Wednesday, October 30, 2024

रत्नागिरी रोलर कोस्टर सायकल रेस... एक विचार मंथन... दि. २० ऑक्टोबर २०२४

रत्नागिरी रोलर कोस्टर सायकल रेस...

 एक विचार मंथन...

दि.२० ऑक्टोबर २०२४

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या वतीने  प्रसाद देवस्थळी आणि दर्शन जाधव यांच्या  या वर्षीच्या रत्नागिरी रोलर कोस्टर सायकल रेस मध्ये इव्हेंट आयकॉन होण्याच्या विनंतीला ताबडतोब होकार दिला... कारण जास्तीत जास्त सायकलिस्ट ना भेटायला मिळेल म्हणून... ही नियुक्ती तीन महिन्यापूर्वी झाली होती...

  रोलर कोस्टर रेस २० ऑक्टोबर रोजी होती... आणि १९‌ ऑक्टोबर रोजी बिब कलेक्शन आणि ओरियंटेशन होते... त्यानंतर माझ्या टुरिंग सायकलिंग बाबत अनुभव कथनाचा कार्यक्रम होता...

त्यातच या स्पर्धेच्या २ महिने आधी  २० ऑक्टोबर ही तारीख नॅशनल्सच्या स्पर्धेसाठी घोषित झाली...  आणि बरोबर ७ दिवसांनी  २७ ऑक्टोबरला  गोवा ट्रायथलॉन लागली... कोकणातील पाऊस सुद्धा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे सरकला होता...  त्यामुळे  माझे बरेचसे सायकलिस्ट मित्र या स्पर्धांच्या सरमिसळीमुळे विखुरले जात होते.... काही जण पावसामुळे साशंक होते... काही जण मला फीडबॅक देत होते की कोकणातील रस्ते पावसामुळे खराब झालेत.... त्यामुळे रत्नागिरी स्पर्धेमध्ये किती स्पर्धक येतील ही शंका माझ्या मनात होती...  तरी देखील माझ्या संपर्कातील जवळपास ३५ हून अधिक सायकलप्रेमींनी या सायक्लोथॉनसाठी रजिस्टर केले होते...

त्यात भरीस भर म्हणून रेस ॲक्रॉस इंडिया संस्थेच्या काश्मीर ते कन्याकुमारी या रेस कार्यक्रमाच्या तारखा १ ते १० ऑक्टोबर ऐवजी १० ते २० ऑक्टोबर झाल्या... ते काश्मीरमध्ये होणाऱ्या‌ निवडणुकीमुळे.. त्यामुळे २० ऑक्टोबरला इवेंटच इवेंट अशी परिस्थिती झाली.

रेस ॲक्रॉस इंडिया या रेस मध्ये दोन अंध तरुणांचा मी क्रू मेंबर होतो...  आणि ही रेस १८ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून  रत्नागिरी रोलर कोस्टर मध्ये सहभागी होणार होतो... त्या अनुषंगानेच तिरुअनंपुरम वरून १८ ऑक्टोबरचे मुंबईसाठी विमानाचे तिकीट काढले होते...

परंतु पाऊस, खडबडीत आणि रोलिंग टाईपचे रस्ते, धुके तसेच हैद्राबाद मधील हायवे सायलिंगसाठी बंद करणे... या सर्व कारणांमुळे १७ ऑक्टोबर रोजी  अनंतपुर शहरापर्यंत पोहोचलो होतो... येथून बंगलोर २०० किमी  तर कन्याकुमारी ९०० किमी अंतरावर होते... आणि एका दिवसात कन्याकुमारीचे अंतर पार करणे शक्य नव्हते... त्यामुळे बंगलोर वरून मुंबईचे १८ ऑक्टोबरचे दुसरे तिकट काढले.... आणि रेस अर्धवट सोडून बंगलोर वरून मुंबईला पोहोचलो...  रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे... हे प्राधान्य होते... 

यु ट्यूबर महेशला घेऊन गाडीने सायकलसह १९ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता रत्नागिरी गाठले... रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला...  अतिशय प्रेमपूर्वक स्वागत झाले आम्हा दोघांचे...  सतत पंधरा दिवस भारत भ्रमंतीचा प्रवास सुरू होता... त्याचा शीण क्षणार्धात नाहीसा झाला होता... 

