Monday, February 22, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सहावा) तोरणमाळ ते प्रकाशा

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सहावा)  तोरणमाळ ते प्रकाशा
०३.०१.२०२१

सकाळी पाच वाजता जाग आली. बाजूला असलेल्या बाबाजींच्या घंटा नादाने मन एकदम प्रसन्न झाले. त्यांची पूजा सुरू होती. थोडावेळ मेडिटेशन केले आणि बाजूच्या नर्मदा तलावावर आंघोळ करायला गेलो. 
पहाटेच्या वेळी नर्मदा तलावाचे वेगळे रूप पहायला मिळाले. सकाळच्या थंड वाऱ्याच्या झुळकीवर तलावात उठणाऱ्या लहरी... मनातील विचारांचे तरंग शांत करीत होते. खूप वेळ अनिमिष नजरेने नुसत्या लहरणाऱ्या लाटांकडे पाहत होतो.

आन्हिके आटपून... बरोबर असलेल्या नर्मदा मैयेची पूजा करून... गुरू गोरखनाथ बाबांच्या  मंदिरात गेलो. बाबांसह मंदिरातील दोन शिवलिंगाचे दर्शन घेतले. तेथील महंत संजूनाथ बाबांनी बालभोग दिला. त्यांचे आशीर्वाद घेऊन तोरणमाळ वरून प्रस्थान केले.

मच्छिन्नद्रनाथ गुंफा तोरणमाळ पासून साडेतीन किमी अंतरावर आहे. अपहील आणि ऑफ रोडिंग रस्ता होता. एका ठिकाणी रस्ता संपला. सायकल तेथेच ठेऊन, पायऱ्या उतरत उतरत गुंफेत जावे लागले. गुंफेजवळ केसरी पताका लावल्या होत्या. तसेच गुंफेचा आतील भाग शेंदुराने रंगविलेला होता. गुहेच्या आतमध्ये जवळपास शंभर पावले चालत जावे लागले. काही ठिकाणी खूप खाली वाकून पुढे जावे लागले. समोरील एक चौथऱ्यावर गुरू मच्छिन्नद्रनाथांची मूर्ती विराजमान होती. त्यांच्या मागे कपारीतून पाणी ठिबकत होते.
 विशेष म्हणजे गुंफेतील वातावरण अतिशय ऊबदार होते. तसेच या गुंफेत मोबाईल नेटवर्क एकदम झकास होते. जवळपास कुठेही टॉवर नव्हता. तसेच निबिड जंगलात डोंगराच्या कपारीत ही गुंफा होती. मग एव्हढे स्ट्रॉंग नेटवर्क कसे... अंतराळातील एकवटलेल्या रेडिओ लहरींचे ज्ञान आपल्या ऋषी मुनींना होते...  याची प्रचिती आली. आपले ऋषी वैज्ञानिक सुद्धा असावेत. असाच प्रत्यय समर्थ रामदास स्वामींच्या शिवथरघळ येथे आला होता. थोडा वेळ या गुंफेत ध्यानस्थ बसलो... येथून मित्र, आप्तस्वकीयांना फोन लावले...तसेच फोटो सुद्धा शेअर केले. तोरणमाळला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही गुंफा जरूर पहावी.
 
शहादाकडे सायकलिंग सुरू झाले. नंदुरबारच्या माईलस्टोन  बोर्डाजवळ जेम्स बॉण्डच्या अविर्भावात संजयचा फोटो काढला.
पुढे तोरणमाळच्या वेशीवर नागार्जुन देवाचे मंदिर लागले. ही देवता संन्यास, वैराग्य, तत्वज्ञान आणि धर्म विचारांचा आशय सांगणारी आहे. येथील मूर्ती ११ व्या शतकातील यादवकालीन आहेत. 
तोरणमाळ घाट उतरायला सुरुवात केली. रस्त्याच्या वळणावर एक साप मरून पडलेला आढळला. गाड्यांच्या चाकाखाली त्याच्या चिंधड्या झाल्या असत्या... सायकल थांबवून त्या मृत सर्पाला बाजूच्या झाडीत अलगद नेऊन ठेवला.

 पुढे निसर्ग पर्यटन केंद्र लागले...अतिशय सुंदर  व्हिव पॉईंट होता. जळगाव वरून आलेले पर्यटक येथे भेटले. आम्ही सायकल वरून नर्मदा परिक्रमा करतोय, याचं त्यांना खूप अप्रूप वाटलं. त्यांनी परिक्रमेबाबत माहिती घेतली, तसेचआवर्जून आमच्या सोबत फोटो काढले. असे भेटणाऱ्या आणि अनभिज्ञ असणाऱ्या मंडळींच्या मनात नर्मदा परिक्रमेबाबत आस्था निर्माण करणे, हा सुद्धा उपयुक्त उपक्रम आहे हे जाणवले.
 
लेघापाणी गावाजवळ औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र लागले.गावातील मुले सायकल पाहण्यासाठी अवतीभोवती जमा झाली. सोबत असलेली चॉकलेट त्यांना दिली. गियरवाल्या सायकल बद्दल त्यांच्या मनात खुपच कुतूहल होते. एक-एक करून सर्वांना सायकल वर बसविले. त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद... खूप काही सांगून गेला...

वाटेत काही मुले डोंगराचा रानमेवा... बोरे घेऊन बसली होती. आम्ही पण लहान झालो. संजय तर त्या मुलांच्या बाजूला मांडी घालून बसला. दोघांनी  बसून  मनसोक्त बोरे खाल्ली आणि पाठपिशवीत सुद्धा भरून घेतली. त्या मुलांनी फक्त वीस रुपये घेतले. परंतु पुढे आल्यावर आम्हा दोघांनाही काहीतरी चुकल्यासारखे वाटले. वीस रुपयात एक वाडगाभर बोरे घेण्याऐवजी जवळपास सर्व बोरे आम्ही पिशवीत भरली होती. त्या लहान मुलांपेक्षा आम्ही छोटे झालो याची जाणीव झाली...

खरं तर आज आमचा फळे खाण्याचा फिस्ट दिवस होता... पुढे लकडकोट गावात रस्त्याजवळच्या एका शेतात ऊस तोडीचे काम सुरू होते. शेतात फतकल मारून ऊस तोडणीचे काम केले.  मालक संतोष महाडिक यांनी ऊसाचे मोठं कांड... काढून दिले. आता दातांची परीक्षा होती... आम्ही उत्तम मार्कने पास झालो होतो... खूप वर्षांनी दातांनी ऊस सोलाला होता.  शाळेजवळ येणाऱ्या गंडेरीवाल्याची आठवण झाली. नर्मदा मैय्या आम्हाला बालपणात घेऊन गेली होती.

म्हसावद गावाच्या सीमेजवळ पोहोचलो. अनिल सूर्यवंशी यांनी सहा एकर शेतामध्ये पपईची प्रचंड मोठी बाग तयार केली होती. त्यांचा धाकटा मुलगा चेतन सूर्यवंशी आमच्या बरोबर बागेत होता. बगीच्यातील झाडे पपईने लगडली होती. तीन पिवळ्या धम्मक पपई आमच्या पुढ्यात आल्या. तजेलदार आणि अतिशय सुमधुर पपई खातांना आम्ही तल्लीन झालो होतो. सूर्यवंशींचा मोठा मुलगा भूषण मुंबईतील वरळीच्या पोतदार रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेतोय, हे ऐकून आनंद झाला. मुंबईला गेल्यावर त्याला भेटण्याचे आश्वासन चेतनला दिले आणि पुढे प्रस्थान केले. 

दुपारचे दोन वाजून गेले होते. विविध फळे खाल्ल्यामुळे पोट तुडुंब भरले होते. एक बरं असतं... सायकलिंग करत असल्यामुळे खाल्लेले सर्व पदार्थ सहजपणे जिरून जातात.  सायकलिंग करताना, खाण्याची आवड... मनसोक्त जोपासता येते. 

तासभर सायकलिंग केल्यामुळे... भुकेने उचल खाल्ली होती. म्हसावद गावातील पंचकृष्ण हॉटेलवाल्याने पंचरंगी नास्ता दिला. भजी, फाफडा, गोड गाठया, जिलेबी चिवडा, कचोरी, मिसळ  या एकामागोमाग एक आलेल्या पदार्थांनी बहार आणली. उन्हाचा कडाका कमी होई पर्यंत बराच वेळ या हॉटेलमध्ये बसलो. येथून प्रकाशा चोवीस किमी आहे. नास्त्या सोबत गावकऱ्यांशी मस्त गप्पा सुद्धा मारता आल्या. 

महाराष्ट्र देशा, कणखर देशा सोबत सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचा उत्तर भाग पहात होतो. येथील काळया कसदार जमिनीत ऊस, कापूस, हरभरा,गहू या पिकांसोबत बराच भूप्रदेश हिरवळीने व्यापला होता. नंदुरबार जिल्हा तसा कमी पर्जन्यमानाचा प्रदेश आहे. परंतु ईरिगेशन प्रकल्प मोठ्या प्रमाणात येथे राबविल्यामुळे जमिनीत खरीप, रब्बी आणि जोड पिके सुद्धा घेण्यात येत आहेत.

वाटेत मेंढपाळ मेंढे, बकरे यांचा कळप घेऊन चालले होते. एक छोट्टस आणि गुबबूबीत कोकरू सायकल जवळ आलं... त्याला  मायेने उचलून घेतले...  त्याला प्रेमाची भाषा समजली... अलगद  कुशीत विसावलं... मायेची ऊब असीम आनंद देऊन गेली... आज नर्मदा मैय्या वेगवेगळ्या रूपाने आपले दर्शन देत होती..

आसमंतात तळपत्या सूर्याभोवती ढगांनी गर्दी केली होती. शेतात उगवलेल्या कापसाच्या बोण्डातून उडणारा कापूस सूर्याभोवती जमा झाला आहे याचाच भास झाला...संजयची राईड "नर्मदे हर" चा जप करत, दिमाखदारपणे सुरू होती. 

काथरडा खुर्द गावात शेताच्या बाजूला एका मचाणावर टोम्याटोची पिशवी घेऊन रामदास भाऊ बसले होते. आम्हाला पाहताच टोम्याटो खायला दिले. आज पोटात एव्हढी जागा कशी होत आहे याचं कोड पडलं होतं.  रामदासभाऊ आपल्या शेतातील ताजे टोम्याटो प्रत्येक परिक्रमावासीला देऊन त्याची सेवा करतात. संजय म्हणाला, 'आज नर्मदा मैय्या आमची मजा मजा करवते आहे'. 

प्रकाशा येथे केदारेश्वर महादेव मंदिरात सव्वा पाचला पोहोचलो. जवळच पुष्पदंतेश्वर मंदिर तसेच काशी विश्वेश्वर मंदिर आहे. श्री सद्गुरू दगाजी महाराज धर्मशाळेच्या मोठ्या हॉल मध्ये आमच्या विश्रामाची व्यवस्था झाली.

तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या प्रकाशाला दक्षिण काशी म्हणतात. येथे पुलिंदा, गोमाई आणि तापी नदी यांचा संगम झाला आहे. तेथेच संगमेश्वर महादेव मंदिर आहे.

आषाढ शुद्ध सप्तमीला  सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव नदीला साडी अर्पण करण्यात येऊन साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षापासून सुरु असलेल्या या अनोख्या परंपरेत खान्देशासह गुजरात राज्यातील  शेकडो भाविक सहभागी होऊन तापी मातेचे पूजन  करतात.

 प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिराच्या सभामंडपात सूर्यकन्या तापी मातेची मूर्ती आहे.  संगमरवरी दगडातील  देवीच्या मूर्तीचे दर्शन करण्यासाठी आषाढ महिन्यातील  सप्तमीला येणारा तापी नदीचा जन्मोत्सव भाविकांसाठी पर्वणी ठरतो. तापी नदीची मूर्ती अन्य कोठेही नाही. चार भुजा, डोक्यावर मुकूट, एका हातात शंकराची पिंड, दुसऱ्या हातात डमरु अशी ही मूर्ती पूर्वाभिुमख आहे. 

 सायंकाळी जवळच्या तापी नदीत स्नानसंध्या आटपून नर्मदा मैयेची पूजा केली. संत श्री दगाजी महाराज आश्रमाकडून रात्रीच्या अन्नप्रसादीची व्यवस्था झाली. आश्रमाच्या धर्मशाळेत चार बस मधून जवळपास दोनशे परिक्रमावासी आले होते. 

 बाजूच्या श्री राम मंदिरात 'हरे कृष्णा, हरे राम' चा अखंड जप रात्रभर चालू होता. आता सर्व परिस्थितीशी जुळवून घेण्याची शक्ती नर्मदा मैयेच्या सहवासाने मिळत होती. फोन वरून सर्वांना खुशाली सांगून झोपेच्या अधीन झालो.

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

3 comments:

  1. Khup chaan mahit ani swata tikde aslyachi anubhuti tumchya lekhat aahe pretek shabdh sambhalun vaprla aahe

    ReplyDelete
  2. मित्राचे अभिप्राय...


    प्रकाशा गावापर्यंतचा उबदार प्रवास वाचताना ही उबदार मायेची अनुभूती देतो..

    नर्मदा, तापीच्या पाण्याची शीतलता आणि फळांचा गोडवा ही चाखायला मिळतो ...

    खूप बहारदार आणि सुखद वर्णन...

    ReplyDelete