Wednesday, September 8, 2021

लडाख सायकलिंग भाग ०१ दि. २४ जुलै ते २७ जुलै २०२१

लडाख सायकलिंग भाग ०१

दि. २४ जुलै  ते २७ जुलै २०२१

 लडाख परिसर सायकलिंग मार्गे पादाक्रांत करावा ही इच्छा २०१९ साली जेव्हा मनाली ते लेह सायकलिंग पूर्ण केले तेव्हाच मनात पक्की झाली होती. गेल्या जानेवारीत नर्मदा परिक्रमा सायकलने पूर्ण केली आणि जुलै-ऑगस्ट मध्ये लडाख सायकलिंग करण्याची योजना तयार होऊ लागली. 
 
 लडाख सर्किटसाठी मित्र संजय सावंत तयार होता. डॉ. राजेश कांबळे आणि लक्ष्मण नवले सुद्धा तयारीला लागले. सर्व योजना तयार झाली. सायकलिस्त मित्र आदित्य दास लडाखचा अत्यंत माहितगार... त्याच्याकडून महत्वाच्या टिप्स मिळाल्या. 

२४ जुलैला सायकल सह विमानाने लेह गाठायचे नक्की झाले. चौघांच्या विमानाच्या तिकीट काढल्या.    निघण्याच्या चार दिवस अगोदर राजेशच्या सायकलला अपघात झाला आणि त्याला लडाख वारी रद्द करावी लागली. लक्ष्मणला सुद्धा तब्बेतीच्या कारणामुळे लडाखला येता आले नाही. आता संजय आणि मी... आम्ही दोघेजणच राहिलो... सर्वांच्या शुभेच्छा घेऊन २४ जुलै रोजी  लेहला प्रस्थान केले. विमान प्रवासात आमच्या तिकीट भाड्यापेक्षा सायकलचे भाडे जास्त झाले. 

मुंबई वरून अडीच तासात लेहला पोहोचलो. सिक्युरिटीने RTPCR चेक केले.  शैलेशच्या हॉटेल खारडुंग मध्ये आधीच बुकिंग केले होते. मुंबई वरून तडक लेहला पोहोचल्यामुळे वातावरणाशी एकरूप होण्यासाठी विश्रांती घेणे आवश्यक होते. परंतु आम्ही दोघेही काही तासातच लेहमध्ये अनुकूलीत (acclimatize) झालो होतो. त्यामुळे दुपारीच लेहच्या  मुख्य बाजारात गेलो. नाक्यावरील एका हॉटेल मध्ये लेमन चहा पिता पिता मालकिणीशी गप्पा मारताना समजले... तिचा मुलगा पुण्याला उच्च शिक्षण घेतोय. एव्हढ्या लांब पर्यंत ही मंडळी आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात याच खरंच अप्रुप वाटलं. 

त्यानंतर संजयच्या मित्र, उल्हास वैद्य आम्हाला भेटायला हॉटेलवर आला होता. उल्हासने मनाली लेह सायकलिंग पूर्ण करून, काल त्याने लेह वरून खारडुंगला पास पादाक्रांत केला होता... तो ही विक्रमी वेळात...  सकाळी साडेदहा वाजताच खारडुंगला टॉपला पोहोचला होता उल्हास...  प्रचंड स्टॅमिना होता त्याच्याकडे... मानलं त्याला...
हॉटेलवर सायंकाळी डॉ. शंकर यांची भेट झाली. मुंबईच्या MGM हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेले डॉ. शंकर YHAI चे फिल्ड डायरेक्टर आहेत आणि यावेळी मनाली ते लेह सायकलिंगचे दोन गृप घेऊन ते आले होते. दोन्ही ग्रुपचे सायकलिंग यशस्वीरित्या पूर्ण करून आज शैलेशला भेटायला हॉटेलमध्ये  आले होते. आमच्या लडाख सफरीसाठी त्यांनी बऱ्याच टिप्स दिल्या. 
आमचा लडाख सर्किटचा प्रवास खूप मोठा आणि खडतर होता.  लडाखच्या सर्व परिसरात प्राणवायूची कमतरता असते, त्यामुळे भारताच्या इतर भागातील सायकलिंग पेक्षा येथे सायकलिंग करणे अवघड असते. याची तयारी म्हणून प्राणायाम आणि ध्यानधारणा याची जोड दिनचर्येत दिली होती. यामुळेच एका दिवसाच्या आताच येथील वातावरणाशी एकरुप झालो होतो. 

सायंकाळी सायकल असेंबल करून तिला तेलपाणी लावून तयार केले.... उद्याच्या फन राईडसाठी... त्यामुळे वातावरणाशी आणखी एकरूप व्हायला सुद्धा मदत मिळणार होती.

सकाळी नास्ता करून "लडाख शांती स्तूप" कडे राईड सुरू झाली. तीन किमीची खडी चढाई होती... वाटेत "बुद्ध प्रेयर व्हील" लागले. बुद्धाची अमृतवाणी यावर लिहिलेली होती. हे चक्र फिरविणे पवित्र मानले जाते. चक्र परिक्रमा करून शांती स्तूपकडे निघालो. वळणावळणाचा चढाचा रस्ता पार करून शांतिस्तुपाच्या पायथ्याला पोहोचलो. 

शांतिस्तुपाच्या सुवर्ण बुध्दाला नमन करून तेथून हिमालयाच्या पर्वत रांगा आणि स्टोक कांगरी परिसर पहिला... शिखरांवर दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बर्फाशी गोरेगोमटे ढग लपंडाव खेळत होते... तर लडाख मधील इमारती खेळण्यातील घरांसारख्या भासत होत्या... उन्हाचा कडाका आणि थंड वारे याचे अजब मिश्रण येथे जाणवत होते. ११८४१ फुटावर असलेला सर्वात उंच असा हा शांतिस्तुप आहे. जागतिक शांतीचे हे प्रतीक आहे. 

सायंकाळी अलीभाईच्या छोट्याश्या टपरी मध्ये फक्कड कडक चहा मिळाला.  लेहच्या मुख्य बाजारपेठेत फेरफटका मारला. तेथे असलेल्या बुद्ध मंदिराला भेट दिली. सुर्यनारायणाच्या सोनेरी प्रकाशाने या मंदिराच्या आसमंतात सुवर्णमय मेघ अवतरले होते.  सूर्यास्ताचा लपंडाव पाहत खूप वेळ या प्रांगणात बसून होतो. 
आज सकाळीच  खारडुंगला पासच्या रस्त्यावरून सायकलवर  समान लादून मार्गक्रमण सुरू केले. सेल्फ सपोर्ट सायकलिंग म्हणजेच सर्व सामान सायकलवर लावून हिमालयात अपहील पेडलिंग करणे होय...दमछाक नियमित ठेऊन सायकलिंग करणे हे एक चॅलेंज होते... बुद्ध प्रेयर व्हील पार करून खारडुंनगलाच्या मुख्य रस्त्यावर आलो आणि थोड्याच वेळात पहिले चेकपोस्ट सर केले. आमचे इनर लाईन परमिट उद्यापासून सुरू होणार असल्यामुळे मागे फिरणे क्रमप्राप्त होते. संपूर्ण लडाखचे ऑनलाईन इनर परमिट काढण्यासाठी शैलेशने मदत केली होती. २७ जुलै ते १४ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण लडाख परमिटसाठी प्रत्येकी ८२५ रुपये भरावे लागले होते. तेथे आलेल्या मोटरसायकलिस्ट ना चिअर अप करण्यासाठी गणपती बाप्पाचा जयघोष केला. 
हॉटेल खारडूंग पासून साऊथ पोलू २५ किमी आणि तेथून खारडूंगला पास १५ किमी होता. आमच्या लेह सायकलिंगची सुरुवात प्रथम खरडूंगला पासने होणार होती. त्यामुळे या प्रथम चढाई साठी सपोर्ट गाडी करायचे नक्की केले. गाडीवाला खारडूंगला पास नंतर येणाऱ्या खारडूंग गावापर्यंत आम्हाला बँक अप देणार होता.
दुपारी लेह मधील अप्पर चांगस्पा भागातील  ओझेरच्या सायकल शॉपीला भेट दिली. ओझेरने दोन्ही सायकल ओके आहेत याची पावती दिली. लेहच्या मेन बाजारात एप्रिकोट आजी भेटली.
तीची केशभूषा पाहण्यासारखी होती. बाजारातील विजेच्या पोल जवळ निवांत गप्पा मारत बसल्या होत्या दोन्ही सायकल...

