Tuesday, June 21, 2022

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी... सखीचा विश्रांती दिवस.... दि. २१.०६.२०२२

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी 
सखीचा विश्रांती दिवस दि. २१.०६.२०२२

आज गम्मत झाली. दिल्ली गरीबरथ गाडीला लगेज डबा नसल्यामुळे सखीला दुसर्‍या गाडीने दिल्ली प्रवास करावा लागणार होता. तसेच तिची आणि माझी भेट परवा झाली असती. परंतु उद्या पुन्हा दिल्ली-काठगोदाम गाडी पकडायची असल्यामुळे सखीला दुसर्‍या गाडीने पाठविणे शक्य नव्हते. 

यासाठी पंढरीचा विठोबा भक्ताला पावला. पंढरपूरच्या गाडीला सुद्धा लगेज डबा नव्हता. तेव्हा सखीला डिसेमेंटल करून डब्यात सोबत ठेऊन मुंबई पर्यंत प्रवास केला होता.  तीच तिकडम आता दिल्ली पर्यंत करणार आहे...  त्यामुळे सखीला सोबत ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे. 

प्रवास  नवनवीन कल्पनांचा जनक असतो... 
याची प्रचिती आली... 
आहे ना गम्मत... 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे.... 

Sunday, June 12, 2022

संतोष भेट... ईश्वरी संकेत... दि. १२ जून २०२२

संतोष भेट... ईश्वरी संकेत... 
दि.  १२ जून २०२२

         दर रविवारी  मरीन लाईन्स चौपाटीची एक मार्गिका गाड्यांसाठी बंद असते. या निमित्ताने खूप खेळाडू हौशे नवशे चौपाटीवर असतात. आज एका ठिकाणी कराओके संगीत मैफल सुद्धा सुरू होती. खूप जण त्याचा आस्वाद घेत होते... गाणारे सुद्धा पट्टीचे होते... थोडावेळ थांबलो... गाणारे जास्त असल्यामुळे नंबर लागणे कठीण होते.

 एव्हढ्यात परममित्र संतोषची शिर्केची भेट झाली... खूप महिन्यांनी भेटला होता संतोष... त्याच्या सह मुंबई पंढरपूर सायकल वारी केली होती...   येत्या १८ जूनला पुणे पंढरपूर सायकल वारी करतोय... त्या अगोदर संतोषची भेट हा ईश्वरी संकेत होता...
 
 गप्पा मारत मारत मासे घेण्यासाठी ससून डॉकला पोहोचलो. येथे संतोषने डॉकवर आलेल्या विविध पक्ष्याचे अफलातून फोटो टिपले... उत्कृष्ट फोटोग्राफर आहे संतोष... तेथील भारत हॉटेलमध्ये स्पेशल चहा पिताना... जुन्या आठवणींना उजाळा मिळाला... 

संतोषकडे जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक भाव ठासून भरला आहे... वृद्ध आई आणि अपंग बहीण यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले आहे. तसेच स्वतः एका डोळ्याच्या विकाराने ग्रस्त... परंतु या बाबत परमेश्वराकडे कोणतीही तक्रार नाही. जे जीवन वाट्याला आले आहे... ते मस्त मजेत जगणे... हाच संतोषचा ध्यास... आणि सकाळचे दोन तास निसर्गात सायकलिंग करणे हाच श्वास... मान गये मेरे दोस्त... 

या ऊर्जावान मित्राची भेट म्हणजे... पुणे-पंढरपूर ही २४० किमी सायकल सफर एका दिवसात पूर्ण करण्याचे प्रथम पाऊल होते... मन अपार संतोषाने भरून गेले होते... 

आजची ४० किमीची सायकल सफर परममित्र संतोषला अर्पण... 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

Tuesday, June 7, 2022

लडाख सायकलिंग भाग ८..... दि. १२ ते १४ ऑगस्ट २०२१

लडाख सायकलिंग भाग ८
दि. १२ ते १४ ऑगस्ट २०२१

लेहमधील  माल रोडच्या खारडुंग हॉटेल मधून सकाळीच बाहेर पडलो... हानले साठी परमिट मिळविणे तसेच सेलिब्रिटी सोनम  वांगचुक यांची भेट घेणे ही महत्त्वाची कामे करायची होती. हानले परमिटसाठी लेहमधील इरफानचा नंबर मिळाला होता. त्याच्या ऑफिस मध्ये गेलो. हानलेचे परमिट तहसील कार्यालयातून काढून देण्याची कामगिरी इरफानने स्वीकारली. प्रायव्हेट गाडीने जायचे असेल तर रात्री हानलेला राहायची परवानगी नव्हती. त्यामुळे स्थानिक बसने जायचे ठरवले. नेमकी आठवड्यातून एकदाच शनिवारी सकाळी हानलेला जाणारी बस होती, त्याचे बुकिंग केले.

आता सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू झाले... वेब साईटवरून वांगचुक यांचा नंबर काढून फोन केला पण तो बंद होता. मुंबईचा मित्र गजानन कडून लेहचे नगरसेवक श्री ताशी यांचा नंबर मिळाला. ताशी साहेबांनी वांगचुक सरांचा पर्सनल नंबर दिला. फोन केल्यावर वांगचुक सरांचे सेक्रेटरी तेंझिंग यांनी फोन घेतला. त्यांनी आमचा बायोडेटा मागविला... प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना  घेऊन सायकल सफरींचा आतापर्यंत केलेला सर्व सफरनामा... तसेच प्रिझर्व लडाख ही संकल्पना घेऊन लडाख खोऱ्यामध्ये जवळपास १२०० किमी केलेली सायकल सफर... हा सर्व लेखाजोखा वांगचुक सरांना पाठविला... विशेष म्हणजे वांगचुक सरांनी १३ ऑगस्टला सकाळी पावणे दहा वाजता भेटण्याची अनुमती दिली... आमच्या आनंदाला पारावर राहिला नाही... उद्या वांगचुक यांच्या सिकमॉल इन्स्टिट्यूटला सायकलने तासभर लवकरच भेट देण्याचे ठरविले... 

फे गावातील सिकमॉल संस्था, लेह पासून अकरा किमी अंतरावर होती. सकाळी सात वाजता वाजता सायकलिंग करत फे गावाकडे कूच केले... वाटेत लडाखचा राजा नामग्याल यांचा घोड्यावर स्वार झालेला पुतळा लागला. जवळच १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनासाठी झेंडा चौकात जोरदार तयारी सुरू होती...  सेनेच्या हॉल ऑफ फेम मधील म्युझियम मध्ये सकाळ पासूनच जनसमुदाय जमा झाला होता. 

फे गावाकडे वळलो... बडा हिमालयाच्या कुशीत सिंधू नदीच्या तीरावर वसलेले फे गाव निसर्गाचा आविष्कार होता... जसे काही निळ्या आकाशाच्या कॅनव्हासवर हिरव्या, पांढऱ्या, राखाडी रंगांची उधळण करून सुंदर  रांगोळीची आरास केली होती.
 फे मधील सिकमॉल केंद्रात साडेआठ वाजता पोहोचलो. तेथील स्वयंसेवकाने सुहास्य स्वागत केले. वांगचुक सरांना भेटायला अजून तासभर होता... तेव्हढ्या वेळात संपूर्ण इन्स्टिट्यूट पहायचे ठरविले... केंद्र दाखविणारा मुलगा त्या संस्थेचा विद्यार्थी मुंग होता...  
 या संस्थेचे सर्वात मोठे वैशिट्य म्हणजे येथे सोलर एनर्जीचा सर्वत्र उपयोग केलेला आहे... प्रत्येक इमारतीत दिवसाच्या सूर्यप्रकाशामध्येच कामे होतात...  गुरुकुल पद्धतीने दिलेल्या शिक्षण पद्धतीमुळे प्रत्येकाला आपल्या उदारनिर्वाहाची कला शिकता येते... येथे लडाखमधील नापास विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो... फेल्युअर ते टॉपर असा आहे आलेख सिकमॉल संस्थेचा. ही संस्था म्हणजे एक स्थानिक स्वराज्य केंद्र आहे... विद्यार्थ्यांमध्ये निवडणुका होतात... पंतप्रधान निवडला जातो आणि पुढील दोन महिने निवडलेले मंत्रिमंडळ एका प्रोजेक्ट वर काम करते. ते प्रोजेक्ट संस्थेला सादर केले जाते... अशा प्रकारे मुलांनी कीटक विरहित धान्याची कोठारे, टाकाऊ वस्तू पासून कलात्मक वस्तू, रासायनिक खत विरहित शेती, भाज्या वाळविण्याचे ड्रायर, थंडीत गरम राहणारी सोलर झोपडी... जी सध्या कारगिल मधील सैन्यांना अतिशय उपयुक्त ठरली आहे... जल व्यवस्थापनासाठी आईस पिरॅमिड ( जे उन्हाळ्यात डोंगरात  राहणाऱ्या लडाखिंच्या पाण्याचा प्रश्न सोडविते)  माणसांच्या मलापासून सेंद्रिय खत आणि मिथेन गॅस निर्मिती अशा प्रोजेक्ट मधून समाजपयोगी उपक्रम तयार केले आहेत... गाईच्या गोठयाचे तापमान सोलर पॉवर द्वारे नियमित केले आहे.  येथे पुण्याच्या मिलिंद जोशीची भेट झाली. येथील मुलांना शिकवण्या साठी गेली सहा महिने या संस्थेत काम करतोय. 

येथील विद्यार्थ्यांची आईस हॉकीची टीम आहे. ती भारताचे प्रतिनिधित्व करते.स्टुडंट एज्युकेशन आणि कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (Secmol) पर्यावरण  पूरक संस्था आहे
सूर्य प्रकाशाचा  वापर करून भरपूर ऊजेड आणि खेळती हवा तसेच मातीच्या भिंती द्वारे कडाक्याच्या थंडीत आणि कडक उन्हात सुद्धा इमारतीच्या आतील वातावरण उबदार असते. येथील ईमारती साऊथ फेसिंग आहेत. त्यामुळे जास्त वेळ सूर्याचा प्रकाश सोलर एनर्जीसाठी उपलब्ध होतो. Secmol इन्स्टिटय़ुटच्या मुख्य सोलर इमारतीला फ्रान्सच्या टेरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संपूर्ण संस्था पाहून झाल्यावर स्वतः सोनमजी वांगचुक भेटायला आपल्या बंगल्यातून बाहेर आले. बंगल्याच्या गच्चीत  पाहुणचार झाला... तेथील बागेत पिकलेल्या जरदाळूच्या सरबताची ट्रीट मिळाली.. मग सुरू झाली गप्पांची मैफिल...
आम्हाला फक्त पंधरा मिनिटे मिळाली होती...परंतु गप्पामध्ये पाऊण तास कसा गेला समजलेच नाही. 
 वांगचुकजी म्हणाले, "प्रत्येक जण विजेची बचत करून देशाच्या प्रगतीला मदत करू शकतो... फक्त आपले घड्याळ एक तास पुढे करून त्या घड्याळा प्रमाणे कामे केली तर दिवसाच्या उजेडात कामे पूर्ण करू शकले तर रात्रीच्या वेळी लागणार्‍या विजेची बचत होईल" ... लवकर उठा आणि लवकर झोपा हाच तो मंत्र होता... 
 सायकलने लडाखवारी मुळेच सोनमजी वांगचुक यांची भेट झाली होती... कारने, मोटरसायकलने भारत भ्रमंती करणाऱ्यांना सोनमजी भेटत नाहीत याचे मूळ कारण ते प्रदूषणाला हातभार लावतात हे आहे... वयाच्या उत्तरार्धात आम्ही संपूर्ण लडाख वारी करतोय याच त्यांना अप्रूप होते... विशेष म्हणजे सोनमजी सुद्धा लडाख मध्ये सायकलचा  वापर करतात...  लडाखच्या शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल करून नापास विद्यार्थ्यांना टॉपर  करणाऱ्या या अवलीयाला त्रिवार प्रणाम... 

येथून शिखांचा पवित्र गुरुद्वारा... पत्थरसाहिबला भेट दिली... लडाख श्रीनगर रस्त्यावर असलेल्या या गुरुद्वारामध्ये शिखांचे प्रथम धर्मगुरू श्री नानक साहिब यांनी तपश्चर्या केलेली होती... लेह पासून हा गुरुद्वारा २५ किमी अंतरावर आहे. श्री नानकजी यांना मारण्यासाठी राक्षसाने पहाडावरुन टाकलेली मोठी शिळा नानक देवांच्या स्पर्शाने मेण झाली. त्यामुळे राक्षसाला उपरती झाली. आपले जीवन मानव कल्याणासाठी अर्पण कर असा राक्षसाला उपदेश करून त्याचा उद्धार केला. श्री गुरु नानक देवजी यांनी आपल्या पदस्पर्शाने लडाखच्या भूमिला पावन केले आहे. 
लडाख कडील परतीच्या प्रवासात एका छोट्या टेकडीवर पोहोचलो. प्रचंड वारे सुटले होते. वरुन सिंधू नदीचा  व्ह्यू पॉईंट दिसू लागला.लांबवर पसरलेल्या पर्वतरांगा... त्यांच्या शिखरावर दिसणारी पांढुरक्या बर्फाची चादर... सिंधू नदीने एक बाकदार वळण घेतलेले... आणि आकाशात ढंगाची गर्दी... अंग मोहरून टाकणारा अथांग निसर्ग... जीवन जगण्याचा खरा अर्थ हाच आहे... वार्‍याच्या झोतात निसर्गात रममाण झालो. 

लेहमध्ये यायला साडेचार वाजले होते. मिलीटरीच्या "हॉल ऑफ फेम" म्युझियम मध्ये गेलो. युद्धात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करून त्यांना मानवंदना दिली.  

सकाळीच हानले साठी बसने प्रस्थान केल़े. सोमोरीरी कडे सायकलिंग करताना माहे ब्रिज पर्यंत  पेडलिंग केले होते. येथून सिंधू नदीच्या किनाऱ्याने पुढे निघालो. माहे गावा नंतर नोयमा रांगो  करत हानलेला पोहोचलो. हानले गाव  १५ हजार फुट उंचीवर वसलेले आहे. येथे वर्षातील जवळपास ३०० दिवस आकाश निरभ्र असते. येथून रात्री आकाशगंगा दर्शन होते... नेब्यूला म्हणजे दुसर्‍या सूर्यमाला दिसतात... लाखो चांदण्यांचा आकाशात सडा पडलेला असतो. 

गावातील एका उंच टेकडीवर आशिया खंडातील सर्वात उंचीवरील भारतीय वेधशाळा आहे. ज्यामध्ये ऑप्टिकल, इन्फ्रारेड आणि गॅमा-रे दुर्बिणींतून अवकाशातील  वेगवेगळे बदल नोंदविले जातात. ही वेधशाळा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ  ऑस्ट्रोफिजिक्स, बंगलोरद्वारे चालवली जाते. आमचे सायकलीस्ट मित्र डॉ रामेश्वर भगत यांच्या ओळखीमुळेच ही वेधशाळा पाहण्याचा योग आला. 
तसेच लेहचे कार्यकारी कौन्सिलर श्री ताशीजी यांनी आमची राहण्याची व्यवस्था पद्मा गेस्ट हाऊस मध्ये केली होती. उंच पठारावर वसलेल्या हानले गावच्या चारही बाजूला हिमालयाच्या पर्वत रांगा आहेत. 

बीएआरसी ने सुद्धा समोरील टेकडीच्या पायथ्याला प्रचंड मोठा टेलिस्कोप बसविला आहे. त्याच्यासाठी सात ऑबजरवेटरी प्रयोगशाळा आहेत. रात्रीच्या वेळी शास्त्रज्ञ येथे बसुन आकाश निरिक्षण करतात. पृथ्वीवर होणारे उल्कापात आणि इतर खगोलीय माहिती गोळा केली जाते. येथील केअर टेकर कुंदन याने प्रचंड मोठा टेलिस्कोप एकदम जवळून दाखवला. 
गाडीने टेकडीवरील ऑस्ट्रोफिजिक्स वेधशाळेत पोहोचलो... प्रचंड घोंघावणारे थंड वारे सुटले होते. त्या वेधशाळेबाहेर दहा मिनिटे उभे राहणे सुद्धा कठीण होते. दोरजे ने संपूर्ण प्रयोगशाळा दाखविली... जगातील दोन नंबरची उंचावर वसलेली प्रयोग शाळा पाहण्याचे भाग्य आम्हाला मिळाले होते... एखाद्या गुहेचे दार उघडते तसे प्रयोगशाळेतील दुर्बिणीच्या वरची गोलाकार खिडकी घड घड घड करत उघडली. आता प्रयोगशाळेच्या अंतरंगात होतो... हानलेला जाऊन दुर्मिळ अशी प्रयोगशाळा पाहणे हे आमचे भाग्यच होते... येथे थंडी वाढली होती. दोरजे यांनी पद्मा गेस्ट हाऊस मध्ये जीपने सोडले. अंगात जाकिट कानटोपी थर्मल घातले. पण थंडी आवरत नव्हती. अंधार पडायला सुरुवात झाली. तसे आकाशही निरभ्र झाले. 

रात्री आकाशदर्शनाची पर्वणी सुरू झाली. आकाशगंगा ज्यामध्ये अगणित तारे आणि अनंत सूर्यमाला आहेत ... त्या ब्रम्हांडाचे दर्शन याची देही याची डोळा झाले...  डोळ्याचे पारणे फिटले... वजा पाच डिग्री तापमानात रात्री दोन वाजेपर्यंत आकाश दर्शन केले. 
लडाख सायकल सहलीचे सार्थक झाले होते... 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे...