्हाच पोहोचले आहे. त्यांच्या पुतळ्याकडे पाहिल्यावर याची प्रचिती येते.
प्रतिभा  वहिनीने बनविलेले खुमासदार कांदा पोहे आणि कुणालने आणलेली वेलची केळी हा सकाळचा नास्ता बहारदार होता.
*"एकत्र जेवण आणि एकत्र जीवन"* ही बाबा आमटेंची संकल्पना मी सांगितली आणि सर्व जण गप्पांमध्ये सामील झाले. शाळेत कुणाल, संजय, दिनेश आणि दिलीप टेक्निकलला होते तसेंच मी आणि शरद नॉन टेक्निकल बॅचला होतो,  मागील दोन भेटीमध्ये आम्ही सर्व एकमेकांचे घनिष्ठ मित्र झालो होतो. आज प्रथमच संजय आणि प्रतिभा यांची सहकुटुंब भेट झाली होती. काही क्षणातच आम्हा सर्वांची व्हेव लेंथ जुळून आली आणि गप्पांची मैफिल सुरू झाली. 

हाफ पॅन्ट आणि बनियन मध्ये असलेला संजय आता दिलखुलासपणे बोलू लागला. बालपणात त्याला आणि त्याच्या बालमित्रांना खेळताना त्रास देणाऱ्या त्याच्या बिल्डिंग मधील काकूंची कशी जिरवली, हे संजय सांगू लागला. काकूंच्या घरी पाहुणे आले असताना,  दरवाजात ठेवलेल्या पाहुण्याच्या चपलांचा ढिगारा संजयने करून ठेवला. नाक्यावरच्या तैमुरलंग चांभारकडे जाऊन,"माझ्या घरी चपलांचा ढिगारा करून ठेवलाय आणि त्या विकायच्या आहेत" म्हणून त्या चांभाराला काकूंच्या घरी पाठविले.  घरात पाहुणे आले असताना काकूंचे आणि चांभाराचे झालेले भांडण संजय आणि मित्रमंडळी लांबून पाहत होती. 

एकदा  पणशिकरच्या दुकानात पाचशे लाडवांची ऑर्डर देऊन काकूंच्या घरी लाडू पाठवले होते. असा खोडकर आणि मिस्कील संजय आम्हाला उलगडला. संजयने आम्हाला आमच्या बालपणात नेले होते.

शालेय जीवनात जीवन गौडची काढलेली खोडी इतक्या खुमासदार पद्धतीने सांगितली की आम्ही सर्व शारदाश्रम शाळेतच बसलो आहोत असा अनुभव आला. शाळेतील गुप्ते सर, वैद्य बाई यांचे किस्से ऐकताना सर्व पोट धरून खो खो हसत होते.

माझगाव डॉक मध्ये मिळालेली नोकरी,  तेथील लिडरशिप तसेच डॉ दत्ता सामंतांच्या युनियनचा पाईक होणे. या सर्व संजयच्या जीवनातील घटना त्याचे नेतृत्वगुण दर्शवित होते. संघटनांच्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या भाईगिरीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी संजयने कधीही केला नाही. 
कामगार आघाडी संघटनेचा संजय पक्का पाईक आहे. फायद्यासाठी डॉ सामंतांशी त्याने कधीही गद्दारी केली नाही. तसेच कामगारांच्या हिताच्या कोणत्याही करारावर सही करताना,  कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे आणि कंपनी जास्तीत जास्त काय देऊ शकेल याचा अभ्यास करून मगच कारारनाम्यावर सह्या करून भविष्यात कंपनी बंद पडू नये म्हणून काळजी घेण्याची संजयची हातोटी पाहून मी स्तिमित झालो.

कब्बडीतले प्राविण्य, व्यायामाची आवड, उंच धिप्पाड बांधा, तसेच विश्वासू ,अभ्यासूवृत्ती आणि नेतृत्वगुण यामुळे संजय डॉ सामंतांचा उजवा हात झाला. 

मग संजयची भाईगिरी, लोअर परेलच्या सनमिल लेन मधल्या चांदीवाला चाळीत असलेली पानाची गादी, त्या वरून जग्या आणि इतर भाई लोकांशी झालेली ठसन आणि त्यातून काढलेला मार्ग संजयचा दूरदर्शीपणा दाखवते. अंगावर झेललेले अठरा वार आणि त्यातून सुद्धा सावरून *फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेणारा "संजय" कामगार संघटनेच्या क्षेत्रांत आज अत्युच्च स्थानी विराजमान झाला आहे.*

 संजयच्या लग्नाची तर खासी गम्मत आहे. भाईगिरी मध्ये, तसेच विविध संघटना मध्ये काम करत असल्यामुळे संजयचे लग्न जमत नव्हते. प्रतिभाचे जेव्हा स्थळ आले, तेव्हा प्रतिभाच्या वडिलांचा काळा रंग बघून,  माझ्या गुंडगिरीच्या प्रतापामुळे नशिबात काळीच मुलगी आहे, याचा मनोमन कयास संजयने बांधला. पण प्रत्यक्षात गोरी गोमटी प्रतिभा पाहून संजयने ताबडतोब होकार दिला.

 संजयला पाहून प्रतिभाच्या सर्व कुटुंबीयांनी स्थळाला होकार दिला, पण प्रतिभाचे मत विचारात न घेता. 

प्रतिभाला संजयचे सर्व प्रताप समजले होते. त्यामुळे तीने रात्रभर रडून काढली. पण शेवटी निर्णय घेतला,  सर्व घरच्यांची पसंती ती माझी पसंती. पुढे जे काय होईल त्याला सामोरे जायचे असे ठरवून प्रतिभाने संजय बरोबर लग्न केले. लग्नानंतर प्रतिभाचे नाव स्वप्ना झाले. त्याच्या स्वप्नातील राजकन्या, *प्रतिभेच्या* रूपाने  संजयच्या जीवनात पत्नी म्हणून आली होती. 

या सर्व संभाषणात प्रतिभा उर्फ स्वप्नाने सुद्धा भाग घेतला होता. बाहेर संजयला मानमरातब मिळत होता, वर्तमानपत्रात झळकत होता पण घरात हालाकीची आर्थिक परिस्थिती होती. प्रतिभा "कलावती आई" वर नितांत श्रद्धा ठेऊन संसार रथ खेचत होती. "हे पण दिवस जातील" याची तीला खात्री होती. 

असं काय होतं की संजय आणि प्रतिभा इतक्या आत्मीयतेने आणि आपुलकीने आपल्या अंतरंगातील गोष्टी आम्हांला सांगत होते. एकच गोष्ट होती त्यात तो म्हणजे *दोस्तांवरचा विश्वास* आणि जुळलेले *मनाचे सूर*

लग्नांनातर प्रतिभाच त्याची मैत्रीण झाली आणि संजयची *प्रतिभा* जागृत झाली. त्या काळात त्याने चारोळी, कविता, शंकर महाराजांचे शिष्य श्री तांबट महाराज उर्फ पप्पा यांचे 54 ओव्यांचे चरित्र लिहिले आहे. रात्री बे रात्री सुद्धा झोपेतून उठून तो कविता लिहायचा. ट्रेनमध्ये कागदाच्या कपट्यावर चारोळी रेखाटायचा. हेमंत कुमारांच्या गाण्याची नितांत आवड, म्हणून त्यांची गाणी संजयने हिंदीतून मराठीत लिहिली आहेत. रात्री कॅम्प फायर मध्ये त्याच्या या रूपांतरित गाण्याचा मनमुराद आस्वाद आम्ही घेतला.

*कविमन आणि कलासक्त असलेला संजय मला प्रचंड भावला.*

दारू न पिता आणि पत्ते न खेळता, इतका आनंद लुटता येतो, हे संजयने पहिल्यांदा अनुभवले होते. 

माझा सुसंवाद ऐकताना त्याला जीवन जगण्याची एक नवीन कला प्राप्त झाल्याचे मला जाणवले. 

