Monday, December 12, 2022

एक छोटीशी चूक... बेतू शकते जिवावर...

एक छोटीशी चूक...  बेतू शकते जिवावर... 

खरतर असे प्रसंग घडू नये म्हणून प्रत्येक सायकलिस्ट  खबरदारी घेत असतो...  परंतू अनवधानाने किंवा चुकीने... ती गोष्ट घडली... की मग त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो...

कालच १०० किमी ग्लोबल पगोडा सायकल राईड दरम्यान हा प्रसंग घडला... परंतू सायकलिंगचे सर्व सेफ्टी मेजर परिधान केले असल्यामुळे थोडक्यात बचावलो...

सकाळी अंबरीष गुरव, तुषार रेडकर आणि विजय कांबळे सोबत सेना भवन कडून सायकल राईड सुरू झाली...

दहिसर चेक नाक्यावर रघुनाथ घडशी भेटला...  घोडबंदर लुप मारण्याचे ठरविले होते...  


पण सकाळी अकरा  वाजता अंधेरीच्या सोसायटी मध्ये असणारी मीटिंग गाठणे सुद्धा आवश्यक होते... म्हणून मीरा भायंदर नाक्यावरून उत्तन मार्गे ग्लोबल पगोडा राईड करण्याचे ठरले...

बरोबर सकाळी पावणे नऊ वाजता ग्लोबल पगोडा येथे पोहोचलो... वाटेत महेश दाभोळकर आणि इतर सायकलिस्ट मित्रांची भेट झाली...

पगोडाचे बाहेरूनच दर्शन घेऊन मनोरीकडे कूच केले...  मनोरी मार्वे मढ आयलंड वर्सोवा करून अंधेरीला जायचे नक्की केले..

डोळ्याच्या नजरेत मनोरी बीच दिसू लागला... आणि मनोरीला केलेल्या धम्माल मस्तीचे जुने दिवस आठवले... मन प्रफुल्लित झाले... हवेत तरंगत समुद्र न्याहाळू लागले... त्या आनंदाच्या भरात तो लांबवर दिसणारा मनोरी  बीच सोबत सायकलिंग करत असलेल्या विजयला उजवा हात समुद्राकडे करून दाखवत होतो...

क्षणार्धात काय झाले कळलेच नाही... समोरच्या  स्पिड ब्रेकर वरुन सायकल धाडकन जमिनीवर कोसळली... पाय आणि खांदा सायकल खाली आला... डोके कचकन जमिनीवर आदळले... हात रस्त्यावर घसपटले... ट्रॅक पँट फाटली... 

भानावर यायला मिनिट भर लागले... तेव्हा लक्षात आले समोर पांढरे पट्टे न मारलेला स्पिड ब्रेकर दिसलाच नाही... सायकल हॅन्डल वरुन क्षणभर सोडलेला हात... जिवावर बेतणारा होता... परंतु डोक्यात चांगल्या प्रतीचे हेल्मेट... हातात ग्लोव्हज असल्यामुळे डोक्याला कोणतीही हेड इंज्युरी झाली नाही आणि पंजा सोलपटला नाही... पण गुढग्याच्या खाली पायाला बरेच खरचटले होते... खांदा दुखावला होता... तरी बरं... मागून कोणतेही मोठे वाहन नव्हते...

तुषारने पाणी दिले तर विजयने पुरणपोळी खायला दिली... जमिनीवर एव्हढ्या जोरात आपटलो होतो की उजवा पाय आणि खांदा बधिर झाला होता... तुषार आणि रघुनाथ थोडेसे घाबरलेले वाटले... पण विजय एकदम खंबीर होता... वाकडे झालेले हॅन्डल विजयने सरळ केले... चाक सुद्धा थोडे व्होबल झाले होते... ते पुढच्या सायकल दुकानात ठीकठाक करून राईड पूर्ण करण्याचे ठरविले...

पेडलींग सुरू केल्यावर लक्षात आले पाय आणि खांदा व्यवस्थित काम करतोय... कुठेही मेजर ईंज्युरी नाही... मार्वेला रघुनाथला टाटा केला तर वर्सोवा मेट्रो स्टेशन कडे विजय आणि तुषारला बाय बाय करून अंधेरी सोसायटीत मीटिंग अटेंड केली..

पेडलिंग करत मुंबईत आलो... लोअर परळला सायकल शॉपी मध्ये खुप गर्दी असल्यामुळे सखीला उद्या ठिकठाक करण्याचे ठरविले... रात्री शाळकरी मित्र नागेश सोपारकर याने वाशीला विष्णु दास भावे  नाट्यगृहात ठेवलेल्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी झालो...

तेथे स्टेज वर डान्स पण केला...

 त्यामुळे खात्री झाली... सकाळी झालेला अपघात फारसा गंभीर नाही... कोठेही फ्रॅक्चर नाही... अपघात हा अपघातानेच होतो... पण  बचावलो ते निव्वळ  सेफ्टी मेजर मुळेच... डोक्यात चांगल्या प्रतीचे हेल्मेट आणि हातात ग्लोव्हज नसते तर... कालच  हॉस्पिटल मध्ये बेशुद्धावस्थेत पोहोचलो असतो... पण तसे न घडल्यानेच १०० किमी राईड पुर्ण झाली होती... 

मित्रांनो... सर्वांना एकच सांगणे आहे... सायकल वरुन  हात एका क्षणांसाठी सोडल्यामुळे काय घडू शकते... याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे... म्हणूनच सर्व सेफ्टी मेजरसह सावधपणे सायकल चालवा... आणि मस्त एंजॉय करा... 

आज सखीची काळजी घ्यायची आहे तसेच पायाला आणि खांद्याला आराम द्यायचा आहे... 

मंगल हो... 


सतीश जाधव... 
मुक्त पाखरे 

Thursday, December 8, 2022

४२ हजार किमी सायकलिंग आणि १११ वे रक्तदान...

४२ हजार किमी सायकलिंग आणि  १११ वे रक्तदान...
दि. ८ डिसेंबर २०२२

पंढरपुर ते पंजाब (घुमान) ही सायकल वारी नुकतीच पुर्ण झाली होती... संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज यांनी समता, शांतता आणि बंधुता हा मानव कल्याणाचा  विश्वसंदेश घेऊन भागवत धर्माच्या प्रचारासाठी संपूर्ण भारत भ्रमंती केली होती... त्यांच्या पदकमलाने पावन झालेल्या मार्गावरूनच सदरची सायकल वारी संपन्न झाली... 

याच सायकल वारीच्या अनुषंगाने ४२ हजार किमीचा सायकलिंग टप्पा लीलया पार झाला होता.. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सायकलिस्ट तसेच पालखी सोहळ्याचे सदस्य, पत्रकार, भजनी मंडळातील वारकरी, भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि नामदेव समाजोन्नती परिषद असे जवळपास दीडशे वारकरी कायमचे मित्र झाले आहेत...


 पांडुरंगाच्या कृपेने सायकलिस्ट मंडळींची सेवा करण्याची सुद्धा संधी मिळाली... त्यासाठी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री सूर्यकांत भिसे गुरुजी यांचा शतशः ऋणी आहे...

याची पुढील आवृत्ती म्हणजे.... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहासष्टव्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त सुरक्षा रक्षक दल (पाणी खाते) यांनी आज भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते... या रक्तदान शिबिरात मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित राहण्याची संधी माझे गायक मित्र श्री गणेश हेटगे यांच्यामुळे मिळाली... 

विशेष म्हणजे प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री अजित तावडे साहेब यांनी  आतापर्यंत केलेल्या रक्तदान कामगिरी बद्दल माझा सन्मान केला.
 

तर विभागीय सुरक्षा अधिकारी श्री सुशील बडेकर यांच्या समवेत मला १११ वे रक्तदान करण्याचा योग लाभला...
 

तेथील सर्व कर्मचारी वृंदाबरोबर रक्तदानाच्या माहितीसाठी सुसंवाद करण्याची संधी मिळाली...

आता मला सांगा...  सुख म्हणजे नक्की काय असत... आपल जीवन इतरांच्या कामी यावे... यातच परम सुखाची परिसीमा आहे... हाच संदेश महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवनकार्यातून मिळतो...

या दोन्ही थोर व्यक्तिमत्वांना ४२ हजार किमी सायकलिंग आणि  १११ वे रक्तदान सादर समर्पण...

मंगल हो...

सतीश जाधव...
मुक्त पाखरे...