Showing posts with label भटकंती. Show all posts
Showing posts with label भटकंती. Show all posts

Thursday, September 26, 2024

सायकल रपेट आणि मोबाईलचा डॉक्टर हेमंतची भेट... दि. २६ सप्टेंबर २०२४

सायकल रपेट आणि मोबाईलचा डॉक्टर हेमंतची भेट... 

दि. २६ सप्टेंबर २०२४

सकाळी पाच वाजता उठलो... खिडकीतून बाहेर डोकावले तर रस्ता ओलाचिंब आणि पावसाची रिपरिप सुरू होती... कालच रेड अलर्टचा इशारा मिळाला होता... म्हणून सकाळी सायकलिंग साठी बाहेर न पडता एक तास मेडीटेशन नंतर २८ सूर्य नमस्कार घातले...

काश्मिर ते कन्याकुमारी राईडची अंतिम तयारी सुरू आहे म्हणूनच सायकलिंग सोबत सूर्यनमस्कार सुद्धा सुरू केले आहेत... 

घरातील सर्व कामाची यादी घेऊन दुपारी सखिसह बाहेर पडलो... बाजारातच परममित्र अल्ट्रा रायडर आणि कोच अंकुश साळुंखे आणि संतोषची भेट झाली... जेव्हा जुने मित्र नव्याने भेटतात तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही...

घरातील सर्व कामांचा निपटारा करून... ग्रँट रोडला गेलो... ब्ल्यू टूथ स्पीकर आणन्यासाठी... त्याची बॅटरी लवकर ड्रेन होत होती... बोट कंपनी मध्ये रीपेरींग पॉलिसी नाही... जर पिस वॉरंटी मध्ये असेल तर रीप्लेसमेंट मिळते... 

दोन दिवसांपूर्वी राज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तो स्पीकर घेऊन गेलो त्याने बाजूलाच असलेल्या रीपेरर  हेमंतचे दुकान दाखवले... गुजराती मारवाडी यांच्या गराड्यात मराठी माणसाचे दुकान मनाला दिलासा देऊन गेले... त्याने स्पीकर चेक करून त्याची बॅटरी खराब झाल्याचे सांगितले... नवीन  ओरिजीनल बोट कंपनीच्या  बॅटरीचे... त्याच्या कारागिरी सह... सातशे रुपये होतील असे सांगितले... बोट कंपनीचा स्पीकर घेऊन दोन वर्ष झाली होती... आणि नवा स्पीकर दोन हजार पर्यंत होता... म्हणून हेमंतला होकार दिला बॅटरी बदलण्यासाठी... ती आज मिळणार होती...

हेमंतच्या दुकानात गेलो तर नेमका तो जेवायला गेला होता...  यायला तासभर लागणार होता... म्हणून बाजूलाच असलेल्या सॅमसंग गॅलरीत गेलो... दोन वर्षापूर्वी घेतलेला सॅमसंग मोबाईल आता एकदम ड्रेन होत होता... सकाळी चार्ज केला की दुपारपर्यंत डिस्चार्ज व्ह्यायचा... त्यामुळे सतत पॉवर बँक घेऊन फिरावे लागत होते... 

 गॅलरीमध्ये मोबाईल दाखवल्यानंतर... पंधरा मिनिटांनी रिपोर्ट आला... मोबाईलची बॅटरी खराब झाली आहे... बॅटरीचा खर्च साडेचार हजार रुपये... आणि डेटा नाहीसा होऊ शकतो... तसेच दोन दिवस मोबाईल ठेवावा लागेल... 

मोबाईल दोन दिवस गॅलरीत ठेवण्याची तयारी नव्हती... यापेक्षा नवा मोबाईल घेऊन त्यात डेटा ट्रान्स्फर करून मगच जुना मोबाईल दुरुस्तीला द्यावा... असे ठरवून सॅमसंग गॅलरीतून बाहेर पडलो... येथून नरिमन पॉइंट लूप पूर्ण केला...

 आणि तासाभरात हेमंतच्या दुकानात आलो... हेमंत ब्ल्यु टूथ स्पीकरमध्ये नवी बॅटरी बसवत होता... दहा मिनिटात त्याने स्पीकर टकाटक केला... त्यात मायक्रोकार्ड बसवून... खणखणीत आवाजात स्पीकर चालू केला... काश्मिर कन्याकुमारी सायकलिंगसाठी याचा मस्त उपयोग होणार होता...

हेमंतला सॅमसंग मोबाईलचा प्रोब्लेम सांगितला... त्याने माझ्या समक्ष मोबाईल उघडला आणि म्हणाला बॅटरी फुगली आहे... बदलावी लागेल... किती होतील... तर म्हणाला ओरिजनल बॅटरी टाकली तर माझ्या मजुरीसह पंधराशे रुपये होतील... यातील  डेटा नाहीसा होईल काय... हेमंत म्हणाला बिलकुल नाही... मनाला दिलासा वाटला... आणि नवा मोबाईल घेण्याचे विचारचक्र थांबले... किती वेळ लागेल... हेमंत म्हणाला... मार्केट मधून ओरिजनल बॅटरी आणावी लागेल... आणि तासाभरात काम होईल...

जुनी बॅटरी घेऊन हेमंत मोटरसायकल घेऊन मार्केटमध्ये गेला तेव्हढ्यात पाऊस सुरू झाला... पाऊस थांबल्यावर हेमंत अर्ध्या तासात परत आला आणि दहा मिनिटात नव्या बॅटरीसह मोबाईल फिट करून माझ्या ताब्यात दिला... सर्व डेटा सुरक्षित आहे का ते तपासले... एकदम ठिकठाक पाहिल्यावर खूप आनंद झाला... 

