Monday, July 12, 2021

शाळेतील मित्रांच्या मैत्रीची सहल

शाळेतील मित्रांच्या मैत्रीची सहल

दि. ७ आणि ८ जुलै २०२१

गेल्याच आठवड्यात सतीश आणि शरदसह शांती रिव्हर रिसॉर्ट पाहून आलो होतो. रिसॉर्टचा परिसर, तेथे असलेल्या सोई सुविधा, रूम्स पाहून आपल्या मित्रांसाठी अतिशय सुयोग्य रिसॉर्ट आहे याची खात्री झाली. येथील वातावरण, अंबियन्स आणि जेवण याची पडताळणी केली होती. रिसॉर्टचे मालक प्रवीण भोजने यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याच वेळी शरदने आगाऊ रक्कम देऊन रिसॉर्ट बुकिंग केले.
बुधवारी, सात जुलैला, कोणी कुठच्या गाडीतून यायचे याची खबरदारी शरदने घेतली होती. सकाळी बरोबर साडेसहा वाजता दिलीप काळे गाडी घेऊन माझ्या हजर घरी हजर झाला. कुणाल दादरला तयारच होता. रामकृष्ण मुतालिकला मुलाने कुणालच्या दारात सोडले. दोघांना गाडीत घेतले. जीवन गौड सायन नाक्यावर भेटला आणि सुरू झाली स्वप्नवत सफर...
शाळेत एका बेंच वर बसणारे रामकृष्ण आणि जीवन  तब्बल  ४७ वर्षांनी एकमेकांना भेटले होते... एकमेकांना कडकडून भेटतांना त्यांना शाळेतील त्या बेंचची आठवण झाली होती...

दिलीप काळे एक गहन व्यक्तिमत्व.... शाळेत गाडीने येणारा दिलीप रस्ते माहीत नाहीत; अशा पद्धतीने गाडी चालवत होता. डाव्या बाजूला वळू की उजव्या बाजूला असा घोषा करणाऱ्या दिलीपची नस आणि नस कुणाल जाणून होता. त्यामुळे त्याच्या रस्त्याबाबतच्या प्रश्नांना कुणाल काहीच उत्तरे देत नव्हता. त्याने मला बळीचा बकरा बनविला होता.

दिलीप साठी CNG पेट्रोल पंप शोधत होतो. पनवेल जवळ पंपाला वळसा मारताना, तंदुरी चहाची टपरी लागली... कुल्हड मधली चरचरलेली तंदुरी चहा पिऊन मित्रांसोबतच्या सफरीचा आनंद भन्नाट झाला.
 वक्तशीर शरद, "कुठपर्यंत पोहोचलात" असे सर्वांचे मॉनिटरींग करत होता. मुंबई पुणे जुन्या हायवेवरून CNG शोधत मार्गक्रमण केल्यामुळे बाकीच्या तीन गाड्या एक्सप्रेस वे वरून पुढे निघून गेल्या होत्या. शेडुंग टोल प्लाझा जवळ आम्ही सर्वजण एकत्र आलो. सर्वांच्या गळाभेटी झाल्या. मित्र भेटीचा आनंद अपरिमित असतो याचा प्रत्यय आला...  सर्वांना एकत्र आणण्याचा सर्वात मोठा वाटा शरदचा होता.

दहिवली गावात अंडी घेऊन सर्व लवाजमा रिसॉर्ट वर पोहोचला. हिरवळीने नटलेल्या कर्जत मुरबाड रस्ताच्या चोहीकडे सह्याद्रीच्या पर्वत रांगा, झाडे वेली फुलांनी डवरल्या होत्या.  निर्जन रस्त्यावरून निवांतपणे जाताना, गाडीच्या काचा उघडून स्वच्छंदीपणे बागडणाऱ्या प्राणवायूला छातीत भरून घेत होतो... वाऱ्याची झुळूक आणि पक्षांच्या किलबिलाटाचे संगीत मनात आनंदाच्या तारा छेडीत होत्या.. निसर्गाची साथ आणि मित्रांची बात सफरीची रंगत वाढवीत होती.
या सहलीमध्ये माझे शाळकरी मित्र रामकृष्ण मुतालिक, कुणाल ठाकूर, दिलीप काळे, माधव केळकर, नागेश सोपरकर, विकास होशिंग, शरद पाटील, नरेंद्र मोहिते, अजित तोडणकर, अशोक वारीक, दिनेश नाडकर्णी, जीवन गौड, कैलास गौड, संजय कोळवनकर,निशिकांत क्षिरे,सतीश कामेरकर, प्रमोद दातार  हे सामील झाले होते.
 
