Monday, July 4, 2022

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी... (भाग दोन) दि. २४ जुन २०२२

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी...  (भाग दोन) 
दि. २४ जुन २०२२ 

धारचूला मधील यू टर्न हॉटेलमध्ये रात्री मुक्काम होता. सकाळी चारला उठून एक तास ध्यानधारणा केली.  प्रचंड ऊर्जा  घेऊन आदी कैलास महादेवाला भेटण्याचा ध्यास उरात बाळगून पहाटे पावणे सहा वाजता सायकल वारी सुरू झाली. पहिला टप्पा चौसष्ट किमी बुधी गावापर्यत होता.
 प्रथम पंधरा किमी अंतरावरील तवा घाट पार करायचा होता. वरवर चढत जाणारा रस्ता काही ठिकाणी डांबरी झाला होता... हिमालयाच्या माथ्यावरुन घरंगळत येणारी धुक्याची चादर... खळखळाट करत वाहणारी काली नदी... नदी पलीकडे दिसणाऱ्या गर्द वनराईत विसावलेली नेपाळी गावे... हिमशिखरांवर पडलेली सूर्याची किरणे... जोरात सुटलेला वारा... प्रेमाने आकाशात विहार करणार्‍या घारी आणि सायकल वरील भगव्याची फडफड... या निसर्ग संगीतात... हिरवटलेले डोंगर पार करत सखी अतिशय संथ गतीने वळणावळणाच्या रस्त्यावरून रमतगमत चालली होती.

 अतिशय निसर्गरम्य आणि मनमोहून टाकणारा हा परिसर सतत ऊर्जा देत होता.  आज आदी कैलास आणि ॐ पर्वत सायकल वारीच्या पाहिल्या दिवसाची सुरुवात एकदम अद्भुत होती. 
 
सकाळीच प्रोटिन बार, खजूर, बदाम यांचा नास्ता केल्यामुळे अंगात भरपूर ऊब होती. दिड तास सायकलिंग झाल्यावर पोटाने घंटी वाजवली... आठ किमी वरील दोबाट गावात पोहोचलो होतो. मुख्य गाव पर्वताच्या वरच्या  भागात होते. रस्त्याची कामे करणार्‍या कामगारांच्या एका कंटेनर जवळ थांबलो. बरेच कामगार नास्ता करत होते. "चहा मिळेल काय" हे विचारातच कामगारांचा मुखीया सतीश पांडेने  नास्ता करण्याची विनंती केली... नेकी और पुछपुछ... गरमागरम चपात्या आणि सोयाबीनची भाजी पुढ्यात आली... वर ग्लासभर चहा आला...  सायकल वरुन कैलास वारी करतोय... या धाडसाचे मुखीया पांडेने कौतुक केले... कामगार, आचारी आणि मुखीया यांच्या समवेत फोटो काढले.  

BROने दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट नुसार या वर्षांत बुधी पर्यत डांबरी रस्ता बनवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम सुरू होते... रस्त्यावर होणार्‍या लॅन्ड स्लाईड मुळे सुद्धा प्रचंड अडथळे निर्माण होत होते... तवा घाट आता  पाच किमी अंतरावर होता.   तेथून सुप्रसिद्ध नारायण आश्रमाकडे एक रस्ता जातो. 

वाटेत उंच कड्यावरून कोसळणारा सुंदर धबधबा लागला... 

त्यावर जलविद्युत केंद्र बनविले होते. वहाणार्‍या नाल्यावर BROने एक मोठा पूल बांधला होता. तो नाला खाली मुख्य काली नदीला मिळाला होता. निसर्गरम्य परिसर पाहताना भान हरपून गेले. 

 काली नदीवर नेपाळ आणि भारताला जोडणारा झुलता पुल लागला. या वरुन माणसांची ये जा चालू होती... दोन देशांना जोडणारा पूल माणसांची मन जोडणारा भासला. 

घासू गावातील एका दुकाना जवळ आलो. कडक चहाची सलामी मिळाली. सखीने पंचवीस किमी कठीण रपेट केली होती. यासाठी पाच तास लागले होते. 

येथील खडतर परंतु शांत निवांत वाटा, थंडगार हवा, नितळ पाणी, अवर्णनीय सुंदरता, एकांत शांतता, हिरवी वनराई, मध्येच ऐकू येणारा काली नदीचा खळखळाट आणि त्यात सोलो राईड हे सर्व पहिलं की या वातावरणात विरघळून जावे असच वाटत होतं... 

शहरातील घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या जीवनात रंग भरायचे असतील तर या रानवाटा तुडवत, बेभान वारा अंगावर घेत भटकंती करायलाच हवी... माझ्या बरोबर गुजगोष्टी करायला सखीची साथ होती. त्यामुळे तिचे अंतरंग जाणून घ्यायला निवांत वेळ मिळत होता... याचा खुप आनंद होत होता...

वाटेत एक बोलेरो गाडी जवळ येऊन थांबली. ड्रायव्हर सोबत घेऊन महिला एकटीच सफर करत होती. सायकल वारी करतोय याचे आश्चर्य मिश्रित भाव तिच्या चेहर्‍यावर होते. बुधीला राहण्याची व्यवस्था होईल हे सांगितले. खुप ढग असल्यामुळे तिला ॐ पर्वताचे दर्शन झाले नव्हते. अतोनात मानवी प्रयत्न सुद्धा निसर्गापुढे तोकडे आहेत याची जाणीव झाली. "आले देवाजीच्या मना"  ही उक्ती आठवली. पण आदी कैलास दर्शन झाले होते. 

 दुपारी दीड वाजता नजंग गावात पोहोचलो. येथून मालपा गाव सहा किमी अंतरावर होते. हॉटेलवाल्या योगेशला वरण भाताची वर्दी दिली. नववीत शिकणारा योगेश सायकल पाहताच आनंदून गेला होता. त्याच्या आईने वरण भात जेवण दिले. जेवायला बसलो तेव्हा खाली बसून सायकलचे गियर न्याहळत होता योगेश... 
Ki
हिरव्या गवताच्या भारा घेऊन जाणार्‍या कष्टकरी महिला भेटल्या... गवताचा भारा पंचवीस किलोचा असावा. तो उचलणे सुद्धा कठीण होते.  माझे या वारीचे प्रयत्न सुद्धा त्या भार्‍यापुढे फिके वाटले... 

ढग खाली उतरू लागले होते. हवेतील गारवा वाढला होता. थेंब थेंब बरसात सुरू झाली. घरंगळत येणार्‍या दगडावर तीक्ष्ण लक्ष ठेऊन पहाडाकडे सतत पहावे लागत होते. माती, धुळीचे खडकाळ रस्ते... गारवा, पाऊस, चिखल, लॅन्ड स्लाइड यातून चढ चढणे खूपच खडतर होते.

 परंतु त्यापेक्षा मनाने प्रचंड तयारी केली होती. लक्षापासून ढळायचे नाही... एकएक पेडल मारत रहायचे... हाच ध्यास... 

शांगकांग गावात  थांबलो... येथून चार कि.मी अंतरावर बुधी गाव होते. चार वाजले होते. सखी धापा टाकत होती...


अजून कठीण चढ चढायचा होता... त्यामुळे थोडी विश्रांती घेतली... वाटेत थांबणे सुद्धा धोकादायक होते... पण कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची तयारी होती. काली नदीच्या अगदी जवळ होतो... खळखळणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर उडत होते... 

पेडलींग सुरू झाले... 

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे... 
घेईल ओढ मन तिकडे सैर झुकावे...  
कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी... 
वेळुत कधी वा पडक्या वाड्यापाठी... 
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत... 
कधी रमतगमत वा कधी भरारी भेट... 

ही कविता आठवली... मन एकदम तरल झाले... 

अर्ध्या तासात फक्त अर्धा किमी चढ चढला असेल... समोर पाहतो तर जबरदस्त लॅन्ड स्लाईड झाले होते... 

थोडा वेळ थांबलो... तसे शरीर थंड होऊ लागले... म्हणुन बुलडोझरच्या बाजूच्या चिंचोळ्या वाटेतून सखी पुढे आली.

हसर्‍या सखीला वाट देण्यासाठी क्षणभर बुलडोझर सुद्धा थबकला होता... कसा बसा तो टप्पा पार केला... प्रचंड कस लागत होता चढ चढताना... काही ठिकाणी दगडांच्या चढावर सखीला ढकलावे लागत होते...

अतिशय थ्रीलींग सायकल राईड सुरू होती... प्रचंड ऑफ रोडिंग... काही ठिकाणी पुढचं चाक वर उठत होतं... वातावरण थंड होत चाललं होतं... वाटेत भेटणारे ट्रक जीप कामगार यांना "ओम नमः शिवाय" ची साद घालत होतो. त्यांच्या कडून प्रतिसाद मिळत होता. या नाम घोषात बुधी पर्यतचा शेवटचा खडतर चढ महत् प्रयासाने चढून गेलो. या चार किमी चढासाठी दोन तास लागले होते. 

सायंकाळचे सहा वाजले होते बुधीला पोहोचायला... कुठेही मोठी विश्रांती न घेता सतत बारा तास अवघड चढाची सायकलिंग करून चौसष्ट किमीचा पहिला टप्पा पार झाला होता... शरीर थकलं तरी मन थकलं नव्हतं...  चिखलाने माखलेली सखी माझ्या काळ्याकुट्ट चेहऱ्याकडे पाहून हसत होती. 

बुधीला कुमाऊ विकास निगम मध्ये राहण्याची व्यवस्था झाली... प्रथम सखीला स्वच्छ केले. थंड पाण्याने कशीबशी आंघोळ केली.  कुमाऊ मंडळच्या नेगीनी ग्लासभर चहा दिला. वज्रासनात बसल्यावर एकदम तरतरी आली... 

जवळच असलेल्या ITBP कॅम्प मधून नेट उपलब्ध झाले... त्यामुळे सर्वांना फोन करता आले.. आणि आजच्या अवघड वारीचे फोटो शेअर करता आले... 

पहिला टप्पा पार झाला होता... 

परमेश्वराच्या ओढीने आणि निसर्गाच्या साथीने... अशक्य ते शक्य झाले होते... 

ॐ नमः शिवाय... 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे.... 

17 comments:

  1. अतिशय सुंदर आयुष्य जगत आहेस, माझ्या शुभेच्छा सदैव आहेत....

    ReplyDelete
  2. मित्र प्रकाश परांजपेचे अभिप्राय

    थरारक…!!!

    ReplyDelete
  3. मित्र महादेव पाटीलचे अभिप्राय

    प्रथम सखीला सॅल्यूट रुसली नाही मातली नाही घेतला वसा टाकला नाही नंतरचा सॅल्यूट तुम्हाला आनंदी जीवन जगत आहात तेही सोलो राइड... चहा विचारला आणि नाष्टा मिळाला हि महादेवानेच व्यवस्था केली असे चमत्कार घडत असतात हरी ओम हर हर हर महादेव जय शिव शम्भो...

    ReplyDelete
  4. मित्र प्रमोद अमृतकरचे अभिप्राय

    खरोखर कौतुकास्पद व प्रेरणादायक कर्तुत्व🙏🌷🌷

    ReplyDelete
  5. Shakhi la chai pani pajay ki nay , techa pan ek vdo banva

    ReplyDelete
  6. परम मित्र विकास चे अभिप्राय..

    सतिश तुसी ग्रेट हो 👍🌹👏👏👏👏👏

    ReplyDelete
  7. गुरू आप ग्रेट हो l आपण महादेवाच्याच रुपात भ्रमंती करीत आहात असेच वाटतंय.

    ReplyDelete
  8. मुलगी शरयूचे अभिप्राय

    Mast baba ekdum thrilling experience…. Paji tusi great ho♥️♥️👍🏻

    ReplyDelete
  9. Great. This is the best way to enjoy second inning very positively.

    ReplyDelete
  10. मित्र प्रीतचे अभिप्राय

    [अशक्य ते शक्य सफर....

    मन:शक्ती ,मनोधैर्य , मन:पूत विश्वास यांचा आविष्कार...

    प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे....

    या उक्तीचे प्रत्यक्ष उदाहरण...

    ध्येयासक्ती , आत्मविश्वास ,प्रचंड परिश्रम,प्रचंड साहस या सर्वांचे यथार्थ दर्शन...

    तसेच वर्णनही... स्फूर्तिदायी आणि सर्व सायकलिंग करणाऱ्या सायकल वीरांना प्रेरणादायी आणि योग्य मार्गदर्शन करणारे...

    ReplyDelete
  11. खरतर तुझ्या या अजोड प्रवासासाठी शब्दही तोकडे आहेत.कौतुकास्पद कामगिरी.तुझ्यातली थोडीशी ऊर्जा आम्हालाही दे .सरस्वती लक्ष्मी काली या सगळ्यांचा वास तुझ्यात आहे.शब्दांकण ,डौल,सुंदरता तुझा बाँडच वेगळा
    ———राजेश

    ReplyDelete
  12. बाज वेगळा,तसा बांडही आहेस 😀😀🌹🙏
    राजेश

    ReplyDelete
  13. प्रेरणादायी भ्रमंती आणि सुरेख वर्णन...मस्त सर...कसे जगावे हे तुमच्याकडूनच शिकावे

    ReplyDelete
  14. भावना अनंत मनांत
    शब्दात न मावणार्या
    अस हे अजोड साहस तुझ
    रसरशीत जगण्याचं…

    ReplyDelete
  15. सायकल राईड चा मनमुराद आस्वाद फक्त आणि फक्त सतिश सरांनी च घ्यावा सर तुसी ग्रेट हो ,,

    ReplyDelete