Thursday, February 19, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि चांदिवली सहयोग सोसायटीत शिवज्योत स्वीकारण्याचा मान... दि १९ फेब्रुवारी २०२६*

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि चांदिवली सहयोग सोसायटीत शिवज्योत स्वीकारण्याचा मान... दि १९ फेब्रुवारी २०२६*

आज शिवजयंती प्रित्यर्थ परममित्र स्वप्नील दौंड यांच्या संकल्पनेतून साकारलेली सायन किल्ला ते पवई ह्या छत्रपती शिवाजी महाराज सायकल राईड मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली...

तरुणाईला निसर्गाकडे नेणे तसेच छत्रपतींचा इतिहास अवगत करणे आणि फिटनेसची आवड निर्माण करणे... स्वप्नीलच्या  या शुद्ध प्रयोजनामुळेच या राईड मध्ये भाग घेण्याचे ठरविले...

सायन किल्ल्यावर शिव मशालीचे प्रज्वलन झाले तेव्हा छत्रपतींचा जयघोष करण्यात आला...

सकाळच्या आल्हाददायक वाऱ्यात पेडल मारताना प्रत्येक सायकलस्वाराच्या मनात एकच ऊर्जा धावत होती ... छत्रपतींची प्रेरणा...

पवई येथील सहयोग सोसायटीमध्ये सर्व सायकलिस्टचे जोरदार स्वागत करण्यात आले... 

येथे सुप्रसिद्ध कौन्सिलर डॉ अंजलीताई अरुण पारकर यांची भेट झाली...  अंजली ताई समाजासाठी करत असलेल्या कार्यामुळे अतिशय प्रभावित झालो... त्या Remedial Therapist आणि Counsellor म्हणून कार्यरत आहेत..

शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही... तर प्रत्येक मुलाची क्षमता ओळखून ती उजळवण्याचे त्यांचे समर्पित कार्य सतत सुरू आहे... विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भावनिक विकासासाठी कार्यरत असलेली त्यांची सेवा समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे...

शिकण्यात अडचणी येणाऱ्या मुलांसाठी योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास वाढवणारे समुपदेशन आणि विशेष शिक्षणाची प्रभावी साथ हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे...

अंजलीताईंच्या साथीने चांदिवलीतील सहयोग सोसायटीच्या प्रांगणात शिव प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून छत्रपतींच्या प्रतिमेला हार घालण्यात आला...

तसेच शिवज्योत स्वीकारण्याचा सन्मान लाभला… तो स्वराज्याच्या विचारांना स्पर्श करण्याचा दिव्य अनुभव होता... ज्या भूमीतून स्वराज्याची ज्योत प्रज्वलित झाली, त्या तेजस्वी परंपरेची ही अखंड मशाल… शौर्य, दूरदृष्टी आणि जनकल्याण यांचे जिवंत प्रतीक... त्यामुळेच मनाचा निर्धार अधिक भक्कम झाला...

छत्रपतींच्या तेजस्वी विचारांची ही मशाल हातात घेताना जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली...

स्वराज्य, शौर्य आणि संस्कार यांचे प्रतीक असलेली ही मशाल प्रत्येक हृदयात स्वाभिमान प्रज्वलित करत राहो... रस्ता कितीही लांब असो, उद्दिष्ट कितीही कठीण असो... स्वराज्याची प्रेरणा सोबत असेल तर प्रत्येक वाट विजयाकडेच जाते...

या राईड निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमातील... छत्रपतींची आग्र्याहून सुटका या इतिहासाची माहिती सर्वांना दिली... आणि छत्रपतींना आग्र्यात नजरकैदेत ठेवलेल्या मीनाबाजार कोठी या वास्तूवर  मोठे संग्रहालय निर्माण होतय या बद्दल सांगितले... केंद्र सरकारने १७ ऑगस्ट हा दिवस शिव चातुर्य दिन म्हणून जाहीर केला आहे...

स्वप्नीलने  पितळी पाण्याची बाटली भेट म्हणून दिली... विशेष म्हणजे  त्या बाटलीवर छापलेली महाराजांची प्रतिमा पाहताच छाती अभिमानाने भरून आली.

सहयोग सोसायटीतील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

आजची पन्नास किमी राईड करून महाराजांना मानाचा मुजरा...

जय शिवराय...

सतीश जाधव सायकलिस्ट

7977690693


Sunday, February 15, 2026

टायगर सिटी सायकलिंग असोसिएशनचा दिमाखदार सायकल सोहळा... एक अविस्मरणीय अनुभव... दि १४.०२.२०२६

टायगर सिटी  सायकलिंग असोसिएशनचा दिमाखदार सायकल सोहळा... एक अविस्मरणीय अनुभव... दि १४.०२.२०२६

टायगर सिटी  सायकलिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या बहारदार कार्यक्रमात विशेष पाहुणा म्हणून सहभागी होण्याचा सुवर्णयोग लाभला...  

संस्थेचे अध्यक्ष आणि जिवलग मित्र दिलीप वरकड यांचा संदेश आला आणि नागपूरच्या या कार्यक्रमात भाग घेण्याचे नक्की केले... दिलीपच्या सहयोगाने VIP कोट्यात दोन दिवस आधी काढलेल्या जाण्या येण्याच्या तिकीट कन्फर्म सुद्धा झाल्या...

दूरंतो एक्सप्रेसने सकाळी सव्वा सातला नागपूरमध्ये आगमन झाले… तर परम मित्र प्रदीप देशपांडे उर्फ PD स्वागतासाठी प्लॅटफॉर्मवर सज्ज होता...

PD च्या घरचा आपुलकीचा पाहुणचार घेऊन थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या कार्यक्रम स्थळी उपस्थित झालो... 

मागोमाग विद्यमान नगरसेविका शिवानी ताई  दाणी वखारे यांचे सायकलवरून आगमन होताच  वातावरणात प्रसन्नतेने भरून गेले... 

अध्यक्ष दिलीप आणि सदस्य विश्वास यांच्या कडून शिवानी ताईंचा जीवन प्रवास ऐकला आणि भारावून गेलो...

त्याचा संक्षिप्त परिचय खालील प्रमाणे:

महाराष्ट्र शासनाच्या नमो महारोजगार मेळाव्याच्या समन्वयक; मनी बी इन्स्टिट्यूट प्रा. लि. यांच्या संचालिका, प्रेरणादायी वक्त्या व आर्थिक सल्लागार...

संगणकशास्त्र पदवीधर; वित्त क्षेत्रातील अनेक प्रमाणपत्रे. १८व्या वर्षापासून विविध क्षेत्रांत कार्यअनुभव...

शिवानी ताईंचे ४००+ लेख प्रमुख मराठी वृत्तपत्रांत प्रकाशित झाले आहेत... वयाच्या १९व्या वर्षी ‘नागपूरचा सर्वोत्तम वक्ता’ हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे...

NISM व BSE येथे सर्वात तरुण प्राध्यापक म्हणून कार्यरत...

अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशीच त्याचे विश्लेषणात्मक पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा अनोखा विक्रम आहे...

२.७५ लाख+ सबस्क्राइबर्स असलेला यूट्यूब चॅनल; १.३ कोटी+ व्ह्यूज...

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस; नागपूर शहराच्या पहिल्या महिला अध्यक्षा...

हार्ले डेव्हिडसन बाईकर; जम्मू–कारगिल बाइक प्रवास पूर्ण....

आणि आता नागपूर महापालिकेच्या नगरसेविका...

शिवानी ताई म्हणजे तडफदार व्यक्तिमत्त्व, अफाट जिद्द, साहसाची आवड आणि ओढ... या सर्व गुणांमुळेच त्यांच्या  मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार याची मला खात्री आहे...

