Saturday, December 27, 2025

नॉनस्टॉप जिद्द… नॉनस्टॉप खंडाळा घाट... दि. २७ डिसेंबर २०२५

नॉनस्टॉप जिद्द… नॉनस्टॉप खंडाळा घाट... दि. २७ डिसेंबर २०२५

खंडाळा घाट चढलो नॉनस्टॉप दमदार…
श्वासात जिद्द, पायात वेग साकार…

पहाटे सव्वा चारची वेळ, शहर अजून झोपेत होते..सर्लीची ऊर्जा मात्र सकाळीच फुरफुरत होती...


 दादरहून खोपोली लोकल पकडली...आणि तेथून सुरू झाली खऱ्या अर्थाने प्रेरणादायी सफर.

प्रतिथयश ब्लॉगर महेश दाभोळकर यांच्या नियोजनाखाली, परिक्षीत पाध्ये यांच्या काटेकोर साथीने खोपोलीहून खंडाळा घाटाची राईड सकाळी सव्वा आठ वाजता सुरू झाली. 


चाळीसहून अधिक जुने आणि नवोदित सायकलिस्ट होते... प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आणि मनात एकच संकल्प होता... खंडाळा घाट पार करणे...


वाहतुकीची गर्दी, वळणावळणाचा घाट, हेड विंड आणि तरीही सव्वा तासात न थांबता टॉप गाठण्याचा पराक्रम साध्य झाला... वाटेत विशांत माझी स्पेशल व्हिडिओ ग्राफी करत होता... कलात्मक ॲगलने फोटो पण काढत होता...

सर्व सायकलिस्तानी एकदम रुबाबात खंडाळा घाटमाथा गाठला होता... सर्वांनी एकच जल्लोष केला... 

राजमाची पार झाल्यावर वेध लागले लोणावळा झीरो पॉईंटचे... खंडाळा लोणावळ्याच्या गर्दीतून वाट काढत झीरो पॉईंटवर पोहोचताच आनंद द्विगुणित झाला. प्रत्येकाने झकास फोटो काढले...


माझा विठू माऊलीच्या पोज मधला फोटो एकदम व्हायरल झाला...

 नंतर वारी निघाली दादांची मिसळ खायला कार्ल्याच्या दिशेने...
 

मडक्यात आलेली तुपाच्या धुराने स्मोकी झालेली मिसळ खाणे म्हणजे तृप्त करणारी मेजवानी होती...

 यानंतर सुरू झाली वेगवान परतीची राईड... लोणावळ्याच्या वाढलेल्या गर्दीमुळे प्रसंगी सायकल ढकलत पुढे न्यावी लागली... खंडाळा तलावाजवळ फोटो काढले...


त्यानंतर राजमाची पासून भन्नाट उतार सुरू झाला... येथे सावधगिरी, नियंत्रण आणि अनुभवाची खरी कसोटी होती...

साथीला होते जितेंद्र जैन आणि महेंद्र निकम... यांच्यासोबत केलेली उताराची सुरक्षित आणि शिस्तबद्ध राईड हा खऱ्या सायकलिंग संस्कारांचा नमुना होता...

 महेंद्राचा एकीकडे २०० किमीचा संकल्प होता, तर दुसरीकडे जितेंद्राचा शतक मारण्याचा आत्मविश्वास होता ... त्यामुळेच प्रत्येक पेडलस्ट्रोक सतत प्रेरणा देणारा होता...

खोपोलीच्या शिवाजी चौकात छत्रपतींच्या जिरेटोपाबरोबर मस्त फोटोग्राफी झाली... नंतर पुढे नॉनस्टॉप पळस्पे फाटा गाठला... अवघ्या दीड तासात ३० किमी पार करण्याचा वेग… म्हणजे जितेंद्राच्या वाढलेल्या क्षमतेवरचा जबरी परिपाक होता.

महेंद्राने वाशी पुलापर्यंतची साथ दिली... तेथून तो कल्याणकडे निघाला... दोनशे किमी पूर्ण करण्याच्या जिगरीने...

माझ्यासह जितेंद्र घरी पोहोचेपर्यंत दोघांची शतकी राईड पूर्ण झाली होती... अगदी आरामात आणि मस्त मजेत... जितेंद्राची जिद्द आणि महेंद्रची मेहनत फळाला आली...

 नॉनस्टॉप खंडाळा घाटासह पूर्ण केलेली शतकी राईड निलगिरी उटी सायकल वारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.

 योग्य नियोजन, सकारात्मक नेतृत्व, संघभावना आणि स्वतःवरचा विश्वास असेल, तर कोणताही घाट पटकन पार होतो... मग खंडाळा क्या चीज है...

महेश दाभोळकर आणि परिक्षीत पाध्ये यांचे मनःपूर्वक आभार...

 महेशने आयोजित केली ही खंडाळा घाटमाथा वारी... सर्व सायकलिस्टना एकच संदेश देते... थांबू नका… पेडल फिरवत राहा… शिखर आपोआप गाठता येते...

सतीश जाधव
7977690693

No comments:

Post a Comment