Showing posts with label रक्तदान. Show all posts
Showing posts with label रक्तदान. Show all posts

Sunday, February 19, 2023

११२ वे रक्तदान... छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं...

११२ वे रक्तदान... छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं... 


राजा शिवाजी माजी विद्यार्थी मैत्रेय प्रतिष्ठान तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते...

या शिबिरात प्रमुख पाहुणा आणि रक्तदाता म्हणून बोलावण्यात आले होते. 

कार्यक्रमात सायकलपटू आणि रक्तदाता म्हणून राजा शिवाजी विद्यालयाच्या गुरूवर्य माजी मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया निमगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


विशेष म्हणजे माझ्या सायकलिंग उपक्रमाबद्दल माहिती  मिळाल्यानंतर सुप्रिया ताईंनी सायकलिंग सुरू करण्याचे मनोगत व्यक्त केले...

 ११२ व्या रक्तदाना नंतर गुरूवर्य रूपवते बाईंनी प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन गौरव केला...

या कार्यक्रमात बर्‍याच रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्याचे सौभाग्य मिळाले...  खरे तर राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे हे स्नेह संमेलनच होते...


एका अतिशय स्तुत्य सामाजिक  उपक्रमाचा राजा शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रेरक पायंडा पाडला होता. 

मुंबईतील सर्व मित्र परिवार होताच... तसेच एक मित्र नाशिक वरुन तर एक मित्र अँमस्टरडॅम येथून आला होता... वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या सर्व मित्रांना या निमित्ताने भेटता आले... आणि खुप नविन मित्र मिळाले...

राजा शिवाजी विद्यालयाच्या १९९१ सालात पास आऊट झालेल्या विद्यार्थी समूहाने अतिशय बहारदार उपक्रम हाती घेऊन के ई एम् रक्तपेढीला ६७  रक्त पिशव्या मिळवून दिल्याबद्दल सर्वांना शतश प्रणाम...

मंगल हो !!!

 सतीश जाधव 

Thursday, November 18, 2021

१०७ वे रक्तदान आणि शाळकरी मित्र

१०७ वे रक्तदान आणि शाळकरी मित्र

माझगाव डॉक मधील इंजिनीअरिंग वर्कर्स असोसिएशन आणि जिव्हाळा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या वतीने फाउंडर युनियन लीडर माननीय डॉ दत्ता सामंत यांच्या ८९ व्या जन्मदिनाप्रीत्यर्थ  माझगाव डॉक येथे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. वरील संस्थांचे जनरल सेक्रेटरी श्री संजय कोळवणकर माझे शाळकरी मित्र...

या रक्तदान शिबिराला संजयने अगत्याचे आमंत्रण दिले होते... शाळकरी मित्रांना सुद्धा बोलावले होते... गेली २४ वर्ष सलगपणे रक्तदान शिबिर आयोजित करणे आणि मुंबईतील पाच रक्तपेढ्यांना सुमारे १२०० रक्त पिशव्या मिळवून देण्याचे प्रचंड मोठे सामाजिक कार्य संजय आपल्या सहकारी मित्रांच्या सोबतीने करत आहे...

अशा महान कार्यात आज माझा खारीचा वाटा समाविष्ट होणार होता... आज रक्तदानाची १०७ वी वेळ होती... या उपक्रमात  KEM रक्तपेढीचा समावेश असल्यामुळे विशेष आनंद झाला... 

सकाळी साडेआठ वाजता माझगाव डॉकला सहकुटुंब पोहोचताच; संजय आणि त्याच्या मित्र परिवाराने सहर्ष स्वागत केले... KEM च्या रक्तपेढी अधिकारी श्रीमती ससाणे मॅडम यांची भेट झाली... त्यांनी रक्तदान करण्याचा फॉर्म आणि सर्व चाचण्या याची तातडीने पूर्तता केली... 

व्हाईस ऍडमिरल आणि माझगाव डॉकचे चीफ ऑफिसर श्री नारायण प्रसाद,  विद्यमान युनियन अध्यक्ष श्री भूषण सामंत तसेच उपाध्यक्ष श्री वर्गीस चाको आणि परममित्र, सरचिटणीस श्री संजय कोळवणकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराला सुरुवात झाली...

संजयने युनियनच्या कार्याचा सर्वांना परीचय करून दिला... व्हाईस ऍडमिरल श्री नारायण प्रसाद यांनी माझगाव डॉकला आशियातील नंबर एक ची शिप बिल्डींग यार्ड बनविण्याचे ध्येय ठेवले आहे... श्री सामंत साहेबांनी युनियन तसेच सर्व कामगार यांचे प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य असेल असे आश्वासन दिले... संजयने माझ्या प्रदूषण मुक्त भारत  या सायकल वारीचा, नुकत्याच पार पाडलेल्या मुंबई ते दिल्ली सायकल वारीचा, तसेच १०७ व्या रक्तदान उपक्रमाचा परिचय सर्वांना करून दिला. या प्रसंगी शाळकरी मित्र कुणाल ठाकूर, दिलीप काळे आणि शरद पाटील सहकुटूंब हजर होते. याचा खूप आनंद झाला...

आता सुरू झाला रक्तदानाचा कार्यक्रम... सर्व मान्यवरांच्या आणि शाळेतील मित्रांच्या उपस्थितीत माझे १०७ वे रक्तदान पाच मिनिटात पूर्ण झाले... या वेळी व्हाईस ऍडमिरल श्री नारायण प्रसाद आणि अध्यक्ष श्री भूषण सामंत यांच्या समवेत रक्तदान करताना फोटो काढले...

रक्तदान पूर्ण झाल्यावर परममित्र संजयने शाल श्रीफळ देऊन सन्मान केला... शाळेतील मित्रांच्या उपस्थितीत केलेला हा सन्मान लाख मोलाचा आहे...

आजचा विशेष दिवस कायम स्मरणात राहील...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...