नागेश सोपरकर, प्रमोद दातार, निशिकांत क्षिरे, जीवन गौड आज ४७ वर्षानंतर भेटले होते. त्यांचा शाळेतील चेहरा आणि आताचा चेहरा यात काहीच बदल झालेला नव्हता. 
शांती रिव्हर व्हीव रिसॉर्ट वर ठरल्याप्रमाणे सकाळी दहा वाजता पोहोचलो. रेस्टरन्ट मध्ये सर्व स्थानापन्न झाले. आणि सुरू झाला एकमेकांच्या भेटीचा कार्यक्रम...

 योग जुळुनी आला  आपल्या सर्व मित्र भेटीचा,

खरंच आहे केवढा  क्षण हा आनंदाचा...

असेच पुन्हा पुन्हा वाटे सर्व मित्र भेटू,

देऊ घेऊ आनंद  सुख दुःख आपसात वाटू ...

जपू मनातून हे  खऱ्या मैत्रिचं नातं

कृष्णसुदामा जरी  नसले कलीयुगात..

मैत्रीचे हे बंध  सारे जपून ठेवू..  

असेच भेटूनी नाचत गात राहू

पटतंय आणि जमतंय का  तुम्हीच बघा,

भेटीगाठी व्हाव्यात  हृदयात हवी जागा...

जीवनाच्या या वळणावर  पुन्हा पुन्हा भेटून घेऊ

आठवणी आणि आनंद  चिरकाल साठवून ठेऊ...

डोळे  आले  भरून  ... 

 मैत्रीचा महापूर पाहून...

आनंदाच्या अश्रूंना पारावार राहिला नव्हता...

जीवनातल्या  घडीला  आसमंत लहान होता...

हीच प्रार्थना जगंनियंत्याला ....

दे आरोग्यदायी दीर्घायुष्य मित्र जगताला...

फक्त मैत्रीसाठी..... आणि मित्रांसाठी...

माझे सर्वस्व अर्पण त्यांच्या भेटीगाठी साठी...

जीवन आणि रामकृष्ण एका कोपऱ्यात गप्पा मारत बसले होते... तर प्रमोद आणि निशिकांत बँक ऑफ इंडिया मधून सेवानिवृत्त झाले तरी बँकेला कवटाळून बसले होते...

शरदच्या आवाहनाप्रमाणे प्रत्येक जण निळे कपडे घालून आले होते... त्यामुळे शाळेतील गणवेशाची आठवण झाली. विशेष म्हणजे सर्वांनी ड्रेसकोड पाळला होता.  निळा टीशर्ट  घातलेली खूप मंडळी होती. त्या निळ्या रंगाच्या सुद्धा खूप वेगवेगळ्या छटा होत्या. हसतमुख प्रमोद दातारचा टीशर्ट खूपच ढगळ होता. 
आज सतीश कामेरकर फुल्ल फॉर्म मध्ये होता.  वारं प्यालेल्या वारू सारखी त्याची गत झाली होती. त्याच्या कॉलेज मधील पहिल्या प्रेमाची कशी खांडोळी झाली, तो किस्सा अप्रतिमच...

बुलेट रायडर दिनेश नाडकर्णी सुद्धा भरभरून बोलत होता... शाळेतील हॉस्टेलचे लाईफ आणि  मुलामुलींशी केलेली दंगामस्ती सांगताना त्याचे पांढरे गोबरे गाल लालेलाल झाले होते. 

बोटींचा बादशाह कुणाल ठाकूर बोलायला लागला की फक्त ऐकत राहावे... त्याचे बोटीवरचे किस्से... रबराच्या बायका... वेगवेगळ्या देशात केलेली धमाल.. समुद्री चाचे... या  अनुभवाचा खजिनाच तो आम्हाला भरभरून देत होता...

कंदापोहे आणि उपमा, सोबत आमलेट पावाचा नास्ता झाल्यावर सर्वांनी रूम कडे प्रस्थान केले. जाताजाता रेस्टोरंटच्या पायरीवर सर्वांचा गृप फोटो काढला. 

आता सुरू झाली स्वीमिंग पूल वरची मस्ती... मिस्कील कैलास गौड... प्रत्येकाला शब्दांच्या दातांनी चावत होता.  कैलास बरोबर जीवन, कुणाल, दिनेश, दिलीप, नागेश, अशोक, विकास, संजय पोहायला  तलावात उतरले होते.  डुंबत असताना सुद्धा कुणालचे किस्से सुरू होते. मग सुरू झाली मैफिल डीजे वर नाचण्याची... सतीश कामेरकर एकदम जोशात होता. दिनेश आणि सतीशची नाचण्याची जुगलबंदी सुरू झाली.
त्यांच्या बरोबर विकास, नरेंद्र,  माधव सुद्धा डान्स मध्ये सामील झाले. नाचता नाचता विकास तलावाच्या एकदम किनाऱ्यावर गेला, त्याला म्हणालो, "विकास पाण्यात पडलास तर चालेल, मोबाईल पडता कामा नये". सतीश कामेरकरने तलावात उडी मारली आणि पाण्यातच एका पायावर डान्स करू लागला.  आमचाच गृप असल्यामुळे तलावाच्या काठावर सुद्धा मदिरा आणि चकण्या आस्वाद माझे सवंगडी घेत होते. 

 शरद पाण्याच्या घसरगुंडीवर चढून फोटोग्राफी करत होता. प्रमोद, रामकृष्ण आणि निशिकांत खुर्च्यात बसून संपूर्ण वातावरणाचा तसेच बालपणात गेलेल्या  मित्रांच्या अवखळपणाचा आनंद लुटत होते. 

शब्दांच्या पलीकडलं,  नातं असं मैत्रीचं

जरी नसे रक्ताचं,  आहे मात्र खात्रीचं

शब्दांतही बांधता न येणारं, फुलांसारख दरवळणारं

एकमेकांना समजणारं, नातं असं मैत्रीचं...

मैत्रीचं नातं हे इतर नात्यांपेक्षा खरोखर वेगळ असतं. आम्ही सर्व शाळकरी मित्र १९७४ नंतर नव्यानं  एकमेकांच्या जवळ आलो होतो. म्हणूनच मधल्या काळातील प्रत्येकाच्या जीवनात झालेल्या घडामोडींचे कथन आम्ही ऐकणार होतो सांगणार होतो. या शाळकरी मैत्रीचा योग जुळून आला तो शरद पाटीलच्या अथक प्रयत्नामुळे... आणि म्हणूनच दिनेश सतत म्हणत होता... *शरद शतशः प्रणाम*  तर अशोकने ऑडिशन दिली, "दोन सतीश, शरद शतशः प्रणाम" 

या कार्यक्रमाच्या औचित्याने अशोक वारीकने मदीरेचा प्रश्न सोडवला होता, तर चकणा आणि पाणी याची जबाबदारी कुणालने ठाकुरने स्वीकारली होती.  बीअर अजित तोडणकरने स्पॉन्सर केली होती... माधव केळकर स्वतःचा ब्रँड ओल्ड मंक रम घेऊन आला होता. फक्त सतीश कामेरकरसाठी काजू मात्र आणता आले नाहीत... परंतु शेंगदाण्याने त्याचा प्रश्न सोडवला होता.
SSC ला शाळेत पहिला आलेला नागेश आणि
आता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला आणि रोटरी क्लबचा अध्यक्ष असलेला नागेश सोपारकर, हा जीवनप्रवास नागेशने खुमासदार पद्धतीने सांगितला... सेक्स बद्दल त्याची परखड मते एकदम भावली... त्याचा एकच मतितार्थ होता...तारुण्य मनात असत, मग ते शरीरात पसरत.... उगाच नाही म्हणत... पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...

मितभाषी रामकृष्ण मुतालिक जीवनप्रवासात खुपच सकारात्मक भासला... त्याच्या मंद स्मितामध्ये आपुलकीचा भाव जाणवला... 

जीवन गौडच्या पोलिसी जीवनातील एक गोष्ट जाणवली तो म्हणजे पोलिसीखाक्या त्याच्याकडे अजिबात नाही. पोलीसा मधील माणुसकी असलेला माणूस आमचा मित्र आहे याचा खूप आनंद झाला. 
स्विमिंग पुलावर कुणालचे किस्से पुन्हा चालू झाले. कुणालच्या अनुभवाच्या बोलण्यातील तडफ आणि  सच्चेपणा पटकन जाणवतो. बोटीवरील खडतर जीवनाची खूप जवळून ओळख झाली...

कैलास गौडच्या खोड्या काढणे चालूच होते... शाळेत असताना पट्टीचा पोहणारा कैलास... सांसारिक भवसागर सुद्धा सहज पार करून गेला आहे... मधल्या काळात मरणाच्या दारातून परत आलेल्या कैलासने आता स्वतःच्या तब्बेतीची काळजी करणे आवश्यक आहे.  कैलास... तुझासारखी माणसे मित्रपरिवारासोबत समाजाचे सुद्धा भूषण असतात... त्यामुळे तुझे दीर्घायुष्य सर्वांच्या भल्यासाठी आहे... पण तू दीर्घायुषी होणे, हे निव्वळ आणि निव्वळ तुझाच हातात आहे... तू डॉक्टर आहेस... त्यामुळे तुला सर्व कळते...
दुपारी सामिष जेवण झाले... सर्वजण रूमवर आले.  अशोक, शरद, कुणाल, विकास, प्रमोद यांनी झोपाळ्यावर बसून गप्पांची मैफिल सुरू केली... त्यात नंतर दिनेश, कैलास, दिलीप झाले. 

सहा वाजता शरदची वर्दी आली आता पळसदरीच्या बॅक वॉटर ओढ्याकडे जायचे आहे. या नाल्यात एक जर्मन शेफर्ड मस्त डुंबत होता... सर्वांना एकत्र आणून येथे सुद्धा फोटो सेशन झाले. पाऊस सुरू झाला आणि या नितांत सुंदर वातावरणात गाण्यांची मैफिल सुरू झाली. दिनेश, संजय आणि सतीश यांनी बहारदार गाणी सादर केली. खरच... निसर्ग रम्य वातावरणात दोस्तांची साथ जेव्हा असते... तेव्हाच  सुखाची परिभाषा कळते... तेथील कठड्यावर बसून चुटकुले, गप्पा आणि गाणी या मध्ये तासाभराचा वेळ कसा गेला कळलेच नाही.
संजयचे, " बेचैन करुनी अशी जाऊ नको" हे गाणे भाव खाऊन गेले.
आता संध्याकाळचे सेशन रेस्टॉरंट मध्ये सुरू झाले. येथेसुद्धा दिनेश नाडकर्णी फुल फॉर्म मध्ये होता... कुणाल बोलत असताना, दिनेश त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत होता... ज्याला जे हवे ते पेय येथे उपलब्ध होते..  नागेश ग्रीन सलाड चा भोक्ता होता. जीवनने पेरू आणि आंबा ज्यूस आणले होते, मदिरा प्राशन न करणाऱ्यांसाठी...   कुणालने आणलेले वेफर्स चणा डाळ मूग डाळ सर्वांना सर्व केली. आता हिरीरीने प्रत्येक जण गप्पात सामील होत होता.  कुणालाच्या बोटीवरील गोष्टी ऐकून दिनेश चेकाळला होता. सहा महिने घरदारापासून लांब बोटीवर राहणे किती खडतर असते हे समजले. गप्पांच्या ओघात संजयच्या कवितांचा कार्यक्रम राहूनच गेला. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच रेस्टॉरंट किचन मध्ये जाऊन कडक चहा बनविला. मित्रांसाठी काय पण... त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्या साठी ऊर्जा होती.

नाश्त्याला मिसळ आणि भुर्जी पावचा बेत होता... निवांत नास्ता झाल्यावर पुन्हा पोहोण्याच्या तलावावर सर्वांचे आगमन झाले. आजचा दिवस संजय कोळवनकरचा होता... त्याची संघर्षमय जिवनगाथा ऐकताना मनोमन त्याच्या कर्तृत्वाला साष्टांग दंडवत घातला... संजयची गाथा ऐकून कैलास सुद्धा खूपच प्रभावित झाला होता. कामगारांच्या उन्नतीसाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित असलेले संजयचे व्यक्तिमत्व, तसेच त्याची झालेली जडणघडण सर्वांना अवगत होण्यासाठी त्याची बायोपिक बनविण्याचे कैलासने ठरविले आहे. एकसे बढकर एक अशी व्यक्तिमत्वे मित्रांच्या रूपाने माझ्या जीवनात आहेत याचा मला खूप अभिमान आहे.
दुपारी सामिष जेवण होते. संजय, विकास यांना लवकर जाण्याची घाई होती. त्यामुळे दोन गाड्या पुढे निघाल्या... माधव  नवीन गाडी घेणार होता म्हणून तो सुद्धा लवकर निघाला. बाकी आम्ही निवांत होतो. हॉटेल मालक प्रविणने उरलेल्या सर्वांना कॉफी पाजली. 

या मित्रभेट कार्यक्रमाला न आलेले माझे सवंगडी प्रकाश परांजपे, अशोक परब, सतीश जोशी, अजय हर्डीकर, केशव रेडकर, मकरंद चव्हाण, रवींद्र चुरी, संजीव पणशीकर, शरद शिंदे, शिरीष देसाई,सुहास राऊत, विजय गवाणकर, अरुण देसाई, शरद राणे, उमेश नाडकर्णी या सर्व मित्रांना खूप मिस केले होते. 

सर्वांच्या भेटी झाल्यामुळे आनंदाला पारावार राहिला नव्हता. 

आज माझी गत, " अजी सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा धनु " अशी झाली होती. 
सर्व मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि  सकारात्मक ऊर्जा घेऊन घरी परतलो. ही ऊर्जा मला लेह सायकलिंग साठी कामाला येणार आहे...

सतीश जाधव
मुक्त पाखरे.....

21 comments:

  1. संपूर्ण मजेची व आठवणीत राहणारी सहल, मित्रा धन्यवाद. सगळ्यांचा उल्लेख केला.

    ReplyDelete
  2. सतीश, हे वाचताना अनुभवलेले क्षण जसेच्या तसे चित्रपटासारखे डोळ्यासमोर येत होते. तुझ्या विचारांना व लेखनाला शतशः प्रणाम. तुझ्या लेह अभियानाला कोटी कोटी शुभेच्छा... कुणाल

    ReplyDelete
  3. पुन्हा कुणालचे अभिप्राय

    खरंच सुंदर, एक शरद व दोन सतीश शतशः प्रणाम!
    आभारी आहे.

    ReplyDelete
  4. जीवनचे अभिप्राय

    सतिष जी खरोखर सोनिया चा क्षण

    ReplyDelete
  5. पुन्हा कैलासचे अभिप्राय

    ब्लॉग वाचला अतिसुंदर
    कुठेही अतिशयोक्ती नाही तूझ्या स्वभावाप्रमाणे हसत खेळत सर्वाना बरोबर घेऊन वर्णन केलंय..
    तुझे ब्लॉग वाचणे म्हणजे एक पकवान्न असतं.
    मित्रा आभारी आहे व तुझे अभिनंदन 🌹🌹🌹🙏🙏

    ReplyDelete
  6. विकासचे अबीप्रय

    सतिश छान सचित्र परिक्षण लिहील आहेस 👍💐👏👏👏👏

    ReplyDelete
  7. अप्रतिम लिखाण समुद्रा.....

    ReplyDelete
  8. सतीश खुप सुंदर वर्णन

    ReplyDelete
  9. प्रकाश परांजपे चे अभिप्राय

    सतीश, खूप छान लिहिलं आहेस… सोबतचे फोटो सुद्धा छान… सगळं वाचून आणि तू आणि बाकी सगळ्यांनीच शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओज् बघून आपण कशाकशाला हुकलो हे जास्तच जाणवलं आणि चुटपुट लागली…. असो…

    ReplyDelete
  10. अशोक वारीकचे अभिप्राय

    Perfect Picnic Summary written by Satish with Coverage of Natural Beautiful Place and Enjoyable Moments with all School Friends of Shardashram in 1974.Hats up to Satish for your Superb Writing experience of Picnic like a Professional Writer. Stay Blessed Always.👌👍

    ReplyDelete
  11. खूप मस्त सर तुमचे ब्लॉग मी न चुकता आवर्जून वाचतो

    ReplyDelete
  12. मी फार सुंदर लेखा बाबतीत मी माहिती लिहिली परंतु डिलीट झाली सविस्तर पिकनिक ची माहिती सतिष ने लिहिली आहे,सार्वाना शुभेच्छा परत लवकरच भेटू, शरद, सतिष.

    ReplyDelete
  13. सुहास राऊत चे अभिप्राय

    Very Nice of you Satish, keep it up your skills of effective narration.

    ReplyDelete
  14. केशव रेडकर चे अभिप्राय

    Picnichi sammary farch chan👍👍👍👍

    ReplyDelete
  15. Great work Satish !! U've described everything so beautifully!!
    Thank you for this blog it will always help us to remember the trip as it is !!

    ReplyDelete
  16. नरेंद्र मोहितेचे अभिप्राय

    खरच मित्रा असच लिहित जा,
    तुझे लिखाण खूप भावत ,सगळे कसे चित्र डोळ्यासमोर उभे रहात आणि त्यात मग्न होऊन जातो

    ReplyDelete
  17. खूपच सुंदर वर्णन केले काका

    ReplyDelete
  18. नमस्कार,
    येती सारे मित्र रीसाॅर्ट द्वारा,
    नाही आनंदाला पारावार,
    येती आठवणी उचंबळून सर्वां
    नि काय वर्णाव्या त्या कथण-परा.

    छान, पुन्हा पुन्हा आनंद घेत रहा !!!!

    ReplyDelete