२७ जुलैला पहाटे तीन वाजता उठून प्राणायाम आणि ध्यानधारणा करून ओंकाराचा गजर केला. सायकलला लाईट लावून सुरू झाली खारडूंगला चढाई पहाटे सव्वा चार वाजता... सलग दोन दिवस त्या परिसरात सायकलिंग केल्यामुळे सकाळी कुत्रे भुंकत नव्हते. आज चार किमी वरील पहिल्या चेक  पोस्टवर कोणीही नव्हते... थोडावेळ ब्रेक घेऊन पुढे पेडलिंग सुरू केले. 
पहिला टप्प्या पंचवीस किमीचा... साऊथ पोलू... वाटेत कुठेही साधी चहा टपरी सुद्धा नाही... वातावरण थंड... परंतु पेडलिंगमुळे शरीरात बऱ्यापैकी उष्णता होती. सकाळीच गाड्या आणि मोटरसायकलची वर्दळ सुरू झाली होती... पाचच्या दरम्यान छान पैकी उजाडलं होतं... विशेष म्हणजे मागून पुढे जाणारे मोटरसायकलिस्ट चिअर अप हात दाखवून जात होते... 

बॅकअप गाडीचा ड्रायव्हर अली आम्हाला सतत चिअर अप करत होता. पाणी किंवा आणखी काही खायला हवं काय याची पण चौकशी करत होता. अतिशय सावकाश परंतु निश्चित ध्येय्याने मार्गक्रमण सुरू होते. हा रस्ता सतत चढत जाणारा असल्यामुळे पेडलिंग करण्याशिवाय पर्याय नव्हता. सोबत असलेले खजूर, बदाम, घरचे तहान लाडू भूक लाडू या खुरकावर एक एक पेडल मारणे सुरू होते. वाटेत सायकलची विश्रांती सुरू असताना सोनेरी सूर्याचा उदय होत होता.

इतक्यात दोन तरुण सायकलिस्ट जोरजोरात पेडलिंग करत भरकन पुढे निघून गेले. त्यांना खारडूंगला टॉप लवकर गाठायचा असावा... पुढच्या वळणावर त्यातील एकाची सायकल पंचर झाली होती. पंचर काढले, पण त्यांचा पंप काम करीत नव्हता. संजयने ताबडतोब पंप काढून दिला. चाकात हवा भरून त्यांचे मार्गक्रमण सुरू झाले. ते तिघेजण होते... एक मागून येत होता. 
संजय अपहिल मास्टर आहे. तसेच मागचा अनुभव त्याच्या गाठीला होता. त्यामुळे पुढे राहून मोठे वळण आले की थांबून मला बुस्टिंग करत होता. दिवस उजाडला तरी थंड वारे वाहत होते... मध्येच अंगावर येणारे वाऱ्याचे झोत सायकलचा वेग कमी करत होते. दहा बारा पेडल मारले की हायड्रेशन बॅग मधून पाण्याचे एक दोन घोट पीत होतो.  अशा थंड वातावरणात शरीरातील कमी झालेले पाणी समजत नाही. त्यामुळे क्रॅम्प येऊ शकतात. 

वेडीवाकडी वळणे, चढाचा रस्ता, त्यात लेह वरून पहिल्याच प्रयत्नात खारडूंगला टॉप चढणे... हे एक चॅलेंज होते माझ्यासाठी... आणि ते पूर्ण करणे हा ध्यास होता... न संपणारी वळणे मानसिक ताण वाढवत होती... परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती, ध्येयपुर्तीच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचे बळ देत होती... वाटेत साऊथपोलुचे कमी होत जाणारे माईल्स स्टोन लागत होते... त्यामुळे पेडलिंग करण्याचे सामर्थ्य वाढत होते... 

पहिला २५ किमीचा पडाव... साऊथपोलू पादाक्रांत केला... बरोबर सकाळी साडेदहा वाजता साऊथपोलूला पोहोचलो होतो.
संजय तर साडेनऊलाच येथे आला होता... दोघांनी आनंदाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या... ड्रायव्हर अली सुद्धा खूप खुश झाला होता. विशेष म्हणजे येथे मोबाईल रेंज चांगली होती... सर्वांना फोन लावले... आनंदाची बातमी शेअर केली... आता खूप रिलॅक्स वाटत होते. 

लेहच्या ११००० फुटावरून साऊथपोलुच्या १५३०० फुटावर चढाई केली होती. एक मोठा टप्पा पार केला होता. सोबत असलेल्या तहान लाडूवर ताव मारला. साऊथपोलुच्या खारडूंगला हॉटेल मध्ये फक्कड कॉफी प्यायलो. साऊथपोलू माईल्स स्टोन जवळ फोटो काढले... मिलिटरी चेक पोष्टला परमिट दाखविले आणि पुढची खडतर सफर सुरू केली...

आता १५ किमी अंतर पार करायचे होते आणि १८००० फुटाचा टप्पा गाठायचा होता. चढासकट वेडीवाकडी वळणे सुरू झाली...  हेड विंड सुद्धा सुरू झाले होते... संजय विशिष्ट वेगाने पुढे निघाला होता.. सहा किमी चढ चढलो होतो. दोन मोठी चढाची वळणे घेतली... पाय लटपटू लागले... डोक्यामधली किणकिण वाढू लागली... सायकल वेडीवाकडी होऊ लागली... इतक्यात अली ड्रायव्हर जवळ आला... सायकल पकडली... म्हणाला, "सर आप थोडा आराम करो" दहा मिनिटे रस्त्याच्या किनारी आडवा झालो... दीर्घ श्वास घेणे चालू होते... खजूर खाल्ले... भरपूर पाणी प्यालो... 

आता नव्या जोमाने पुन्हा पेडलिंग सुरू केले. अतिशय संथ गतीने सायकलिंग सुरू होते. आता फक्त पुढच्या चाकाकडे लक्ष केंद्रित करून... तसेच हँडलची कमीत कमी हालचाल करीत मार्गक्रमण करीत होतो.  मागे असलेल्या कार मधून अली ड्रायव्हर मला चिअर अप करत होता... प्रचंड दमछाक होत होती... दरम्यान दोन वेळा हायड्रेशन ब्रेक घेतले... संजयला खजूर, पाणी याचा बँक अप देण्यासाठी अलीला पुढे पाठवित होतो... 

आता शेवटचे चार किमी अंतर राहिले होते... खारडूंगला टॉपला पोहोचायला... दहा मिनिटे विश्रांती घेतली... वाऱ्यामुळे थंडी वाढू लागली... अंगात जाकीट चढवून पेडलिंग सुरू केले ... थोड्याच वेळात घामाच्या धारा वाहू लागल्या... आता बऱ्याच ठिकाणी वळणावर ऑफ रोडिंग रस्ता लागत होता... तेव्हा जास्त जोरात सायकलला पेडलिंग करावे लागत होते... रस्त्यावरील रहदारी वाढल्यामुळे जाकीट अली कडे देऊन हिरवे विंडचिटर घातले... पेडलिंग सुरूच होते... अली म्हणाला , "सर, अभी सर्फ आधा किमी बाकी है"... "मनात, हर हर महादेव चा जयघोष केला.. आणि अंतिम चढाई सुरू झाली...  तो शेवटचा अर्धा किमी चढायला पंधरा मिनिट लागले... खारडूंगला टॉपच्या माईल्स स्टोनला भोज्या केला आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले... 

तुकोबारायांचा अभंग मनी तरळला...

