Monday, April 1, 2024

अयोध्या वारी...दिवस पहिला... २६ फेब्रुवारी २०२४

अयोध्या वारी...

दिवस पहिला... २६ फेब्रुवारी २०२४

सकाळीच नागपूर स्टेशनमध्ये आगमन झाले. येथील परममित्र दिलीप वरकड आणि प्रदीप देशपांडे यांनी इतर सायकलिस्ट मित्रांसोबत रेल्वे स्टेशनमध्येच गुलाबपुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले... अरुण नेवसेच्या नागपूरच्या मित्रांनी शुभेच्छासह सुकामेवा पाकीटे  दिली.

नागपूर शहर सायकल वारी सुरू झाली... वाटेत प्रथम नागपूरचे ग्रामदैवत श्री रामाचे दर्शन घेतले...

तेथून झीरो पॉइंटकडे आलो... भारताचा केंद्रबिंदू किंवा मध्य ह्या स्थळाला म्हणतात... 

तेथून हायकोर्ट इमारत आणि  विधानभवन पाहिले... येथील विधानभवनात महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन भरते... 

वाटेत दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसाची ट्रीट मिळाली... अतिशय स्वादिष्ट आणि लुसलुशीत स्पंज डोसा जिभेवर ठेवताच विरघळून जात होता...


बाजूलाच असलेल्या चहावाल्या दादांनी चहाचे पैसे घ्यायला नकार दिला... नागपूरची नवीन ओळख मिळाली...

अयोध्या वारी सुरू झाली नागपूरच्या  स्वातंत्रवीर सावरकर चौकातून...  तेथे भेट झालेल्या सेलिब्रिटी आणि जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी DD TV साठी  मुलाखत घेतली...


आणि अयोध्या वारीला शुभेच्छा दिल्या... येथेच नर्मदा परिक्रमा पायी करणारे समाजसेवक श्री संजय कठाळे यांची ओळख झाली...

तेथून सर्वजण दिलीपच्या वरकडच्या घरी निघालो. दिलीपच्या घरचा पाहुणचार एकदम फर्मास होता... त्याच्या घरातील कलात्मकता एकदम भावली... मेडल्स ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांनी घराचा एक कोनाडा व्यापला होता...


तसेच घराला घरपण देणारे कुटुंबीय आणि त्यांनी केलेला पाहुणचार एकदम फर्मास होता... टुमदार मोठ्या माडीपेक्षा दिलीपचे मन खूप मोठे आहे... याचा प्रत्यय आला...

नागपूर दर्शनासाठी स्थानिक सायकलिस्ट संजय आणि अर्चना बोंगीलवार, विश्वास चाटी, जयंत मेंधी आणि उदय पानवलकर यांनी सायकल साथ दिली... यावेळी खूप गप्पा झाल्या... सर्व सायकलिस्ट मित्रांना मुंबई वारी करण्याचे आमंत्रण दिले...

तेथून जागतिक विक्रमवीर आणि अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थाच्या घरी गेलो... एव्हढा मोठा माणूस... नागपूरची शान... आम्हाला "कूछ मिठा हो जाय" ची ट्रीट दिली...

सर्वांना सह्या दिल्या... आणि   झेंडा फडकवून नागपूर ते अयोध्या सायकल वारीसाठी शुभेच्छा दिल्या...

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानं... नागपुरात वीर सावरकरांना आदरांजली वाहताना... सेलिब्रिटी आणि प्रतिथयश शेफ विष्णू मनोहर यांची भेट... तसेच अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थ यांनी केलेला फ्लॅग ऑफ आणि नागपूरचे सायकलिस्ट यांनी केलेले स्वागत... तसेच दिलीप वरकड व प्रदीप देशपांडे यांनी केलेला पाहुणचार... अरुण नेवसेच्या नागपूरच्या मित्रांनी शुभेच्छासह सुकामेवा पाकीट देणे... या सर्व गोष्टी वारीच्या आरंभाचा शुभसंकेत होता...

दुपारचे बारा वाजले नागपूर वरून पुढे प्रस्थान करायला... देवलापार गावापर्यंत जवळपास पासष्ट किमी सायकल सफर करायची होती... रामसेनेची  अयोध्यावारी एकदम झोकात सुरू झाली होती...

उन्हे चढली होती... त्यामुळे पेडलींगचा वेग अंमळ कमी झाला होता... दर दहा किमी अंतरावर हायड्रेशन साठी थांबावे लागत होते...

  चाळीस किमीवर एका ट्रक मधून दोन रामभक्त उतरले... आणि चहापान घेण्यासाठी आग्रह करू लागले... खंडाळा गावाजवळच्या  धाब्यावर थांबल्यावर... दोघांतील एकजण मालिशवाला निघाला...  राजेश नागपुरे... त्याने सर्वांच्या पायाला ऍक्युप्रेशर करून जबरदस्त मालिश केली...  छोट्या पेन्सिलच्या साहाय्याने पायाच्या बोटांच्या नसा दाबून संपूर्ण पायाचे मसल रिलॅक्स केले होते राजेशने... 

"ज्याची आपण इच्छा करतो... तेच आपल्याकडे चालत येते" या उक्तीचे प्रत्यंतर आले ... रात्रभराचा प्रवास आणि सकाळी नागपूर फिरून सायकलिंगला सुरुवात... यामुळे आलेल्या शिथिलतेला ऊर्जेत परिवर्तित करण्यासाठीच या मर्कटसेनेला हनुमंताच्या रूपाने भेटला होता राजेश... जवळपास पाऊण तासाचा ब्रेक झाला होता...

अंधार पडायच्या आधी थांबणे आवश्यक होते... त्यामुळेच पन्नास किमी अंतरावरील मनसर येथे थांबण्याचा निर्णय झाला...  मनसर येथील सरपंच कैलास नरुळे यांनी गावातील राम मंदिरात राहण्याची व्यवस्था केली .. तसेच जवळील पांडेजीच्या मेसमध्ये जेवणाची सुद्धा व्यवस्था केली... आज नागपूर दर्शनासह एकूण ७५ किमी राईड झाली होती...

वातावरणात गारवा होता... राममंदिर परिसरातील हनुमान मंदिराच्या व्हारांड्यावर झोपण्यासाठी पुजाऱ्याने भलेमोठे जाजम टाकले... अयोध्येला निघालेली वानरसेना महाबली हनुमंताच्या देखरेखीखाली होती... वारीच्या पहिल्याच दिवशी भेटलेल्या प्रत्येक रामभक्ताने आमची काळजी घेतली होती... 

ज्या वाटेने आम्ही निघालो होतो... तीच्यावरचा प्रवास हा स्वतःच स्वतःचे सार्थक होता... 

कृतार्थ मनाने झोपेच्या अधीन झालो...

जय श्री राम...

6 comments:

  1. सुंदर मनोगत ❤️

    ReplyDelete
  2. अप्रतिम… केवळ वर्णन नव्हे… अविट गोडीच्या
    सर्व क्षणचित्रांचा चित्रपट जणू वाचक सार काही तुझ्या सोबत चालतोय…

    ReplyDelete
  3. …अनुभवत तुमच्या सोबत चालतोय…

    ReplyDelete
  4. एका मित्राने वरील ब्लॉग मध्ये आलेल्या खालील उक्तीचा अर्थ विचारला...

    *ज्या वाटेने आम्ही निघालो होतो... तीच्यावरचा प्रवास हा स्वतःच स्वतःचे सार्थक होता...*

    मनात उठलेलं विचारांचे तरंग... वरील वाक्यातून प्रतीत झाले... जे भाव मनात उठले होते... त्याचा भावार्थ...


    आम्ही ज्या वाटेवरून निघाला होतो...

    ती वाट श्री रामाच्या जन्मस्थानाकडे घेऊन जात होती...

    ज्या स्थानावर मुस्लिम दावा ठोकून होते...

    पाचशे वर्ष अविरत संघर्ष करून राम मंदिर उभे राहिले होते...

    ही इतिहासातील पहिली घटना होती... जिच्यामुळे हिंदू अस्मिता जागृत झाली होती...

    त्यामुळे मन अतिशय भावूक, हळुवार झाले होते ...

    या अयोध्या वारी मुळे मन भविभोर झाले होते...

    याची देही याची डोळा सत्य दर्शन घडवणार होते...

    तृप्ती करणारे होते... जीवनाला अर्थ सापडला होता...

    म्हणूनच स्वतः स्वतःचे सार्थक होता...

    सतीश जाधव

    ReplyDelete
  5. अप्रतीम लेखांकन सतीश जी . आम्ही नागपुरकर भाग्यशाली आहोत या यात्रेत खारीचा वाटा उचलायचे भाग्य आम्हास लाभले 👍🙏

    ReplyDelete
  6. सतीश सुंदर लिहिलंय -रवी बनकर

    ReplyDelete