साडेचार हजार रुपये खर्च, डेटा जाण्याची शक्यता, दोन दिवस मोबाईल ठेवा... या सर्व दुष्ट चक्रातून मोबाईलच्या खऱ्याखुऱ्या डॉक्टरने अतिशय माफक खर्चात मोबाईलला संजीवनी दिली होती... 

आज मोबाईलच्या प्रामाणिक डॉक्टरची भेट झाली होती...

आजची पंचवीस किमी राईड हेमंतला सप्रेम भेट...

Thursday, May 23, 2024

काश्मिर सफर 21.05.24

काश्मिर सफर...

पहिला दिवस 21.05.24

दुपारी साडेतीन वाजता सहकुटुंब श्रीनगर विमानतळावर उतरलो....तेथे गाडी तयारच होती... ड्रायव्हर ओईसने  सामान गाडीत ठेवायला मदत केली... विमानतळावर  भव्य फडकता तिरंगा आणि त्याखाली शहीद स्मारक पाहून मन अभिमानाने उचंबळून आले...

 बदलाचे वारे वहात असल्याचे जाणवले... विमानतळावरील लोकल गाईड आणि विमानतळ कर्मचारी सर्व टुरिस्टना अतिशय अदबीची वागणूक देत होते... आपले प्रीपेड फोन येथे चालत नाहीत... म्हणून सर्वांसाठी एक सिम कार्ड घेतले...

दुपारचे जेवण झाले नसल्यामुळे सर्वांना दल झिल समोरील शाह कॅफेटरीया मध्ये पॅटीस, बर्गर, फ्रेंच फ्राईज ट्रीट मिळाली... वर काश्मिरी कावा घेतला... 

तेथून तडक मुघल बागेत गेलो... आ हा हा !!!  अप्रतिम लॅण्डस्केप आणि झील पाहून मन अतिशय प्रसन्न झाले... फोटोग्राफीची पर्वणी होती...नाचणे, बागडणे, धावणे, चालणे, हरखून जाणे, निसर्ग कवेत घेणे, डोळ्यात आसमंत साठवणे... या सर्व अनुभवांची एकत्रित परिणीती  साठली होती... आसमंताची निळाई आणि झाडांची पानांची हिरवाई धरणीवर अवतरली होती... फुलांच्या रंगसंगती डोळ्याचे पारणे फेडीत होते... भान हरपणे काय असते... याचा प्रत्यक्ष अनुभव येत होता... 


महाराष्ट्र आणि बंगाल लोटला होता या बगीच्यात... चारही बाजूला  माथ्यावर पांढऱ्या शुभ्र बर्फाची टोपी घालून हिमालय साद घालत होता... लवकर या माझ्यासंगे खेळायला... माझ्या कुशीत येऊन... खुशी घेऊन जा... सर्व मित्रांनां मुक्त हस्ते वाटायला... लार्जर दॅन लाईफ असंच काहीसं होतं... ये दिल तो ना कह सका सारी बाते... 

सायंकाळी दल झीलवर विसावलो... सूर्याचे हिमालयाच्या आड लपणे आणि आकाशाला सोन्याची लालिमा देण्याची कलाकुसर पाहणे... ही ध्यानधारणा होती... मुले स्पीड बोटीतून फिरून आली... यावेळी आईसक्रीम खाणे म्हणजे डोळ्याबरोबर  रसना तृप्त करणे होते...

दल झीलची झलक अनुभवली होती... समोरच असलेल्या आलिशान ड्यूक हॉटेलमध्ये गाडी विसावली... ॲंटिक लाकडी कलाकुसर असलेले हे हॉटेल पहिली पसंती होती... 

सकाळी मुंबईत होतो तर संध्याकाळ श्रीनगर मध्ये आलो... येथे वातावरणाशी एकरूप होण्यासाठी तीन दिवस राहणे आवश्यक होते..  

सुरू झाली होती काश्मिर सफर... सहकुटुंब...

जय श्री राम...

Friday, April 12, 2024

टकलू टकली की पाठशाला सायकल राईड...

टकलू टकली की पाठशाला सायकल राईड...

 आज घरातली कामे आटपायची असल्यामुळे... सकाळी राईड न करता मेडीटेशन नंतर चोवीस सूर्यनमस्कार केले...

न्याहरी झाल्यावर निघालो बाजारहाट आणि बँकेची कामे करण्यासाठी सायकल घेऊन...

कांदे बटाटे आणणे, ज्वारी बाजरी आणि बेसनचे पीठ आणणे, परिसच्या सायकलची सीट बदलणे, हळू फिरणाऱ्या पंख्यासाठी कपॅसिटर आणणे... ही बाजाराची कामे... तसेच बँक पास बुक अपडेट करणे, लोन स्टेटमेंट घेणे, जुने बँक खाते बंद करणे... ही बँकेची कामे आटपली...

वाटेत परममित्र विकास कोळीचा फोन आला...  परेल येथील कॅनशाळा मुंबई पब्लिक स्कूल  (कॅन्सरग्रस्त मुलांची शाळा) येथून मेडल आणि ट्रॉफी स्विकारण्याचे काम मिळाले... कॅन्सर झालेल्या मुलांची वेगळी शाळा आहे हे पहिल्यांदा कळले... टकलू टकली की पाठशाला असे या शाळेचे विशेष नाव आहे... ४ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान ५०० किमी पेक्षा जास्त अंतर सायकलिंग करून विकासला मेडल आणि ट्रॉफी मिळाली होती... याच दिवसात विकासने मुंबई ते अयोध्या सायकल वारी पूर्ण केली होती... त्यामुळे Super Hiros Fighting the Cancer हा बहुमान त्याला मिळाला होता...

विकासच्यावतीनं एखाद्या कॅन्सरग्रस्त मुलाकडून मेडल स्वीकारायचे योजले होते...

 उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मुलांची भेट झाली नाही... त्यामुळे या सायकल वारीचे संयोजक आणि रिजनल हेड डॉ सचिन तावरे  यांच्या हस्ते पदक आणि ट्रॉफी स्वीकारली..


तसेच  उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर  कॅनकिड्स सुपर होरोंना  भेटायचे ठरविले...

लहान वयातच कॅन्सरग्रस्त झालेल्या या मुलांसाठी मनाचा एक कोना अतिशय हळवा झाला होता... आजची वीस किमी राईड या लहान सुपर हिरोंना अर्पण...

मंगल हो... !!! 






Sunday, December 31, 2023

एका अपघाताची गंमत

एका अपघाताची गंमत

तेजुमध्ये मौशूमी दिदी,जयश्री ताई,  शिवांगी आणि प्रियाल यांना टाटा करून आज सकाळी सव्वा सहा वाजता राईड सुरू झाली... मौशूमी दिदीनेच करूणा ट्रस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती... 

आज पासून एक्सपिडिशन मधला महत्त्वाचा टप्पा सुरू झाला होता... किबीतू आणि हेल्मेट टॉप हे बकेट लिस्ट मधील हॉट स्पॉट होते... दिड महिन्यात त्रिपुरा, मिझोराम, मेघालय आणि आसाम पादाक्रांत करून शेवटच्या पंधरा दिवसात अरुणाचल मध्ये पेडलींग करायचे होते.

मागच्या दिड महिन्यात प्रचंड मित्र परिवार मिळाला होता तसेच शाळेतले बालगोपाल दोस्त झाले होते... या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊन  या वर्षाच्या शेवटच्या दिवसाची रम्य सकाळी राईड सुरू केली होती.

सकाळचे थंड वारे हिरव्या विड चीटर मधून सुद्धा अंगाला बोचत होते... थोडा चाढाचाच रस्ता असल्यामुळे धीम्या गतीने सायकल रायडिंग सुरू होते... दोन्ही बाजूची वनराई आणि धुकटलेले वातावरण मनाला उभारी आणत होते...  पानांची सळसळ आणि पक्षांचा किलकीलाट... या निसर्ग संगीतात धुंद होऊन अलगदपणे पेडलींग सुरू होते...

चकचकीत निवांत रस्ता लोहित नदीच्या किनाऱ्याने पुढे पुढे सरकत होता...


डीमवे गावा नंतर खडी चढाई सुरू होणार होती... तिथेच न्याहरी करून  चढाईला सुरुवात करणार होतो... आज अमलियांग पर्यंत ८१ किमीची सफर पूर्ण करायची होती... मनात एक अनामिक ओढ होती... किबीतु पर्यंत पोहोचून भारतीय सैनिकांना सदिच्छा भेट देण्याची...

डीमवे गाव चार किमी राहिले होते... एव्हढ्यात मागे जोरदार बॉम्ब स्फोटासारखा ढुंम आवाज झाला... दोन फूट पुढे फेकला गेलो... माझ्या अंगावर सखी... दोन मिनिटे काय झाले मलाच कळले नाही... स्वतःला सावरले... पाय सायकलच्या सीट मध्ये अडकला होता... आणि मागचे चाक फ्रेम मधून निखळून तीन चार ठिकाणी वेडेवाकडे झाले होते...


ट्युब फुटून जोरदार धमाका झाला होता... मोटारसायकलने मागून येऊन जोरदार धडक मारली होती...
 

मोटार सायकल रायडर धावत आला... माझा अडकलेला पाय बाहेर काढून हिरवळीवर बसविले... डोक्यात हेल्मेट आणि हातात ग्लोव्हज असल्यामुळे हेड इंज्युरी आणि हात सोलपटण्यापासून बचावलो होतो... कुल्याला मुका मार लागला होता... 

मोटार सायकलस्वार रडत पाया  पडू लागला... त्याला म्हणालो अरे रडू नकोस... आपण दोघेही बचावलो आहेत... मला पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटलमध्ये न्यायची जबाबदारी आता तुझी आहे... मागे असलेल्या वळणावरून तो पुढे आल्यावर सूर्याची किरणे त्याच्या हेल्मेटच्या विंड शिल्डवर पडली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली... त्यामुळे वेगात तो सायकलवर धडकला होता...

विवेकानंद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक चंपक काकोती सरांना फोन लावला... तातडीने शाळेचा सदस्य प्रशांता पोलिसांची गाडी घेऊन आला. पोलिस स्टेशन मधून आम्हा दोघांनाही तडक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस घेऊन आले... डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी केली अंगावर कुठेही काळेनिळे डाग नव्हते... दुखऱ्या कुल्यासाठी मलम आणि गोळ्या दिल्या... आज दिवसभारासाठी आराम करण्याचा सल्ला दिला...

पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये आलो... मोटार सायकलस्वार  दिलबहाद्दुरचे रडून डोळे लाल झाले होते... मजुरी करणारा दिलबहाद्दुर ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी बायकोमुलांना खाऊ-मिठाई घेऊन घरी  निघाला होता... लोहित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितले "मला कंप्लेंट किंवा FIR करायचा नाही... याला सोडून द्या"... दिलबहाद्दुर पैसे देत होता... त्याला सांगितले "तू माझ्या मुलासारखा आहेस... तुझी बायको मुले घरी वाट पाहत असतील... लवकर घरी जा..."

पोलिस स्टेशनच्या बाहेर  आल्यावर बायको आणि मुलीला अपघात झाल्याचे कळविले... तसेच सर्व गृपवर व्हॉट्स ॲपवर कळविले... 

