Friday, September 6, 2024

उमलिंगला पास सायकल वारी.. विश्रांती आणि सायकल सर्व्हिसिंगचा दिवस... दि. २० जुलै २०२४

उमलिंगला पास सायकल वारी.. विश्रांती आणि सायकल सर्व्हिसिंगचा दिवस... दि. २० जुलै २०२४

आज विश्रांती आणि सायकल सर्व्हिसिंगचा दिवस होता... संजयला आणखी एक दिवस विश्रांती हवी होती... सकाळीच संजयची बायको पूजाचा फोन आला... संजयची खुशाली विचारण्यासाठी...  तिला ताबडतोब तिघांचा फोटो शेअर केला... संजय एकदम ठिकठाक आहे... हे कळण्यासाठी...

सर्लीचा डिरेलर हॅंगर फाईन ट्युनिंग करणे आवश्यक होते... मागचा गियर एक आणि दोन वर जात नव्हता... प्रथम  हॅंगरचे फोटो काढले...

सायकलचे चाक  फ्रेम मधून बाहेर काढले... त्यानंतर परेशच्या मदतीने  हॅंगर खोलला... हॅंगरच्या बाहेरील पट्टी वाकडी झाली होती... तिला पक्कड आणि हातोडीच्या साहाय्याने सरळ केले... ती पट्टी पुलीसह पुन्हा लावताना काढलेल्या फोटोची मदत झाली... आता गियर एक आणि दोन वर शिफ्ट होत होता... सर्लीची टेस्ट राईड घेतली... शंभर टक्के पास झाली सर्ली... टुरिंग राईड करताना सायकलचे रीपेरिंग शिकणे म्हणूनच अतिशय महत्त्वाचे असते... 

नाष्टा झाल्यावर सकाळी क्वालिस गाडी आली... परेश बरोबर सोमोरिरी तलावाकडे प्रस्थान केले... आज संजय सुमडो येथे पूर्ण विश्रांती घेणार होता... 

सुमडो ते सोमोरीरी सायकल वारी संजय सोबत केली होती... क्वालिस मधून जाताना ती संपूर्ण वारी आठवली... क्यागरसो पर्यंत वर वर चढत जाणारा रस्ता मातीने माखलेला ऑफ रोडींग होता... गाडीत अक्षरशः हाडे खिळखिळी झाली... यापेक्षा या रस्त्यावर सायकलिंग केले असते तर बरे झाले असते... असे वाटले...

सोमूरिरी लेकच्या आधी क्यागरसो तलाव लागतो... या तलावाच्या काठाला पांढऱ्या वाळूचा प्रदेश होता... जणूकाही थंडीत पडणाऱ्या भुरभुऱ्या बर्फाची  वाळू झाली असावी... 

निळेशार पाणी आणि त्यावर वाऱ्याने उठणारे  तरंग... मनाचे अंतरंग... मदमस्त करत होते... मागच्या वेळी माहे ते सो मोरीरी सायकलिंग करताना या तलावापर्यंतचा घाट चढल्यावर माझी दमछाक झाली होती... परंतु टेन्ट लावायला येथे आडोसा मिळाला नव्हता... म्हणून कारझोक कडे प्रस्थान केले होते...

क्यागरसो लेकच्या पुढे  बऱ्याच ठिकाणी रस्ते डांबरी झाले आहेत... त्यावेळी सोमोरिरी जवळ BRO कंत्रादाराचा सुपरवयाजर अलीच्या कंटेनर मध्ये तीन दिवस राहिलो होतो... त्याची चौकशी केली... पण त्याची बदली लेह मध्ये झाली होती... 

कराझोक गाव ओलांडून सोमोरिरी तलावाच्या व्हीव पॉइंट कडे आलो...

तेथून परेशची  फोटोग्राफी  झाली...  परेशच्या बकेट लिस्ट मधील एक इच्छा पूर्ण झाली होती... 


तलावाजवळून जवळपास चार किमी चालत सफर करत... मॉनेस्ट्रीकडे आलो... परेशने खूप फोटो काढले...
एकाच लोकेशनचे वेगवेगळ्या ॲपरचर आणि स्पीड (ISO) मध्ये बदल करून परेश फोटो टिपत होता...

 ढगांचे तलावात पडलेले प्रतिबिंब... लाईट आणि शॅडो इफेक्ट, बर्फाने आच्छादलेली  हिमशिखरे, पक्षांचे बागडणे... हे सर्व निसर्ग सौंदर्य... डोळ्याच्या कॅमेऱ्याने टिपत होतो... डोळ्यांचे पारणे फिटले...

जवळपास दोन तास सोमोरीरि परिसरात फिरत होतो...

कारझोक गावात एका हॉटेल मध्ये फ्राय राईस आणि चावमिन खाऊन पुन्हा सुमडोकडे रवाना झालो...

संजय आता एकदम फ्रेश झाला होता... त्याच्या बरोबर मस्त चहा घेऊन... हॉटेलच्या गच्चीत बसलो... सर्वांशी सुसंवाद करायला...

जय श्री राम...

No comments:

Post a Comment