Wednesday, July 31, 2024

चिशुमले ते उमलिंगला पास (जगातील सर्वात उंच रस्ता... १९०२४ फूट...) येथील सायकल थरार... २५ जुलै २०२४

चिशुमले ते उमलिंगला पास (जगातील सर्वात उंच रस्ता... १९०२४ फूट...) येथील  सायकल थरार... २५ जुलै २०२४

 चिशुमले मधील टॉंगस्पन टेन्ट स्टे मध्ये सकाळी ब्रेडआम्लेट आणि मॅगीचा नाष्टा मिळाला... परमेश्वराची प्रार्थना करून राईडला सुरुवात झाली...

आज २५  किमीची खडी चढाई सर करायची होती... १६३०० फुटांवरील चिशूमले वरून  १९०२४ फूट उंचीवरील उमलिंगला टॉप हा जगातील सर्वात उंच रस्ता सायकलने सर करायचा होता...

सुरुवातीलाच बोर्ड लागला... Best View Comes After Highest Climb... Umaling La...

परेश आणि  साथीला होती सोनल... लहान चणीची पण महान कर्तृत्ववान सोनल... दिल्ली ते कन्याकुमारी सेल्फ सपोर्ट सोलो सायकलिंग करणारी सोनल...  आमच्यासह उमलिंगला पास पादाक्रांत करण्यासाठी आतुर होती... 

"हे राम हे राम" नामाची धून वाजत वारी सुरू झाली... मनात एकच निर्धार... आज उमलिंगला पार करायचे... सुरुवाती पासूनच  रस्ता हळू हळू वर वर चढत जाणारा  होता... 

जवळपास पंधरा मिनिटांची राईड झाली... एक बाय एक गियर लावून सर्ली चढत होती... अचानक काय झाले कळले नाही... आणि खाड खाड आवाज करत सर्ली जागेवर थांबली... परेश मागेच होता... पाहतो तो काय... मागील गियर मधून चेन पडली होती... खाली उतरून चेन लावण्याचा प्रयत्न केला... तर चेन कॅसेट मागील प्लॅस्टिक रिंगमध्ये अडकली होती... 

थोडासा ताण निर्माण झाला... सायकल उलटी करून चेन लावण्याशिवाय गत्यंतर नव्हते... सायकल उलटी केली... गडबडीत पुढच्या चाकाला लावलेल्या पाण्याच्या बाटल्या उलट्या झाल्या... एका बाटलीचे बुच तुटले आणि अर्धी बाटली रिकामी झाली... पाण्यापेक्षा सायकल चेन व्यवस्थित लावणे ही प्रार्थमिकता होती...  अडकलेली चेन काढण्याचे प्रयत्न केले... तर चेन आणखी फसली... 

इतक्यात दहा बारा जवानांची परेड साठी पुढे चालत जाणारी एक तुकडी मदत करायला थांबली... त्यातील सिनियर अधिकारी काठीने चेन जागेवर आणण्याचा प्रयत्न करू लागला... हात काळे होतील म्हणून तो चेनला हात लावत नव्हता... तातडीने त्याला लाल पंचा दिला... त्याचे प्रयत्न असफल झाले... 

अडचणीची पातळी वाढू लागली होती... दुसरा एक पिळदार शरियष्टीचा जवान पुढे आला... त्याच्या ताकदीच्या प्रयोगापुढे सर्ली बधली नाही... सकाळच्या थंडीत घामाघूम होऊन तो बाजूला झाला... मध्ये मध्ये माझे प्रयत्न चालूच होते... डोक्यात आले... तसे क्विक रिलीज खोलून चाक बाहेर काढण्याचे प्रयत्न केले... क्विक रीलज सैल केले पण चाक सुद्धा बाहेर येईना... 

आता आणखी दोन जवान त्यांना काही जमते काय ते पाहू लागले... खेचाखेची प्रकरणात चेन तुटली तर... असा प्रश्न मनात प्रकटला... चटकन सावध झालो... दोन्ही जवांनाना बाजूला केले...  