याजसाठी केला होता अट्‍टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥

आता निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥

कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचे तेणें गुणें ॥

तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळी ॥

माझा तर सायकल वारीचा पहिलाच दिवस गोड झाला होता... या पहिल्याच चढाईत मिळालेला आनंद अवर्णनीय होता... जसे काही आनंदाचे डोही आनंद तरंग...

 येथे सुद्धा टॉप वर संजय अर्धातास आधीच पोहोचला होता... खरं तर ही सफर त्याने हायब्रीड सायकल वर पूर्ण केली होती... त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे होते...

तुफान वारे सुटले होते... पण आमचे सायकल वारू भन्नाट जोशात होते... अली ड्रायव्हर एकदम सतर्क होता... त्याने तातडीने जाकीट घालायला सांगितले... पटापट तेथील माईल्स स्टोन जवळ फोटो काढले... ते सुद्धा वेगवेगळ्या पोज मध्ये... प्रेमभराने संजय आणि मी... एकमेकांना मिठ्या मारल्या... अभिनंदन केले... मित्रमंडळी आणि आप्तस्वकीयांना फोनवर आनंदाची बातमी दिली... 

या ठिकाणी जास्त वेळ थांबता येत नाही... जवळच्या कॉफी शॉप मध्ये मस्त कॉफी प्यायलो. डोळे भरून खारडूंगला टॉप वरून हिमालयाच्या पर्वतरांगांचे दर्शन घेतले. चारही बाजूला बर्फाच्या  ग्लेशियरने व्यापला होता हिमालय... 

थोड्याच वेळात खारडूंग गावाकडे प्रस्थान केले.


सतीश जाधव 
मुक्त पाखरे....




13 comments:

  1. रोमांचकारी सायकलिंग! आपण केलेलं वर्णन वाचतानाच खरोखरीची धाप लागते तर प्रत्यक्ष सायकल चालवताना काय अनुभव असेल याची कल्पनाच केलेली बरी! तुमच्या आणि संजयच्या भावी सायकल राईडस् साठी मनस्वी शुभेच्छा
    --विलास जाधव,कल्याण

    ReplyDelete
  2. सायकलिंग वरून सफर आपण केली पण "सायकलिंग" वाचणारा करतो आहे असे अनुभवते..प्रवास वर्णन रोमांचकारी झाले जणू काही प्रत्येक क्षण आम्ही अनुभवत आहे ह्याचा साक्षात्कार झाला. आपल्या ह्या साहसी उपक्रमास माझा सलाम..

    ReplyDelete
  3. 🚴🚴💐💐👌☝🙂पुढील 🚴वाटचलीसाठी हार्दिक💐 सुभेच्छा🙏

    ReplyDelete
  4. मस्त वर्णन. तुमची पण दमछाक झाली हे वाचून किती खडतर राईड आहे याची कल्पना येतेय.

    ReplyDelete
  5. अतिशय रोमांचकारी सायकल प्रवास आणि तुमच्या जिद्दीला सलाम ....
    स्वप्निल नागरे

    ReplyDelete
  6. सॉलिड सतीश सर पुढचा टप्पा पण वाचायला आवडेल वाट बघतोय

    ReplyDelete
  7. तुमच्या पुढील राईडसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

    ReplyDelete
  8. खुपच खडतर प्रवास आहे हा. सलाम तुम्हाला आणी तुमच्या सहकार्याना. प्रत्यक्ष सफरीचा अनुभव आला वाचुन. पुढील भागांची भाग वाचायची उत्सुकता आहे.

    ReplyDelete
  9. खूप छान वर्णन. प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  10. प्रवास वर्णन अप्रतिम तुमच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच फोटोग्राफी पण खुप सुंदर असेच सुंदर लिहित जा . पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा🙏

    ReplyDelete
  11. मित्र सुहास चे अभिप्राय
    सायकलिंग वरून सफर आपण केली पण "सायकलिंग" वाचणारा करतो आहे असे अनुभवते..प्रवास वर्णन रोमांचकारी झाले जणू काही प्रत्येक क्षण आम्ही अनुभवत आहे ह्याचा साक्षात्कार झाला. आपल्या ह्या साहसी उपक्रमास माझा सलाम..
    ..सुहास कांबळी...

    ReplyDelete