Monday, March 29, 2021

पृथ्वीचे प्रेमगीत

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

कविवर्य   कुसुमाग्रज 

कुसुमाग्रजांनी पृथ्वी सोबत स्त्रीचे मन सुद्धा कथन केले आहे. 

भव्य आणि विशाल प्रेमाची ही कथा आहे. युगानुयुगे सूर्याच्या प्रेमाची याचना करीत तुझ्या भोवती मी फिरते आहे. तरीपण सदैव माझी वंचना होत आहे. असं किती काळ धावू? तारुण्याचा यौवनाचा बहर ओसरला आहे. तरीसुद्धा मनाच्या अंतरंगात तुझ्या प्रेमाची अखंड ज्योत सदैव तेवत आहे. तुझ्या भोवती प्रेमायचना करीत मी अविरत भ्रमण करणार आहे. 

अनंत युगे पृथ्वी सूर्याच्या कक्षेत  करत फिरत आहे.

 तसेच प्रेमभराने प्रेरित झालेली लालना प्रियकराला विचारते आहे, 'तुझ्या मागे मागे किती काळ येऊ; तुझ्या प्रीतीची याचना किती वेळा करू, अशी विचारणा करते आहे. प्रत्येक प्रेयसीची ही आराधना आहे.

स्त्री (पृथ्वी) जेव्हा एखाद्यावर (सूर्यावर) नितांत प्रेम करते. तेव्हा तारे, चंद्र, ध्रुव, धूमकेतू, शुक्र, मंगळ यांच्या विविध अंगाने विविध ढंगाने केलेल्या प्रेम याचना तिला निरर्थक वाटतात. सूर्याच्या दिव्य तेजापुढे इतरांचे प्रेमालाप काजव्याच्या शूद्र चमचमी सारखे भासतात. 
माझ्या प्रेमासाठी अनेक तारे, ग्रह, धूमकेतू मला लुभावण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझ्या अंगअंगावर उल्कामय पुष्प वर्षाव करीत आहेत. परंतु तुझ्या शिवाय मला काहीही प्रिय नाही.
तुझ्या भव्य तेजापुढे, काजव्या प्रमाणे असणाऱ्या ग्रह ताऱ्यांचा प्रेमाचा स्वीकार मला मान्य नाही. त्या पेक्षा तुझा दुरावा मला प्रिय आहे.

तिच्या अंतरीच्या कळा लाव्हा रसासारख्या उफाळून येतात, त्यामुळेच आपल्या (पृथ्वी आणि सूर्य) दोघांतली  दुरी सलत राहते. तुझे तेजोमय रूप धारण करून, तुझी गळा भेट घ्यावी. तुझ्या दाहकतेत विरघळून जावे. अशीच मनोकामना आहे. एव्हढे अमर्याद, अनंत प्रेम आहे.

तुझ्या प्रेमाच्या अंगार माझ्या अंतरंगात धगधगतो आहे. तुझ्या आठवणीने सौंदमीनीचे आसूड माझ्यावर मनावर  कोसळतात आणि त्याचा ज्वालामुखी द्वारे उद्रेक होतो. तुझ्या विरहाने मन भूकंपाद्वारे विदीर्ण होते. 

परंतु हे प्रेम मला एकतर्फी वाटत नाही, कारण तिच्या वर असलेल्या प्रेमामुळेच सूर्य तिला आपल्या मागे घेऊन चालला आहे. त्यामुळेच पृथ्वीच्या प्रीतीची ज्योत अविश्रात तेवत आहे. त्याच्या मागची प्रेरणा सुर्यच आहे. 

या ठिकाणी एक जाणवते, सूर्य (पुरुष) सर्वांनाच आपल्या मागे खेचतो आहे. सर्वांवर प्रेम करतो आहे. परंतु पृथ्वी (स्त्री) नितांत प्रेम,  फक्त एकावरच करू शकते. त्यामुळेच ती इतरांच्या प्रेमाचा अव्हेर करते.
तुझ्या विराट रुपात मिसळून जावे हीच कामना आहे.   तुझ्या तेजोमय ज्वालात सामावून जावे आणि आलिंगनाने प्रीतीची  तीव्रता अनुभवायची आहे. तुझ्या अमर्याद थोरावीची मला जाणीव आहे. तुझ्या पुढे एखाद्या धुळीकणाप्रमाणे मी शुद्र आहे. तरी सुद्धा तुझ्यात सामावून जाण्याची तीव्र लालसा आहे

स्त्रीला (पृथ्वीला) सूर्याची अमर्याद थोरवी माहीत आहे. त्यांच्यापुढे आपण यत्किंचित आहोत हे सुद्धा तिला ज्ञात आहे. तरी सुद्धा सूर्याच्या चरणी आपले प्रेम अर्पण करण्यासाठी त्याच्या पायाची धूळ होणे सुद्धा तिला मान्य आहे.

असे नितांत प्रेम फक्त स्त्रीच करू शकते.

सतीश जाधव
मुक्त पाखरे......

Monday, March 8, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सातवा) प्रकाशा ते देडिया पाडा ०४.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सातवा)   प्रकाशा ते देडियापाडा

०४.०१.२०२१

प्रकाशाला दक्षिण काशी सुद्धा म्हणतात. तापी महात्म्यात उल्लेख आहे की, शिव महादेवाने एका सिद्धमहात्म्याच्या स्वप्नात येऊन सांगितले की एकाच स्थानावर एका रात्रीत १०८ शिवमंदिरांची निर्मिती झाली तर त्या गावात  माझा कायम निवास असेल. तापी, पुलिंदा आणि गोमाई नदीच्या संगमा जवळील गावामध्ये १०८ शिवमंदिर निर्मितीचे काम सुरू झाले. शिवभक्तांनी १०७ मंदिरांची निर्मिती केली, परंतु १०८ व्या मंदिराचे निर्माण कार्य सुरू असतानाच सूर्य प्रकाशित झाले. त्यामुळे या गावाला काशी एवढे महत्व मिळाले नाही. 

       आजसुद्धा हे मंदिर;  भिंती विरहित अर्धवट अवस्थेत आहे. ह्या मंदिर निर्मितीच्या वेळी प्रकाश आल्यामुळे या गावाला प्रकाशा हे नाव पडले.

तापीच्या किनाऱ्यावर जाऊन सुर्यनारायणाचे दर्शन घेतले. मैयेची पूजा केली. केदारेश्वर, काशीविश्वेश्वर महादेव तसेच पुष्पदंतेश्वर मंदिरांचे दर्शन घेऊन पुढे प्रस्थान केले.

आज देडिया पाडा पर्यंत जवळपास ९५ किमी सायकलिंग करायची होती. या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कधी महाराष्ट्र तर कधी गुजरात पुन्हा महाराष्ट्र असा दोन्ही राज्यांच्या वेशी वरून प्रवास सुरु होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला महाराष्ट्र तर उजव्या बाजूला गुजरात... येथे भेटणाऱ्या व्यक्ती मराठी आणि गुजराती भाषा याची सळमिसळ करून बोलतात.
या भागात कापूस आणि ऊस याचे मोठ्या प्रमाणात पीक येते. पहिला टप्पा १८ किमी वरील तळोदा शहर होते. रस्त्यात एक गोदाम लागले.  कापसाची छाननी करून तो ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते.

कापसाच्या वेगवेगळ्या प्रती समजल्या. येथे प्रसाद म्हणून चहा देण्यात आला.

तळोदा येथील कणकेश्वर महादेव मंदिराला भेट दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करताना येथे तळ ठोकला होता. म्हणून या गावाला तळोदा हे नाव पडले.  एका धनगराच्या मेंढरांच्या खाजणात, छत्रपतींच्या मावळ्यांनी घोडे घुसवले, म्हणून त्या धनगराने हातातील काठीने मावळ्यांशी सामना केला होता. त्याचा पराक्रम पाहुन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या सैन्यात सामावून घेतले होते.

तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतिक, सामाजिक  इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे, पहेलवानकी गाजवणारे अशी तळोद्याची ओळख आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणाऱ्या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात विशेष प्रसिद्ध आहे.

तळोदा पार करून तासाभरात मेंढवड या गावाजवळ पोहोचलो. या पट्ट्यात जागोजागी ऊसाची गुऱ्हाळे लागली होती. एका ऊसाच्या गुऱ्हाळात प्रवेश केला.

चार मोठ्या कढईत ऊसाचा रस उकळत होता. घट्ट झालेला ऊसाचा रस पत्र्यांच्या डब्यात भरून थंड केला जात होता. लाल रसरशीत केमिकल विरहित गुळ खायला मिळाला. त्याच बरोबर दोन मोठे ग्लास ऊसाचा रस समोर आला. रस काढलेली ऊसाची चिपाड सुद्धा जळण म्हणून तसेच गुरांच खाद्य म्हणून उपयोगात येतात. त्यातून निघणारी मळी खत म्हणून वापरात येते. कारखान्यात कामकरी महिला मोठया प्रमाणात होत्या.

