Saturday, December 27, 2025

नॉनस्टॉप जिद्द… नॉनस्टॉप खंडाळा घाट... दि. २७ डिसेंबर २०२५

नॉनस्टॉप जिद्द… नॉनस्टॉप खंडाळा घाट... दि. २७ डिसेंबर २०२५

खंडाळा घाट चढलो नॉनस्टॉप दमदार…
श्वासात जिद्द, पायात वेग साकार…

पहाटे सव्वा चारची वेळ, शहर अजून झोपेत होते..सर्लीची ऊर्जा मात्र सकाळीच फुरफुरत होती...


 दादरहून खोपोली लोकल पकडली...आणि तेथून सुरू झाली खऱ्या अर्थाने प्रेरणादायी सफर.

प्रतिथयश ब्लॉगर महेश दाभोळकर यांच्या नियोजनाखाली, परिक्षीत पाध्ये यांच्या काटेकोर साथीने खोपोलीहून खंडाळा घाटाची राईड सकाळी सव्वा आठ वाजता सुरू झाली. 


चाळीसहून अधिक जुने आणि नवोदित सायकलिस्ट होते... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि मनात एकच संकल्प होता... खंडाळा घाट पार करणे...


वाहतुकीची गर्दी, वळणावळणाचा घाट, हेड विंड आणि तरीही सव्वा तासात न थांबता टॉप गाठण्याचा पराक्रम साध्य झाला... वाटेत विशांत माझी स्पेशल व्हिडिओ ग्राफी करत होता... कलात्मक ॲगलने फोटो पण काढत होता...

सर्व सायकलिस्तानी एकदम रुबाबात खंडाळा घाटमाथा गाठला होता... सर्वांनी एकच जल्लोष केला... 

राजमाची पार झाल्यावर वेध लागले लोणावळा झीरो पॉईंटचे... खंडाळा लोणावळ्याच्या गर्दीतून वाट काढत झीरो पॉईंटवर पोहोचताच आनंद द्विगुणित झाला. प्रत्येकाने झकास फोटो काढले...


माझा विठू माऊलीच्या पोज मधला फोटो एकदम व्हायरल झाला...

 नंतर वारी निघाली दादांची मिसळ खायला कार्ल्याच्या दिशेने...
 

मडक्यात आलेली तुपाच्या धुराने स्मोकी झालेली मिसळ खाणे म्हणजे तृप्त करणारी मेजवानी होती...

 यानंतर सुरू झाली वेगवान परतीची राईड... लोणावळ्याच्या वाढलेल्या गर्दीमुळे प्रसंगी सायकल ढकलत पुढे न्यावी लागली... खंडाळा तलावाजवळ फोटो काढले...


त्यानंतर राजमाची पासून भन्नाट उतार सुरू झाला... येथे सावधगिरी, नियंत्रण आणि अनुभवाची खरी कसोटी होती...

साथीला होते जितेंद्र जैन आणि महेंद्र निकम... यांच्यासोबत केलेली उताराची सुरक्षित आणि शिस्तबद्ध राईड हा खऱ्या सायकलिंग संस्कारांचा नमुना होता...

 महेंद्राचा एकीकडे २०० किमीचा संकल्प होता, तर दुसरीकडे जितेंद्राचा शतक मारण्याचा आत्मविश्वास होता ... त्यामुळेच प्रत्येक पेडलस्ट्रोक सतत प्रेरणा देणारा होता...

खोपोलीच्या शिवाजी चौकात छत्रपतींच्या जिरेटोपाबरोबर मस्त फोटोग्राफी झाली... नंतर पुढे नॉनस्टॉप पळस्पे फाटा गाठला... अवघ्या दीड तासात ३० किमी पार करण्याचा वेग… म्हणजे जितेंद्राच्या वाढलेल्या क्षमतेवरचा जबरी परिपाक होता.

महेंद्राने वाशी पुलापर्यंतची साथ दिली... तेथून तो कल्याणकडे निघाला... दोनशे किमी पूर्ण करण्याच्या जिगरीने...

माझ्यासह जितेंद्र घरी पोहोचेपर्यंत दोघांची शतकी राईड पूर्ण झाली होती... अगदी आरामात आणि मस्त मजेत... जितेंद्राची जिद्द आणि महेंद्रची मेहनत फळाला आली...

 नॉनस्टॉप खंडाळा घाटासह पूर्ण केलेली शतकी राईड निलगिरी उटी सायकल वारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.

 योग्य नियोजन, सकारात्मक नेतृत्व, संघभावना आणि स्वतःवरचा विश्वास असेल, तर कोणताही घाट पटकन पार होतो... मग खंडाळा क्या चीज है...

महेश दाभोळकर आणि परिक्षीत पाध्ये यांचे मनःपूर्वक आभार...

 महेशने आयोजित केली ही खंडाळा घाटमाथा वारी... सर्व सायकलिस्टना एकच संदेश देते... थांबू नका… पेडल फिरवत राहा… शिखर आपोआप गाठता येते...

सतीश जाधव
7977690693

Sunday, December 14, 2025

संगीताच्या जागतिक विक्रमाला गवसणी...दिनांक. १३ डिसेंबर २०२५

संगीताच्या जागतिक विक्रमाला गवसणी...

दि. १३ डिसेंबर २०२५

पुन्हा एकदा सोगोप्रीत आयोजित कराओके गाण्याच्या जागतिक विक्रमात सहभागी होण्याचा सुवर्णयोग जुळून आला.

मोठमोठ्या सायकलिंग इव्हेंट्समुळे सोगोच्या कार्यक्रमांमध्ये नियमित उपस्थिती आव्हानात्मक ठरत होती.... मात्र, “आपण जागतिक विक्रमाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत” हे प्रीती दीदींचे शब्द प्रेरणा देणारे ठरले.... सोलो गाणे घेऊन या ऐतिहासिक प्रवासात सहभागी होण्याचा निर्धार पक्का झाला. घरी सराव करून तयारी शक्य आहे, हा आत्मविश्वास त्यामागे होता...

तितर चे एक सुंदर गाणे मिळाले… आणि योगायोग पाहा... युगल गीतासाठी तेजश्रीसारखी गुणी सहकारी गायिका सुद्धा मिळाली...

पंढरपूर ते पंजाब सायकल वारी, अष्टविनायक सायकल वारी अशा उपक्रमांमुळे सलग पाच सराव सत्रांना उपस्थित राहता आले नाही. तरीही, होऊ घातलेल्या जागतिक विक्रमात खारीचा वाटा दमदारपणे उचलायचा असा दृढनिश्चय कायम होता...

तेजश्रीदेखील दिवाळीच्या दिवसांत घरी येऊन मनापासून सराव करत होती... हीच खरी समर्पणाची खूण होती...

दोन्ही गाण्यांना चित्रपटातील कलाकाराने घातलेल्या ड्रेस बरोबर आपला पेहराव साम्य दर्शक असावा असा प्रयत्न होता... यासाठी मुलगी शरयू आणि बायको स्वप्ना यांचे खूप सहाय्य लाभले... काळा-लाल स्ट्रिपवाला पांढरा टीशर्ट मिळेना मग शेवटी गाड्यांना लावतात ते फ्लूरोसंट प्लास्टिक कागद आणून टीशर्टला चिकटवले...

“तितर के दो आगे तितर… कच्चा पापड, पक्का पापड धर्तीवर जिभेच्या कसरती घेणारे, पुनरुक्तीने भरलेले हे गाणे एकाग्रतेची कसोटी पाहणारे होते...

त्यात सिमी गरेवाल आणि आशा भोसले यांची वेगवेगळी स्वरपट्टी..  त्यामुळे कसून, शिस्तबद्ध सराव अपरिहार्य ठरला...  गाणे मुखोद्गत झाल्यावर त्यातील गद्य-पद्य, लय-ठेका याकडे बारकाईने लक्ष देता आले...  या सगळ्याचा परिणाम अंतिम शोमध्ये ठळकपणे दिसून आला...

मेरी बुलबुल तू ना हो गुल… या गाण्याची सुरुवात तेजश्रीच्या आलापाने होत असल्यामुळे पुढील अंतरा सहजपणे खुलत गेला... तिच्या बहारदार सुरुवातीमुळे वातावरण रोमँटिक झाले... सुंदर आवाज, अचूक ठेका आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे देहबोलीदेखील नकळत बहरून आली...

 सततच्या अवलोकनामुळे रणधीर कपूर हातातील टोपी फेकतो तो क्षण अचूक पकडता आला आणि स्टेजवर तो प्रसंग जिवंत झाला...

दोन्ही गाण्यांचा घरच्या घरी केलेला सराव उपयोगी पडला. शब्द, ठेका आणि भाव यांचा सुंदर मिलाफ त्यामुळे साधता आला... गाणे गाताना ते मनापासू एन्जॉय केल्यामुळे आत्मिक समाधान लाभले...

तेजश्री ही अत्यंत गुणी गायिका आहे. नोकरी, घर आणि लहान बाळ सांभाळूनही सोगोसाठी वेळ देणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे... “मैं हूँ प्रेमरोगी” हे तिचे गाणे तर विशेषच बहारदार झाले. स्टेजवरील तिचा वावर, आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती वाखाणण्यासारखी होती...

खरंच... गाणं गाणे म्हणजे मनाला स्पर्श करणारे, भावनांना शब्द देणारे आणि प्रत्येक क्षण आनंदाने भारून टाकणारे अद्भुत अनुभवविश्व आहे...

सोगोप्रीतबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. शैलेंद्रच्या कल्पक डोक्यातून जन्म घेणाऱ्या भन्नाट संकल्पनांना उत्तम आणि प्रीती अचूक मूर्त स्वरूप देतात... प्रत्येक कलाकाराला त्याच्या वकुबाप्रमाणे गाणे दिले जाते... 

त्यानंतर जबाबदारी येते गायक-कलाकारांची... गाण्याला साजेसा पेहराव, सराव, सादरीकरण, आणि शिस्त हे मोठे टास्क यावेळी सर्वांनी समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न केला...

मुख्य मुद्दा होता...  गाण्याचे पाठांतर आणि कराओकेच्या ठेक्यावर अचूक गायन... काही ठिकाणी गफलत दिसली; उत्कृष्ट गळा असतानाही ठेका चुकला, तेव्हा कलाकारांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्टपणे जाणवत होते.

या वेळी साउंड सिस्टिम मध्ये उणिवा आढळल्या... हमिंग साउंड येणे, माईक काम न करणे, एकदम लाऊड आवाज येणे... यावर पुढच्या वेळी नक्कीच मात करता येईल...

हॉल मधील जास्त कुलिंग मुळे थंडी वाजण्याच्या प्रकारामुळे बाहेर जावे लागत होते... तर मेकअप रूम मध्ये गरम होत होते...

कँडिड फोटो काढण्यात वाकबगार असलेला फोटोग्राफर संतोष म्हणजे क्षणांचे सौंदर्य अचूक टिपणारा कलाकार...  न दिसणाऱ्या भावनांना, नैसर्गिक हसण्याला आणि अनपेक्षित क्षणांना कॅमेऱ्यात कैद करण्याची त्याची नजर विलक्षण आहे... स्टेजवर त्याची वावरण्याची  ऊर्जा असो किंवा पडद्यामागील सहज भाव... संतोषच्या कॅमेऱ्यातून प्रत्येक फ्रेम जिवंत होते आणि त्या आठवणींना कायमस्वरूपी रूप मिळते...

आता सोगो एका विशिष्ट पातळीवर, एका उंचीवर पोहोचली आहे. त्यामुळे सोगो परिवारासाठी गात असलेले गाणे उच्च दर्जाचे, आशयसमृद्ध, प्रेरणादायी होणे आणि सोगोच्या मूल्यांना साजेसे असणे आवश्यक आहे... ही जाणीव प्रत्येकाकडून जोपासली जाणे अतिशय महत्त्वाचे आहे...

या कार्यक्रमात जगभर कीर्ती मिळवलेले, ८७ वर्षीय मेंडोलियन वादक किशोर देसाई यांची उपस्थिती लक्षणीय ठरली... वयाच्या या टप्प्यावरही त्यांच्या बोटांतून झरणारी मेंडोलियनची मधुर स्वरधारा अनुभवताना काळ जणू थांबून गेला होता... 


वो चांद खिला ये तारे हंसी... या अजरामर गीताच्या सुरांनी संपूर्ण सभागृह प्रेममय भावनांनी भारावून  गेले, प्रत्येक मनात आनंद, आदर आणि विस्मय दाटून आला होता. संगीताच्या सामर्थ्याने वयाच्या सर्व मर्यादा ओलांडत त्यांनी उपस्थित प्रत्येकाला अविस्मरणीय क्षणांची देणगी देऊन गेली...

सोगोच्या आगळ्या-वेगळ्या, हटके थीमनुसार हा कार्यक्रम उल्टा-पुल्टा शैलीत आयोजित करण्यात आला होता. पुरुषाने स्त्री चे तसेच स्त्री ने पुरुषाचे गाणे गायचे होते... हेच सर्व कलाकारांसाठी मोठे चॅलेंज होते... आणि हे जागतिक विक्रमाचे शिवधनुष्य प्रत्येकाने पेलले याचे विशेष कौतुक आहे...

द ग्रेट शोमन... महान कलाकार राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ६३ गाणी आणि ४० कलाकारांच्या सहकार्याने हा सात तासांचा भव्य उपक्रम साकारला गेला...

त्यामुळेच आर. के. फिल्म्सच्या गीतांवरील या कराओके शोमध्ये गायक म्हणून दिलेल्या आपण सर्वांच्या मौल्यवान योगदानाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार...

 हा कार्यक्रम एका उत्कृष्ठ सादरीकरणा बरोबर... संगीत, अभिनय आणि भावनांचा अविस्मरणीय उत्सव होता...

याच कलात्मक, समर्पित सहभागामुळे OMG बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी जागतिक विक्रमाबद्दल सर्वांच्या कला, प्रतिभा आणि योगदानाचे मनापासून कौतुक केले...  प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले...  हाच क्षण सोगो परिवारासाठी अभिमानाचा ठरला आहे...

सतीश जाधव

7977690693


Saturday, November 29, 2025

रूडाबाईची बाव, अडालज दि. २९ नोव्हेंबर २०२५

रूडाबाईची वाव, अडालज दि. २९ नोव्हेंबर २०२५

अहमदाबाद येथे  प्रीती दिदीच्या मुलीच्या... साक्षीच्या लग्नाला आलो असताना रुडाबाईची बाव पाहण्याचा योग आला...

अहमदाबाद शहरातील अडालज उपनगरात असलेली ही बाव पाच मजल्यांची  आहे. बावची रचना, नक्षीकाम, शिल्पकला हे धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आणि भौगोलिक गरजाच्या समन्वयानुसार करण्यात आली आहे...

तसेच ही बाव पाण्याच्या सोई  बरोबरच...  जनता, प्रवासी, धार्मिक श्रद्धा, वास्तुशास्त्र या साऱ्यांचा संगम आहे...

ही आयताकृती बाव (विहीर)  मराठा गुर्जर वास्तुकलेवर आधारित आहे... ह्या बावचे बांधकाम दक्षिणोत्तर आहे...

 दक्षिणेकडील बाजूला  तीन प्रवेशद्वार असून, अष्टकोनी आकाराचे मोकळे छत आणि सोळा स्तंभांनी वेढलेला पहिला मजला चौकोनी आहे...

 येथे प्रत्येक कोपऱ्यात सुंदर छतासह एक छोटी खोली आहे... इथून संपूर्ण बावची रम्य सममिती आकर्षक दिसते... 

या विहिरीतील इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक छोटी भिंत आहे आणि ती भिंत सरळ रेषेत खोलीपर्यंत पुढे गेलेली आहे...

उत्तरेकडील बाजूस पाच मजली अष्टकोनी बांधकाम असलेल्या कुंडाच्या चारही बाजूंनी नजाकतदार पायऱ्यां वरून प्रवेश करता येतो.

खांब, भित्तिस्तंभ, नक्षीकाम, सरदारांचे प्रतिमा शिल्प सूक्ष्म कोरीव काम गुर्जर स्थापत्य शैलीत  केलेले आहे. 

या बावमध्ये अनेक महत्त्वपूर्ण शिल्पांचा समावेश आहे...  नवग्रहांच्या  राशीला दहा-दहा अंशांच्या भागांत विभागून ग्रहांची अचूक स्थिती दर्शवणारी दशाही पाटिका आहे... तसेच  गुडघे टेकून बसलेल्या राजाचे चित्रण व ऊंटावर बसलेला सैनिक आणि देवींची प्रतीकात्मक चित्रे आहेत...

या बावचे बांधकाम १५व्या शतकात सुरू झाले आणि १६व्या शतकात पूर्ण झाले.

रुडाबाई बावचा इतिहास अतिशय रोमांचक आणि प्रेरणादायी आहे...

दांडी राज्याचा आणि वाघेला वंशाचा राजा राणा वीर सिंग याने या बावचे बांधकाम सुरू केले होते... 

परंतु गुजरात सल्तनतचा राजा महमूद बेगडा याच्या बरोबर झालेल्या लढाईत राणा वीर सिंग याला वीर मरण आले... त्यामुळे ही बाव अपूर्ण राहिली..

महमूद बेगडा याने राणा वीर सिंग याची बायको रुडाबाई हिला स्वतःशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला...


राणी रुडाबाई हिने पतीने सुरू केलेल्या बावचे  काम पूर्ण करण्याची अट घालून त्याच्या  प्रस्तावाला मान्यता दिली...

बाव पूर्ण झाल्यानंतर, आपला पती राणा वीर सिंग यांच्या वीर मरणाला कलंक लागू नये म्हणून  राणी रुडाबाईने या बाव मध्ये  उडी मारून प्राण त्याग केला... म्हणूनच ही बाव त्यागमूर्ती रुडाबाईची बाव म्हणून प्रसिद्ध झाली आहे...

रुडाबाईचा... जनतेला जल मिळण्यासाठी केलेल्या त्यागाचा... लोकसेवेचा आणि भारतीय नारीच्या चारित्र्य संपन्नतेचा इतिहास शिकवलाच गेला नाही... हीच खंत आहे...

सतीश जाधव

Tuesday, October 21, 2025

हिमालयाची सावली... दिवाळीला पावली... दि.२१.१०.२०२५

हिमालयाची सावली... दिवाळीला पावली...

दि. २१.१०.२०२५

दिवाळीच्या मोठ्या दिवशी सायकलिंग परममित्र जयंती गाला याच्या गिरगाव येथील घरी  जितेंद्र आणि जयेश यांच्या बरोबर सदिच्छा भेट दिली.

नवरात्रीमध्ये जयंतीचा पाय मुरगळल्यामुळे त्याला दुखापत झाली होती... आणि डॉक्टरांनी त्याला दोन महिने आराम करण्यास सांगितले होते... जयंतीने घरात बसणे म्हणजे वाघाला पिंजऱ्यात बंद करणे होते... पण जयंतीने वॉकरवर चालत येऊन आमचे स्वागत केले... त्याच्या जिद्दीने आणि उत्साहाने सर्वांना प्रेरित केले...

बोलण्यातली त्याची ऊर्जा अजूनही तितकीच तेजस्वी होती, आणि फोटो काढणे हे त्याचे आवडते काम अजूनही त्याला आनंद देत होते.

त्याच्या भेटीबरोबर त्याच्या वडिलांचीही भेट झाली. अर्धांगवायूमुळे गेली पंधरावर्ष अंथरुणात असलेले ८५ वर्षांचे बाबा म्हणजे खरा चमत्कार होते... सतत अंथरुणात असूनही त्यांना कुठेही बेडसोर नव्हता की चेहऱ्याचे तेज कमी झालेले नव्हते.... त्यांच्या जोडीला होता परमेश्वर नावाचा सेवक...आणि जयंती सारखा मुलगा... पंधरावर्ष जयंतीने दिलखुलासपणे वडिलांची सेवा केली आणि अजून करतो आहे... त्याची चिकाटी आणि मनाची उर्मी पाहून आम्ही सर्व सायकलिस्ट स्तिमित झाले होतो...

एक फोटो काढला तेव्हा जयंतीच्या वडिलांच्या  चेहऱ्यावर उमटलेली हास्याची लकेर मनात खोलवर घर करून गेली.

असा मित्र आणि त्याचे पितृतुल्य वडील... आपत्कालीन परिस्थितीत कसे जगायचे... प्रेमाने आणि धैर्याने कसे वागायचे याचा अमूल्य धडा देत होते...  अशा व्यक्तींचे आपल्या जीवनात अस्तित्व असणे हिच खरी श्रीमंती होती...

आज खरं तर सर्ली सायकलचेही आभार मानायला हवेत, ज्यामुळे जयंतीच्या अंतरंगाची जवळून ओळख होऊ शकली...

आजचा दिवाळीचा दिवस आभाळापेक्षा मोठा झाला होता...  आणि तो अंत:करणाला उजाळणारा अनुभव देणारा ठरला...

एक हिमालय आणि तितकीच मोठी सावली... याचे प्रत्यंतर आले होते...

सतीश जाधव

7977690693