दोन क्षण डोळे मिटले... पेडलिंग करताना चेन अडकली होती... मग पेडल रिव्हर्स करून देवाचे नाव घेऊन  खालून चेन झटक्यात खेचली... आणि चेन गियर्स मधून बाहेर पडली होती...  चेन बाहेर पडताच मागील चाक काढले...  हबच्या आतील नट सैल झाला होता... त्याला व्यवस्थित टाईट करून...मागील चाक फिट केले... चाक व्यवस्थित फिरू लागले... मनाची स्थिरताच अडचणीं सोडवू शकते... याची प्रचिती आली...

त्या जवानांचा कप्तान "प्रताप" पुढे आला आणि म्हणाला... येथून गाडी करून टॉपला जा आणि तेथून राईड करत खाली या... आम्हा तिघांची जिद्द कमी करण्याचे हे प्रयत्न म्हणजे... परमेश्वराचे काही संकेत होते काय... का ही सुद्धा आमची परीक्षाच होती...  त्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे... योग्य वाटले नाही...

 पुन्हा पेडलिंग सुरू झाले... या सर्व चेन प्रकरणात अर्धातास लागला होता... त्याचा परिणाम काय होणार हे लवकरच समजणार होते... चेन लागली पण पाणी वाया गेले होते... म्हणून वाटेत एखादा नाला किंवा ओढा लागला तर पाणी भरून घ्यायचे ठरले...

पहिल्या पाच किमीचा चढाव पार झाला होता...अर्धा झालेला पाण्याचा स्टॉक भरून घेणे आवश्यक होते... 

रस्ता आणि बाजूची दरी यातील खोली कमी झाली आणि एक खळखळाट करत जाणारा ओढा दृष्टिक्षेपात आला... सायकल रस्त्याच्या किनारी आडव्या केल्या...

 परेश सायकली जवळ थांबला तर मी आणि सोनल  बाटल्या घेऊन  दगडांमधून सावधतेने  पाण्याजवळ गेलो.... बर्फसारखे थंड पाणी बाटल्यांत भरून घेतले.... आता पाण्याचा स्टॉक पुरेपूर झाला होता...  

अतिशय नितांत सुंदर असा तो परिसर... जणू काही या दऱ्याखोऱ्यात विरघळून जावे... परंतु आस होती शिखरावर पोहोचण्याची... म्हणून वेळ न दवडता... पुन्हा सायकल जवळ आलो...  परेश  शरीर गरम राहावे म्हणून एका जागेवर कवायत करत होता...

आता ऊन वाढत होते... वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर लागणारी थंडी बोचरी होत चालली होती... त्यामुळे पुढच्या पाच किमी साठी काठीण्याची पातळी वाढली होती... 

वाटेत कोणतीही गाडी नाही...घाटात  कसलीही रहदारी नाही... आता पर्यंत फक्त तीन मोटार सायकलचे जत्थे टॉपला जाताना भेटले होते... आम्हाला चीयर अप करत डोळ्यासमोरून पसार झाले होते...

 ज्युक बॉक्स वर लावलेल्या गाण्यांच्या धून वर स्वार होऊन पुढे पुढे सरकत होतो... परेशच्या पाठीवर DSLR कॅमेरा बॅग होती... म्हणजे जवळपास तीन किलोचे सामान तो खांद्यावर बाळगत होता.... फोटोग्राफीची आवडच त्याला अचाट काम करण्याचं बळ देत असावी...

दहा किमीचा टप्पा पार केला होता.. ग्रॅज्युअल चढ आता संपले होते... लूप सुरू झाले होते... हळू हळू तोंडाने श्वास  घेणे सुरू झाले होते... सायकलचे गियर एक एक वर लाऊन सुद्धा सायकल होलपाटे खात होती... दर पंधरा मिनिटांनी थांबून दम खात मुंगीच्या गतीले आम्ही तिघेही वर चढत होतो... आता सोनलने लीड घेतला होता... ती सतत परेशला मोटिव्हेट करत होती... 

पुढचे पाच किमी आमच्या सायकलिंग अनुभवाचा कस पाहणारे ठरले... माझी सुद्धा दमछाक होत होती... परेश माझ्या मागून अतिशय धिम्या गतीने पेडलींग करत होता... तर आता सोनल आणि माझ्या पेडलिंगमध्ये सुद्धा फरक पडू लागला... वळण आले की एकदम चढ येत होता... परेश अशा वळणावर   सायकल वरून उतरून चक्क धक्का मारत होता...  या ठिकाणी पेडलिंग करणे परेशला अवघड जात होते.

नारीशक्तीचा वेगळा आविष्कार आता पाहत होतो... थोडी पुढे गेल्यावर सोनल थांबून मला आणि परेशला चिअर अप करत होती... हि सोनल अग्रवाल मनाली ते  लेह... सेल्फ सपोर्ट सोलो राईड करत... लेह वरून हानलेला आली होती आणि फोटीला टॉप चढताना अनपेक्षितपणे तिची भेट झाली होती...  प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत असलेली सोनल एखाद्या अदभुत शक्ती सारखी आमच्या मदतीला आली होती... किंबहुना या मागे काही ईश्वरी संकेतच असावेत... 

आता हेअर  पिन बेंड रस्ता सुरू झाला... ह्या चार किमी मध्ये मला सुद्धा पेडल करणे अवघड वाटू लागले... तोंडाने श्वास घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता... दर पंचवीस पावलावर थांबून पाण्याचा एक घोट घेऊन... थोडावेळ पाणी तोंडात ठेऊन हळूच गिळत होतो... मागे परेश माझ्या दृष्टीक्षेपात होता... सोनलला सांगितले त्याला टॉपला घेऊन जायचे माझे धेय्य आहे... या साठी तुझी मदत लागणार आहे...

थोडावेळ थांबल्यावर परेश सायकलला धक्का मारत  आमच्या जवळ पोहोचला... परेश म्हणू लागला... आता उन्हाचे जोरदार चटके जाणवत आहेत... तोंडावर मास्क ठेऊन श्वास घेणे कठीण होत आहे... आणि मास्क खाली केला की ओठ, कपाळ आणि गाल भाजून निघत आहेत... मध्येच सूर्याआड ढग आला की जोरदार वारे थंडीचा मारा करीत आहेत...

त्याच्या पोटऱ्या बोलू लागल्या होत्या...  क्रॅंप येण्याची शक्यता टाळण्यासाठी त्याला जबरदस्ती पाणी प्यायला लावले... खजूर वडी, लाडू हा प्रोटीन इंटेक घेतला... तिघांना तरतरी आली होती... कसे बसे हे चार किमी अंतर तिघांनी पार केले होते... 

सोबत जेवण नव्हते... फक्त ड्रायफ्रूट होते... शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी जेवणाची कमतरता जाणवली...

आता पेडलींग करणे कठीण झाले होते...  श्वास घेताना... थंड गरम वारे नाकात तोंडात शिरत होते... नाकपुड्या चोंदल्या होत्या... नाकात बोट घातले की बोटांना रक्त लागत होते... 

खोल आवाजात परेश म्हणाला...सायकल चालवणे आता शक्य नाही...  सायकल ढकलणे सुद्धा अंगावर येत आहे... एका जागेवर थांबले तरी सुद्धा  अंगात हुडहुडी  भरते... त्याला धीर दिला... आता फक्त तीन किमी अंतर राहिले आहे... लवकरच एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची आपण गाठणार आहोत... याची जाणीव करून दिली...

आता तेघेही सायकल ढकलू लागलो... रिदम ठेवला होता... पन्नास पावले सायकल ढकलली की दोन मिनिटे थांबायचे एक घोट पाणी प्यायचे प्रोटीन बारचा एक तुकडा अथवा चॉकलेट खायचे....आणि पुन्हा धक्का मारायचा... डोक्यात किणकिण सुरू झाली होती... प्राणवायूची कमतरता जाणवू लागली... ह्या तीन किमी अंतरात शरीराची क्षमता संपली होती...  

 सोनल तत्परतेने पुढे जात होती... आणि तिच्या पावलावर पाऊल ठेऊन आम्ही पुढे सरकत होतो... 

ही पूर्णपणे  खडी चढाई होती... दुपारचा दीड वाजला होता... आम्ही एव्हरेस्ट बेस कँपच्या उंचीवर म्हणजे १७६०० फुटावर पोहोचलो होतो... 

शेवटचे तीन किमी आणि आणखी १४२४ फूट वर चढायचे होते... विरळ वातावरणामुळे आता एकमेकांशी बोलणे सुद्धा कष्टदायक वाटत होते... रस्ता अतिशय चांगला असल्यामुळे सायकल ढकलायला कमी कष्ट पडत होते... आता फक्त रुहानी ताकद काम करत होती... ध्यास होता टॉप गाठण्याचा... १९०२४ फूट गाठण्याचा...

पन्नास पावले सायकल ढकलली की एक थांबा घेत होतो... एक किमी सायकल ड्रॅग करायला अर्धा तास लागत होता... मध्येच वावटळ उठत होती... सूर्याने सुद्धा आपला प्रताप दाखवायला सुरुवात केली होती... सायकलला मागे अडकवलेले लॉक सुद्धा आता जड झाले होते... अती उष्णतेने डोळे बिलबिलत  होते... थंड वाऱ्याच्या प्रचंड झोतापासून वाचण्यासाठी टीशर्ट वर जाकीट आणि त्यावर रेनकोट घातला होता... पुढून येणारे वारे मागे ढकलत होते... पावसाने गाठण्याआधी घाट माथा गाठणे आवश्यक होते... 

आता हार नव्हती... माघार नव्हती... एकमेकांना बुस्ट करत उस पार जाण्याची जिद्द होती... शरीर साथ देत नव्हते पण मन  उभारी देत होते... एक से भले दो... दो से भले तीन... एकमेकांना ऊर्जा देत... तोंडाने दीर्घ स्वास घेत अतिशय घिम्या गतीने  एक एक पाऊल टाकत होतो... 

शेवटचा एक  किमी राहिला... अचानक थोडा उतार आला... त्या उताराचा फायदा घेत... सायकलला फक्त पाच पेडल मारू शकलो... मी आणि परेश अक्षरशः होलपटत होतो...  स्थिर वृत्तीने सोनालच सायकल ढकलत होती... 

अखेर तो क्षण आला... तिघेही उमलिंगला टॉपला पोहोचलो होतो... डोळ्यात अश्रू उभे राहिले... सायंकाळचे साडेचार वाजले होते...  घेतलेले प्रचंड परिश्रम फळाला आले होते... आनंदाच्या बेहोशिने उड्या मारत होतो... अतोनात वाऱ्याच्या माऱ्यापुढे सुद्धा परेश आनंदाने मदहोश झाला होता... उन्हाचे चटके बसून काळा झालेला त्याच्या नाकाचा शेंडा चमकत होता...

माझ्या नाकातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या... निव्वळ आणि निव्वळ सोनलची प्रचंड ऊर्जा आमच्या कामी आली होती... 

उमलिंगला टॉप... जगातील सर्वात उंचावराचा रस्ता... १९०२४ फुट... आज कवेत आला होता... त्या धरणीला आणि सर्लीला साष्टांग दंडवत घातला... 

दहा मिनिटात तिघेही चार्ज झाले... फोटो काय... उड्या काय... रिळ काय... सॅल्युट काय... तो टॉप आणि आम्ही फक्त तिघेजण... जवळचे लाडू, प्रोटीन बार, सुकामेवा फस्त केला... त्या वाहणाऱ्या वाऱ्यात सुद्धा जवळपास अर्धा तास  टॉप वरील प्रत्येक बोर्डा बरोबर फोटो काढत होतो... 

येथील कॉफी शॉप, ऑक्सीजन चेंबर दुपारी चार वाजताच बंद झाले होते... जगातील उंचावरील कॉफी शॉप, जगातील सर्वात उंचावरील पार्किंग एरिया... जगातील सर्वात उंचावरील मोटरेबल रस्ता... अशा वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध पावलेला तो परिसर माझ्या भारतात आहे... याचा अभिमान ओतप्रोत दाटून आला होता... 

उमलिंगला टॉप वरून पुढे डेमचूक २८ किमी होते... पण डेमचुक हा मिलिटरी कॅम्प आहे... कोणतेही गाव नव्हते... पुढे तर तिबेट सीमा होती... त्यामुळे पलिकडून सुद्धा वाहने येत नव्हती...

ऊन कमी व्हायच्या आत पुन्हा खाली उतरणे आवश्यक होते... सर्व विपरीत परिस्थितीवर मात करत... निव्वळ मानसिक बळाने आणि तिघांच्या एकत्रित साथीनं अशक्य ते शक्य झाले होते... उमलिंगलाच्या प्रेमात पडलो होतो...

परतीच्या प्रवासात ब्रिटिश सायकलिस्ट विकी भेटला... पंधरा किमीवर रस्त्याच्या आडोशाला त्याने टेन्ट लावला होता...

उद्या तो उमलिंगला पासचे उर्वरित अंतर पार करणार होता... त्याला ड्रायफ्रूट आणि पाणी दिले... सर्व सामानासहित तो घाट चढल्यामुळे एका दिवसात टॉपला पोहोचणे त्याला अशक्य झाले होते...

आजची राईड ही आतापर्यंत केलेल्या परिश्रमाची परिणीती ठरली होती... इप्सित साध्य करण्यासाठी केलेल्या खडतर मेहनतीची आज पूर्तता झाली होती... येथे तिरंगा फडकविताना भारताच्या उन्नतीचे आम्ही साक्षीदार आहोत... याचा अभिमान वाटला...

जीवनातली एक स्वप्नवत गोष्ट आज पूर्ण झाली होती... त्यासाठी केलेला सराव आणि अथक परिश्रम फळाला आले होते... बकेट लिस्ट मधील एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद  कामाला आले होते... परेश आणि सोनलची साथ उमलिंगला पार करण्यासाठी लॅंडमार्क  ठरले होते... 

वयाच्या ६७ व्या वर्षात पदार्पण करताना... मी उमलिंगला  पार केले नव्हते तर... पाठीशी असलेल्या परमेश्वराने ते करवून घेतले होते...

उमलिंगला पास पादाक्रांत करताना घ्यायची खबरदारी...

१.   उमलिंगला पास दोन रस्त्यांनी करता येतो... एक आहे फोटीला पास आणि दुसरा आहे निरबुला पास...

२.  यातील निरबुला पास आहे १७३८०  फूटावर तर फोटीला पास आहे १८१२४ फुटावर... निरबुला पास चढताना ऑफ रोडींग आणि मातीचा रस्ता आहे फोटीला पासचा रस्ता एकदम टकाटक पण प्रचंड लूप आणि प्राणवायूच्या कमतरते मुळे अवघड आहे...

३.  फोटीला पास केल्यावर उमलिंगला पास करणे सोपे वाटते...

४. हानले पासून निरबुलापास करून चिशुमलेचा ४५ किमीचा रस्ता आहे... तर हानले पासून फोटिला पास मार्गे चिशुमलेचा रस्ता  ६६ किमी... आणि चिशुमले पासून उमलिंगला टॉपचा २५ किमी रस्ता आहे.... यामध्ये कोठेही चहा पाण्याची टपरी किंवा ढाबा नाही...  तेव्हा सोबत पॅक लंच... सुकामेवा, चिक्की, खजूर आणि भरपूर पाणी घ्यावे...

५. कोणी गृपने ही राईड करत असेल तर जेवणखाण पाणी यासाठी हानले वरून सपोर्ट गाडी घ्यावी... 

६. हानले पासूनच्या उमलिंगला पास पर्यंतच्या पुढील राईड सकाळी पाच वाजता सुरू कराव्यात... जेणे करून टॉपवर दूपारी चार पूर्वी पोहोचणे शक्य होते...

८.  हानले ते उमलिंगला या तीन दिवसाच्या सफरीत थर्मल, जाकीट गरम कपडे आणि  एक्स्ट्रा सायकल ट्यूब, पंप आणि पंचर साहित्य बरोबर ठेवावे.

९. उमलिंगला पास सर केल्यावर चिशुमले पर्यंत उताराची राईड केल्यावर चिशुमले येथेच थांबावे..  पुन्हा तडक हानलेकडे प्रस्थान करू नये... ते खूप अंगावर येते...

१०. हे रस्ते अतिशय कमी वाहतुकीचे आणि कमी रहदारीचे आहेत.. तेव्हा मध्ये वाटेत पीक अप व्हॅन अथवा गाडी मिळणे अशक्य आहे.