जवळच सायकलचे दुकान होते... त्याला सर्व घटना सांगून काय मदत करता येईल ते विचारले... याचे रीपेअरींग तीनसुखिया येथे होईल याची माहिती मिळाली... गुगल वर तीनसुखियाच्या किला सायकल शॉपीचा नंबर मिळाला... फोन करून आणि सायकलचा फोटो पाठवून परिस्थिती सांगितली... मालक ऋषभने आश्वासन दिले आणि  सांगितले.."सर उद्या सकाळी सायकल घेऊन या... तुम्हाला टकाटक करून देतो...

आजचा अपघात हा अनपेक्षितपणें घडलेली घटना होती...  हेल्मेट  ग्लोव्हज  गॉगल  हे सेफ्टी गियर्स आणि अल्युम्यूनियम अलॉयच्या MTB  सायकलचा दणकटपणाच या अपघातातून काहीही इजा न होता मला वाचवू शकला... खरं तर सखीने माझ्यावर आलेला कठीण प्रसंग स्वतःवर घेतला होता... आता माझे कर्तव्य आहे तिला टकाटक करण्याचे होते...

तसेच तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद... या सफरीत सर्वांनी दिलेले सहकार्यच... परमेश्वराच्या चरणी रुजू झाले होते...

म्हणूनच म्हणतात ना... "देव तारी त्याला कोण मारी"

हा अपघात म्हणजे...  एखाद्या सस्पेन्स चित्रपटात घडणाऱ्या घटनां सारखा होता... पुढे काय होणार याची काडीची ही कल्पना नाही... पण डोकं शांत ठेऊन निर्णय घेणे... हीच आजच्या घटनेची गंमत होती...

मंगल हो... !!!

Thursday, November 30, 2023

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले....


टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले...

पारीजातक किंवा प्राजक्त... अतिशय नाजूक आणि आवडीचे फुल... मस्त सुगंध दरवळतोय वेचलेल्या हातामध्ये...

प्राजक्ताचे फुल इतके नाजुक की हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे... 

उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणुनच  रात्री उमलणारे.... 

आज पहाटे फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिला...

हिरवळीवर पडलेला सडा...

जसा काही आकाशात  प्रकट झालेल्या असंख्य तारकांच...

पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ...  निसर्गाचा हा नाजुक अविष्कार...

एखाद्या सुंदर आणि मादक ललने सारखा...

प्राजक्त पाहिला की अलगद आठवतात त्या व. पु. काळे यांच्या ओळी...

पारीजातकाचं  क्षणभंगुर आयुष्य लाभलं तरी चालेल...

पण लयलुट करायाची ती सुगंधाचीच...

मंगेश पाडगावकरांची कविता तर हृदयातील अनमोल ठेवा आहे...

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले 

भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली ऊन-सावली विणते जाळी...

येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दुर दुर हे सूर वाहती उन्हात पिवळया पाहा नाहती...

हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा... गाणे अमुचे लुक-लुक तारा...

पाऊस, वारा, मोरिपसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुलारे... सुरात मिसळुनि सुर चलारे... 

गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

तसेच सुवर्णतुला संगीत नाटकातील विद्याधर गोखले यांचे  पद आठवले...

अंगणी पारिजात फुलला ।

बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ॥

धुंद मधुर हा गंध पसरला

गमले मजला मुकुंद हसला

सहवासातुर मदिय मनाचा कणकण मोहरला ॥

सुनिताबाईंच्या "आहे मनोहर तरीही"  ग्रंथामधला प्रसंग आठवला...

पहाटे  सुनिताबाई प्राजक्ताची  फुले वेचत असताना पु.ल. नीं हळूच झाड हलविले आणि सुनिताबाईंवर प्राजक्ताचा वर्षाव झाला... 

प्रेमाला वय नसतं... हेच प्राजक्त सांगतो...

त्यामुळे बालपणीचा काळ आठवला आणि जुन्या मधुर आठवणी चाळवल्या...

माझा बालमित्र... सकाळी प्राजक्त वेचुन घरी आणताना हाताच्या उष्णतेने कोमेजतात... म्हणुन ही फुले आणण्यासाठी ओला रुमाल अंगणात घेऊन जायचा...आणि घरात आणल्यावर घंगाळ्यात पाणी घालुन त्यावर  प्राजक्त तरंगत ठेवायचा... त्यामुळे संपूर्ण दिवसभर प्राजक्ताचा मंद दरवळ घरात असायचा...

त्यामुळे नेहमी वाटायचे जिण असावं तर प्राजक्ता सारखं...

या संदर्भात आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला...

बाबू मोषाय... जिंदगी बडी होनी चाहिए... लंबी नाही...

किती जगलास यापेक्षा कसा जगालास हेच महत्त्वाचे आहे...

प्राजक्तांच्या फूलाबाबत फार सुंदर कथा आहे...

 रुपनगरच्या राजकन्येचं सुर्यावर निरतिशय प्रेम होत... लग्नाच्या दिवशी सुर्यदेव मांडवात येत नाहीत...म्हणुन राजकन्या रुसून... रागावुन... धगधगत्या होमकुंडात स्वतःला झोकुन देते... 

तेथे प्रकट होते प्राजक्ताचे रोपटे...

सुर्यदेवावर राग म्हणुन हे प्राजक्ताचे फुल दिवसा फुलत नाही...

दिवस उजाडला आणि सूर्य देव आसमंतात वर येऊ लागला की प्राजक्त  कोमेजून जाते... 

परंतु पहाटेचा मंद सुगंधीत दरवळ तिच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देतं राहते...

लहानपणी आजीच्या गावाला गेल्यावर  प्राजक्ताच्या फुलांच्या माळा हातात घालून लपंडाव खेळायचो... 

प्राजक्ताचे केशरी देठ चुरडले की सुगंधित केशरी रंगाने हात गंधित व्हायचे...

फुलांचा पाऊस पहायचा असेल तर पहाटे प्राजक्ताचं झाड हळुवार हलवायचं आणि त्या सड्यात न्हाऊन जायचं...

श्री कृष्ण आणि सत्यभामेची कथा सुद्धा प्रसिद्ध आहे...

श्री कृष्ण हे झाड स्वर्गातून पट्टराणी रुक्मिणीसाठी आणत असताना... वाटेत सत्यभामेन हट्ट धरला... प्राजक्त माझ्या अंगणातच लावायचा... तिच्या हट्टाखातर श्री कृष्णाने तिच्या अंगणात प्राजक्त लावला... 

रुक्मिणी रुसली... श्री कृष्ण हसला आणि म्हणाला... उद्या सकाळी माझ्याबरोबर अंगणात ये... प्राजक्ताचा सर्व सडा रुक्मिणीच्या अंगणात पडलेला होता... 

शाळेत मंदारमाला वृत्त शिकविताना गुरुजींनी वरील कथा सांगितली होती... या वृत्तात बावीस अक्षरे असतात.. तसेच त्याचे उदाहरण अजूनही लक्षात आहे...

मंदारमाला रमालाच लाभे उभा वृक्ष तो सत्यभामांगणी

पहाटेच्या प्राजक्ताने आठणींचा खजिना उघडला...  सर्वांना भरभरून वाटण्यासाठीच...

मंगल हो... !!!



Friday, September 15, 2023

*प्रयत्नांची पराकाष्ठा... एकवीरा राईड...*


प्रयत्नांची पराकाष्ठा... एकवीरा राईड...

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे... या उक्तीचा पुरेपूर अनुभव आज घेतला... उत्तराखंड हिमालयात या महिना अखेरीस सायकल राईडसाठी जातोय... हिमालयात दहा हजार फुटांवर सायकल चालविणे... हे एक वेगळे चॅलेंज असते... त्याचे मुख्य कारण म्हणजे प्राणवायूची असणारी कमतरता... त्यासाठीच आज नॉन स्टॉप खंडाळ्याच्या घाट चढण्याचे चॅलेंज स्वीकारले होते... सोबतीला विजय आणि नवनीत सुद्धा होते... पुढील काळात त्यांची सुद्धा हिमालय राईड साठी तयारी कारणासाठी आज त्यांची ट्रेनिंग होती...

सकाळी खोपोली मध्ये मटकीची उसळ, विजयने आणलेली तांदळाची भाकरी आणि केळे असा जोरदार नाष्टा केला... त्या नंतर बरोबर आठ वाजता खंडाळ्याच्या बोरघाट चढाची सुरुवात करतानाचा... दोघांनाही टास्क दिले... आज शिंगरोबा मंदिराजवळ स्टॉप नाही... सलग न थांबता संपूर्ण घाट चढायचा आहे... सीट वरून खाली उतरायचे नाही... की सायकल थांबवायची नाही... स्वतःच्या मनाशी अधिष्ठान करा... निग्रह करा... आणि राईड सुरू करा... 

आजचे टास्क तसे खडतर होते... शरीराचा आणि मनाचा कस लावणारे होते... खोपोलीच्या मुख्य रस्त्यापासून एकदम चढाला सुरुवात होते... अतिशय निर्धाराने आणि एका विशिष्ट गतीने तिघांची राईड सुरू झाली... विजय आणि नवनीतने मला फॉलो करायचे ठरविले होते... सुरुवातीलाच  वळणाचे दोन अवघड चढ लागले... त्यात मागून गाड्यांची रहदारी सुध्दा होती... एकमेकांना ओव्हरटेक करणाऱ्या गाड्यांना सांभाळत सायकलचे पेडल सतत चालू ठेवणे... हे एक मोठे दिव्य होते... कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन... न डगमगता मार्गक्रमण करायचे होते... अशा वेळी चित्त स्थिर ठेऊन... कोणतेही नकारात्मक विचार मनावर स्वार होणार नाहीत... हेच सांभाळायचे असते... त्या मुळेच अतिशय संथ गतीने परंतु दमदारपणे सायकलिंग सुरू होते...  

सकाळच्या वातावरणात दमटपणा होता... त्यामुळे थोड्याच वेळातच घामाच्या धारा वाहू लागल्या... कपाळावरचा घाम भुवयामधून डोळ्यावर उतरू पाहत होता... चष्मा आणि हेल्मेट डोक्यात असल्यामुळे  घाम पुसणे सुध्दा अवघड झाले होते... परंतु जेव्हा मनापासून निग्रहाने आपण एखाद काम हाती घेतो तेंव्हा निसर्ग सुद्धा आपणाला मदत करतो... वाऱ्याच्या एका जोरदार झुळकिने सायकलच्या दांडीला रुमाल लावला आहे याची जाणीव करून दिली... एका हाताने सायकल सावरत... रुमालाने कपाळावरचा सर्व घाम पुसून काढला...

शिंगारोबाचा टप्पा आवाक्यात दिसू लागला... नेहमीचा हायड्रेशन पॉइंट... मंदिराचे पुजारी थांबण्यासाठी हात करत होते... परंतु त्यांना टाटा करून... दमदारपणे आम्ही तिघांनी ही पुढे प्रस्थान केले... पुढची दोन हेअर पिन वळण आणि खडी चढण... आमची परीक्षा घेणारी होती... गियर एक - एक करून सुद्धा झिकझ्याक करण्याशिवाय गत्यंतर नव्हते... वळणावर खालून चढणाऱ्या गाड्या लांबून वळण घेत असल्यामुळे... त्या गाड्यांच्या मागील भागापासून सावध राहून पेडलींग करणे... अतिशय कसबीच काम होत... चढावर दमछाक झाली असेल तर सायकलचे हॅण्डल सुद्धा डगमगू लागते... अशा वेळी सायकलचा तोल सांभाळणे सुद्दा जिकरीचे होते... मानसिक बळ आणि लक्ष गाठण्याचा दृढ निश्चय हेच अशा प्रसंगातून तारून नेऊ शकते...

अमृतांजन पुलावर पोहोचलो... उजव्या बाजूला नागफणी कडा आमच्या स्वागताला उभा होता... कड्यावराचे वातावरण एकदम हिरवेगार होते... या ठिकाणी खंडाळ्याचा थंडावा जाणवू लागला... वाहणाऱ्या घामाच्या धारांना ही थंडी सुखावत होती... आता शेवटची  दोन चढाची वळणे शिल्लक होती... प्रचंड दमछाक झाली होती... पण मन अतिशय कणखर होते... दमदारपणे आणि  संथ गतीने शेवटचा टप्पा सुरू झाला... पहिले वळण पार केले आणि नवनीतच्या अंगात विद्युल्लता संचारली... तो भराभर पेडल मारू लागला... त्याच्या पाठोपाठ विजय सुद्धा जोशात आला... दोघांनी हा हा म्हणता  वाघजाई मंदिर गाठले... मागोमाग माझा निश्चय सुद्धा तडीस गेला होता... तिघेही घामाने थबथबून गेले होते... 
एक संकल्प... एक अधिष्ठान पूर्ण झाले होते... 

बऱ्यापैकी विश्रांती घेऊन नारायणी धाममध्ये येऊन दुपारच्या जेवणाची कूपन काढली... आता पुढील नियोजन नवनीतकडे होते... 
एकवीरा आईचे दर्शन घेण्याअगोदर टोल प्लाझा ओलांडून वाघजाई गावाकडे वळलो... येथे एकवीरा आईच्या भावाचे... भैरव बाबाचे मंदिर आहे... मंदिरात निवांत दर्शन घेतले... हिरवाईने नटलेला अतिशय नितांत सुंदर परिसर आणि लांबच्या  डोंगरात दिसणारे एकवीरा आईचे मंदिर पाहून मन मोहून गेले... 

तेथल्या सायकल चालविणाऱ्या मुलांनी एकवीरा डोंगराकडे जाणारा शॉर्टकट रस्ता दाखविला... परंतु त्या रस्त्यावर खूप चिखल असल्यामुळे हायवे वरून कर्ल्या पर्यंत गेलो... एकवीरा आईच्या पहाडाच्या अर्ध्या रस्त्यावर गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे... तेथे जाणारा रस्ता अतिशय तंग आणि खडी चढाईचा आहे... दोघांनाही या रस्त्यावरून सायकलिंगसाठी उद्युक्त करण्यासाठी मागे न पाहता कार्ला घाटात सायकल घातली... माझ्या मागे येण्याशिवाय विजय आणि नवनीत कडे पर्याय उरला नाही... आणि हो !!! दोघांनीही तो अतिशय कठीण कार्ला घाट बघता बघता पार केला... वर गाड्या पार्किंगमध्ये पोहोचल्यावर दोघांच्या चेहऱ्यावराचे तेज पाहण्यासारखे होते... जणूकाही हिमालय चढून गेल्याचा आनंद दोघांच्या देहबोलीतून जाणवत होता... 

प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर जे यश प्राप्त होते... त्याचा आनंद अवर्णनीय असतो... हेच या राईड ने सिद्ध केले होते...

एकवीरा आईच्या दर्शनाने पुन्हा ऊर्जा मिळाली... ती परतीच्या सायकलिंगसाठी...

मंगल हो... !!!

Wednesday, June 28, 2023

बेधुंद पावसाळी राईड


बेधुंद पावसाळी राईड

रंगबिरंगी  दिवस होता... वातावरण मदहोश करणारे होते... कारने बोरिवलीला लग्नाला जातानाच... पावसाचे प्रताप सुरू झाले... तेव्हाच ठरविले आज पावसात राईड करायची.. बेधुंद भिजण्यासाठी...

धुवाधार पावसाची सायंकाळ आली... आणि तेव्हढ्यात नवनीतचा फोन आला... चला पावसात सायकलिंग करायला... मनातले मित्राच्या ओठावर आले... आणि सखी निघाली भिजायला... पावसाचे गाणे गायला....

तुडुंब पावसात सखीवर स्वार झालो... सखी शिरशिरली... बावरली... मोहरली... आणि मग सरसावली... दिलं पाण्यात झोकून... 

नवनीतसह स्वारी निघाली नरिमन पॉइंटला... जलाधरांनी अंग अंग झाले ओलेचिंब... पाण्याचे फव्वारे काढत सुसाटत धावत होतो... चष्म्या वरून ओघळणाऱ्या जलबिंदूना जिभेच्या टोकावर घेऊन दिमाखात हवेत उडवत होतो... भन्नाट  गेलो NCPA कडे... बसलो कठड्यावर सागराची गाज ऐकत... पाऊस पडतच होता... किनाऱ्यावरून चालणारी मंडळी छत्र्या रेनकोटचे अस्तर घेऊन पावसाला थोपावत होते... भिजण्यात काय मजा असते... हे त्यांना कोण सांगणार... 

तिकडून निघालो गेट वे ऑफ इंडियाकडे... वरचे टप नसलेली मुंबई दर्शनची रिकामी बस सखीकडे टकमक पाहत होती... दीडशे रुपयात साऊथ मुंबई फिरविणारी बस आज ताज हॉटेलच्या समोर निवांत विसावली होती... 