मग संजयने त्याच्या मासेमारी जहाजाची गोष्ट सांगितली. त्याने मासेमारीचे जहाज विकत घेतले होते. वर्षांभरात तो "संजय नाखवा" म्हणून प्रसिद्ध झाला. "ट्रॉलर ओनर असोसिएशनचा" संजय अध्यक्ष झाला. वर्तमानपत्रात झळकू लागला. राजकारणी लोकांत वावरू लागला पण आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. मच्छीमार बोटीचे सर्व शास्त्र त्याने वर्षाभरात  शिकून घेतले होते. तांडेल आणि खलाशांसह तो मासेमारीसाठी भर समुद्रात जात असे. पावसाळी मासेमारी करू द्यावी म्हणून त्याने मच्छिमारांचे मोठे आंदोलन सुद्धा केले होते. 

ज्या क्षेत्रात उतरायचे त्याचे संपूर्ण आणि चौफेर माहिती घेण्याची संजयची हातोटी आश्चर्यजनक आहे. तात्कालिक मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मत्सोद्योग मंत्री नारायण राणे यांच्या समवेत संजयच्या मिटिंग झाल्या आहेत. कामात झोकून देण्याची वृत्ती संजय मध्ये खच्चून भरलेली आहे. 

संजयचे मासेमारीचे जहाज बुडाले आणि  संसाराचे जहाज भवसागरात डौलाने विहरू लागले. कठोर परिश्रम सुद्धा काही वेळा वाया जातात.  तेव्हा सचोटी आणि विश्वास कामाला येतो. विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा मनाचा समतोल न ढळता, सकारात्मक विचाराने त्या परिस्थितीतून सन्मार्ग शोधणे, यासाठी *संजयला हॅट्स ऑफ*


कॉलेज मध्ये असताना मित्राला बीएस्सी ला फर्स्ट क्लास मिळावा म्हणून केलेली क्लुप्ती संजयच्या अफलातून डोक्यालिटीचा भाग होता. सर्वांनी पुन्हा एकदा ती संजयकडून जरूर ऐकली पाहिजे.

संजयची आणखी एक लकब मला भावली, ती म्हणजे बोलताना तो समोर बसलेल्या मित्रांना, व्यक्तींना आपल्या बोलण्यात समाविष्ट करतो. त्यांची नावे घेऊन संजय उदाहरणे देतो.

दुपार नंतर माळशेज घाटात आम्ही सर्व फिरायला गेलो. तेथील निसर्ग सौंदर्य, सूर्यास्त आणि सह्याद्रीचे सोनेरी उन्हात चमचमणारे रूप आम्ही मनात साठवत होतो. पावसाळ्यात असणाऱ्या धुक्यामुळे सह्याद्रीचे सोनेरी दर्शन दिसण्याची शक्यता फार कमी असते.  शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सह्याद्रीच्या प्रत्येक शिखरावर कोरली आहे, ती किरण रूपाने आमच्याकडे झेपावत होती. 

संजय आज माळशेज घाटाच्या या आगळ्या वेगळ्या रूपाने खूप आनंदित झाला होता. सूर्यास्ताच्या किरणांची बरसात आम्ही डोळ्याच्या कॅमेऱ्यात साठवत होतो. माळशेजच्या पठारावर  चालण्याचा एक मनोहारी आनंद आम्ही लुटत होतो. आम्ही निसर्ग झालो होतो. 

संजयचे कवी मन आणि प्रतिभा संध्याकाळच्या कॅम्प फायर मध्ये ओसंडून वाहत होती. प्रतिभा (बायको)  लग्नानंतरची त्याची खास मैत्रीण आहे. अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक बनवितो संजय. " *नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो"* या सलील कुलकर्णीच्या गाण्याची झाक संजयच्या गीतात होती. हेमंत दा ची गाणी मराठीत रूपांतरित करताना त्याच्या डोळ्यासमोर प्रतिभाच असावी. गाणी गाताना तो चेहऱ्यावर विशिष्ठ पद्धतीने हात ठेवतो, जणू काही गाण्याच्या अंतरंगात तो तरंगत असतो. अतिशय हजरजवाबी आणि मी गायलेल्या गीताचे तोड गाणे त्याच्या डोक्यात  घोळत क्षणार्धात ओठावर येते. आजची कॅम्प फायरची मैफिल जीवनातील एक अविस्मरणीय घटना होती. 

*तो भेटला, तो खुलला आणि सामावून गेला मनाच्या अंतरंगात!!!*

आजची गोड गुलाबी थंडी, संजयच्या संगीताच्या प्रेमाच्या वर्षावात बहरली होती. शेकोटीची धूर डोळ्यात जात असून सुद्धा प्रेम आणि करुणेच्या अश्रूंची बरसात होत होती. संजयच्या भरलेलेल्या डोळ्यातील अश्रुंचे थेंब त्या संधीप्रकाशात चमकत होते. खूप कालावधी नंतर  मैत्रीचे आगळे वेगळे स्तिमित करणारे रूप आम्हा सर्व मित्रांच्या रूपाने त्याने अनुभवले होते. प्रतिभा वहिनी सुद्धा अतिशय भावविभोर झाल्या होत्या.

शाळेतील ते निस्वार्थ, निरपेक्ष, निरागस प्रेम आज खऱ्या अर्थाने पुन्हा प्रकट झाले होते. शेकोटीतील धग थंडावली होती पण आमचे बोलणे भरात आले होते. एक नशा होती, झिंग होती शाळेतील मित्रांच्या भेटीची. 

आपण खूप लवकर भेटायला हवे होते, याची जाणीव झाली. *"देर आये दुरुस्त आये"* या उक्ती प्रमाणे मित्र भेटीचे सर्व श्रेय शरद आणि कुणालला द्यायला हवे. 

पहाटे जाग आली. पुन्हा डॉ सामंतांच्या स्मारकाजवळ गेलो. समोरील हिरवळीच्या मऊशार पानावरुन चालताना एकाच विचार मनात आला, "कामगार विश्व, युनियन बाजी, करारमदार, सतत धावपळ या व्यापात गुंतलेला  संजय एवढा रसिक कसा?" 

डॉ. सामंतांचा पुतळ्याकडे नजर गेली. त्यांच्या करारी चेहऱ्यावर एक स्मितरेषा दिसली आणि मला उत्तर सापडले, प्रतिभेच्या आगमनाने संजयची प्रतिभा जागृत झाली होती. आता मित्रांच्या संगतीत संजयच्या त्या *"प्रतिभेला"* नवीन धुमारे फुटले आहेत. आता संजयने त्या धुमाऱ्याचे संगोपन करायला हवे. गाण्यांच्या, कवितेच्या, चारोळ्यांच्या संगतीत राहायला हवे. लिहायला हवे. आम्ही आहोतच रसिक म्हणून सर्व ग्रहण करायला.

*संजय, तुला खूप जगायचंय !!! त्याची तयारी आतापासून सुरू कर!!!! आम्ही आहोतच तुझ्या बरोबर!!!!*

शरद आणि मी नंतर मुख्य रस्त्यावर फिरायला गेलो. दोन एक किमी फेरफटका मारून पुन्हा फार्म हाऊसवर आलो. सकाळाच्या नाश्त्याला ग्रील्ड सँडविच होते. गरमागरम सँडविच आणि चहा घेऊन मी स्वप्ना आणि दिनेश निघायच्या तयारीला लागलो. 

खरं तर  मित्रांच्या सहवासात अजून रहावे असे मन सांगत होते. पण संसारात असताना काही गोष्टी टाळता येत नाहीत. बिल्डिंग मधील मित्राच्या मुलाच्या लग्नाला जाणे क्रमप्राप्त होते. 

*मित्रांच्या सहवासातील कालचा संपूर्ण दिवस आणि आजची सकाळ माझ्या मर्मबंधातील ठेव झाली होती. माझ्या उर्वरित आयुष्यातील भावविश्वाला पुरेल एव्हढी प्रेमाची, आनंदाची शिदोरी मला मित्रांनी दिली होती. मैत्रीत "जिव्हाळ्याचे" भावबंध मिसळले होते*

*मैत्री चिरायू होवो !!!!!*


सतीश विष्णू जाधव