११. उमलिंगला पासची  राईड करायची असेल तर दररोज घाट चढण्याची प्रॅक्टिस आणि प्राणायाम, ध्यानधारणा...  शारीरिक आणि मानसिक बळ वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते...

१२. ह्या रस्त्यावर MTB सायकलला पर्याय नाही...

सर्ली तयार झाली होती... पुढील नव्या सफरी साठी...

जय श्री राम...

52 comments:

  1. दादा तुम्हाला इथूनच साष्टांग नमस्कार 🙏
    वाचून खूप भारी वाटलं अगदी सगळ डोळ्या समोर उभ राहिलं 🙏

    ReplyDelete
  2. जय श्रीराम साहेब ⛳

    ReplyDelete
  3. सलाम आहे तुमच्या जिद्दीला, जय श्रीराम

    ReplyDelete
  4. विशांत जगदिश नवार, मुंबईAugust 1, 2024 at 7:28 AM

    वाचते वेळेस अगदी तुमच्या सोबत असल्यासारखे वाटले, नमन करतो तुमच्या जिद्दीला, व ह्या वयात केलेल्या धाडसाला, वय हे फक्त एक अंक आहे हे तुमच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते, माझ्या सायकलींच्या सुरुवातीच्या आवडीला छंद बनवण्यात तुम्हीच माझे प्रेरणास्थान आहात त्याबद्दल तुमचे मनसोक्त आभार मानतो, वरील ब्लॉग वाचताना अगदी तुमच्या सोबतच अनुभव घेत असल्यासारखे वाटत होते,
    पुढील सफरीसाठी शुभेच्छा, जय श्रीराम

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विशांत...

      Delete
  5. Wah काय inspiring story आहे. असं वाटलं की I am riding with you to the top. Heartiest congratulations to all three riders

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा...

      Delete
  6. साहेब तुमच्या जिद्दीला सलाम ...
    आज तुम्ही पादाक्रांत केलेले ठिकाण नक्कीच सायकल प्रेमींसाठी मार्गदर्शक असेल. तुमचे कौतुक करावे ते थोडेच ...असाच बहारदार प्रवास तुम्ही करत रहा आणि आम्हाला अनुभव कथन करत जा. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन💐💐💐
    - स्वप्निल नागरे

    ReplyDelete
    Replies
    1. स्वप्नील धन्यवाद...

      Delete
  7. A Great Achievement, Dada
    Proud of You👍🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... प्रिती...

      Delete
  8. खूप मस्त.. Inspired 👍👍

    ReplyDelete
  9. It is giving me intense desire to cycle. Gajendra.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद गजेंद्र...

      Delete
  10. तुम्ही आमचे मित्र आहात हे आमचे भाग्य आणि आम्हाला सुद्धा जायचं आहे त्यासाठी मदत करावी, भारताला तुमचा अभिमान आहे, जय हिंद 🇮🇳🙏🚴‍♂️💐🚴‍♀️🚴💐

    ReplyDelete
  11. राम राम
    प्रचंड जिद्द,चिकाटी व खंबीर मन या मुळे आकाशाला गवसनी घालू शकलास.हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा...

      Delete
  12. खूप छान मला अशा राईड करायला आवडेल. कोणी जाणार असेल तर सांगा,परेशला माहीत आहे मी सुद्धा कटरा ते मुंबई आणि मुंबई ते कन्याकुमारी सोलो राईड केली आहे,माहीत असते तर मी सुद्धा आलो असतो.
    तुम्हा सर्वांचे अभिनंदन . जय हिंद

    ReplyDelete
    Replies
    1. जून २०२४ मानली लेह साठी तयारी सुरू करा...

      Delete
  13. खुप खुप अभिनंदन ! मस्त लेख आणि फोटो !

    ReplyDelete
  14. फार सुंदर अनुभव आणि लिखाण.... लडाख बरंच फिरल्याने तिथे कोणकोणत्या कमतरता आणि त्यामुळे काय होतं हे चांगलंच माहित आहे.

    ReplyDelete
  15. Sir मनापासून धन्यवाद🙏 उत्तम माहिती दिली. तुम्हा तिघांच्या परिश्रमाला मनापासून त्रिवार सलाम. 🫡🫡🫡

    ReplyDelete
  16. मित्र लोचन चे अभिप्राय...

    उमलिंगलाचा पाहिला भाग वाचला अन् उत्सुकता वाढली पुढे काय झाले हे जाणण्याची....

    वाचताना विजिगिषु वृत्तीचे यथार्थ दर्शन याही वेळेस घडले....

    म्हणजेच...कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करण्याची दुर्दम्य इच्छा म्हणजे विजिगिषु वृत्ती !

    नाना अडचणी, निसर्गाची प्रतिकुलता यावर मात करत निश्चय केला ते साध्य केले...

    मनाची एकाग्रता ,विश्वास आणि सहकाऱ्यांची साथ संगत सोबत होती ....

    यथायोग्य वर्णन....माहितीपूर्ण लिखाण....

    ReplyDelete
  17. मित्र काशिनाथचे अभिप्राय...

    श्वास रोखून धरणारा थरार तुझ्या शब्दाशब्दात प्रत्यक्ष अनुभवला…

    तुमच्या शारीरीक, मानसिक साऱ्या गोष्टींना
    मनापासून सॅल्यूट…

    खूप खूप अभिनंदन 💐

    ReplyDelete
  18. खूप छान, चालू राहू द्या असेच भन्नाट, अणि लिहीत रहा, शुभेच्छा तुम्हाला.

    ReplyDelete
  19. हार्दिक अभिनंदन व पुर्ण दंडवत 🙏🙏🌹🌹

    ReplyDelete
  20. Satish hats off to you yaar. Great achievement. Nicely written blog

    ReplyDelete
  21. मित्र मनोहरचे अभिप्राय...

    सतीश सर तुम्हाला खरोखर साष्टांग नमस्कार...

    अगदी जिद्दीने तुम्ही सर्वांनी मोहिम फत्ते केली. तुम्ही खूप स्पूर्ती दायक आहात. ०.१ टक्के जरी आम्हाला साइक्लिंग जमले तरी आम्ही स्वतःला धन्य समजू...
    🙏🙏🙏

    ReplyDelete
  22. मित्र नवनीतचे अभिप्राय...

    नमस्कार सर....

    तुमच्या ह्या राईडला मनापासून माझा मुजरा....

    तुमच्यात भरभरून असलेली जबरदस्त इच्छा शक्ती चे दर्शन होते ...

    खुप छान.... तुमच्या हया कार्याला शब्द कमी पडत आहे...

    आमचे अहोभाग्य आणि अभिमान वाटतो की आम्ही तुमच्या मार्गदर्शना खाली सायकल चालवण्याचे धडे घेत आहोत.....

    🙏🙏🙏आता आतुरता आपल्या भेटीची...लवकर भेटू सर

    ReplyDelete
  23. मित्र तुषारचे अभिप्राय...

    नमस्कार सर सर्वप्रथम मनापासून अभिनंदन...

    आणि वाचताना अंगावर शहारे आले. एवढं मोठं धाडस करण या वयात शक्य नाहीये...

    ह्यासाठी खूप मोठी देवाची ताकदच लागते आणि आपले प्रयास तुमचं सर्वांचं कौतुक करताना शब्द अपुरे आहेत...

    आणि ती सोनल म्हणजे परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवलेली त्याचीच शक्ती याचा प्रत्यय येतो🙌🚴‍♂️

    तिला भेटावंच लागेल🙌🏻🚴🏼‍♂️

    🚴🏼‍♂️मनापासून हिमालयात सायकल चालवण्याची इच्छा आणि तुम्ही कधी पासून सराव घेणार याची प्रतीक्षा🇮🇳🚴🏼‍♂️🇮🇳

    ReplyDelete
  24. अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.🙏🏻💐

    ReplyDelete
  25. मित्र आगाशे यांचे अभिप्राय...

    👆Great....Hat's of to you all...

    Khupch Tough...

    But you completed...

    Congratulations & keep it up 👍🤝

    ReplyDelete
  26. अफलातून प्रवास. जबरदस्त आव्हानात्मक सायकलिंग. सर्व प्रकारच्या क्षमतांचा कस लागतो. अनेकांना प्रेरणा देणारे लेखन. लिहित रहा, फिरत रहा 🌝

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... दादा...

      Delete
  27. Congratulations ,I wish I would try for 🙏

    ReplyDelete
  28. जय श्रीराम सतीश जी आपण केलेले पराक्रम हा वाखडण्यासारखा आहे मी पण आपल्यासारखाच एक सायकलिस्ट आहे मनाली ते लेह ते खारदुंगला यशस्वी राईट केलेली. याआदी नर्मदा परिक्रमा गोदावरी परिक्रमा त्रंबकेश्वर ते पशुपतिनाथ मुक्ती नाथ सध्या आता अयोध्या ते राम वन गमनपद असा अशी राईट केली तिथे श्रीलंका पर्यंत केली 5000 किलोमीटर केली आणि आत्ता नुकतेच मध्येच आहे त्रंबकेश्वर ते श्रीशैलम मल्लिकार्जुन आणि पुढे तिरुपती अशा सगळ्या राईट आम्ही करत असतो त्यामुळे आपल्या राईडीची गाथा वाचून फार आनंद झालाव आठवणी जाग्या झाल्या. छान लिखाण केलं आम्ही पण हा प्रयत्न जरूर करू. आपणांस पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. पुढील नियोजनात आपल्या बरोबर यायला आवडेल. ९९२२१७३०५३. जयहिंद

    ReplyDelete
    Replies
    1. उल्हास...

      धन्यवाद... आपण लवकरच भेटणार आहोत...

      Delete
  29. सतिश परेश आणी सोनल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिंदन. सतिश तुझ्या जिद्दीला सलाम.

    ReplyDelete
  30. परेश तुम्हां तिघांनाही साष्टांग नमस्कार आणि मनापासून अभिनंदन 👏👏

    ReplyDelete
  31. खुप मस्त लेख आणि फोटो !

    ReplyDelete
  32. खुपचं छान. परेश, सतिश सर, आणि सोनल मॅडम
    आपल्या तिघांचे अभिनंदन .🙏💐
    आपण साहस जिद्द आणि चिकाटी मुळेच उमलिंग टाॅप एव्हरेस्ट बेस कॅम्प सायकलींग राईड केलीत . या यशा बद्दल आम्हाला महाराष्ट्राला, भारतवासीयांना अभिमान वाटतो व यातून देशातील नागरिकांना नक्कीच प्रेरणा मिळेल .


    ReplyDelete
  33. तुम्हा तिघांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे खुपचं छान. परेश, सतिश सर, आणि सोनल मॅडम
    आपल्या तिघांचे खूप खूप अभिनंदन .🙏💐
    आपण साहस जिद्द आणि चिकाटी मुळेच उमलिंग टाॅप एव्हरेस्ट बेस कॅम्प सायकलींग राईड केलीत . या यशा बद्दल भारतवासीयांना अभिमान वाटतो आणि यातून देशातील नागरिकांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

    ReplyDelete
  34. अभिनंदन परेश दादा ओढांगी पेण

    ReplyDelete
  35. अभिनंदन परेश दादा ओढांगी पेण

    ReplyDelete
  36. खुप खुप अभिनंदन सर आणि पुढच्या उपक्रमl साठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  37. Great achievement Paresh and team👍

    ReplyDelete
  38. उषाताई काळाचौकी राजु दादाAugust 5, 2024 at 10:14 PM

    परेश तुझे खुप खुप मनपूर्वक अभिनंदन खुप छान

    ReplyDelete
  39. तुमच्या धडाडीचे कौतुक करावे तेव्हढे थोडे....... So proud.
    फक्त एव्हढेच म्हणेन की तुमचे हे अनुभव, outbeyond excursions काहीतरी भन्नाट करण्यासाठी प्रेरणादायी आहेतच पण त्याचबरोबर रोजच्या आयुष्यातल्या किडूक मिडूक तक्रारीच्या बाबतीतील दृष्टिकोनही एकदम सकारात्मकतेच्या पट्टीत आणून बसवतात.
    खूप खूप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा.

    ReplyDelete
  40. कणखर माणसाची अजून एक उत्तुंग कामगिरी..👌अभिनंदन तुमचे आणि तुम्हा तिघांचेही ! ! !

    ReplyDelete