उतरल्या उतरल्या काऊंट किती झाला असं विचारलं आणि १७० जण आलेत हे कळल्यावर फार भारी वाटलं… एवढे एकत्र आलेले इवेंट, पाऊस आणि रस्त्याविषयी साशंकता असलेली परिस्थिती हे सर्व असून देखील रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने १७० जणांना कोकणात खेचून आणलं होत… अर्धी लढाई इथेच जिंकली गेली होती..

दुपारी परममित्र लाल्या उर्फ मृत्यंजय खातू याच्या गोपाळ हॉटेल मध्ये जेवायला गेलो... जेवत असतानाच... लाल्या मरणाच्या दारातून परत कसा आला... त्याची अतिशय विस्मयजनक कहाणी त्याने स्वतः सांगितली... हृदय विकाराने तो मृतप्राय झाला होता... आणि जवळपास वीस मिनिटांनी तो जिवंत झाला... खऱ्या अर्थाने मृत्यूवर त्याने विजय मिळविला होता... मृत्युंजय हे स्वतःचे नाव लाल्याने सार्थ केले होते... हसरा आणि खेळकर मित्र माझ्या समोर बसून गप्पा मारतोय... ही परमेश्वराची कृपाच म्हणायला हवी... 

इव्हेंट पार्टनर हॉटेल विवेकचे मालक श्री देसाई यांनी सायकलिस्टना राहण्यासाठी संपूर्ण हॉटेल खुले केले होते... महेश आणि माझ्यासाठी दोन वेगळे रूम देण्यात आले होते... परंतु आम्ही दोघांनी एकच रूम शेअर केला... आमच्या इतर सायकलिस्ट मित्रांची सोय व्हावी म्हणून...

सायंकाळी सात वाजता प्रसाद देवस्थळीने उद्या होणाऱ्या रोलर कोस्टर सायकल स्पर्धेचे नियम आणि घ्यायची काळजी याबाबत विस्तृत माहिती दिली... तसेच जागोजागी ठेवलेली हायड्रेशन व्यवस्था... मार्गदर्शनासाठी ठेवलेले स्वयंसेवक या बाबत सर्व खेळाडूंना अवगत केले... स्पर्धेचा रस्ता अतिशय ट्रिकी आणि चॅलेंजिंग होता... या स्पर्धेची टॅगलाइन देखील रंजक होती... जो दिमागसे खेलेगा... वही जीतेगा...

त्यानंतर इव्हेंट आयकॉन म्हणून मला बोलायची संधी मिळाली... नुकतीच करून आलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रेस बाबत  माहिती दिली... आतापर्यंत केलेल्या सायकल सफरी तसेच टुरिंग आणि रेसिंग सायकल मधले अंतर समजावून सांगितले... टुरिंग सायकलिंग मध्ये परिसर एक्सप्लोअर करता येतो... मित्र जोडता येतात... तसेच निसर्गात रममाण होता येते... निसर्गच आपला सर्वात मोठा गुरु आहे... खूप काही तोच आपल्याला शिकवत असतो... सायकलने प्रचंड मित्रपरिवार दिला... नॉर्थ ईस्ट सफर, उमलिंगला पास सायकलिंग, आदि कैलास ओम पर्वत सायकलिंग... यात घडलेल्या गमती जमती सांगितल्या...

नंतर सर्व उपस्थित सायकलिस्ट आणि पाहुण्यांना छान भोजनाची मेजवानी होती...

दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक हॉटेलने ठेवलेला केळी आणि चहा अल्पोपहार घेऊन माझ्या मुंबईच्या टीमसोबत भाटे पुलाकडे प्रस्थान केले...

सायकलिंग करत स्टार्ट पॉइंटला पोहोचलो आणि प्रसादचा फोन आला... जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्या समवेत बरोब्बर सकाळी साडेसहा वाजता शर्यतीला पांढरे निशाण फडकावून शर्यतीला सुरुवात करून दिली...

आणि सर्वांच्या शेवटी या शर्यतीत सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी माझी सुद्धा राईड सुरू  झाली... 

माझ्यासाठी जरी ही फन राईड असली तरी... पंढरपूर  पंजाब वारीची तयारी म्हणून न थांबता ही शर्यत पूर्ण करायची असे ठरविले होते... हळूहळू एक एक स्पर्धक मागे पडू लागला... ग्रॅव्हल रायडर सुद्धा मागे पडत होते... एका स्पर्धकाने विचारले... तुमची MTB सायकल इलेक्ट्रिक मोटर लावल्या सारखी पळते आहे... त्याला सांगितले... वेग चाकात नसतो तर तो डोक्यात असतो...

