Tuesday, May 23, 2023

नवनीत एक्सप्रेस

नवनीत एक्सप्रेस

सकाळी पाच वाजता घरून राईड सुरू झाली... पहाटेच्या कुंद वातावरणात भराभर मुलुंडपर्यंत जाऊन परत यायचे होते... आज साथीला होता ताज्या दमाचा गडी नवनीत वरळीकर... बरोब्बर सव्वा पाच वाजता दादर सर्कल जवळ त्याची भेट झाली... आणि मग सुरू झाली... भन्नाट रायडिंग...


कोटीच्या कोटी उड्डाणे... झेपावे उत्तरेकडे... या मारुती स्तोत्रातील उक्ती प्रमाणे... नवनीतच्या अंगात वारा संचारला होता... शक्यतो फ्लाय ओव्हर टाळत जोरदार आणि जोमदार राईड सुरू झाली... हवेतील आद्रतेमुळे शेवटाचे दोन फ्लाय ओव्हर चढताना अंगातून घाम टपटपू लागला...  पण उतरताना वार्‍याच्या झुळका भरपाई करून द्यायच्या... घाम गारवा देत देत सुकतो आहे... हे कळत होतं...

तासाभरात मुलुंड गाठले... नेहमीच्या पॉइंट वरील बेंच काढून टाकल्या मुळे... फुटपाथवर फतकल मारली... घरापासून पंचवीस किमी राईड झाली होती... ती सुद्धा तेवीस किमी वेगाने...

नवनीत आज प्रचंड जोशात होता... म्हणाला "निघूया आपण"   पाच मिनिटे विश्रांती घेऊन हायड्रेट होऊन परतीचा प्रवास करणे आवश्यक होते... घामामुळे आणि तोंडातून बाहेर पडणार्‍या वाफेमुळे शरीरात झालेल्या पाण्याची कमतरता भरपूर पाणी पिऊन भरून काढली... सोबत आणलेल्या खजूरांचा नवनीत सोबत आस्वाद घेतला...

"ऐरोली जंक्शन पार करतानाच हेड विंड सुरू झाली... त्यामुळे वेग कमी झाला... अशा वेळी अँरो डायनॅमिक पोझिशन घेऊन... .. हवेचा विरोध कापत वेगात पुढे जाता येते... हेच टेक्निक पंढरपुर वारीत परतीच्या राईड मध्ये अवलंबावे लागणार आहे...

चेंबूर फ्लायओव्हर खालून जाताना... जोरदार हाक ऐकू आली... तशी सायकल वळवली... समोर आयर्न मॅन दिपक निचित ठाकला... नव्या लूक मधील हसतमुख दिपकला पाहिलं आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला... दिपक सोबत मुंबई कन्याकुमारी आणि मुंबई दिल्ली सायकल राईड विक्रमी दिवसात  पूर्ण केली होती...

इतक्यात फ्लाय ओव्हर वरुन आणखी एक आरोळी कानावर पडली... जुना साथीदार ब्रिजेशची भेट झाली... सदाबहार ब्रिजेश बरोबर मनाली लेह राईड केली होती... तसेच नुकतीच हिल्स इन गोवा ही सायकल राईड केली होती... नवीन राईडचे  प्लॅन शेअर झाले... सप्टेंबर महिन्यातील हिमालयन सायकलिंग साठी ब्रिजेशने ताबडतोब होकार दिला... "हिमालयन सायकलिंग हा ब्रिजेशचा वीक पॉईंट आहे" 

 नवनीतची दोन प्रतिभाशाली रायडर बरोबर ओळख झाली... हेच आजच्या ५०  किमी फ्लाइंग राईडचे फलित होते...

मंगल हो !!!

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

Thursday, May 11, 2023

सायकलिस्ट अमित मोने... अजब रसायन आणि माहीतीचा धबधबा...

सायकलिस्ट अमित मोने... अजब रसायन आणि माहीतीचा धबधबा...

