Friday, July 16, 2021

१०६ वे रक्तदान सायकल राइड

१०६ वे रक्तदान सायकल राइड*

*१६ जुलै २०२१*

मागील रक्तदान करून चार महिने झाले होते. त्यामुळे काल के ई एम च्या रक्तदान सामाजिक अधिकारी श्रीमती ससाणे मॅडमना फोन केला. त्यांनी आज दुपारी एक पूर्वी रक्तपेढीवर यायला सांगितले होते. 

आज सकाळी साडेसात वाजता लेह सायकलिस्टची मिटिंग समर्पयामि उपवन शॉपिवर होती. त्यामुळे सकाळी सहा वाजता पेडलिंग सुरू केले...ते रिपरिप पडणाऱ्या पावसातच...
कपडे भिजू नये म्हणून पॉंचू घातला होता... प्रभादेवी स्टेशन ओलांडले... आणि पावसाचा जोर वाढला... रस्त्यावर पाणी तुंबू लागले होते... किंग्ज सर्कल जवळ तुडुंब पाणी तुंबले होते... पाण्यात सायकल घातली... बाजूने एक बस गेली आणि त्याच्या लाटांनी सायकल डोलू लागली... पॉंचूच्या आता पाणी शिरून नखशिखांत ओलाचिंब झालो... 

तुंबलेल्या पाण्यामुळे आणि वरून पडणाऱ्या पावसामुळे सायकलचा वेग एकदम कमी झाला होता... पाऊण तासात अमर महल येथे पोहोचलो... इतर वेळी हे अंतर अर्ध्या तासात पार होते... अभिजित येथेच भेटणार होता... त्याला फोन लावला, तर अभिजित म्हणाला, " मी येत नाही... पाऊस खुप जोरात आहे..." 

 पावसात सायकलिंग करण्याची गम्मत काही औरच असते... याचा अनुभव त्याने मुंबई कन्याकुमारी सायकल राईड मध्ये घेतला होता... एका धम्माल पावसाळी राईडला अभिजित मुकला होता.

आता पावसाबरोबर वारे सुद्धा वाहू लागले... त्यामुळे लो गियर वर  पेडलिंग करावे लागत होते. मुलुंड चेक नाक्यावर पोहोचायला साडेसात वाजले... चेक नाक्यापासून पुढे ट्राफिक एकदम जाम होते.. एव्हढ्या सकाळी नाकाबंदी लागली असावी असे वाटले... मास्क तोंडावर व्यवस्थित लावून फुटपाथ वरून ढकलत सायकल पुढे दामटली... आता सायकल  बस, ट्रक आणि कंटेनरच्या गराड्यात सापडली होती... मागची लाल लाईट व्यवस्थित चालू आहे काय हे तपासले... 

पुढे-पुढे पेडल मारत गेल्यावर ... अचानक मुलुंड ठाणे पुलावर  लाल-लाल सडा रस्त्यावर पसरला होता.... पोलीस सायकल अतिशय हळू चालावा असा इशारा करत होते... आणखी पुढे गेल्यावर प्रचंड हसायला आले...  एक टोम्याटो चा ट्रक उलटा झाला होता... आणि टोम्याटो चा लाल लाल सडा संपूर्ण रस्त्यावर पसरला होता.. स्पेन मधील टोमाटीना फेस्टिवल आठवला.... वरून धुवाधार पाऊस सुरूच होता म्हणून मोबाईल बाहेर काढायचे धाडस झाले नाही... असे हे दुर्मिळ क्षण डोळ्याच्या कॅमेऱ्यातून मनाच्या मेमरीत साठवून ठेवले.

त्याच उन्मादात उपवनच्या समर्पयामि शॉपिवर पोहोचलो... मयुरेश आणि हिरेन यांनी स्वागत केले... एक नंबर... मयुरेश खूपच बारीक झाला आहे. लेहच्या तयारी साठी सायकलचा डॉक्टर हिरेन कडे सायकल सोपवली... 

इतक्यात डॉ राजेश आणि लक्ष्मण भाऊ शॉपिवर आले... मागोमाग संजय सुद्धा आला...... आज नॉनस्टॉप उपवनला आलो होतो... त्यामुळे जोरदार भूक लागली होती... मयुरेशने बाजूच्या दुकानातून पुणेरी बाकर वडी आणून सोबत मसाला चहा पाजला...

  लेह सायकल सफारीचे सवंगडी राजेश, संजय लक्ष्मण यांची माझ्यासह मयुरेश बरोबर मिटिंग सुरू झाली. सोबत घ्यायच्या वस्तूंची उजळणी झाली... मयुरेशने काही महत्वाच्या टिप्स दिल्या... 
यशवंत जाधव आणि शरद भुवड यांची भेट झाली... दोघांनी लेह लडाख सायकलिंग साठी शुभेच्छा दिल्या... डॉ सौदामिनी यांची सुद्धा भेट झाली.  विशेष म्हणजे सायकलसाठी आवश्यक असलेले बारीक-सारीक पार्ट मयुरेशने हिरेनला आम्हाला द्यायला सांगितले. खरंच एव्हढं प्रेम, मित्रत्वाची आणि समर्पणाची भावना निसर्गावर प्रेम करणाऱ्या सच्च्या मित्रांकडूनच मिळू शकते... राजेशला काही काम असल्यामुळे तो लवकर निघाला होता. 

सकाळच्या पावसात किलोमीटर्स अँप लावता आले नव्हते, ते आता परतीच्या प्रवासात लावले... शॉपीवरून निघता निघता लक्ष्मणने मस्त मनुके खायला घातले.. येथून रक्तपेढीत जायचे असल्यामुळे वाटेत दोन दोन केळी खाल्ली... लक्ष्मणने सुद्धा मला लांब जायचे म्हणून एक  केळे दिले. त्याच्या प्रेमाखातर अर्धे-अर्धे केळे खाल्ले... 

ढगाळ वातावरणात सुरू झाली परतीची राईड.. लक्ष्मणला कॅडबरी जंक्शन कडे टाटा करून संजय सह पूर्व द्रुतगती महामार्गाकडे वळलो.... संजय विक्रोळीवरून पवई कडे वळला... 

आता सुरू झाली सोलो राईड... पुन्हा पावसाने लपंडाव सुरू केला... आज भिजण्याला सुमार नव्हता... पावसामुळे हायवेला गाड्या हळूहळू मार्गक्रमण करीत होत्या... त्यामुळे ट्राफिक वाढली होती. सायकलचा वेग सुद्धा कमी झाला होता... घाटकोपरच्या पुढे अमर महल कडून बिकेसी ला जाणार फ्लाय ओव्हर बंद होता. तेथे  बराच वेळ थांबावे लागले... 

पावसाच्या सरी बरोबर घामाच्या धारा सुद्धा अंग अंग भिजवत होत्या...  वाटेत खालसा कॉलेज जवळील बस स्टॉपवर सॅक मधील सुके कपडे अंगावर चढवले... 

 आज माझी परीक्षा होती.. सायकलिंग केल्यावर किती वेळात रक्तदाब नॉर्मल होतो हे पाहण्याची... बरोबर एक वाजता के ई एम रक्त पेढीत पोहोचलो... ससाणे मॅडम यांनी आज सुट्टी घेतली होती... डॉ प्रफुल्ल यांनी रक्तदान फॉर्म भरायला सांगितला...
 
 फॉर्म भरून डॉक्टर प्रफुल्ल यांच्याकडे गेल्यावर, "सर तुमची साठी ओलांडली आहे त्यामुळे आता रक्तदान करू नका". आश्चर्यचकित होऊन मी विचारले, "डॉक्टर, वयाच्या पासष्टी पर्यंत रक्तदान करू शकतो ना..., मग तुम्हाला काय हरकत आहे"  "माझे होमोग्लोबिन, BP चेक करा, त्यात काही कमतरता असेल तर सांगा" 
 
आतापर्यंत एकशे पाच वेळा रक्तदान केले आहे हे ऐकल्यावर, आता डॉक्टर आश्चर्यचकित झाले होते" वयाच्या पासष्टी पर्यंत एकशे दहा वेळा रक्तदान करायचा माझा संकल्प आहे,  हे त्यांना सांगितल्यावर,   रक्तपेढी सिस्टर असावरी मॅडम पुढे आल्या, त्यांनी सुद्धा मला ओळखले. डॉक्टरांना सांगितले वयाचे आकडे हे फक्त नंबर असतात... 

सर्व तपासण्या झाल्यावर, आसावरी मॅडम यांनी रक्तदान खुर्चीत बसायला सांगितले. रक्तदान सुरू झाल्यावर डॉक्टर प्रफुल्ल यांनी फोटो काढले... तसेच अतिशय प्रेमाने प्रमाणपत्र सुद्धा दिले... तेथील सहाय्यक शंकर याने दोन कॉफी आणि सोबत बिस्किटे दिली...

प्रयत्न हाच आहे...  वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी जर रक्तदान करु शकतो, तर तुम्ही सर्व का नाही?  हाच संदेश माझ्या मित्रपरिवारांना द्यायचा आहे...

माझ्या आप्तस्वकीयांनी मित्रपरिवारांनी नियमित केलेले रक्तदान माझ्यासाठी आणि लेह सायकलिंग साठी प्रचंड मोठा ऊर्जा स्रोत असणार आहे...

आज धुवाधार पावसाळी ६० किमी सायकलिंग सह रक्तदानाची १०६ वि वेळ सहज साध्य झाली होती...

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

11 comments:

  1. नमस्कार सर.
    तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन.
    देवाचे तुम्हास भरपूर आशीर्वाद असोत हीच प्रार्थना.
    आणि रक्तदानाच्या पुढील खेपेसाठी मन:पूर्वक अनंत शुभेच्छा.
    लिखाणाच्या संदर्भात काय लिहिणार?
    ते नेहमीप्रमाणेच तरल, प्रवाही, आणि एकूण एक मुद्दा न विसरता नमूद केलेला आहेच.
    पुनश्च त्रीवार अभिनंदन !!!!!
    ..... लक्ष्मण.

    ReplyDelete
  2. सर तुम्ही ग्रेट आहात, अभिनंदन

    ReplyDelete
  3. परांजपे सरांचे अभिप्राय

    सतिश शाबासकी तुला,पुढच्या रक्तदानासाठी आमच्या दोघांकडून अनेक शुभेच्छा.🍫🍫

    ReplyDelete
  4. परम मित्र अनंत ढवळे यांचे अभिप्राय

    सर अभिनंदन, माझ्या भावना आपल्या सारख्या शब्दात व्यक्त करु शकत नाही.आपला रक्तदाना नंतरचा षटकार आमच्या करिता प्रेरणा देणारा आहे.यासाठी पुनश्च नमस्कार शुभ रात्री

    ReplyDelete
  5. Very impressive and motivational incident
    Hatts off Satish Sir....

    ReplyDelete
  6. परम मित्र रवीचे अभिप्राय

    खूप छान. मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो.🙏💐🙏

    ReplyDelete
  7. मित्र डॉ रामेश्वरचे अभिप्राय

    Sir, you are really Great!.


    ReplyDelete
  8. मित्र राजेंद्रचे अभिप्राय

    आदर्शवत आणि अनुकरणीय असे आपले कार्य आहे.सलाम आपल्या कार्यास !..🙏🙏🙏💐💐💐💐💐🍫

    ReplyDelete
  9. नमस्कार आपले रक्तदानाबद्दल चे कर्तव्य स्तुत्य आहे. आपल्या बरोबर मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचा मला खूप अभिमान वाटतो . आपल्या ह्या कार्यास माझे मनःपूर्वक आशिर्वाद .

    ReplyDelete
  10. तुम्ही असामान्य आहात 🌹🙏

    ReplyDelete