Showing posts with label आदी कैलास वारी. Show all posts
Showing posts with label आदी कैलास वारी. Show all posts

Saturday, July 23, 2022

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी २५ जून २०२२


आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी 
२५ जून  २०२२

बुधी मधील कुमाऊ मंडळ विकास निगमचे रेस्ट हाऊस डोंगराच्या कपारीवर वसलेले होते. सकाळी संपूर्ण परिसर धुक्याने व्यापला होता. आज समोरचा   खडा पर्वत चढून जायचे होते. 

सकाळी साडेसात वाजता दुसरा टप्पा सुरू झाला.  ह्या टप्प्यात साडेसात किमी उभा चढ छियालेक पर्यंत होता. अतिशय धीम्या गतीने सखीची चढाची सफर सुरू झाली.  


येथे सुद्धा रस्त्याची कामे जोरदार सुरू होती. ॐ नमः शिवायचा घोष सुरू केला. कामगारांचा त्याला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे काही वेळ थांबावे लागत होते.

जेसीबी, बुलडोझर यांचे धाडधाड  वाजणे म्हणजे जणूकाही ते हिमालयाशी कुस्ती खेळत होते. अतिशय बाकदार वळणे आणि उंच चढ एकदम अंगावर येत होते. 


काली नदीचा आवाज आता लुप्त झाला होता. काही ठिकाणी डांबरी रस्ता दिसत होता तर काही ठिकाणी मातीने माखलेला खडबडीत रस्ता होता. 

 या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेले होते. नवीन रस्ता बनविण्याबरोबर रस्त्यावरचा मलबा साफ करणे... ही कामे अतिशय चिकाटीने सुरू होती. काही ठिकाणी चिखल मिश्रित रस्ता होता. या चिखलात सायकलची चाके जमिनीत रुतत होती... सायकल चालवणे तर सोडा... ढकलणे सुद्धा कठीण होत होते... अशा वेळी कामगार तत्परतेने मदत करीत होते... 

वर चढत जाणार्‍या घाटात वळणे घेऊन घेऊन दमलो पण वळणे संपायचे नाव नव्हते. तब्बल बावीस वळणे लागली. छियालेख परिसर जवळ आल्याची चाहूल लागली लांबवर आर्मी कॅम्प दिसू लागला. अचानक रस्त्यातच मोठे पाण्याचे डबके लागले.

अंदाज येईना.. किती खोल आहे ते... अशा डबक्यात चिखल असेल तर... सखी त्यात अडकून पडण्याची शक्यता होती...  एका बाजूला खोल दरी तर दुसर्‍या बाजूला दगडांची कपार... सखीने टांस घेतला... डोंगराच्या किनाऱ्याने डबक्यावर चढाई केली... सखीची अर्धी चाकं पाण्यात गेली... पेडलला पाणी लागले... अक्षरशः पेडल बोटी सारखी अवस्था झाली. आता थांबणे म्हणजे नव्या संकटाला आमंत्रण देणे होते. पाण्यात चिखल असल्यामुळे प्रचंड ताकदीने पेडलिंग करत होतो. सखी धीम्या गतीने पुढे सरकत होती. पुढचा काठ जवळ आला... आणि कचकन सखी थांबली... चाके चिखलात रूतली होती... गुढगाभर पाय चिखलात गेला... कशीबशी सखी सावरली... जोरदार रेटा देऊन सखीला बाहेर काढले... प्रचंड दमछाक झाली होती... दोन्ही पाय आणि बूट चिखलाने माखले होते... सखीच्या दोन्ही चाकात आणि डिरेलर मध्ये चिखलाचा थर जमला होता... कसाबसा सखीसह बाहेर आलो. प्रचंड खडतर सफर होती... 

आता  अतिशय उंचावरील खडकाळ रस्त्यावर आलो होतो. ढगांनी  संपूर्ण खोलवरची दरी व्यापून टाकली होती.

जणूकाही समोरील रस्ता स्वर्गारोहण करीत होता. निसर्गाच्या या बेभान आविष्काराचा भाग झालो होतो. त्या निसर्गात रममाण झालो... 

कवडसे... ढगांचे.... 

लपंडाव... धुक्याशी... 

खेळ उन्हाचा... 

सोनुल्या सावल्याशी...

किती सुंदर आहे !!

धरेवरचा स्वर्ग... 

बारा हजार फुटा वरील छियालेख जवळ पोहोचलो होतो. प्राणवायुची कमतरता जाणवायला लागली होती ... परंतू  समोरील मनोरम दृश्याने सगळा थकवा अदृश्य झाला होता...

साडेसात किमीचा घाट चढायला तब्बल साडेतीन तास लागले होते. जवळच्या एका झऱ्याखाली सखीला स्वच्छ केले... पाय आणि बूट धुतले... 

आता सपाटून भूक लागली होती... दूर उंचावर एक मंदिर दिसले...

मंदिरापर्यंत आणखी वर चढण्याचे त्राण नव्हते. जवळच्या गावाकडे जायचे ठरवले आणि  छोटा चढ चढून छियालेख चेक पोस्टकडे आलो...

इतक्यात लांबून कोणीतरी हाक मारली... एक जवान पळत पळत माझ्याकडे येत होता... "ये रस्ता आर्मी कॅम्पमे जाता है" "गुंजी की तरफ जानेका नीचेवाला रस्ता है" त्या जवानाची माफी मागितली... महाराष्ट्रातून आलोय हे कळल्यावर त्याचा चेहरा खुलला... नागपूरच्या सुरेंद्र चव्हाणची भेट झाली होती...  आर्मी कॅम्प मध्ये सुरेंद्र घेऊन गेला... कॅप्टन रावत यांची ओळख झाली... त्यांनी जेवून जाण्याची विनंती केली... खरचं  जेवणाची व्यवस्था कैलास महादेवाच्या कृपेनेच झाली होती. राजमा, भात, पालेभाजी, दही कोशिंबीर, चपात्या असे राजेशाही जेवण झाले... बरेच जवान चौकशी करायला आले होते... एकट्याने आदी कैलास सायकल वारी करतोय याचे त्यांना अप्रुप वाटत होते. सर्व जवानांच्या शुभेच्छा स्विकारुन पुढे पेडलींग सुरू झाले... 

वाटेत चेक पोष्टवर परमीट तपासले गेले... पुढचा रस्ता वरखाली वरखाली असा रोलींग होता. परंतू चिखल मिश्रित असल्यामुळे अतिशय सावधपणे पुढे पुढे जात होतो. आता रस्ता हळूहळू खाली उतरत चालला होता. काली नदीच्या उगमाच्या दिशेने मार्गाक्रमण सुरू होते. निसर्गाची विविध रूपे पाहायला मिळत होती. हिरवळीचा प्रदेश आणि त्यातून वहाणारी काली नदी हे सर्व दृश्य स्वप्नातीत वाटत होते. 

हिरवाई आणि निळाई यांचा अद्भुत संगम झाला होता...

 धवल मेघांनी आच्छादलेले आकाश... 
 
हिरव्या डोंगर रांगांनी आणि वृक्षांनी वेढलेली काली नदी !!!

केवळ अप्रतिम... 

किती आणि काय काय मनोहारी पाहायचे...

मन भरत नव्हते...

 सरळ पुढे पुढे जाणारा रस्ता अकरा हजार फुटा वरचा असल्यामुळे दीर्घ श्वास घेऊन दमदार पेडलींग करावे लागत होते. बर्‍याच ठिकाणी लॅन्ड स्लाईड झाल्यामुळे रस्ता डोंगराच्या वरच्या भागाकडे वळविला होता.

ही राईड सर्व सामानासह करीत असल्यामुळे चढावर दमछाक होत होती. नपलचू घाट सुरू झाला. दोन किमीचा छोटासा घाट चढायला सुद्धा अर्धा तास लागला. 

 नपलचू गावात पोहोचलो. जीवनसिंगच्या देवभुमी होम स्टे मध्ये चहा घेतला.  जीवनसिंग तेथेच राहण्याची विनंती करत होता. पण ट्रेकर मित्र अंबरीष गुरव गुंजीला भेटणार असल्यामुळे नदी ओलांडून गुंजीकडे निघालो. गुंजीच्या गोविंदसिंग गुंजीयालच्या होमस्टे मध्ये एकटा सायकलिस्ट म्हणून रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नास्त्यासह सहाशे रुपयात खाशी व्यवस्था झाली होती. निसर्गरम्य गुंजी गाव साडे अकरा हजार फुटावर आहे. 

अंबरीषला भेटायला कुमाऊ विकास निगमच्या रेस्ट हाऊस मध्ये गेलो. अंबरीष अजून गुंजीला पोहोचला नव्हता.  टूर टू टेंपल या पॅकेज मध्ये जवळपास चाळीस यात्रेकरू तेथे आले होते. काही वयस्क मंडळी जाकिट कानटोपी ईत्यादी सर्व गरम कपडे घालून उन्हात बसले होते. प्राणवायूची कमतरता त्यांना जाणवत असावी... त्यांची मेडिकल टेस्ट होणे आवश्यक होते. 

सरकारी कैलास मानसरोवर यात्रा करणार्‍या यात्रेकरूंसाठी गुंजी गाव म्हणजे महत्त्वाचा टप्पा असतो. सर्व यात्रेकरुंची येथे अंतिम मेडिकल टेस्ट होते... जे या टेस्ट मध्ये पास होतात त्यांनाच कैलास मानसरोवरची यात्रा करता येते. 

सायंकाळी अक्षय दुबे आणि नयन तिवारी या दोन तरुण सायकलिस्टची भेट झाली. या दोघांनी पिठोरागड वरुन  सायकलींग सुरू केली होती आणि आदी कैलास दर्शन घेऊन ते आज गुंजीला पोहोचले होते. अक्षयने हेल्मेट न घालता ही सफर केली होती. त्याला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्याचे सांगितले. परंतु त्याच्या बोलण्यात अति आत्मविश्वास जाणवला. उद्या ते ओम पर्वतकडे सायकलिंग करणार होते. येथे बागेश्वरच्या अरविंद आणि मनोज या मोटरसायकलीस्टची भेट झाली. रात्री शेकोटी भोवती ऊब घेत सर्वांना सायकलिंगचे अनुभव... किस्से सांगितले. अरविंदने बागेश्वरला येण्याचे आमंत्रण दिले. आजची फक्त चौतीस किमीची सफर अतिशय कठोर होती. 

अशा प्रवासाची एक गम्मत असते काही वेळासाठी भेटणारे निसर्गप्रेमी कायमचे मित्र होतात.

रात्री निद्रा देवीने कधी घेरले हे कळलेच नाही... 

ॐ नमः शिवाय!!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे...