Sunday, February 27, 2022

जिंदगी बडी होनी चाहीये... लंबी नही... २५ फेब्रुवारी २०२२

जिंदगी बडी होनी चाहीये... लंबी नही..

२५ फेब्रुवारी २०२२

आज सकाळी पुन्हा समर्पयामि शॉपीला भेट देण्यासाठी प्रस्थान केले... रात्रीच फोन शरदचा फोन  आला होता, "सर्व्हिसिंगला दिलेली सायकल टकाटक तयार केली आहे हिरेनने" 

साथीला... सोबत कोणीही नसल्याने आज अंमळ उशिराच म्हणजे सकाळी साडेसहा वाजता राईड सुरू केली. वातावरणात बऱ्यापैकी गारवा होता... 

दादरच्या चित्रा सिनेमा जवळच्या नाकाबंदीने ट्राफिक जाम केली होती... नाकाबंदी म्हणजे भरलेले ट्रक आणि टेम्पो बाजूला घेऊन पोलीस मंडळी कागद पत्रे चेक करीत होती. कागदामध्ये गांधीजी दिसताच तपासणी पूर्ण होत होती.... हसून पोलिसाला सॅल्युट मारल्यावर... खुणेनेच लवकर पुढे जा म्हणून सांगितले... 

आजची सफर अतिशय रमतगमत होती...  उजाडल्यामुळे रस्त्याला रहदारी सुद्धा वाढली होती... शरदने स्कॉटची स्टँडबाय सायकल दिली होती... ती चालवताना एक लक्षात आले, सीट थोडी उंच असल्यामुळे पाय पूर्ण स्ट्रेच करावे लागत होते... त्यामुळे सायकल वेगात पळत होती... हायवेच्या लोकेशनवरचा आजचा सूर्योदय नवीन उत्साहाने भरलेला होता.


वाटेत दोन रायडर्स भेटले.. एकाची सायकल पंचर झाली होती... त्यांचा पंप काम करत नव्हता... माझ्या सोबत असलेल्या पंपाने त्यांचे काम झाले...

 पुढे कुर्ल्याला खारी, बटर, पाव घेऊन जाणारा सायकलवाला भेटला... हँडलला दोन पिशव्या आणि कॅरियरला चार पिशव्या लावून तो घाईने चालला होता. मागच्या कॅरियरला लावलेल्या दोन पिशव्या रस्त्यावर पडण्याच्या बेतात होत्या... त्याला थांबविले आणि पिशव्या व्यवस्थित अडकवल्या...

छेडा नगर जवळ एक तरुण सायकल रायडर; हायब्रिड सायकलवर हेल्मेट न घालता राईड करत होता...  हात जोडून हेल्मेटचे महत्व सांगितले... 

विक्रोळीला समर्पयामि रायडर कौस्तुभ गिरकरची भेट झाली...


दररोज मुलुंड ते विक्रोळी राईड नेमाने करतो...  खूप आनंद झाला... त्याचे नानाजी खेडेकर काकांच्या हॉटेलवर वडापाव खायला येण्याचे आमंत्रण मिळाले... त्याच्या बरोबर मुलुंडच्या नवीन ठिकाणी फोटो काढले...


ताडदेवचा कौस्तुभ दोन वर्षांपूर्वीच मुलुंडला राहायला आलाय... पण मित्रांचा गोतावळा ताडदेवला असल्यामुळे वेळोवेळी मित्रांना भेटायला जातो... 

समर्पयामि शॉपीवर पोहोचलो... सखी सायकल झकास सर्व्हिस केल्यामुळे एकदम खुशीत होती. इतक्यात आदित्य काकाची एन्ट्री झाली. मागोमाग यशवंत जाधव आले... सिद्धार्थ भागव आला... डॉ. नरेंद्र आला... पुन्हा गप्पांची मैफिल सुरू झाली...

काकाने फर्मास नारळ पाण्याची ट्रीट दिली... सखी वरून एक ट्रायल राईड मारली....  लॉंग राईड साठी तयार झाली होती सखी... सिद्धार्थ आज खुश मिजाज मूड मध्ये होता... स्पेशल फोटो काढले आणि माझ्यासह सायकल राईड करायची इच्छा प्रकट केली...
त्या नंतर श्रेय, शरद आणि आदित्य बरोबर सायकलवाला शॉपीवर लहान सायकल पाहायला गेलो..

आदित्य काकाने जवळच्याच हॉटेल मध्ये गरमागरम मेदूवडा आणि डोसा ट्रीट दिली...

परतीचा प्रवास एकट्याने करताना... आजच्या आनंदी सकाळच्या आठवणी मनात घोळत होत्या... त्यामुळे दुपारचे ऊन सुद्धा मऊ झाले होते...

आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला, "बाबू मोशाय... जिंदगी बडी होनी चाहीये, लंबी नही..."

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Friday, February 18, 2022

अफलातून अनुभूती.... १८ फेब्रुवारी २०२२

*अफलातून अनुभूती*
१८ फेब्रुवारी २०२२

आज मुंबई वरून शिवनेरी सायकल वारीसाठी जुन्नर मार्गे ओझरला पोहोचलो.

अहमदनगरच्या सौरभ घायतडक या मरीन इंजिनिअर सायकलिस्टची भेट झाली...ओझरच्या विघ्नहर गणपती बाप्पाच्या मंदिरात... 


सौरभ टुरिंग सायकलिंग करतोय... सुट्टीच्या दिवसात... त्याने ठरवलंय सायकलिंग करताना पोटापाण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गरजा  माधुकरी मागून पूर्ण करायच्या... ... "माझ्या खिशात पैसे नाहीत... मला भूक लागली आहे.. त्यासाठी कोणतेही काम करायची तयारी आहे"... हेच सौरभचे बोलणे...

रात्री राहण्यासाठी सुद्धा मंदिर, धर्मशाळा, यात्री निवास किंवा एखाद्या सद्गृहस्थाच्या घरी आसरा शोधायचा... 

खिशात एकही पैसा न ठेवता... समाजात याचक म्हणून वावरणे आणि आपल्या गरजा भागवत सायकलिंग करणे...  तसेच याचना केल्यावर समोरील व्यक्ती कसा रिऍक्ट होईल... ती परिस्थिती हाताळणे... या साठी मनात परिव्राजकाची धारणा निर्माण करण्याचे प्रचंड आत्मिक बळ अंगी बाणवावे लागते... 

विशेष म्हणजे त्याला आलेले अनुभव अचंबित करणारे आहेत... त्याने सहृद समाज मनाचा कानोसा घेतला आहे... अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती कडून मिळालेला प्रतिसाद खूपच आनंददायी होता...  या अनुभवामुळे जीवनात उंच भरारी घेण्यासाठी त्याचे  पंख खूप बळकट असतील आणि त्याच वेळी त्याचे पाय जमिनीवर असतील...

जेमतेम बावीस वर्षाच्या सौरभ कडून जीवन जगण्याच्या कलेचा एक नवीन आविष्कार अनुभवायला / शिकायला मिळाला होता...

ट्रॅव्हल विदाऊट मनी अँड लिव्ह लाईफ लाईक अ किंग ( Travel without Money and Leave Life like a King)  हाच तो concept आहे.

अशा प्रकारे सफर करणे ही एक अफलातून अनुभूती आहे... आणि सौरभ त्याचा लाभ घेतोय....

मंगल हो ! ! !

सतीश जाधव
मुक्त पाखरे....