Showing posts with label घोडबंदर सायकलिंग लूप. Show all posts
Showing posts with label घोडबंदर सायकलिंग लूप. Show all posts

Wednesday, February 5, 2020

घोडबंदर सायकलिंग लूप

21 जानेवारी 2020

*घोडबंदर सायकलिंग लूप*

आज दादर, बोरिवली, घोडबंदर, ठाणे आणि दादर अशी 80 किमी सायकल राईड करायचे मी आणि विजयने ठरविले. कुठेही हॉटेल मधले खायचे नाही म्हणून सोबत मसाले दूध आणि सुकामेवा घेतला होता.

 सकाळी 5.20 ला दादरच्या सेनाभवन कडून राईड सुरू झाली. वांदऱ्यावरून हायवे ला न जाता, स्वामी विवेकानंद रस्त्यावरून सायकलिंग करत तासाभरात बोरिवली गाठले. सकाळच्या कमी रहदारीमुळे सायकलिंग करायला धम्माल आली. 

अहो आश्चर्य!  वाटेत सायकलिंग करताना अतुल सापडला. सकाळ सकाळी क्रिकेट खेळायला निघाला होता. दहिसर स्टेशन जवळच्या बस स्टॉप जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला.  दूध, सुकामेवा आणि सिद्धिविनायक बुंदी लाडू खाऊन अतुलला टाटा करून पुढची राईड सुरू केली.  

घोडबंदर जवळील फाउंटन हॉटेल पार केले आणि घाट चढाई सुरू झाली. ट्राफिक किंचित वाढली होती घोडबंदर ते ठाणे पूर्व द्रुतगती महामार्ग हे 16 किमी अंतर धडाक्यात पूर्ण करण्यासाठी सायकलचा स्पीड वाढवला. तेव्हढ्यात कासारवाडी जवळ  विजय मागून मोठ्याने हाक मारत होता. त्याच्या सायकल मधून चर.. चर.. आवाज येत होता. थांबून, मागचे चाक खोलले. ब्रेक पॅड घासून निकामी झाले होते. आता येऊरला समर्पयामि शॉपीवर जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
येऊर चढालाच सायकालिस्ट स्नेहा आणि गोगटे यांची भेट झाली. 

समर्पयामि शॉपी वर पोहोचलो. शरद, यशवंत जाधव, आदित्य काका आणि हिरेन ने झकास स्वागत केले. काकाने ताबडतोब ग्लासभर मसाले दूध दिले. 

समर्पयामि शॉपीचे एक  वैशिष्टय आहे. येथे आल्यावर पॉजिटिव्ह व्हायब्रेशन मिळतात. सायकलींगचे नवीन प्लॅन्स तयार होतात. काकाने मुंबई ते मंगलोर सायकलिंगचा प्लॅन तयार केला. तर यशवंत जाधव लेह मनाली सायकल सफर करण्याच्या तयारीत आहेत.

 चिरागने तातडीने विजयची सायकल उलटी करून ब्रेक पॅड बदलले आणि  येणारे सर्व आवाज बअँड करून सायकल टकाटक करून दिली. 

आता आदित्य आम्हाला अपूर्वाची मिसळ खायला घातल्या शिवाय सोडायला तयार नव्हता.

तीन हात नाक्यावरच्या सुरुची हॉटेल मध्ये पोहोचलो. मी तिखट मिसळ तर विजय आदित्य आणि यशवंत ने मिडीयम मिसळ चा आस्वाद घेतला. 

आदित्यला मिसळ बरोबर भाकरी खायची हुरहुरी आली. पाव मराठी जेवणातील भाग नसल्याने मिसळ भाकरी असे कॉम्बिनेशन हवे, असे आदित्य म्हणाला. 

गावाला शेतात काम करणारा शेतकरी तिखट उसळ आणि भाकरी खायचा त्याचेच शहरी रूप मिसळ पाव आहे. हे आदित्यचे बोलणे मला भावले. ग्रांट रोड येथील नाना चौकात, पोळा उसळ खाण्याचे आमंत्रण आदित्यला दिले.

सुरुची हॉटेलच्या फळ्यावर आदित्यने मिसळ भाकरीचे म्हणणे लिहिले. त्याचा फोटो हॉटेल मालकाला पाठवला. आदित्यला सिद्धिविनायकचा प्रसाद दिला तर त्याने सर्वांना वाटला. विजयने दिलेला प्रसादाचा लाडू घरच्यांसाठी बॅगेत ठेवला.

आदित्याच्या परोपकारी स्वभावाला मानले. तसेच आपले म्हणणे विनयशील पद्धतीने मांडणे, ही कला त्याच्या कडून शिकण्यासारखी आहे.

ठाण्यात राहत असून सुद्धा आदित्यने आम्हाला मुलुंड पर्यंत सायकल कंपनी दिली. एक भन्नाट व्यक्तिमत्वाच्या सहवासातील आठवणी घेऊन मुंबई पर्यतची राईड मनोहारी झाली

हॅट्स ऑफ आदित्याच्या सहिष्णुतेला.

सायकलिंगमुळे मनुष्य स्वभावाचे खूप जवळून आकलन होते.

सतीश विष्णू जाधव