Monday, January 25, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस पाचवा) पिपरीकुंड ते तोरणमाळ

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस पाचवा)  पिपरीकुंड ते तोरणमाळ

०२.०१.२०२१

सकाळी मैयेची पूजा केली.   रेवसिंगला पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले. चहा बिस्कीट घेऊन रेवसिंग कुटुंबाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्याने काहीही पैसे घेतले नाहीत. अतिशय प्रेमाने सेवा देण्याची वृत्ती खरोखरच रेवसिंगकडून शिकावी. ही माणसं पाहिली की आपण किती छोट्या जगात जगतो आहोत याची अनुभूती झाली.

ग्रामीण जीवन किती सुंदर आहे याची जाणीव झाली... अतिशय कमी गरजा आहेत त्यांच्या...
खरोखरच रेवसिंगची आनंदी झोपडी खूप भावली...

डोंगराच्या आडून सुर्योदय झाला होता.  रस्ता दिसू लागला होता. पुढचा रस्ता ऑफ रोडिंग, दगड धोंड्यांचा आणि घाटीचा होता. काही ठिकाणी सायकल सामानासह ढकलावी लागली. रस्ता अतिशय निसरडा आणि धुळीचा होता. पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा अवघड अशी ही वाट...

सायकलिंगवाल्यांसाठी तर अतिशय बिकट होती. तीन किलो मीटरचा झरार गावाकडे नेणारा रस्ता... प्रचंड दमछाक करणारा होता. दम खात... थांबत... झरार गावात पोहोचलो. रस्त्यावर एकमेव दुकान होते. गावातली सर्व घरे वरच्या उंच टेकाडावर होती. सकाळीच... दोघेही घामाने थबथबलो होतो. 

रस्त्यावरील त्या एकमेव दुकानात चहा बनवायला सांगितले. 'हाऊ' दुकानातील बाबाजींचा होकार आला. अतिशय छोटेखानी घर, त्यात दुकान आणि गाईचा गोठा होता. चुलीजवळ काम करणाऱ्या मैय्येने चहा आणला.  काळया चहा सोबत बिस्कीटे खाल्ली. दुकानदाराने फक्त बिस्किटाचे पैसे घेतले. अतिशय कमी गरजांमध्ये ही माणसे गुजराण करीत असून सुद्धा प्रेमाने देण्याची दानत आणि सेवाभाव विशेष जाणवला.

झरार गावाचा अतिशय विहंगम परिसर... वातावरण आल्हाददायक आणि प्राणवायूने ओतप्रोत भरलेले...

येथेच मध्यप्रदेशचा वनरक्षक नाका आहे. पुढे दोन किमी वर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. तेथून सोळा किमीवर तोरणमाळ आहे. अजूनही खडकाळ रस्ता संपला नव्हता. मध्येच सायकल ढकलावी लागत होती. महाराष्ट्र चेकपोष्ट आले. कोणीही नव्हते तेथे.

महाराष्ट्रात शिरलो तरीही रस्त्याची स्थिती सुधारली नव्हती. आता तर अवघड चढ उतार होते. सामानासह सायकल चढविणे... एक-एक  गियरवर सुद्धा कठीण होते. काही ठिकाणी सायकल चढविताना गावकऱ्यांची मदत घ्यावी लागली.

तोरणमाळ पर्वतरांगांच्या  शिखरावर पोहोचलो... शिखराच्या वरच्या बाजूला एक बुरुजबंद भिंत लागली. म्हणून सायकल खाली ठेऊन टेकाड चढून गेलो. दगडी भिंतीच्या पुढे गुंफा लागली.

जालंधरनाथ महाराजांची गुंफा होती... तेथे आता बमबम लहरीनाथ बाबांचे वास्तव्य आहे.  अन्नधान्य आणण्यासाठी बाबाजी शहादा गावाच्या बाजारात गेले होते.

येथे नाथ संप्रदायाचे संत जालंधरनाथ यांनी  घोर तपस्या केली होती. आता परिक्रमावासीयांची येथे सेवा केली जाते. अतिशय अवघड ठिकाणी वसलेले हे मंदिर आणि तेथे दिली जाणारी सेवा पाहून स्तिमित झालो. दोन किमी खाली जाऊन पाणी आणावे लागते. थकला भागलेला पारिक्रमवासी जेव्हा येथे पोहोचतो... तेव्हा येथे मिळणारी सेवा त्याला प्रचंड बळ देते. आपल्या बाळाची काळजी घेणाऱ्या नर्मदा मैयेच्या अपार प्रेमाची जाणीव येथे होते...

भोजन प्रसादीची व्यवस्था झाली..  तेथे असलेल्या मैयेने वांग्याची भाजी आणि रोटी भोजनप्रसादी दिली.

तेथे आलेले परिक्रमा करणारे हटयोगी बाबा नर्मदानाथ बैरागी आमच्या बरोबर भोजनाला बसले... संपूर्ण अंगाला भस्म लावलेले, कानाच्या मधल्या भागात मोठी तांब्याची बिकबाळी आणि काळी कफनी घातलेले बाबा खूप प्रेमाने बोलत होते. सायकल घेऊन या मार्गाने आल्या बद्दल त्यांना खूप अप्रूप वाटले आणि आनंद ही झाला...

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश चेक पोष्ट जवळ आलो. तेथे कोणीही नव्हते. वरच्या टेकाडावर एक मजली पांढरी इमारत दिसली. तेथे फोटो काढून महाराष्ट्रात पाय ठेवला.

महाराष्ट्रातील पहिल्यांदा लागलेले गाव बुरुमपाड्यात आलो.

नंदुरबार जिल्ह्यातील हे टोकाकडचे गाव. सामूहिक वन संवर्धन प्रकल्प येथे राबविला जातो आहे.   येथील गावे म्हणजे आदिवासी पाडे आहेत.  याला नवे तोरणमाळ सुद्धा म्हणतात. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आल्याबद्दल खूप आनंद झाला.  महाराष्ट्रात याच शूलपाणी जंगलातून नर्मदा मैय्या वाहते, त्याचा सुद्धा आनंद होता. या बुरुमपाड्यात सुद्धा चहा देऊन सेवा मिळाली.

पुढे तोरणमाळच्या विव्ह पॉईंटवर आलो.

येथून खालच्या दरीत वसलेली अनेक गावे, हिरवेगार जंगल परिसर आणि शेतांचे चौकोन  दिसत होते. एका पाठी एक पसरलेल्या तोरणमाळच्या पर्वतरांगा दिसत होत्या.  नंदुरबार, शहादा फाट्यावर आलो. तेथे गावांच्या नावाचा बोर्ड मराठीत लावलेला होता.
येथून तोरणमाळ, नर्मदा तलाव आणि मुख्य गाव चार किमी अंतरावर आहे.

वर-खाली चढ उताराच्या रस्त्याने तोरणमाळचे मुख्य आकर्षण नर्मदा तलावाजवळ पोहोचलो.

त्याच्या बाजूलाच बाबा गोरखनाथांचा भव्य आश्रम आहे. हे नाथ परंपरांचे सर्वात मोठे सिद्धपीठ आहे. गोरखनाथ बाबा येथे साक्षात विराजमान आहेत. बाबा गोरखनाथांच्या तपश्चर्येने येथे नर्मदा मैय्या पाताळातून प्रकट झाली आहे. म्हणूनच परिक्रमावासी तोरणमाळला आवर्जून भेट देतात. येथील जंगलाला शूलपाणी जंगल म्हणतात.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ आहे. येथे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात यांच्या सीमा आहेत.  पावसाळ्यात सर्व ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात, तसेच सकाळी आणि संध्याकाळी धुक्याचे साम्राज्य असते.

गुरू गोरखनाथच्या मंदिरात विश्रांतीची व्यवस्था झाली. तेथून 'सीता खाई' पाहायला गेलो. खाली खोल दरी दिसत होती.

सीता मैय्या येथेच भूमातेमध्ये विलीन झाली होती. हा एको पॉईंट सुद्धा आहे. येथून मध्य प्रदेशाचा भूभाग दिसतो.

प्रचंड वारे सुटले होते. वाटेत आदिवासी पाडे लागले. तेथील लहान लहान मुले "नर्मदे हर" म्हणत आमच्या मागे धावत होती. एक टपरीवजा दुकान लागले. सायकल थांबवून सर्व मुलांना चॉकलेट वाटले. तेथेच संजयने माझे नामकरण केले, "चॉकलेट बाबा".

समोरच्या झाडातून सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन झाले. काळया ढगांतून डोकावणारे सोनेरी कवडसे निसर्गाचे संगीत गात होते.

मंदिराच्या मागे असलेल्या नर्मदा तलावाच्या काठावर  निवांत बसलो...  सर्व भावना आणि विचार विरहित अवस्थेत या ठिकाणी तल्लीन झालो. वातावरण थंड व्हायला लागले होते.

गोरखनाथ सिध्द पिठाचे मुख्य महंत योगी संजूनाथजी यांनी भोजन प्रसादीची सर्व व्यवस्था केली. मंदिराच्या खालीच विश्रामाची व्यवस्था होती.

ग्रामीण जीवन आणि सेवा भाव यांची फार जवळून ओळख झाली...

मनाचा... मुंबईच्या छोट्या जगातून गावाकडच्या विशाल विश्वात प्रवेश झाला होता.

नर्मदे हर...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

No comments:

Post a Comment