दीप प्रज्वलना नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली...  सुरुवातीलाच प्रदीप देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींची ओळख करून दिली. अध्यक्ष दिलीप वरकड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि सदस्य दररोज ३० किमी सायकलिंगची शिस्त पाळतात, ही प्रेरणादायी माहिती दिली.

शिवानी ताईंनी नागपूरमध्ये सायकल ट्रॅक उभारण्याचे आणि स्वतः नियमित सायकलिंग करण्याचे आश्वासन  दिले, ही सायकलप्रेमींसाठी मोठी आनंदवार्ता होती... अश्विनी ताईच्या हस्ते मला सुद्धा मेडल मिळाले...

प्रदूषणमुक्त भारताची संकल्पना घेऊन देशभर केलेल्या सायकल सफरीतील  अनुभव... थोरामोठ्यांच्या झालेल्या गाठीभेटी आणि नर्मदा परिक्रमेतील आध्यात्मिक अनुभूती मला सर्वांसमोर मांडता आल्या...

प्रत्येक सायकलस्वाराने एखादे ध्येय ठरवून टुरिंग सायकलिंग करावे... असा प्रेमाचा संदेश सर्वांना दिला... समाजचं आपण देणं लागतो आणि त्याची परतफेड करण्याची परमेश्वराने आपल्याला सायकलिंगच्या अनुषंगाने दिलेली ही सुवर्णसंधी आहे... 

नागपूरच्या चैतन्य प्रवीण कुहिते या छोट्या मुलाने " काका मला तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे... हे सांगितल्यावर... माझे नागपूरला येण्याचे सार्थक झाल्याचे समाधान वाटले... छोट्यांच्या स्वप्नांना माझ्या अनुभवाची साथ मिळाली होती...

टायगर सिटी सायकलिंग असोसिएशन यांनी एका महिन्याची जी सायकल स्पर्धा घेतली होती त्यातील सर्व विजेत्या सदस्यांना मेडल प्रदान करण्याचा कार्यक्रम अतिशय दिमाखात पार पडला... तसेच विशेष कार्य केलेल्या सदस्यांना माझ्या हस्ते ट्रॉफीने सन्मानित करण्याचे भाग्य मिळाले..


संस्थेचे फाउंडर मेंबर देवदत्त परांजपे यांनी आभार प्रदर्शन केले आणि त्या नंतर  अल्पोपहारचा कार्यक्रम झाला... तेव्हा टायगर सिटीच्या सर्व सदस्यांशी मनमोकळा सुसंवाद साधता आला.

कार्यक्रमानंतर विश्वास चाटी यांच्या घरी जंगी पाहुणचार... उदय-जयंत-विश्वास यांच्यासोबत रंगलेल्या गप्पा... आणि परतीच्या प्रवासासाठी स्वाती वहिनींच्या प्रेमळ हातचा जेवणाचा डबा... नागपूरकरांची  ही आपुलकी हृदयात कायमची कोरली गेली...

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती... त्यांचे खूप खूप आभार आणि  सायकलिंग परिवार वाढविण्यासाठी नवनवीन कार्यक्रम हाती घ्यावेत... हीच शुभेच्छा...

नागपूर भेट आणि टायगर सिटीकरांनी केलेला स्नेहसत्कार दीर्घकाळ स्मरणात राहील.

नागपूरकरांनी सप्रेम दिलेला मोमेंटो आणि टायगर सिटी सायकल असोशिएशन प्रिंट केलेला कप खूप भावला... घरी गेल्यावर त्याचे उद्घाटन झाले...

सर्व नागपूरकर सायकलिस्ट ना प्रेमाचे आमंत्रण जेव्हा मुंबईला याल तेव्हा तुमची सेवा करण्याची संधी जरूर द्यावी...

जय श्री राम...

सतीश जाधव...सायकलिस्ट 

7977690693