विशेष म्हणजे आज पावसाची कृपा झाली होती... सकाळी रेस दरम्यान कुठेही पाऊस पडला नाही... तसेच रत्नागिरी बांधकाम खात्याने आदल्या दिवसापर्यंत पावसामुळे खराब झालेला रस्ता... खडी आणि डांबर टाकून सुव्यवस्थित केला होता...

वाटेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या स्वयंसेवकांनी अतिशय फर्मास हायड्रेशन व्यवस्था  केली होती... पाणी तसेच मेनेकी Abaolute  चे हायड्रेशन बाटलीचे बुच उघडून स्पर्धकांना देत होते... एक स्वयंसेवक मुलगी  सोललेले केळे  देण्यासाठी माझ्या सायकल मागे धावली होती... खरंच स्पर्धकांची अशा प्रकारे काळजी घेणे... ही कौतुकास्पद गोष्ट होती...

या सायकल स्पर्धेत बरेच अल्ट्रा सायकलिष्ट होते...  जवळपास एकशे सत्तर सायकलिस्टनी या स्पर्धेत भाग घेतला होता... परंतु प्रत्यक्ष स्पर्धा करणारे निम्मे असावेत... माझ्यासारखे फन राईड करणारे आणि फोटोग्राफी करत त्या सायकल रूटचा आणि  निसर्गाचा आनंद घेणारेच खूप सायकलिस्ट होते... 

ईलिट ग्रुप मध्ये पहिले तीन स्पर्धक विजयी झाले... त्यात पहिला आला अमन तांबोळी... अमनने निर्विवाद फिनिश केला २ ते १० नंबर साठी मात्र तुल्यबळ लढत झाली... पहिले आलेले तिघेही स्पर्धक नॅशनल स्पर्धांसाठी एकत्र सराव करतात आणि ते या स्पर्धेत ग्रुपने सायकलिंग करताना एकमेकांना डॉज करत होते... तसेच शेवटपर्यंत त्या तिघांनी कोणालाही पुढे जाऊ दिले नाही... आपल्याच ग्रुपच्या एका सदस्याने रेस जिंकण्यासाठी ही  स्टॅटेजी आता सर्व ठिकाणी सर्रास वापरली जाते... 

मुलींच्या गटात प्रथम आलेली नॅशनल स्पर्धक योगेश्वरी एका ठिकाणी घसरून पडली... तरी सुद्धा उठून पुन्हा तिने मुसंडी मारत स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकली...

 पहिल्या तीन क्रमांकाने विजयी झालेल्या स्पर्धकांच्या सायकलींच्या किमती ऐकून डोळे पांढरे झाले होते...

नॅशनल लेवलला स्पर्धा करणाऱ्या स्पर्धकांबरोबर स्थानिक सायकलिस्ट स्पर्धेत होते पण ही तुलना सायकलचे प्रकार पाहुन होऊ शकत नाही हे मात्र खरं… स्थानिक सायकलपटू ना प्रोत्साहन देण्यासाठी वेगळी Category ठेवल्यास अजून मजा येईल...

मला वाटते... कोणत्याही सायकल क्लबने आपल्या शहरात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात सायकलिंग कसे वाढेल... फोफावेल... सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचेल याचा विचार करणे आवश्यक आहे... रेस साठीच्या स्पर्धा भरविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर वेगळे मंच आहेत... स्थानिकांसाठी रेग्युलर ग्रुप राईड तसेच लांब पल्याच्या राईड होणं गरजेचं वाटतं...

हल्ली बऱ्याच क्लब मध्ये BRM, SR आणि LRM करणाऱ्या स्पर्धकांचे सत्कार, सन्मान केले जातात... खरंच या स्पर्धा भारतीय आहेत काय... अशा स्पर्धांच्या प्रत्येक गोष्टी साठी पैसे मोजावे लागतात... हायड्रेशन, सायकल ब्रेक डाऊन किंवा स्पर्धकाला आलेल्या अडचणीसाठी आयोजकांकडून कोणताही सपोर्ट मिळत नाही...

याच धर्तीवर मुंबईच्या घोडबंदर सायकल क्लबने GRM (म्हणजे घोडबंदर रोड मास्टर) 25, 50, 75, 100, 150, 200, 250 आणि 300 किमी ह्या सायकल स्पर्धा अतिशय कमी फी मध्ये सुरू केल्या  आहेत... स्पर्धा पूर्ण करण्यासाठी कट ऑफ टाईम निर्धारित केलेला असतो... यात कोणीही सायकलिस्ट प्रत्यक्ष किंवा वर्चुअल भाग घेऊ शकतो... स्पर्धेत प्रत्यक्ष भाग घेणाऱ्यांसाठी सकाळचा नाष्टा, वाटेतील हायड्रेशन, जेवण, सायकल मेकॅनिक, अँब्युलन्स सपोर्ट... इत्यादी सर्व सुविधा पुरविल्या जातात... यात मेडल अथवा सर्टिफिकेट साठी वेगळे पैसे भरावे लागत नाही... शंभर किमी अंतरापर्यंतच्या सर्व स्पर्धा पार करणाऱ्या सायकलिस्टला ज्युनिअर GRM ट्रॉफी आणि 25 ते 300 किमीच्या सर्व स्पर्धा नियोजित वेळात पार करणाऱ्या  सायकलिस्टला सिनियर GRM  ही ट्रॉफी मिळत आहे... या स्पर्धेत ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल या भागातले शेकडो सायकलिस्ट भाग घेत आहेत... अशा धर्तीवर देखील रत्नागिरी सायकलिस्ट क्लब अथवा रत्नागिरीतील सर्व सायकल क्लब स्पर्धा भरवू शकतात... 

GRM मध्ये स्पॉन्सरर कडून आलेली मदत सर्व सायकलिस्ट वर खर्च केली जाते...  सायकलिस्टच्या खिशाला जास्त खर्च न पडता अशा स्पर्धा जेव्हा घेतल्या जातात तेव्हा भरभरून सायकलीस्ट यात भाग घेतात... यामुळे तळागाळातील सायकलिस्ट सुद्धा आपला इंड्युरंस तपासू शकतो... ते सुद्धा अतिशय कमी खर्चात... यामुळे सायकलिंग सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवू शकतो... 

रोटरी क्लब ऑफ काळा घोडा ही संस्था सायकलिंग फॉर डायबिटीज या सायकल रॅलीचे आयोजन करते... ह्याचे रजिस्ट्रेशन मोफत असते... स्पर्धेच्या दिवशी सकाळी सर्वांना टीशर्ट आणि पाणी दिले जाते... मुंबईच्या काळा घोडा पासून दादर शिवाजी पार्क पर्यंत फक्त 15 किमीची  रॅली असते... रॅली पूर्ण केलेल्या प्रत्येक सायकलिस्टना एक नंबर दिला जातो... दादर येथे लॉटरी द्वारे 25 सायकलिस्ट ना सायकल विषयक बक्षिसे दिली जातात... आणि पहिले बक्षीस चांगल्या प्रतीची गियर सायकल असते... या रॅलीत हजारो सायकलिष्ट भाग घेतात... आणि शेवटपर्यंत थांबतात..  हा उपक्रम सुद्धा रत्नागिरी सायकल क्लब स्पॉंसररच्या  मदतीने राबवू शकतो...

मी गेली ३-४ वर्ष सतत कोकणात येतोय आणि सायकल स्पर्धेमधे एंजॉयमेंट म्हणून भाग घेतोय. मला मनापासून वाटतं की जिल्ह्यातील सर्व क्लबचं मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सायकलिंग करावे हे  असले पाहिजे... फक्त स्पर्धात्मक सायकलिंग वर भर देण्याऐवजी टूर राईड वर फोकस केला गेला पाहिजे... आणि स्थानिक सायकलिस्ट यात कसा सहभागी होईल यावर लक्ष दिले पाहिजे...

इतर प्रांतातील सायकलिस्टसाठी व्हर्च्युल सायकल स्पर्धा घेऊन त्यांना सुद्धा बक्षिसे देता येतील का हा विचार देखील प्रत्येक सायकलिस्ट क्लब ने करावा... असा माझा आग्रह असतो... कारण इतर प्रांतातून येणाऱ्या सायकलिस्टना कारने, बसने, रेल्वेने सायकल घेऊन यावे लागते... त्यामुळे स्पर्धेत भाग घेणे हे खर्चिक होते... 

स्पर्धा आली तेथे रिस्क आली आणि रिस्क आली की संस्थेची जबाबदारी खूप वाढते...मी असे अनुभव घेतलेत आणि त्यापासून धडा घेऊन काही क्लब फक्त फन राईड आयोजित करतात... रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली सायकलिंग क्लब त्यापैकी एक आहे...

मी अनेक क्लब ना सांगतो की जे ब्रँड आयकॉन आहेत त्यांना  वाईल्ड कार्ड द्या... त्यांच्या मार्फत येणाऱ्या पार्टीसिपंट ना स्पेशल  डिस्काउंट द्या... इव्हेंट अनाउन्समेंटच्या पहिल्या दिवशी रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी  डिस्काउंट द्या... तळागाळापर्यंत सायकलिंग पोहोचली पाहिजे असे उद्दिष्टं ठेवा... घोडा सायकलवाल्याने सुद्धा भाग घ्यायला हवा असा फॉरमॅट ठेवा... महाराष्ट्रात असणारे वयस्क तसेच भरपूर सायकलिंग केलेले सायकलिस्ट त्यांना फ्री एन्ट्री द्या... या गोष्टीमुळे सायकल क्लब सर्वांपर्यंत पोहोचू शकतील...

इव्हेंट मध्ये लॉटरी असली की जास्तीत जास्त सायकलिस्ट  सहभागी होतात... ज्या सायकल संस्थेची दहा पेक्षा जास्त सायकलिस्ट इव्हेंट मध्ये सहभागी होतील त्या सायकल क्लबचा सुद्धा सन्मान करावा... नुसती रेस हा कन्सेप्ट नसावा... लॉटरी मध्ये हेल्मेट, गॉगल, ग्लोव्हज, सायकल इत्यादी बक्षिसे वाटण्यात यावीत... यातील बऱ्याच गोष्टी यावर्षी रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने अमलात आणल्या आहेत... 

कुठल्याही क्लबच ध्येय हे सायकलिस्ट घडवणे हे असावे... ना की स्पर्धक निर्माण करणे... स्पर्धा आली की ग्रुप करून इतरांना पुढें जाऊ न देणे... आपल्या गटातील  एकमेकांना वाऱ्यापासून प्रोटेक्शन देणे... अशा चाली खेळल्या जातात... 

आणि यावर पर्याय म्हणजे स्पर्धा न  ठेवता कट ऑफ टाईम असावा..  आणि मग लॉटरी सिस्टिमने बक्षीस द्यावे... सर्वांना मेडल... टीशर्ट मिळावे... फन राईड मुळे खूप जण सहभागी होतील... महिलांसाठी सुद्धा स्पर्धा पूर्ण करणे हे ध्येय असावे... ना की स्पर्धा जिंकणे असावे... 

रत्नागिरीतील सर्व क्लबचे ध्येय हे  रत्नागिरी जिल्हा सायकलमय व्हावा... हे असले पाहिजे... मग बाहेरील सायकलिस्ट कसे  सहभागी होतील याचा विचार करावा... 

स्पर्धेपेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सायकलिंग पोहोचविणे... आणि लोकल सायकलिस्टनी या सायकलिंग इव्हेंट मध्ये भाग घ्यावा यासाठी रत्नागिरी क्लब प्रयत्नशील आहेच पण आता याची गती वाढणे आवश्यक आहे... 

देशाला प्रदूषण मुक्त करायचे असेल तर जास्तीत जास्त सायकलिस्ट निर्माण करण्याचे ध्येय संस्थेने ठेवणे आवश्यक आहे... स्पर्धा म्हणजे धोक्याला आमंत्रण देणे आहे... 

कोणत्याही तालुका निहाय सायकल संघटनांमध्ये स्पर्धा नसावी... किंवा संघटनेची प्रगती स्पर्धा अनुषंगाने मापली जाऊ नये... तर किती स्थानिक स्पर्धक स्पर्धेत भाग घेतात या वर असावी... स्थानिक स्पर्धकांची आदल्या दिवशी राहण्याची व्यवस्था करण्याची सुद्धा आवश्यकता नसते...

बाहेरील सायकलिस्ट मंडळींना जास्तीत जास्त सवलती दिल्या तरच टुरिझम वाढेल तसेच रत्नागिरीचे  स्थान महात्म्य सर्वांपर्यंत पोहचविता येईल... टिळक, सावरकर यांची कर्मभूमी आणि गणपतीपुळे, पावस, वेळणेश्वर, हेदवी  ही देवस्थाने यांची ओळख इतरांना करून देता येईल... 

स्थानिक सायकलिस्ट वाढले की स्थानिक प्रशासनाला रस्त्याची कामे वेगात करावी लागतील... मीडिया सुद्धा जागृत होईल... त्यामुळेच प्रत्येक सायकलिस्टला निर्विघ्नपणे  एक्सप्लोअर करता येईल असे व्हिजन असावे... 

सर्व स्वयंसेवक  यांचा सुद्धा  यथोचित सन्मान झाला पाहिजे... रत्नागिरी शहर...  त्याच बरोबर जिल्ह्यातील इतर शहरे तालुके आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्हा सायकलमय होईल हे उद्दिष्ट असले पाहिजे... 

तसेच टुरिंग सायकलिंगसाठी सुद्धा प्रोत्साहन द्यावे... रत्नागिरी मधून जाणाऱ्या टुरिंग सायकलिस्टला क्लबची मदत  आणि मार्गदर्शन मिळाले तर तो सुद्धा आपल्या क्लबचा प्रचार प्रसार करू शकतो... या द्वारे प्रत्येक प्रांतात आपला सायकलिस्ट  मित्र पाहिजे...  हे ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट साध्य होईल...

रत्नागिरी सायकल क्लबला पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा...

जय श्री राम...


सतीश विष्णू जाधव,  सायकलिस्ट, मुंबई 7977690693

Thursday, September 26, 2024

सायकल रपेट आणि मोबाईलचा डॉक्टर हेमंतची भेट... दि. २६ सप्टेंबर २०२४

सायकल रपेट आणि मोबाईलचा डॉक्टर हेमंतची भेट... 

दि. २६ सप्टेंबर २०२४

सकाळी पाच वाजता उठलो... खिडकीतून बाहेर डोकावले तर रस्ता ओलाचिंब आणि पावसाची रिपरिप सुरू होती... कालच रेड अलर्टचा इशारा मिळाला होता... म्हणून सकाळी सायकलिंग साठी बाहेर न पडता एक तास मेडीटेशन नंतर २८ सूर्य नमस्कार घातले...

काश्मिर ते कन्याकुमारी राईडची अंतिम तयारी सुरू आहे म्हणूनच सायकलिंग सोबत सूर्यनमस्कार सुद्धा सुरू केले आहेत... 

घरातील सर्व कामाची यादी घेऊन दुपारी सखिसह बाहेर पडलो... बाजारातच परममित्र अल्ट्रा रायडर आणि कोच अंकुश साळुंखे आणि संतोषची भेट झाली... जेव्हा जुने मित्र नव्याने भेटतात तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही...

घरातील सर्व कामांचा निपटारा करून... ग्रँट रोडला गेलो... ब्ल्यू टूथ स्पीकर आणन्यासाठी... त्याची बॅटरी लवकर ड्रेन होत होती... बोट कंपनी मध्ये रीपेरींग पॉलिसी नाही... जर पिस वॉरंटी मध्ये असेल तर रीप्लेसमेंट मिळते... 

दोन दिवसांपूर्वी राज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तो स्पीकर घेऊन गेलो त्याने बाजूलाच असलेल्या रीपेरर  हेमंतचे दुकान दाखवले... गुजराती मारवाडी यांच्या गराड्यात मराठी माणसाचे दुकान मनाला दिलासा देऊन गेले... त्याने स्पीकर चेक करून त्याची बॅटरी खराब झाल्याचे सांगितले... नवीन  ओरिजीनल बोट कंपनीच्या  बॅटरीचे... त्याच्या कारागिरी सह... सातशे रुपये होतील असे सांगितले... बोट कंपनीचा स्पीकर घेऊन दोन वर्ष झाली होती... आणि नवा स्पीकर दोन हजार पर्यंत होता... म्हणून हेमंतला होकार दिला बॅटरी बदलण्यासाठी... ती आज मिळणार होती...

हेमंतच्या दुकानात गेलो तर नेमका तो जेवायला गेला होता...  यायला तासभर लागणार होता... म्हणून बाजूलाच असलेल्या सॅमसंग गॅलरीत गेलो... दोन वर्षापूर्वी घेतलेला सॅमसंग मोबाईल आता एकदम ड्रेन होत होता... सकाळी चार्ज केला की दुपारपर्यंत डिस्चार्ज व्ह्यायचा... त्यामुळे सतत पॉवर बँक घेऊन फिरावे लागत होते... 

 गॅलरीमध्ये मोबाईल दाखवल्यानंतर... पंधरा मिनिटांनी रिपोर्ट आला... मोबाईलची बॅटरी खराब झाली आहे... बॅटरीचा खर्च साडेचार हजार रुपये... आणि डेटा नाहीसा होऊ शकतो... तसेच दोन दिवस मोबाईल ठेवावा लागेल... 

मोबाईल दोन दिवस गॅलरीत ठेवण्याची तयारी नव्हती... यापेक्षा नवा मोबाईल घेऊन त्यात डेटा ट्रान्स्फर करून मगच जुना मोबाईल दुरुस्तीला द्यावा... असे ठरवून सॅमसंग गॅलरीतून बाहेर पडलो... येथून नरिमन पॉइंट लूप पूर्ण केला...

 आणि तासाभरात हेमंतच्या दुकानात आलो... हेमंत ब्ल्यु टूथ स्पीकरमध्ये नवी बॅटरी बसवत होता... दहा मिनिटात त्याने स्पीकर टकाटक केला... त्यात मायक्रोकार्ड बसवून... खणखणीत आवाजात स्पीकर चालू केला... काश्मिर कन्याकुमारी सायकलिंगसाठी याचा मस्त उपयोग होणार होता...

हेमंतला सॅमसंग मोबाईलचा प्रोब्लेम सांगितला... त्याने माझ्या समक्ष मोबाईल उघडला आणि म्हणाला बॅटरी फुगली आहे... बदलावी लागेल... किती होतील... तर म्हणाला ओरिजनल बॅटरी टाकली तर माझ्या मजुरीसह पंधराशे रुपये होतील... यातील  डेटा नाहीसा होईल काय... हेमंत म्हणाला बिलकुल नाही... मनाला दिलासा वाटला... आणि नवा मोबाईल घेण्याचे विचारचक्र थांबले... किती वेळ लागेल... हेमंत म्हणाला... मार्केट मधून ओरिजनल बॅटरी आणावी लागेल... आणि तासाभरात काम होईल...

जुनी बॅटरी घेऊन हेमंत मोटरसायकल घेऊन मार्केटमध्ये गेला तेव्हढ्यात पाऊस सुरू झाला... पाऊस थांबल्यावर हेमंत अर्ध्या तासात परत आला आणि दहा मिनिटात नव्या बॅटरीसह मोबाईल फिट करून माझ्या ताब्यात दिला... सर्व डेटा सुरक्षित आहे का ते तपासले... एकदम ठिकठाक पाहिल्यावर खूप आनंद झाला... 

साडेचार हजार रुपये खर्च, डेटा जाण्याची शक्यता, दोन दिवस मोबाईल ठेवा... या सर्व दुष्ट चक्रातून मोबाईलच्या खऱ्याखुऱ्या डॉक्टरने अतिशय माफक खर्चात मोबाईलला संजीवनी दिली होती... 

आज मोबाईलच्या प्रामाणिक डॉक्टरची भेट झाली होती...

आजची पंचवीस किमी राईड हेमंतला सप्रेम भेट...

Friday, September 6, 2024

उमलिंगला पास सायकल वारी.. विश्रांती आणि सायकल सर्व्हिसिंगचा दिवस... दि. २० जुलै २०२४

उमलिंगला पास सायकल वारी.. विश्रांती आणि सायकल सर्व्हिसिंगचा दिवस... दि. २० जुलै २०२४

आज विश्रांती आणि सायकल सर्व्हिसिंगचा दिवस होता... संजयला आणखी एक दिवस विश्रांती हवी होती... सकाळीच संजयची बायको पूजाचा फोन आला... संजयची खुशाली विचारण्यासाठी...  तिला ताबडतोब तिघांचा फोटो शेअर केला... संजय एकदम ठिकठाक आहे... हे कळण्यासाठी...

सर्लीचा डिरेलर हॅंगर फाईन ट्युनिंग करणे आवश्यक होते... मागचा गियर एक आणि दोन वर जात नव्हता... प्रथम  हॅंगरचे फोटो काढले...

सायकलचे चाक  फ्रेम मधून बाहेर काढले... त्यानंतर परेशच्या मदतीने  हॅंगर खोलला... हॅंगरच्या बाहेरील पट्टी वाकडी झाली होती... तिला पक्कड आणि हातोडीच्या साहाय्याने सरळ केले... ती पट्टी पुलीसह पुन्हा लावताना काढलेल्या फोटोची मदत झाली... आता गियर एक आणि दोन वर शिफ्ट होत होता... सर्लीची टेस्ट राईड घेतली... शंभर टक्के पास झाली सर्ली... टुरिंग राईड करताना सायकलचे रीपेरिंग शिकणे म्हणूनच अतिशय महत्त्वाचे असते... 

नाष्टा झाल्यावर सकाळी क्वालिस गाडी आली... परेश बरोबर सोमोरिरी तलावाकडे प्रस्थान केले... आज संजय सुमडो येथे पूर्ण विश्रांती घेणार होता... 

सुमडो ते सोमोरीरी सायकल वारी संजय सोबत केली होती... क्वालिस मधून जाताना ती संपूर्ण वारी आठवली... क्यागरसो पर्यंत वर वर चढत जाणारा रस्ता मातीने माखलेला ऑफ रोडींग होता... गाडीत अक्षरशः हाडे खिळखिळी झाली... यापेक्षा या रस्त्यावर सायकलिंग केले असते तर बरे झाले असते... असे वाटले...

सोमूरिरी लेकच्या आधी क्यागरसो तलाव लागतो... या तलावाच्या काठाला पांढऱ्या वाळूचा प्रदेश होता... जणूकाही थंडीत पडणाऱ्या भुरभुऱ्या बर्फाची  वाळू झाली असावी... 

निळेशार पाणी आणि त्यावर वाऱ्याने उठणारे  तरंग... मनाचे अंतरंग... मदमस्त करत होते... मागच्या वेळी माहे ते सो मोरीरी सायकलिंग करताना या तलावापर्यंतचा घाट चढल्यावर माझी दमछाक झाली होती... परंतु टेन्ट लावायला येथे आडोसा मिळाला नव्हता... म्हणून कारझोक कडे प्रस्थान केले होते...

क्यागरसो लेकच्या पुढे  बऱ्याच ठिकाणी रस्ते डांबरी झाले आहेत... त्यावेळी सोमोरिरी जवळ BRO कंत्रादाराचा सुपरवयाजर अलीच्या कंटेनर मध्ये तीन दिवस राहिलो होतो... त्याची चौकशी केली... पण त्याची बदली लेह मध्ये झाली होती... 

कराझोक गाव ओलांडून सोमोरिरी तलावाच्या व्हीव पॉइंट कडे आलो...

तेथून परेशची  फोटोग्राफी  झाली...  परेशच्या बकेट लिस्ट मधील एक इच्छा पूर्ण झाली होती... 


तलावाजवळून जवळपास चार किमी चालत सफर करत... मॉनेस्ट्रीकडे आलो... परेशने खूप फोटो काढले...
एकाच लोकेशनचे वेगवेगळ्या ॲपरचर आणि स्पीड (ISO) मध्ये बदल करून परेश फोटो टिपत होता...

 ढगांचे तलावात पडलेले प्रतिबिंब... लाईट आणि शॅडो इफेक्ट, बर्फाने आच्छादलेली  हिमशिखरे, पक्षांचे बागडणे... हे सर्व निसर्ग सौंदर्य... डोळ्याच्या कॅमेऱ्याने टिपत होतो... डोळ्यांचे पारणे फिटले...

जवळपास दोन तास सोमोरीरि परिसरात फिरत होतो...

कारझोक गावात एका हॉटेल मध्ये फ्राय राईस आणि चावमिन खाऊन पुन्हा सुमडोकडे रवाना झालो...

संजय आता एकदम फ्रेश झाला होता... त्याच्या बरोबर मस्त चहा घेऊन... हॉटेलच्या गच्चीत बसलो... सर्वांशी सुसंवाद करायला...

जय श्री राम...