Thursday, May 11, 2023

सायकलिस्ट अमित मोने... अजब रसायन आणि माहीतीचा धबधबा...

सायकलिस्ट अमित मोने... अजब रसायन आणि माहीतीचा धबधबा...

आज परममित्र अमित मोनेच्या घरी सायकलसह भेट देण्याचा योग आला... ठाकूरद्वारच्या हमरस्त्यावर असणाऱ्या अनंतया अपार्टमेंटच्या बाराव्या मजल्यावरील घरातून दिसणारा सागराचा गोलाकार नजारा पाहताना डोळ्याचे पारणे फिटले... समुद्रावरून येणाऱ्या  आणि घरात खेळणाऱ्या वाऱ्यावर तरंगत...  मनचक्षू... सागराच्या एका किनारच्या कफ परेड वरुन दुसर्‍या किनारी असणाऱ्या राजभवनच्या गर्द हिरवाई मधून मस्त मजेत फिरून आले...

कुसुमाग्रजांच्या कवितेच्या चार ओळी अलगद ओठावर आल्या... 

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनार्‍याकडे
मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्‍यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

हसतमुख मेधाने (पत्नी) सुहास्य स्वागत केले... आणि मग अमितच्या गप्पांचा धबधबा प्रचंड वेगाने वाहू लागला... अभ्यासू वृत्तीच्या अमितला कोणत्याही विषयाचे वावगे नव्हते... त्याच्याकडे असलेला टुरींग सायकलिंगचा प्रचंड अनुभव शेअर करताना... प्रकर्षाने जाणीव झाली की त्या अनुभवांच्या आठवणींमध्ये अमित मनःपूर्वक रममाण झाला होता... स्तिमित होऊन सर्व ऐकत असतानाच मेधाने फक्कड चहा आणून दिला... पाठोपाठ खुसखुशीत कांदा पोहे सुद्धा आले... 

घरात फिरणाऱ्या समुद्री वाऱ्यासोबत घरातील खेळीमेळीचं वातावरण एकदम भावलं... दहावीच्या परीक्षेच्या ताणातून मुक्त झालेली मुलगी ईशा एकदम रिलॅक्स झाली होती... व्हेकेशनमध्ये MSCIT आणि विपश्यना टिन एजर कोर्स ती सहज पूर्ण करणार आहे... 

मनपा शाळेतून सत्तावीस वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेली आई व्हरांड्यात शतपावली करत होती... आईसाठी घरात अलेक्सा आहे... आई एकटी घरी असताना... अमित जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही असला तरी अलेक्सा  ताईच्या माध्यमातून आईशी बोलू शकतो... संपर्क करु शकतो... टेक्नोलॉजीचा वापर करून वडीलधाऱ्या मंडळींचे जीवन सुसह्य करण्याचा जबरदस्त फंडा अमितने अप्रतिम पद्धतीने घरात वापराला होता... त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे घरात पोछा आणि साफसफाई करणारा गोल रोबोटिक  यांत्रिक झाडू... ज्याच्यामुळे घरातील प्रत्येक खोली बिनबोभाटपणे कचरामुक्त झाली होती...

अमितने अगत्याने सर्व घर दाखवले... घरात केलेल्या करामती, गमतीजमती, बारीक सारीक फंडे सांगताना, दाखवताना त्याला बाबांची आठवण झाली... खिळा न ठोकता लावलेले कॅलेंडर, टाचण्या सेफ्टीपिन सुरक्षित ठेवण्यासाठी लोहचुंबकांचा वापर, कमी वॅटचा रिमोट पंखा, आरशात असलेली LED लाईट्स... ब्लूटूथ की पॅड... यातून अमितकडे असलेली प्रचंड कल्पकता जाणवत होती... 

विपश्यनेचा विषय निघाताच... मेधा एकदम सुखावली... तिच्या मैत्रिणींनी विपश्यना केली असल्यामुळे मेधाच्या मानत विपश्यना करण्याची इच्छा उफाळून आली... शाळेतील शिक्षकांना विपश्यनेसाठी प्राधान्यक्रम असतो हे सांगितल्यावर लवकरच मेधा मुलगी ईशा बरोबर विपश्यना करणार आहे.. 

 घराचा निरोप घेताना ईशाने एक सुंदरशी लाकडी घंटा भेट दिली... सायकल सखीच्या गळ्यात ती घंटा बांधताच... सखी सुखावली... 

८५ वर्षाच्या आईची मायेने काळजी घेणाऱ्या या संपूर्ण कुटुंबाने मनात एक आदराचे स्थान पटकावले आहे... 

मंगल हो 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

5 comments:

  1. आपण आलात घर प्रसन्न झाले खूप तुमचे मनशक्ती चे अनुभव ऐकायला मिळले young and energetic Satish dada thanks

    ReplyDelete
  2. तुमचे खूप वाचण्यासारखे असतात. त्यात नुसते प्रवास वर्णन नसते तर ओळखी / अनोळखी माणसांच्या सहवासात आलेले सुमधुर क्षण पण असतात.
    एक मायेचा ओलावा तुमच्यात नेहमी दिसतो.
    यातही दिसला 👍

    ReplyDelete
  3. सुंदर लेख.... आवडला

    ReplyDelete
  4. अमित दादाच्या घराचे आणि स्वभावाचे वर्णन अतिशय समर्पक आहे. अमित दादाचे सायकल प्रेम तसेच विडियोग्राफी (drone) बद्दल सांगायलाच नको.

    ReplyDelete
  5. अमित नावाप्रमाणे च अमर्याद
    जो कुठेच थांबत नाही, प्रत्येक क्षण मजेत कसा जाईल आणि तो अनोखा कसा असेल तर अमित ला follow करायला पाहिजे
    या सगळ्या प्रवासात त्याला मेधाची च्या चाकांची भक्कम साथ लाभल्यामुळे त्याचा प्रवास हा सुखकर तर असतोच आणि महत्वाचं म्हणजे tension free

    ReplyDelete