भर पावसात फोटो काढले... आणि आलो ऑपेराहाऊसच्या तिवारी स्वीटकडे...नवनीतने मस्त ट्रीट दिली...दोघात एक स्टफिंग केलेली जंबो दही कचोरी खाताना सायकल मैत्रीण शुल्लुची आठवण झाली... 

नाना चौकातून हाजी अली कॉर्नरला आलो... स्कूटर वरच्या दोन तरुणांनी भिजताना पाहिले... पुढच्याने रेनकोट घातला होता तर मागचा छत्री घेऊन बसला होता... विचारले... "पावसात भिजताय"... होय सखिसह मस्त भिजतोय... ठरवूनच घरातून बाहेर पडलोय... बालपणीच्या आठवणी ताज्या करण्याचा हाच तर रामबाण उपाय आहे... 

सिग्नल सुरू होण्या अगोदर स्कूटरस्वाराने रेनकोट उतरवला... मागच्याने छत्री बंद केली... आणि रममाण झाले पावसात... 

आनंदाचा झरा कसा बेधुंद असतो... याची प्रचिती आली... आजची चौतीस किमी राईड सार्थकी लागली होती...

सतीश जाधव...



Friday, June 16, 2023

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा... काश्मीर ते कन्याकुमारी

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा...
 काश्मीर ते कन्याकुमारी

काश्मीर ते कन्याकुमारी हे 3651  किमी अंतर सहा दिवस तेवीस तास आणि 39 मिनिटात पार करून जागतिक विक्रम  प्रस्थापित करणारे डॉ अमित समर्थ यांची आज भेट झाली... 

मोनिलच्या वांद्रे येथील बाईकइंडिया या सायकल शॉपी मध्ये असलेल्या टॉक शो मध्ये...

दररोज साधारण 550 किमी अंतर पार करत... दिवस-रात्रभरात फक्त एक तास झोप घेत ही सायकल रेस विक्रमी वेळात पूर्ण करून डॉ अमित यांनी  जागतिक सायकल क्षेत्रात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आहे... 

 "रेस  अँक्रॉस अमेरिका" या सायकल रेसिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका सायकलिस्टला पन्नास लाख रुपये खर्च येतो... तर ह्या भारतीय स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला पाच लाख रुपये खर्च आला... 

या स्पर्धेत एकूण बारा स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील एक स्पर्धक साठ वयाचा होता... एक स्पर्धक सिंगल गियर सायकलिस्ट होता.. तर तीन स्पर्धक अपंग होते...  सर्वांनी नियोजित वेळेआधी यशस्वीरीत्या ही स्पर्धा पूर्ण केली...

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन अतिशय देखणे आणि नियोजनबद्ध होते... तसेच अमेरिकन स्पर्धेच्या तोडीसतोड होते... भारतीयांनी भारतीयांसाठी  भारताच्या भूमिवर आयोजित केलेली  स्पर्धा होती... ही प्रचंड अभिमानाची बाब आहे... 

BRM / SR / LRM / RAAM इत्यादी परदेशातील सायकल स्पर्धांना पर्याय म्हणून ही स्पर्धा अतिशय उपयुक्त असून भारतीय तरुणांना आणि रेसिंग सायकलिस्टना नवनवीन जागतिक विक्रम पादाक्रांत करण्याची एक सुसंधी उपलब्ध झाली आहे भारत भूमिवर... 

डॉ. अमितच्या मार्गदर्शनाखाली पुढील स्पर्धा नोव्हेंबर 2024 मध्ये असणार आहे... साठीच्या पुढील तसेच MTB रायडर्स सुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकतात...

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी डॉ अमित समर्थ (मोबाईल नंबर 8956433351) यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे...

तर सुरू करा तयारी... आणि मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना हातभार लावा...

 मंगल हो

सतीश जाधव 

Wednesday, April 19, 2023

मनपा गुरू डोंगरे साहेबांची भेट आणि सायकल निष्ठांची मांदियाळी

मनपा गुरू डोंगरे साहेबांची भेट आणि सायकल निष्ठांची मांदियाळी

 ठरविल्याप्रमाणे सायकल वरुन एका दमात कुंभार्ली घाट पादाक्रांत करून काल चिपळुणातून मुंबईकडे प्रस्थान केले...

वाटेत  महापालिका जल विभागाचे माझे गुरु श्री डोंगरे साहेब यांचा फोन आला... त्यांनी आठवण काढली होती... त्यांना सांगितले सायकलिंग करत उद्या सकाळी तुमच्या घरी येतो... मग निवांत गप्पा मारुया...

आज सकाळची सायकल रपेट सुरू झाली... वांद्रे लिंकींग रोड वरुन राईड करत असताना... एक सरदार सायकलिस्ट पापाजी ओव्हरटेक करून पुढे गेला... "एकसे भले दो" या नात्याने छोटी स्प्रिंट मारून पापाजीला गाठले... गप्पा सुरू झाल्या...

 अंगात घातलेल्या टीशर्ट बद्दल पापाजीने विचारले... एकट्याने, सेल्फ सपोर्ट "आदी कैलाश ओम पर्वत" सायकल वारी केल्याबद्दल तसेच सायकल वरुन भारत भ्रमंती बद्दल कळल्यावर... जुहू जवळ थांबवून आपल्या सर्व सायकलिस्ट मित्रांना बोलावले... सायकल भ्रमंतीचे काही किस्से सांगितल्यावर सर्व मित्रांच्या मनात सायकल टूरींग बद्दल जिज्ञासा निर्माण झाली ...   दहा मिनिटापूर्वी भेटलेले सर्व सायकलिस्ट माझे जिगरी दोस्त झाले होते... सरदारजी अंबरीर सिंग यानी फोन नंबर शेअर केला... तर सायकलिस्ट पटेल यानी MTB घेण्याचे नक्की केले... पुन्हा भेटण्याचे ठरवून सर्व मित्रांची रजा घेतली...

आता सुरू झाली राईड... अंधेरी चारबंगल्या जवळील डोंगरे साहेबांच्या घराकडे... बरोबर सकाळी आठ वाजता साहेबांच्या घरात आलो... झक्कास चहाने कडक स्वागत झाले आणि सुरू झाली गप्पांची मैफल... लडाख सायकल सफर... नर्मदा सायकल परिक्रमा... स्पिती व्हॅली सायकल वारी... मुंबई कन्याकुमारी... मुंबई दिल्ली... पंढरपुर पंजाब ईत्यादी सायकलिंगच्या सुरस कथांचा ओघ सुरू झाला...

लता वहिनी नर्मदा सायकल वारीच्या गोष्टी तल्लीन होऊन ऐकत होत्या... त्यांच्या मनात बसने नर्मदा परिक्रमा करण्याचे विचार घोळू लागले...

 "आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले... आता स्वतःसाठी जगता आले पाहिजे"  हे म्हणणे वहिनींना तंतोतंत पटले... तसेच सायकलिंग करण्यासाठी डोंगरेना आडकाठी करणार्‍या वहिनी... त्यांनी सायकल घ्यावी यासाठी  तयार झाल्या... ओघाओघाने खुप दिवस सायकलसाठी मागे लागलेल्या नातू अथर्वला सुद्धा सायकल घेण्याचे नक्की झाले... 

सायकलिंगद्वारे करत असलेली निसर्ग भ्रमंती... खुप मोठ्या लोकांशी होणार्‍या भेटीगाठी... नितांत सुंदर आणि जीवनात आमूलाग्र बदल घडविणारे अनुभव...   सूनबाई अदिती आणि आजी शांताबाई मनःपूर्वक ऐकत होत्या... मुलगा नीलेशचे वर्क फ्रॉम होम चालू होते... त्याच्याशी सुद्धा बोलणे झाले...

आज एका सुखी आणि समाधानी कुटुंबाच्या संपर्कात आलो होतो... सायकलिंगचे आणि निसर्ग भ्रमंतीचे स्फुलिंग सर्व कुटुंबाच्या मनात रुजवीले होते... याचा खुप आनंद होत होता...

 ८६ वर्षाच्या डोंगरेंच्या सासू... आजी शांताबाईंच्या चेहर्‍यावरील सकारात्मक सुहास्य भाव एकदम भावले... त्यांना म्हणालो "तुमच्या शंभरीला फोटो काढायला येणार आहे... तसेच माझ्या शंभरीला तुम्ही आवर्जून यायचे आहे" या बोलण्यावर आजी खळखळून हसल्या... अजूनही खडानखडा वर्तमानपत्र वाचणार्‍यां आजींनी... ईमारतीच्या पटांगणात चालायला जाण्याचे कबूल केले...

हे सर्व कामकाज चालू असताना; मस्तपैकी चटपटीत पावभाजीवर ताव मारला... गप्पांच्या ओघात अदितीच्या फक्कड चहाची चव सुद्धा चाखली... आणखी एक पाव घेऊन... चहात बुडवून पाव खाल्ला... आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला...

 गप्पांमध्ये दोन तास कसे गेले कळलेच नाही... सर्वांचा निरोप घेऊन ईमारतीखाली उतरलो... ७८ वर्षाच्या डोंगरेंनी भन्नाट सायकलिंग केले... त्यांच्या चेहर्‍यावरचा सुखद भाव... आनंदी जीवनासाठी अनमोल ठेवा सापडल्याचे सांगत होते...

अदिती म्हणाली, "काका खुप खुप धन्यवाद... सर्व कुटुंबाला नवसंजीवनी दिल्याबद्दल" 

सर्वांचा निरोप घेऊन आनंद लहरीवर तरंगत अंधेरीच्या सोसायटीमध्ये गेलो...  पान दुकान चालविणारा भाडेकरू प्रमोद ऊर्फ छोटूला  भेटलो... बोरिवलीच्या एका पान दुकानात बरीच वर्ष काम करणार्‍या छोटूने दुकान भाड्याने घेऊन आलिशान पानाचे दुकान थाटले आहे... 

 मेहनतीने आणि सचोटीने काम करणार्‍या छोटूचा भविष्यकाळ अतिशय उज्वल आहे... याची जाणीव त्याच्याशी बोलताना जाणवली... एकदम कलात्मक पद्धतीने सजवलेले दोन मीठा पान छोटूने घरच्यांसाठी बांधुन दिले... नवीनच दुकान थाटलेल्या छोटूला शगून म्हणुन पैसे दिले... छोटूला सुद्धा पानाची डिलीव्हरी करायला सायकल हवी आहे... 

आज सकाळची विविध रंगांनी नटलेली ४८ किमीची सायकल राईड... क्वालिटी टाईमचे प्रतिक होती...  डोंगरे साहेबांच्या सर्व कुटुंबियांची भेट... नवीन सायकलिस्ट मित्रांची सोबत... आणि मोठा आवाका असलेला भाडेकरू छोटूची गाठ... ही माऊलीच्या उक्ती प्रमाणे प्रेमाच्या एका समान धाग्यात गुंफलेली मांदियाळीच होती... 

घराकडे परतताना आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला... "बाबू मोशाय... जिंदगी बडी होनी चाहिये... लंबी नही".... त्याच धर्तीवर सायकल सखी हसली आणि तिच्या विचारांचे तरंग उमटले...

  "किती किलोमीटर सायकल चालवली... यापेक्षा किती लोकांना भेटलास... त्यांच्या मनात जगण्याचे... नवीन विचारांचे स्फुलिंग निर्माण केलेस... यालाच सुख म्हणतात ना !!! 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे...