Saturday, July 23, 2022

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी २५ जून २०२२


आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी 
२५ जून  २०२२

बुधी मधील कुमाऊ मंडळ विकास निगमचे रेस्ट हाऊस डोंगराच्या कपारीवर वसलेले होते. सकाळी संपूर्ण परिसर धुक्याने व्यापला होता. आज समोरचा   खडा पर्वत चढून जायचे होते. 

सकाळी साडेसात वाजता दुसरा टप्पा सुरू झाला.  ह्या टप्प्यात साडेसात किमी उभा चढ छियालेक पर्यंत होता. अतिशय धीम्या गतीने सखीची चढाची सफर सुरू झाली.  


येथे सुद्धा रस्त्याची कामे जोरदार सुरू होती. ॐ नमः शिवायचा घोष सुरू केला. कामगारांचा त्याला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे काही वेळ थांबावे लागत होते.

जेसीबी, बुलडोझर यांचे धाडधाड  वाजणे म्हणजे जणूकाही ते हिमालयाशी कुस्ती खेळत होते. अतिशय बाकदार वळणे आणि उंच चढ एकदम अंगावर येत होते. 


काली नदीचा आवाज आता लुप्त झाला होता. काही ठिकाणी डांबरी रस्ता दिसत होता तर काही ठिकाणी मातीने माखलेला खडबडीत रस्ता होता. 

 या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेले होते. नवीन रस्ता बनविण्याबरोबर रस्त्यावरचा मलबा साफ करणे... ही कामे अतिशय चिकाटीने सुरू होती. काही ठिकाणी चिखल मिश्रित रस्ता होता. या चिखलात सायकलची चाके जमिनीत रुतत होती... सायकल चालवणे तर सोडा... ढकलणे सुद्धा कठीण होत होते... अशा वेळी कामगार तत्परतेने मदत करीत होते... 

वर चढत जाणार्‍या घाटात वळणे घेऊन घेऊन दमलो पण वळणे संपायचे नाव नव्हते. तब्बल बावीस वळणे लागली. छियालेख परिसर जवळ आल्याची चाहूल लागली लांबवर आर्मी कॅम्प दिसू लागला. अचानक रस्त्यातच मोठे पाण्याचे डबके लागले.

अंदाज येईना.. किती खोल आहे ते... अशा डबक्यात चिखल असेल तर... सखी त्यात अडकून पडण्याची शक्यता होती...  एका बाजूला खोल दरी तर दुसर्‍या बाजूला दगडांची कपार... सखीने टांस घेतला... डोंगराच्या किनाऱ्याने डबक्यावर चढाई केली... सखीची अर्धी चाकं पाण्यात गेली... पेडलला पाणी लागले... अक्षरशः पेडल बोटी सारखी अवस्था झाली. आता थांबणे म्हणजे नव्या संकटाला आमंत्रण देणे होते. पाण्यात चिखल असल्यामुळे प्रचंड ताकदीने पेडलिंग करत होतो. सखी धीम्या गतीने पुढे सरकत होती. पुढचा काठ जवळ आला... आणि कचकन सखी थांबली... चाके चिखलात रूतली होती... गुढगाभर पाय चिखलात गेला... कशीबशी सखी सावरली... जोरदार रेटा देऊन सखीला बाहेर काढले... प्रचंड दमछाक झाली होती... दोन्ही पाय आणि बूट चिखलाने माखले होते... सखीच्या दोन्ही चाकात आणि डिरेलर मध्ये चिखलाचा थर जमला होता... कसाबसा सखीसह बाहेर आलो. प्रचंड खडतर सफर होती... 

आता  अतिशय उंचावरील खडकाळ रस्त्यावर आलो होतो. ढगांनी  संपूर्ण खोलवरची दरी व्यापून टाकली होती.

जणूकाही समोरील रस्ता स्वर्गारोहण करीत होता. निसर्गाच्या या बेभान आविष्काराचा भाग झालो होतो. त्या निसर्गात रममाण झालो... 

कवडसे... ढगांचे.... 

लपंडाव... धुक्याशी... 

खेळ उन्हाचा... 

सोनुल्या सावल्याशी...

किती सुंदर आहे !!

धरेवरचा स्वर्ग... 

बारा हजार फुटा वरील छियालेख जवळ पोहोचलो होतो. प्राणवायुची कमतरता जाणवायला लागली होती ... परंतू  समोरील मनोरम दृश्याने सगळा थकवा अदृश्य झाला होता...

साडेसात किमीचा घाट चढायला तब्बल साडेतीन तास लागले होते. जवळच्या एका झऱ्याखाली सखीला स्वच्छ केले... पाय आणि बूट धुतले... 

आता सपाटून भूक लागली होती... दूर उंचावर एक मंदिर दिसले...

मंदिरापर्यंत आणखी वर चढण्याचे त्राण नव्हते. जवळच्या गावाकडे जायचे ठरवले आणि  छोटा चढ चढून छियालेख चेक पोस्टकडे आलो...

इतक्यात लांबून कोणीतरी हाक मारली... एक जवान पळत पळत माझ्याकडे येत होता... "ये रस्ता आर्मी कॅम्पमे जाता है" "गुंजी की तरफ जानेका नीचेवाला रस्ता है" त्या जवानाची माफी मागितली... महाराष्ट्रातून आलोय हे कळल्यावर त्याचा चेहरा खुलला... नागपूरच्या सुरेंद्र चव्हाणची भेट झाली होती...  आर्मी कॅम्प मध्ये सुरेंद्र घेऊन गेला... कॅप्टन रावत यांची ओळख झाली... त्यांनी जेवून जाण्याची विनंती केली... खरचं  जेवणाची व्यवस्था कैलास महादेवाच्या कृपेनेच झाली होती. राजमा, भात, पालेभाजी, दही कोशिंबीर, चपात्या असे राजेशाही जेवण झाले... बरेच जवान चौकशी करायला आले होते... एकट्याने आदी कैलास सायकल वारी करतोय याचे त्यांना अप्रुप वाटत होते. सर्व जवानांच्या शुभेच्छा स्विकारुन पुढे पेडलींग सुरू झाले... 

वाटेत चेक पोष्टवर परमीट तपासले गेले... पुढचा रस्ता वरखाली वरखाली असा रोलींग होता. परंतू चिखल मिश्रित असल्यामुळे अतिशय सावधपणे पुढे पुढे जात होतो. आता रस्ता हळूहळू खाली उतरत चालला होता. काली नदीच्या उगमाच्या दिशेने मार्गाक्रमण सुरू होते. निसर्गाची विविध रूपे पाहायला मिळत होती. हिरवळीचा प्रदेश आणि त्यातून वहाणारी काली नदी हे सर्व दृश्य स्वप्नातीत वाटत होते. 

हिरवाई आणि निळाई यांचा अद्भुत संगम झाला होता...

 धवल मेघांनी आच्छादलेले आकाश... 
 
हिरव्या डोंगर रांगांनी आणि वृक्षांनी वेढलेली काली नदी !!!

केवळ अप्रतिम... 

किती आणि काय काय मनोहारी पाहायचे...

मन भरत नव्हते...

 सरळ पुढे पुढे जाणारा रस्ता अकरा हजार फुटा वरचा असल्यामुळे दीर्घ श्वास घेऊन दमदार पेडलींग करावे लागत होते. बर्‍याच ठिकाणी लॅन्ड स्लाईड झाल्यामुळे रस्ता डोंगराच्या वरच्या भागाकडे वळविला होता.

ही राईड सर्व सामानासह करीत असल्यामुळे चढावर दमछाक होत होती. नपलचू घाट सुरू झाला. दोन किमीचा छोटासा घाट चढायला सुद्धा अर्धा तास लागला. 

 नपलचू गावात पोहोचलो. जीवनसिंगच्या देवभुमी होम स्टे मध्ये चहा घेतला.  जीवनसिंग तेथेच राहण्याची विनंती करत होता. पण ट्रेकर मित्र अंबरीष गुरव गुंजीला भेटणार असल्यामुळे नदी ओलांडून गुंजीकडे निघालो. गुंजीच्या गोविंदसिंग गुंजीयालच्या होमस्टे मध्ये एकटा सायकलिस्ट म्हणून रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नास्त्यासह सहाशे रुपयात खाशी व्यवस्था झाली होती. निसर्गरम्य गुंजी गाव साडे अकरा हजार फुटावर आहे. 

अंबरीषला भेटायला कुमाऊ विकास निगमच्या रेस्ट हाऊस मध्ये गेलो. अंबरीष अजून गुंजीला पोहोचला नव्हता.  टूर टू टेंपल या पॅकेज मध्ये जवळपास चाळीस यात्रेकरू तेथे आले होते. काही वयस्क मंडळी जाकिट कानटोपी ईत्यादी सर्व गरम कपडे घालून उन्हात बसले होते. प्राणवायूची कमतरता त्यांना जाणवत असावी... त्यांची मेडिकल टेस्ट होणे आवश्यक होते. 

सरकारी कैलास मानसरोवर यात्रा करणार्‍या यात्रेकरूंसाठी गुंजी गाव म्हणजे महत्त्वाचा टप्पा असतो. सर्व यात्रेकरुंची येथे अंतिम मेडिकल टेस्ट होते... जे या टेस्ट मध्ये पास होतात त्यांनाच कैलास मानसरोवरची यात्रा करता येते. 

सायंकाळी अक्षय दुबे आणि नयन तिवारी या दोन तरुण सायकलिस्टची भेट झाली. या दोघांनी पिठोरागड वरुन  सायकलींग सुरू केली होती आणि आदी कैलास दर्शन घेऊन ते आज गुंजीला पोहोचले होते. अक्षयने हेल्मेट न घालता ही सफर केली होती. त्याला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याचे सांगितले. परंतु त्याच्या बोलण्यात अति आत्मविश्वास जाणवला. उद्या ते ओम पर्वतकडे सायकलिंग करणार होते. येथे बागेश्वरच्या अरविंद आणि मनोज या मोटरसायकलीस्टची भेट झाली. रात्री शेकोटी भोवती ऊब घेत सर्वांना सायकलिंगचे अनुभव... किस्से सांगितले. अरविंदने बागेश्वरला येण्याचे आमंत्रण दिले. आजची फक्त चौतीस किमीची सफर अतिशय कठोर होती. 

अशा प्रवासाची एक गम्मत असते काही वेळासाठी भेटणारे निसर्गप्रेमी कायमचे मित्र होतात.

रात्री निद्रा देवीने कधी घेरले हे कळलेच नाही... 

ॐ नमः शिवाय!!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

Monday, July 4, 2022

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी... (भाग दोन) दि. २४ जुन २०२२

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी...  (भाग दोन) 
दि. २४ जुन २०२२ 

धारचूला मधील यू टर्न हॉटेलमध्ये रात्री मुक्काम होता. सकाळी चारला उठून एक तास ध्यानधारणा केली.  प्रचंड ऊर्जा  घेऊन आदी कैलास महादेवाला भेटण्याचा ध्यास उरात बाळगून पहाटे पावणे सहा वाजता सायकल वारी सुरू झाली. पहिला टप्पा चौसष्ट किमी बुधी गावापर्यत होता.
 प्रथम पंधरा किमी अंतरावरील तवा घाट पार करायचा होता. वरवर चढत जाणारा रस्ता काही ठिकाणी डांबरी झाला होता... हिमालयाच्या माथ्यावरुन घरंगळत येणारी धुक्याची चादर... खळखळाट करत वाहणारी काली नदी... नदी पलीकडे दिसणाऱ्या गर्द वनराईत विसावलेली नेपाळी गावे... हिमशिखरांवर पडलेली सूर्याची किरणे... जोरात सुटलेला वारा... प्रेमाने आकाशात विहार करणार्‍या घारी आणि सायकल वरील भगव्याची फडफड... या निसर्ग संगीतात... हिरवटलेले डोंगर पार करत सखी अतिशय संथ गतीने वळणावळणाच्या रस्त्यावरून रमतगमत चालली होती.

 अतिशय निसर्गरम्य आणि मनमोहून टाकणारा हा परिसर सतत ऊर्जा देत होता.  आज आदी कैलास आणि ॐ पर्वत सायकल वारीच्या पाहिल्या दिवसाची सुरुवात एकदम अद्भुत होती. 
 
सकाळीच प्रोटिन बार, खजूर, बदाम यांचा नास्ता केल्यामुळे अंगात भरपूर ऊब होती. दिड तास सायकलिंग झाल्यावर पोटाने घंटी वाजवली... आठ किमी वरील दोबाट गावात पोहोचलो होतो. मुख्य गाव पर्वताच्या वरच्या  भागात होते. रस्त्याची कामे करणार्‍या कामगारांच्या एका कंटेनर जवळ थांबलो. बरेच कामगार नास्ता करत होते. "चहा मिळेल काय" हे विचारातच कामगारांचा मुखीया सतीश पांडेने  नास्ता करण्याची विनंती केली... नेकी और पुछपुछ... गरमागरम चपात्या आणि सोयाबीनची भाजी पुढ्यात आली... वर ग्लासभर चहा आला...  सायकल वरुन कैलास वारी करतोय... या धाडसाचे मुखीया पांडेने कौतुक केले... कामगार, आचारी आणि मुखीया यांच्या समवेत फोटो काढले.  

BROने दिलेल्या कॉन्ट्रॅक्ट नुसार या वर्षांत बुधी पर्यत डांबरी रस्ता बनवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम सुरू होते... रस्त्यावर होणार्‍या लॅन्ड स्लाईड मुळे सुद्धा प्रचंड अडथळे निर्माण होत होते... तवा घाट आता  पाच किमी अंतरावर होता.   तेथून सुप्रसिद्ध नारायण आश्रमाकडे एक रस्ता जातो. 

वाटेत उंच कड्यावरून कोसळणारा सुंदर धबधबा लागला... 

त्यावर जलविद्युत केंद्र बनविले होते. वहाणार्‍या नाल्यावर BROने एक मोठा पूल बांधला होता. तो नाला खाली मुख्य काली नदीला मिळाला होता. निसर्गरम्य परिसर पाहताना भान हरपून गेले. 

 काली नदीवर नेपाळ आणि भारताला जोडणारा झुलता पुल लागला. या वरुन माणसांची ये जा चालू होती... दोन देशांना जोडणारा पूल माणसांची मन जोडणारा भासला. 

घासू गावातील एका दुकाना जवळ आलो. कडक चहाची सलामी मिळाली. सखीने पंचवीस किमी कठीण रपेट केली होती. यासाठी पाच तास लागले होते. 

येथील खडतर परंतु शांत निवांत वाटा, थंडगार हवा, नितळ पाणी, अवर्णनीय सुंदरता, एकांत शांतता, हिरवी वनराई, मध्येच ऐकू येणारा काली नदीचा खळखळाट आणि त्यात सोलो राईड हे सर्व पहिलं की या वातावरणात विरघळून जावे असच वाटत होतं... 

शहरातील घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या जीवनात रंग भरायचे असतील तर या रानवाटा तुडवत, बेभान वारा अंगावर घेत भटकंती करायलाच हवी... माझ्या बरोबर गुजगोष्टी करायला सखीची साथ होती. त्यामुळे तिचे अंतरंग जाणून घ्यायला निवांत वेळ मिळत होता... याचा खुप आनंद होत होता...

वाटेत एक बोलेरो गाडी जवळ येऊन थांबली. ड्रायव्हर सोबत घेऊन महिला एकटीच सफर करत होती. सायकल वारी करतोय याचे आश्चर्य मिश्रित भाव तिच्या चेहर्‍यावर होते. बुधीला राहण्याची व्यवस्था होईल हे सांगितले. खुप ढग असल्यामुळे तिला ॐ पर्वताचे दर्शन झाले नव्हते. अतोनात मानवी प्रयत्न सुद्धा निसर्गापुढे तोकडे आहेत याची जाणीव झाली. "आले देवाजीच्या मना"  ही उक्ती आठवली. पण आदी कैलास दर्शन झाले होते. 

 दुपारी दीड वाजता नजंग गावात पोहोचलो. येथून मालपा गाव सहा किमी अंतरावर होते. हॉटेलवाल्या योगेशला वरण भाताची वर्दी दिली. नववीत शिकणारा योगेश सायकल पाहताच आनंदून गेला होता. त्याच्या आईने वरण भात जेवण दिले. जेवायला बसलो तेव्हा खाली बसून सायकलचे गियर न्याहळत होता योगेश... 
Ki
हिरव्या गवताच्या भारा घेऊन जाणार्‍या कष्टकरी महिला भेटल्या... गवताचा भारा पंचवीस किलोचा असावा. तो उचलणे सुद्धा कठीण होते.  माझे या वारीचे प्रयत्न सुद्धा त्या भार्‍यापुढे फिके वाटले... 

ढग खाली उतरू लागले होते. हवेतील गारवा वाढला होता. थेंब थेंब बरसात सुरू झाली. घरंगळत येणार्‍या दगडावर तीक्ष्ण लक्ष ठेऊन पहाडाकडे सतत पहावे लागत होते. माती, धुळीचे खडकाळ रस्ते... गारवा, पाऊस, चिखल, लॅन्ड स्लाइड यातून चढ चढणे खूपच खडतर होते.

 परंतु त्यापेक्षा मनाने प्रचंड तयारी केली होती. लक्षापासून ढळायचे नाही... एकएक पेडल मारत रहायचे... हाच ध्यास... 

शांगकांग गावात  थांबलो... येथून चार कि.मी अंतरावर बुधी गाव होते. चार वाजले होते. सखी धापा टाकत होती...


अजून कठीण चढ चढायचा होता... त्यामुळे थोडी विश्रांती घेतली... वाटेत थांबणे सुद्धा धोकादायक होते... पण कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची तयारी होती. काली नदीच्या अगदी जवळ होतो... खळखळणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर उडत होते... 

पेडलींग सुरू झाले... 

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे... 
घेईल ओढ मन तिकडे सैर झुकावे...  
कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी... 
वेळुत कधी वा पडक्या वाड्यापाठी... 
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत... 
कधी रमतगमत वा कधी भरारी भेट... 

ही कविता आठवली... मन एकदम तरल झाले... 

अर्ध्या तासात फक्त अर्धा किमी चढ चढला असेल... समोर पाहतो तर जबरदस्त लॅन्ड स्लाईड झाले होते... 

थोडा वेळ थांबलो... तसे शरीर थंड होऊ लागले... म्हणुन बुलडोझरच्या बाजूच्या चिंचोळ्या वाटेतून सखी पुढे आली.

हसर्‍या सखीला वाट देण्यासाठी क्षणभर बुलडोझर सुद्धा थबकला होता... कसा बसा तो टप्पा पार केला... प्रचंड कस लागत होता चढ चढताना... काही ठिकाणी दगडांच्या चढावर सखीला ढकलावे लागत होते...

अतिशय थ्रीलींग सायकल राईड सुरू होती... प्रचंड ऑफ रोडिंग... काही ठिकाणी पुढचं चाक वर उठत होतं... वातावरण थंड होत चाललं होतं... वाटेत भेटणारे ट्रक जीप कामगार यांना "ओम नमः शिवाय" ची साद घालत होतो. त्यांच्या कडून प्रतिसाद मिळत होता. या नाम घोषात बुधी पर्यतचा शेवटचा खडतर चढ महत् प्रयासाने चढून गेलो. या चार किमी चढासाठी दोन तास लागले होते. 

सायंकाळचे सहा वाजले होते बुधीला पोहोचायला... कुठेही मोठी विश्रांती न घेता सतत बारा तास अवघड चढाची सायकलिंग करून चौसष्ट किमीचा पहिला टप्पा पार झाला होता... शरीर थकलं तरी मन थकलं नव्हतं...  चिखलाने माखलेली सखी माझ्या काळ्याकुट्ट चेहऱ्याकडे पाहून हसत होती. 

बुधीला कुमाऊ विकास निगम मध्ये राहण्याची व्यवस्था झाली... प्रथम सखीला स्वच्छ केले. थंड पाण्याने कशीबशी आंघोळ केली.  कुमाऊ मंडळच्या नेगीनी ग्लासभर चहा दिला. वज्रासनात बसल्यावर एकदम तरतरी आली... 

जवळच असलेल्या ITBP कॅम्प मधून नेट उपलब्ध झाले... त्यामुळे सर्वांना फोन करता आले.. आणि आजच्या अवघड वारीचे फोटो शेअर करता आले... 

पहिला टप्पा पार झाला होता... 

परमेश्वराच्या ओढीने आणि निसर्गाच्या साथीने... अशक्य ते शक्य झाले होते... 

ॐ नमः शिवाय... 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे.... 

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी.... दि. २२ आणि २३ जून २०२२

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी
दि. २२ आणि २३  जून २०२२

 काल समर्पयामी शॉपीला सदिच्छा भेट दिली... सायकल डॉक्टर हिरेनला "सखीची" तब्बेत दाखविली... दोन स्पोक घट्ट केल्यावर सखी एकदम टणटणीत असल्याचे प्रमाणपत्र मिळाले... सखी तयार झाली... आदी कैलास आणि  ॐ पर्वत सायकल वारी साठी... 

आज कारने जावई राजूने बांद्रा टर्मिनसला सोडले... गरीबरथ गाडीला लगेज डबा नव्हता... पार्सल ऑफिसला सखीला जमा केले असते तर दोन दिवसांनी दिल्लीला ताब्यात मिळाली असती. हे सखीला मान्य नव्हते... म्हणुन सखी (सायकल) डिसमेंटल केली आणि डब्यात कोच खाली ठेवण्याची तयारी केली. 

 गाडीवर लक्ष्मण आणि अतुल शुभेच्छा द्यायला आले होते... मोठे काम लक्ष्मणने केले होते. सायकल बांधायला नायलॉन टॅग आणले... सोबत ड्रायफ्रूट सुद्धा घेऊन आला... कोच पर्यंत सखी लक्ष्मणच्या ताब्यात दिली... अतुल लस्सी घेऊन आला होता... प्रोटिन्सचा भोक्ता होता अतुल... दिल्लीस्थित लक्ष्मणचा मित्र दुर्गेश  निजामुद्दीन स्टेशनवर मदत करायला येईल हे लक्ष्मणने सांगितले. स्वप्नाने दिलेले मेथी पनीर ठेपले, कोल्हापूरी ठेचा आणि अतुलची लस्सी यांनी रात्रीच्या जेवणात बहार आणली... 
सकाळी दहा वाजता गाडी निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचली आणि दुर्गेश त्याच्या दोन सहकार्‍यांना घेऊन डब्यात हजर झाला.


सामानाचे काम बरेच हलके झाले. स्टेशन बाहेर दुर्गेशने बेल फळाचा ज्युस पाजला आणि जुनी दिल्ली स्टेशन पर्यंत ऑटो करून दिली. त्याच्यासह फोटो काढून आभार मानले... मनोमन लक्ष्मणला सुद्धा धन्यवाद दिले.
जुनी दिल्ली स्टेशनवर पोहोचताच हमाल करून रेस्ट रुम गाठली... दुपारी चारच्या संपर्क क्रांती एक्सप्रेसचे तिकीट कन्फर्म नव्हते म्हणुन रात्री साडेदहाच्या राणीखेत एक्स्प्रेसचे कन्फर्म तिकीट काढले होते. दुपारच्या गाडीचे तिकीट कन्फर्म झाले. हे सिटींग तिकीट असल्याने दोन डब्यांच्या शंटिंगमध्ये खोललेली सायकल लॉक केली.


काठगोदाम ऐवजी हलद्वानीला उतरायचे नक्की केले. कारण येथूनच धारचूलासाठी सकाळी पाच वाजताची बस पकडायची होती. रात्री साडेदहा वाजता हलद्वानीला उतरून ऑटो पकडली. ऑटोवाल्याने टीप दिली... त्यामुळे रात्री बारा वाजता दैनिक जागरण प्रेसची जीप मिळाली... वर्तमानपत्रावर सायकल बांधली.

 सकाळी साडेसहा वाजता पिठोरागडला आलो. येथे धारचुलासाठी जीप बदलली. या जीपमध्ये सामान आणि पॅसेंजर भरे पर्यंत आठ वाजले... अकरा वाजता धारचुलाला पोहोचलो. बाजूला बसलेल्या नरेंद्र दानूची ओळख झाली होती . त्याने सायकलसह सामान उतरवायला मदत केली.  त्याचा भाऊ लक्ष्मणचे हॉटेल धारचुलाला आहे. लक्ष्मणने मेडिकल सर्टिफिकेट आणि परमीटसाठी मदत केली.  धारचुलाला पोहोचल्या दिवशीच आदी कैलास आणि ॐ पर्वत सायकलवारीची कागदपत्रे तयार झाली होती.
 
हॉटेल यू टर्न मध्ये स्वच्छ रुम मिळाला. जवळपास दोन दिवस सतत प्रवास झाला होता.. मस्त आंघोळ करून सायकल असेंबल केली


आणि धारचुलाचा  फेरफटका मारला. येथे नेट असल्यामुळे सर्वांना फोन केले. फोटो शेअर केले. कुमाऊ विकास निगम मध्ये पुढच्या प्रवासात नेट नाही ही माहिती मिळाली. हे व्हॉटस् अँपने सर्वांना कळविले. उद्या पासूनच सायकल वारी सुरू करणार होतो. 

आदी कैलास आणि ॐ पर्वत सायकल वारी एकट्याने आणि कोणत्याही संपर्काशिवाय करणार याची चिंता सर्वांना वाटू लागली होती... 

सोबत विशाल निसर्ग होता आणि पार्वतीपती कैलास महादेवाने साद घातली होती...

त्यामुळेच ही अवघड वारी पूर्ण होणार... 

किंबहुना देवाधिदेव महादेव पूर्ण करवून घेणार याची मनोमन खात्री होती... 

ॐ नमः शिवाय... 

सतीश जाधव
मुक्त पाखरे...