दुपारचा एक वाजला होता. रस्ता बराच खराब होता. धूळ, धूर, ऊन यांचा सामना करीत मार्गक्रमण करीत होतो. वाटेत अक्कलकुवा गावाजवळ एका चहावाल्याने नर्मदे हर करीत आम्हाला साद घातली.

दुपारच्या उन्हात कडक मसालेदार चहा थंडावा देऊन गेला. चुलीतील निखारे धगधगते ठेवण्यासाठी सोनाराकडे असते तशी फुंकणी मशीन चुलीला लावली होती. जुगाड संस्कृतीमुळे या गावाला "अक्कलकुवा" नाव पडले असावे काय?

पावणे तीन वाजता गव्हाली गावात पोहोचलो. गरमागरम भजी आणि जिलेबी खाल्ली.

उन्हात तापल्यामुळे थोड्या विश्रांतीची गरज होती. या टपरीवर एक सुभाषित लिहिले होते "नम्रता हाच माणसाचा सर्वोत्तम गुण आहे" अतिशय खराब रस्त्यांमुळे कातावलेल्या जीवाला नम्रतेचा सहवास मिळाला की पुढ्यात येणारे पदार्थ समाधानाचे सुख देतात. अतिशय चपलखपणे सुभाषिताचा अर्थ समजला होता.

गुजरात राज्यातील दुधलीवार गावाजवळ पोहोचलो. 'नाना माच' आणि 'मोटा माच' घाट्या चढून वर आलो होतो. घाटी चढताना दमछाक झाली परंतु टकाटक रस्त्यामुळे वेगात वाढ झाली होती. रस्त्याच्या किनारी मकेवाला बसला होता. चुलीवरील मोठ्या टोपात मक्याची कणसे उकडत टाकली होती.

 फतकल मारून बसलो आणि मक्याचा आस्वाद घेतला. मक्याला येथे 'डोडा' म्हणतात.  दुपारच्या भोजन प्रसादी ऐवजी वाटेत मिळेल ते हायड्रेशन साठी खात होतो.

दुधलीवार गावाकडून देडियापाडा अवघ्या अठरा किमी अंतरावर आहे. सूर्य अस्ताला चालला होता आणि पुढील प्रवास शूलपाणेश्वर अभयारण्यातून होता. मोठे मोठे कंटेनर या हायवे वरून जात होते. त्यामुळे सायकलिंग अतिशय सावधपणे करत होतो.

वाटेत नर्मदाकुटी गाव लागले. एका झोपडीच्या लोकेशनवर अस्ताला चाललेला सूर्य सुवर्ण शलाकांची उधळण नभांगणात करत होता.

अलगदपणे लाखाची गोष्ट चित्रपटातील " त्या तिथे पलीकडे" गाण्याची आठवण झाली. गाणे अनुभवणे काय असते याची अनुभूती मिळाली.

सायंकाळी साडेसहा वाजता देडियापाडा येथील जलराम बाप्पाच्या आश्रमात पोहोचलो. 

प्रकाशा ते अंकलेश्वर या दिडशे किमी पट्ट्यात परिक्रमावासीयांसाठी कोणतीही सेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे जलराम बाप्पाच्या आशीर्वादाने महामंडलेश्वर श्री सुरेंद्रदासजी महाराज गेल्या सव्वीस वर्षांपासून देडियापाडा येथे परिक्रमावासीयांची सेवा करत आहेत. हे सेवाव्रत म्हणजे एक महायज्ञ आहे... अखंड धगधगत राहणारे...
सुरेंद्रदासजी महाराज म्हणतात "मैने जो देखा दो रोटीमे, वो नही देखा पुछीमे"   विचारपूस करण्यापेक्षा जेवू घाला हाच संदेश देतात बाबाजी.

जलराम बाप्पाच्या मंदिराजवळच मोठा आश्रम परिक्रमावासीयांच्या निवासासाठी होता.  आमच्यासह जवळपास वीस परिक्रमावासी तेथे होते. स्नानसंध्या आटपून नर्मदा मैंय्येची पूजाअर्चना केली. वातावरणात गारवा आला होता. रात्री सर्वांसोबत  दालखीचडी भोजनप्रसादी ग्रहण केली.

आजच्या दिवसाची प्रकाशा ते देडियापाडा ही सायकल वारी स्मरणात राहील अशीच होती... सेवावृत्तीच्या प्रकाशवाटा दैदिप्यमान झाल्या होत्या.


सतीश जाधव

मुक्त पाखरे...