आज परममित्र अमित मोनेच्या घरी सायकलसह भेट देण्याचा योग आला... ठाकूरद्वारच्या हमरस्त्यावर असणाऱ्या अनंतया अपार्टमेंटच्या बाराव्या मजल्यावरील घरातून दिसणारा सागराचा गोलाकार नजारा पाहताना डोळ्याचे पारणे फिटले... समुद्रावरून येणाऱ्या  आणि घरात खेळणाऱ्या वाऱ्यावर तरंगत...  मनचक्षू... सागराच्या एका किनारच्या कफ परेड वरुन दुसर्‍या किनारी असणाऱ्या राजभवनच्या गर्द हिरवाई मधून मस्त मजेत फिरून आले...

कुसुमाग्रजांच्या कवितेच्या चार ओळी अलगद ओठावर आल्या... 

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनार्‍याकडे
मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्‍यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

हसतमुख मेधाने (पत्नी) सुहास्य स्वागत केले... आणि मग अमितच्या गप्पांचा धबधबा प्रचंड वेगाने वाहू लागला... अभ्यासू वृत्तीच्या अमितला कोणत्याही विषयाचे वावगे नव्हते... त्याच्याकडे असलेला टुरींग सायकलिंगचा प्रचंड अनुभव शेअर करताना... प्रकर्षाने जाणीव झाली की त्या अनुभवांच्या आठवणींमध्ये अमित मनःपूर्वक रममाण झाला होता... स्तिमित होऊन सर्व ऐकत असतानाच मेधाने फक्कड चहा आणून दिला... पाठोपाठ खुसखुशीत कांदा पोहे सुद्धा आले... 

घरात फिरणाऱ्या समुद्री वाऱ्यासोबत घरातील खेळीमेळीचं वातावरण एकदम भावलं... दहावीच्या परीक्षेच्या ताणातून मुक्त झालेली मुलगी ईशा एकदम रिलॅक्स झाली होती... व्हेकेशनमध्ये MSCIT आणि विपश्यना टिन एजर कोर्स ती सहज पूर्ण करणार आहे... 

मनपा शाळेतून सत्तावीस वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेली आई व्हरांड्यात शतपावली करत होती... आईसाठी घरात अलेक्सा आहे... आई एकटी घरी असताना... अमित जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही असला तरी अलेक्सा  ताईच्या माध्यमातून आईशी बोलू शकतो... संपर्क करु शकतो... टेक्नोलॉजीचा वापर करून वडीलधाऱ्या मंडळींचे जीवन सुसह्य करण्याचा जबरदस्त फंडा अमितने अप्रतिम पद्धतीने घरात वापराला होता... त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे घरात पोछा आणि साफसफाई करणारा गोल रोबोटिक  यांत्रिक झाडू... ज्याच्यामुळे घरातील प्रत्येक खोली बिनबोभाटपणे कचरामुक्त झाली होती...

अमितने अगत्याने सर्व घर दाखवले... घरात केलेल्या करामती, गमतीजमती, बारीक सारीक फंडे सांगताना, दाखवताना त्याला बाबांची आठवण झाली... खिळा न ठोकता लावलेले कॅलेंडर, टाचण्या सेफ्टीपिन सुरक्षित ठेवण्यासाठी लोहचुंबकांचा वापर, कमी वॅटचा रिमोट पंखा, आरशात असलेली LED लाईट्स... ब्लूटूथ की पॅड... यातून अमितकडे असलेली प्रचंड कल्पकता जाणवत होती... 

विपश्यनेचा विषय निघाताच... मेधा एकदम सुखावली... तिच्या मैत्रिणींनी विपश्यना केली असल्यामुळे मेधाच्या मानत विपश्यना करण्याची इच्छा उफाळून आली... शाळेतील शिक्षकांना विपश्यनेसाठी प्राधान्यक्रम असतो हे सांगितल्यावर लवकरच मेधा मुलगी ईशा बरोबर विपश्यना करणार आहे.. 

 घराचा निरोप घेताना ईशाने एक सुंदरशी लाकडी घंटा भेट दिली... सायकल सखीच्या गळ्यात ती घंटा बांधताच... सखी सुखावली... 

८५ वर्षाच्या आईची मायेने काळजी घेणाऱ्या या संपूर्ण कुटुंबाने मनात एक आदराचे स्थान पटकावले आहे... 

मंगल हो 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे...