Thursday, February 23, 2023

सन्मान... एका छंदाचा...

सन्मान...  एका छंदाचा... 

माझ्या कार्यालयीन सहकारी सोनाली जोशींना नुकतीच प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली...

आपली माणसं जेव्हा वरीष्ठ पदावर पोहोचतात तेव्हा खुप आनंद होतो... आणि हाच आनंद साजरा करण्यासाठी जोशी बाईंना भेटायला मुलुंडस्थित महापालिकेच्या टी विभाग कार्यालयातील जल विभागात गेलो होतो...

आधी सांगितले असल्यामुळे जोशी बाई आतुरतेने वाट पाहत होत्या... बाईंची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी मंगल आशिर्वाद दिले...

  जल विभागातील सहाय्यक अभियंता श्री बोरसे साहेब यांची भेट झाली... त्यांनी रक्तदानाच्या आणि  सायकलिंग क्षेत्रातील माझ्या भरीव कामगिरी बाबत जल विभागातर्फे सन्मान सोहळा आयोजित केला होता.. हे तर माझ्यासाठी अनपेक्षित  होते... परंतु सर्व कार्यालयीन कर्मचारी, अधिकार्‍यांशी सुसंवाद करायला मिळणार म्हणुन आनंद झाला होता...

जोशी बाईंनी सर्वांना माझा परिचय करुन दिला... आता पर्यंत केलेले ११२ वेळा रक्तदान तसेच सायकलिंग करत एकट्याने आदि कैलास आणि ॐ पर्वत पादाक्रांत करून केलेल्या जागतिक विक्रमाची ओळख करून दिली... आणि कार्यालयातर्फे सुंदर भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ श्री बोरसे साहेबांच्या हस्ते देऊन सन्मान केला... 

श्री बोरसे साहेबानी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज आम्हा सर्वांना जाधवांनां ऐकायचे आहे... सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जपलेले छंद... याची ओळख करुन घ्यायची आहे... फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने जल देयकांच्या डिमांड रिकव्हरी साठी अतिशय निर्णायक आणि संवेदनाक्षम असतात... या दिवसात येणार्‍या ताणतणावाच्या वातावरणात  श्री जाधवांनां ऐकणे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असेल...

सर्वांशी सुसंवाद साधताना सांगितले की, मनपा मध्ये सेवा करत असताना कार्यबाहुल्यामुळे सतत ताणतणावाला सामोरे जावे लागते... आपल्या छंदांना मुरड घालावी लागते... तसेच आपल्या प्रकृतीकडे सुद्धा दुर्लक्ष होते... 

म्हणुनच  उत्स्फुर्तपणे जीवन जगायचे असेल आणि सतत नवचैतन्यमय राहायचे असेल तर आपले छंद जपा-जोपासा... वेळ काढून भ्रमंती करा... नवनवीन मित्र जोडा... 

"चरैवेती". म्हणजे संधी मिळेल तेव्हा भटकणे हे सतत उर्जावान ठेवण्याचे जीवनाचे सूत्र आहे... या फिरण्याच्या वेडापायीच सेवानिवृत्त झाल्यावर सायकलिंगला सुरुवात केली... आतापर्यंत भारत भ्रमंती करत बेचाळीस हजार किमी सायकलिंग केली आहे... तसेच एक जागतिक विक्रम नावावर आहे... या सायकलिंग मुळेच मित्र परिवार प्रचंड वाढला आहे तर मोठ्या मोठ्या लोकांच्या गाठी भेटी झाल्या आहेत... सायकलिंगमुळे भारताच्या विविध प्रांतातील लोकांचे जनजीवन अतिशय जवळून पाहता आले... लडाख सारख्या ठिकाणी  बर्फवृष्टीमुळे आठ महिने दळणवळण बंद असते... अशा ठिकाणी राहणार्‍या जनतेचे खडतर जीवन अनुभवता आले... त्यामुळेच  जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय विशाल झाला... कोणत्याही ताणतणावात न अडकता... आलेली कठीण परिस्थिती संधी म्हणुन स्वीकारत गेलो आणि एखाद्या झर्‍यासारखे  प्रवाही राहीलो... झाडासारखे दातृत्व स्वीकारले...

निसर्ग आपला सर्वात मोठा गुरु आहे... आपण जेव्हा मोटरसायकल, कार, रेल्वे ईत्यादीने फिरतो तेव्हा ग्रंथाची पान फडफडल्या सारखा निसर्ग पाहतो... परंतु सायकलने आपण निसर्गाच्या खूप जवळ जातो... त्यात रमतो आणि आपणच निसर्ग होऊन जातो... 

आपण समाजाचा एक घटक आहोत याची जाणीव होते आणि लोककल्याणासाठी आपले उत्तरदायित्व आहे हे ध्यानात येते... निरपेक्ष वृत्तीने समाजोन्नत्ती करण्यासाठी प्रेरित होतो...

 याचाच भाग म्हणून प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन भारत भ्रमंती चालू आहे... नर्मदा परिक्रमा करताना "नर्मदा स्वच्छता अभियान राबविले होते... लडाख मध्ये" प्रिजर्व लडाख... Don't liter Save Water" ही संकल्पना घेऊन फिरलो... तर स्पिती व्हॅली मध्ये "एक बुटा (झाडाचं रोपटं) बेटी के नाम" याचा प्राचार केला... 

सायकलिंग आपले प्रकृती स्वास्थ्य झकास तर ठेवतेच आणि ते एक प्रकारे मेडिटेशन सुद्धा आहे... त्यामुळे मनस्वास्थ्य सुद्धा उत्तम राहते... 

विद्यार्थ्यांना-तरुणांना सायकलिंग साठी उद्युक्त करणे आणि मोबाईल संस्कृती कडून निसर्ग संस्कृतीकडे वळविणे... हा उपक्रम सुरू आहे...
भारत भर सायकल संस्कृती वाढविणे आणि सायकलिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे हा प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्यासाठी परमेश्वराकडून शंभर वर्षाचे आयुष्य मागून घेतले आहे... 

आपल्या उर्वरित काळात "पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा प्रकृती कशी आहे याचीच चौकशी केली जाते... या साठीच तुमच्या आवडीचे छंद जोपासा... तसेच सायकल चालवा... आणि हिट रहा फिट रहा... 

या सुसंवादामुळे बर्‍याच कर्मचारी अधिकारी यांनी माझा मोबाईल नंबर घेतला... 

शेवटी सर्वांना एकच सांगणे आहे... छंद जोपासा... हसत रहा... फिरत रहा... हीच जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे... 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे 
९८६९५७०२६६





Sunday, February 19, 2023

११२ वे रक्तदान... छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं...

११२ वे रक्तदान... छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं... 


राजा शिवाजी माजी विद्यार्थी मैत्रेय प्रतिष्ठान तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते...

या शिबिरात प्रमुख पाहुणा आणि रक्तदाता म्हणून बोलावण्यात आले होते. 

कार्यक्रमात सायकलपटू आणि रक्तदाता म्हणून राजा शिवाजी विद्यालयाच्या गुरूवर्य माजी मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया निमगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


विशेष म्हणजे माझ्या सायकलिंग उपक्रमाबद्दल माहिती  मिळाल्यानंतर सुप्रिया ताईंनी सायकलिंग सुरू करण्याचे मनोगत व्यक्त केले...

 ११२ व्या रक्तदाना नंतर गुरूवर्य रूपवते बाईंनी प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन गौरव केला...

या कार्यक्रमात बर्‍याच रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्याचे सौभाग्य मिळाले...  खरे तर राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे हे स्नेह संमेलनच होते...


एका अतिशय स्तुत्य सामाजिक  उपक्रमाचा राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रेरक पायंडा पाडला होता. 

मुंबईतील सर्व मित्र परिवार होताच... तसेच एक मित्र नाशिक वरुन तर एक मित्र अँमस्टरडॅम येथून आला होता... वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या सर्व मित्रांना या निमित्ताने भेटता आले... आणि खुप नविन मित्र मिळाले...

राजा शिवाजी विद्यालयाच्या १९९१ सालात पास आऊट झालेल्या विद्यार्थी समूहाने अतिशय बहारदार उपक्रम हाती घेऊन के ई एम् रक्तपेढीला ६७  रक्त पिशव्या मिळवून दिल्याबद्दल सर्वांना शतश प्रणाम...

मंगल हो !!!

 सतीश जाधव