Wednesday, April 24, 2024

बोईसर फ्लायर्स सायकल संमेलन... आणि मुंबई-ठाणे ते बोईसर सायकल वारी... दि. २० एप्रिल २०२४

बोईसर सायकल संमेलन... आणि मुंबई-ठाणे ते बोईसर सायकल वारी... दि. २० एप्रिल २०२४

सायकल संमेलनासाठी... बोईसर पर्यंत राईड करत येणार... हे ऐकूनच बोईसर फ्लायर्सच्या सदस्यांना आनंद झाला होता... आम्हा पाच जणांच्या टीम मध्ये दोन महिला आहेत... हे समजल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही...

सुवर्णा, हर्षदा आणि संभाजी या तीन जणांच्या टीमने पहाटे चार वाजता ठाण्यावरुन तर माझ्यासह नवनीतने  पहाटे साडेतीन वाजता मुंबईच्या सिध्दीविनायक मंदिराकडून सुरुवात केली... ते निव्वळ दुपारच्या उन्हाचा तडखा  लागू नये या साठीच... सर्वजण बरोब्बर साडेपाच वाजता घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेल जवळ एकत्र आले...

प्रचंड ट्रॅफिक मध्ये पुढील राईड सुरू झाली... एकमेकांना फॉलो करत... तासातासाने हायड्रेशन घेत राईड सुरू होती... दहा वाजायच्या आधी हायवे पार करायचा असा निर्धार होता...

सुवर्णा आणि हर्षदा आता पट्टीच्या रायडर झाल्या होत्या... सुवर्णाची तर ही पहिलीच शतकी राईड होती... उन्हातान्हात कशी राईड करणार याची घरच्यांना चिंता होती... त्यावर महिलांनी तोडगा काढला होता... काही अडचण आली तर ट्रेनमध्ये सायकल टाकू आणि पुढे जाऊ... परंतु राईड पूर्ण करायची हाच मनोमन  निर्धार होता... 

प्रचंड धूळ आणि ट्रॅफिक यांचा सामना करत पावणेनऊ वाजताच सकवार येथील रामकृष्ण मिशन केंद्रात गेलो... अतिशय शांत, निर्मळ आणि अध्यात्मिक वातावरणात सर्वजण एकदम प्रसन्न झाले... नवनीतच्या ओळखीमुळे केंद्रामध्ये अल्पोपहाराची व्यवस्था झाली... कांदापोह्या सोबत फलाहार आणि चहा मिळाला...

येथील बाबाजी आणि माताजींची भेट झाली...

हे केंद्र पंचक्रोशीतील गावकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवते... तसेच गावातील आदिवासी आणि गरीब मुलांना व्यवसायभिमुख प्रशिक्षण देते... मुलांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करते... सर्व उपक्रम मोफत चालविले जातात... मुलांसोबत फोटो काढले... विशेष म्हणजे या सर्व मुलांना सायकल चालवता येत होती...

माताजी पद्मा ताई यांनी विवेकानंद केंद्र संचालित नालासोपारा येथील शारदा शिशु निकेतनला भेट देण्याचे निमंत्रण दिले... सायकलने बोईसरला निघालोय यांचे त्यांना खूप अप्रूप वाटत होते...

स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचे प्रत्यक्षिकच पाहायला मिळाले...  रामकृष्ण मिशन केंद्रात सेवा देण्याचे मनी ठरविले...  बाबाजी आणि माताजींचे  आशीर्वाद घेऊन पुढे मार्गक्रमण केले...

नंतर हायवे सोडून वरई येथे पालघर रस्त्याकडे वळसा घेतला... .. वैतरणा नदीवरील अरुंद पुलावर पोहोचायला साडेदहा वाजले होते... जेमतेम एक गाडी जाईल एव्हढाच हा पूल आहे... त्यामुळे सिग्नल होते...  पुलाच्या  दोन्ही बाजूला असलेल्या पाईपच्या लोकेशन वर मस्त फोटोग्राफी केली...

पुढे दोन दोन ग्लास उसाचा रस प्यायलो....

ऊन वाढत होते... अंग घामाने भिजून चिंब झाले होते... आणि आता आले सूर्या धरण... धरणातून ओसंडणारे फेसाळलेले पाणी पाहूनच मन आनंदाने बेभान झाले... सायकल कठड्याला लाऊन झोकून दिले सर्वांनी धरणाच्या पाण्यात...

अंगावर पडणाऱ्या जलधारा... संपूर्ण शरीराला मसाज करत होत्या... नाचणे, बागडणे, हुंदडणे, मस्ती करणे, ओरड घालणे... सर्वजण अक्षरश: बालपणात गेले होते... बेहोश झाले होते...


जवळपास पाऊण तास पाण्यात खेळत होतो... कशानेही कोमेजू नये असे एक सुंदर शैशव, बालमन  सर्वांना  लाभले होते... 

तीच बालपणीची प्रचंड ऊर्जा घेऊन ओल्या कपड्यांनीच सर्वजण एका दमात घाट चढले ... वाघोबा मंदिरात पोहोचायला भर दुपारचा एक वाजला होता... पाण्यात भिजल्यामुळे उन्हाचा दाह कोणालाच जाणवला नाही... सुवर्णा आणि हर्षलमध्ये तर आता सायकलिंग करतच बोईसरला पोहोचायचे हा आत्मविश्वास दृढ झाला होता... वाघोबा मंदिराजवळ खूप माकडे असल्यामुळे येथे काहीही खाण्याचे टाळले... 

सोबत घेतलेले ताडगोळे, कलिंगड, आणि रानमेवा जाम शेलवाडी गावाजवळच्या  गर्द वनराईत बसून हडप केले...  बालपण अजूनही ताजे होते... त्यामुळेच झाडाच्या एका फांदीवर सुवर्णा आणि हर्षल उभ्या राहिल्या होत्या...

येथून बोईसर चौदा किमी होते... टप्पा आवाक्यात आला होता... पालघर जवळील शिवाजी चौकाला  वळसा मारून बोईसर गाठले... 

स्टेशनजवळ हसतमुख अक्की उर्फ  आकाश रुपटक्के आम्हाला घ्यायला आला होता... 


तेथून सायकल दुकानाजवळ आलो...   सायकल दुकानदार आणि सायकलिस्ट प्रियेश बरनवाल बोईसरच्या सर्व सायकलींचा डॉक्टर आहे... त्याने फक्कड चहा पाजला... त्याचा भाऊ वरुणकुमार  IAS अधिकारी आहे.

बोईसर फ्लायर्सचे अतिशय आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व सायकलपटू रामदास जाधव यांनी सर्वांचे जंगी स्वागत केले... शाल आणि आंबा सरबत देऊन सन्मान केला...

आदल्या दिवशीच रामदासने बोईसर ते मुंबई आणि परत बोईसर अशी दोनशे पंच्याहत्तर किमी सायकलवारी अनवाणी केली होती... विकास कोळीसह बोईसर फ्लायर्सचे बरेच सदस्य आमच्या स्वागताला तत्पर होते...  प्रचंड सायकलिंग केल्यामुळे आता काहीही पचणार होते...

सुवर्णाचे बॅचमेट बोईसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि मॅरेथॉनपटू  श्री पवार साहेब यांना भेटायला  पोलीस स्टेशनला गेलो... सुवर्णा भर उन्हात सायकलिंग करत बोईसरला आली याचं त्यांना खूप आश्चर्य वाटले... सर्वांचे त्यांनी कौतुक केले...


आणि झकास लस्सीचा पाहुणचार केला... पवार साहेबांचा निरोप घेताना पोलीस स्टेशनच्या गेट जवळ गृप फोटो काढला...

BARC च्या गेस्ट हाऊस मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती... विकास म्हणाला...चिंचणी बीच वर जायचे काय... सर्वांनी एकसाथ होकार दिला...सायकलपटू सरिता जारोली हिने डबा भरून कलिंगड काप आणले होते... ते फस्त करून आणि पाऊण तासात तयार होऊन सर्वजण निघाले चिंचणी समुद्रकिनारी... 

सोबत सायकलिंग करत... सरिता, रामदास आणि विकास होते... वाटेत रामदास सोबत गप्पा रंगल्या... एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व संपर्कात आले होते... त्याच्याकडे खच्चून सकारात्मक भाव भरभरून आहे... कमीत कमी खर्चात सायकलने मोठे पल्ले कसे गाठायचे... हे समजले... आपल्या मुलाला राष्ट्रीय पातळीवर बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक मिळेपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असे व्रत आहे रामदासचे... आणि दररोज पन्नास किमी सायकलिंग करतोय पठ्ठ्या... दोन चार दिवस कामामुळे सायकलिंग करता आली नाही तर... एकदम दोन तीनशे किमीचा टप्पा एका दिवसात पार करतो... आहे की नाही ध्येय वेडा... निव्वळ आणि निव्वळ मुलाला प्रोत्साहन मिळावे आणि "तुझ्या मेहनती सोबत मी सुद्धा इप्सित ठेवले आहे" याचीच सतत मुलाला जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न आहे... खरंच या सायकलिंगमुळे  प्रचंड व्यक्तिमत्त्वाची भेट झाली होती... रामदास बरोबरच त्याची नत्थुलाल जैसी मिशी खूप भावली...

वाटेत तारापुरचे अणुवीज केंद्र पाहिले...


जवळपास पंधरा किमी राईड करून चिंचणी बीचवर पोहोचलो... तेथे भेट झाली सहकुटुंब विशाल आणि पूनम राऊतची... 


सूर्यास्ताचे विहंगम दृश्य डोळ्याच्या कॅमेऱ्यात साठवले... भलामोठा लाल तांबूस गोळा हळूहळू सागरात विसर्जित होताना डोळ्याचे पारणे फिटले... 

समुद्रावर खूप वेळ बसून राहिलो... सृष्टीचे मुक संगीत ऐकत.....अगदी मंत्रमुग्ध होऊन... सर्व सायकल मित्रांच्या गराड्यात सुद्धा एकांतात गेलो होतो... कुठल्यातरी एका अगदी अज्ञात अपार्थिव अशा प्रदेशात वावरत होतो...


जिथे मी आणि सागरात डुंबणारा रवी यांखेरीज दुसरे काहीही नव्हते... त्या क्षणाचा कृतार्थतेचा आनंद डोळ्याच्या झरोक्यातून ओसंडून वाहत होता...


चमचमीत आणि चटणीदार वडापावमुळे...
एकांतवास संपवून जनसागरात दाखल झालो... आणि मारला ताव गरमागरम वडापाव वर... 

कृतार्थ मनाने परतीची राईड सुरू झाली... सरिताच्या साथीने भन्नाट वेगात BARC गेस्ट हाऊस मध्ये  पोहोचलो... 

आजच्या दिवसाचा हाय लाईट अजून शिल्लक होता...

रात्रीच्या जेवणात विकास कोळीचा घरातून आलेले पदार्थ रसनेच्या राज्यात घेऊन गेले... भरलेले पापलेट आणि सुरमई फ्राय, घोळीचे कालवण, सुके चिकन, तांदळाची लुसलुशीत भाकरी आणि भात... त्याच्या वर विकासच्या मित्राने... राहुल पाटीलने आणलेली जायकेदार पुरणपोळी या सर्व पदार्थांनी भुकेची तारांबळ उडाली होती... हे खाऊ की ते... असेच काहीसे झाले होते... सर्वांनी जेवणाचा फर्मास आस्वाद घेतला...

बोईसर फ्लायरच्या प्रचंड आदरतिथ्याने  आम्ही सर्वजण स्तिमित झालो होतो... त्यात आजची १४० किमीची सायकल राईड कुठल्याकुठे विरून गेली होती... 

तऱ्हेतऱ्हेच्या सुगंधी फुलांनी भरलेल्या परडीसारखे हे बोईसर फ्लायर्स होते... प्राजक्ताचे झाड हलवल्यावर फुलांचा टपटप सडा पाडवा तसा या बोईसर फ्लायर्सचे सदस्य आमच्या सेवेला तत्पर होते...

सायकल आणि निसर्गावरच्या उत्कट प्रेमाचा साक्षात्कार घडला होता... आणि अकृत्रिम जिव्हाळ्याचे बंध निर्माण झाले होते...

उद्याच्या बोईसर पालघर ड्रीम राईडसाठी निद्रादेवीच्या अधीन झालो...

15 comments:

  1. Very Nice Excited to explore this place with my Bicycle and friends

    ReplyDelete
  2. सुंदर शब्दांकन सर.. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा केलात, तुम्ही खूप छान लिहता तुमच्यातील हा ही एक पैलू आज माहीत झाला...

    सर तुमच्याशी जास्त बोलायला नाही मिळाले, पण तुम्ही सांगितले तसे दररोज मेडिटेशन करायला सुरुवात केली आहे, आणि हो येथून पुढे मी माझ्या रागाबद्दल बोलताना.. माझा राग हा hereditary आहे असे मुळीच म्हणणार नाही..खरच तुम्हाला व तुमच्या सोबत आलेल्या टीम मेंबर्सना मनापासून धन्यवाद तूम्ही तुमचे बहुमूल्य अनुभव आमच्या सोबत शेअर केले , त्यामुळे आम्हला खूप खूप प्रेरणा मिळाली.

    (संतोष मोरे, पालघर)

    ReplyDelete
  3. सायकलची दोन चाके, जणु पंख तुझे ! आकाशी झेप घेण्याचे स्वप्न साकारेल तुझे. 👍

    ReplyDelete
    Replies
    1. Above comments by D.N.Jadhav, Currey Road, near God's Gift.

      Delete
  4. सुंदर शब्दांकन सर.. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा केलात, तुम्ही खूप छान लिहता तुमच्यातील हा ही एक पैलू आज माहीत झाला...

    सर तुमच्याशी जास्त बोलायला नाही मिळाले, पण तुम्ही सांगितले तसे दररोज मेडिटेशन करायला सुरुवात केली आहे, आणि हो येथून पुढे मी माझ्या रागाबद्दल बोलताना.. माझा राग हा hereditary आहे असे मुळीच म्हणणार नाही.☺️ खरच तुम्हाला व तुमच्या सोबत आलेल्या टीम मेंबर्स ना मनापासून धन्यवाद तूम्ही तुमचे बहुमूल्य अनुभव आमच्या सोबत शेअर केले , त्यामुळे आम्हला खूप खूप प्रेरणा मिळाली.,🙏

    (संतोष मोरे, पालघर)

    ReplyDelete
  5. निसर्ग मित्राचे अभिप्राय...

    लेखन अतिशय सुंदर आणि सुगंधित फुलांसारखे.....
    सायकल, निसर्ग , मित्र आणि प्रिय अश्या अन्नपदार्थांवरील अकृत्रिम प्रेमाचे यथार्थ वर्णन आणि यथार्थ दर्शन .....

    ReplyDelete
  6. लेखन अतिशय सुंदर आणि सुगंधित फुलांसारखे.....
    सायकल, निसर्ग , मित्र आणि प्रिय अश्या अन्नपदार्थांवरील अकृत्रिम प्रेमाचे यथार्थ वर्णन आणि यथार्थ दर्शन .....

    ReplyDelete
  7. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील सायकल पटू ना एक व्यासपीठ मिळाव म्हणून बोईसर फ्लायर्स ने तृतीय सायकल संमेलन आयोजित केले होते .
    हे संमेलन खऱ्या अर्थी यशस्वी झाले ते जागतिक विक्रमवीर असणारे श्री सतीश जाधव सर , रिंकू सर , आणि त्यांच्या सोबत मुंबई ,हून बोईसर ला सायकल प्रवास करत एक दिवस अगोदर उपस्थित राहिल्यामुळे . त्यांच्या उपस्थिती मुळे आयोजकांचा आत्मविश्वास आणखी बळावला आणि जो तो आपली जबाबदारी आणखी जोमाने पार पाडू लागला . संमेलना दरम्यान सतीश सरा नी केलेलं अनुभव कथन खर्च प्रेरणादायी होत. प्रवासात आनंद शोधण्याची व्याख्या त्यांच्या कथनातून समजली . याचं संमेलना दरम्यान आम्हला आणखी एक सायकल पटू मिळाला . या महाराष्ट्र दीन विशेष त्र्यंबकेश्वर सायकल वरीत ही तो सामील होत आहे.


    तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे हे संमेलन यशस्वी झाले .

    सर्वांचे आभार .



    Akki


    BOISAR FLYERS

    ReplyDelete
  8. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील सायकल पटू ना एक व्यासपीठ मिळाव म्हणून बोईसर फ्लायर्स ने तृतीय सायकल संमेलन आयोजित केले होते .
    हे संमेलन खऱ्या अर्थी यशस्वी झाले ते जागतिक विक्रमवीर असणारे श्री सतीश जाधव सर , रिंकू सर , आणि त्यांच्या सोबत मुंबई ,हून बोईसर ला सायकल प्रवास करत एक दिवस अगोदर उपस्थित राहिल्यामुळे . त्यांच्या उपस्थिती मुळे आयोजकांचा आत्मविश्वास आणखी बळावला आणि जो तो आपली जबाबदारी आणखी जोमाने पार पाडू लागला . संमेलना दरम्यान सतीश सरा नी केलेलं अनुभव कथन खर्च प्रेरणादायी होत. प्रवासात आनंद शोधण्याची व्याख्या त्यांच्या कथनातून समजली . याचं संमेलना दरम्यान आम्हला आणखी एक सायकल पटू मिळाला . या महाराष्ट्र दीन विशेष त्र्यंबकेश्वर सायकल वरीत ही तो सामील होत आहे.


    तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे हे संमेलन यशस्वी झाले .

    सर्वांचे आभार .



    Akki


    BOISAR FLYERS

    ReplyDelete
  9. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील सायकल पटू ना एक व्यासपीठ मिळाव म्हणून बोईसर फ्लायर्स ने तृतीय सायकल संमेलन आयोजित केले होते .
    हे संमेलन खऱ्या अर्थी यशस्वी झाले ते जागतिक विक्रमवीर असणारे श्री सतीश जाधव सर , रिंकू सर , आणि त्यांच्या सोबत मुंबई ,हून बोईसर ला सायकल प्रवास करत एक दिवस अगोदर उपस्थित राहिल्यामुळे . त्यांच्या उपस्थिती मुळे आयोजकांचा आत्मविश्वास आणखी बळावला आणि जो तो आपली जबाबदारी आणखी जोमाने पार पाडू लागला . संमेलना दरम्यान सतीश सरा नी केलेलं अनुभव कथन खर्च प्रेरणादायी होत. प्रवासात आनंद शोधण्याची व्याख्या त्यांच्या कथनातून समजली . याचं संमेलना दरम्यान आम्हला आणखी एक सायकल पटू मिळाला . या महाराष्ट्र दीन विशेष त्र्यंबकेश्वर सायकल वरीत ही तो सामील होत आहे.


    तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे हे संमेलन यशस्वी झाले .

    सर्वांचे आभार .



    Akki


    BOISAR FLYERS

    ReplyDelete
  10. निसर्ग मित्राचे अभिप्राय

    लेखन अतिशय सुंदर आणि सुगंधित फुलांसारखे.....
    सायकल, निसर्ग , मित्र आणि प्रिय अश्या अन्नपदार्थांवरील अकृत्रिम प्रेमाचे यथार्थ वर्णन आणि यथार्थ दर्शन .....

    ReplyDelete
  11. सरिता जा हीचे अभिप्राय...

    Bahut hi mast sirji.

    Anubhav jindgi ki sabse badi punji hoti hai...the way you are living your life after retirement its appreciable...


    Aapka aashirwad aur sath bana rahe aur hame margdarshan milta rahe.

    ReplyDelete
  12. Congo 🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐

    ReplyDelete
  13. सतीश चिवटेApril 30, 2024 at 12:18 PM

    सतीश सर आपण अनुभवलेला कठीण व थरारक सायकल अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. अशाच पुढच्या सायकल राईड साठी आपणास खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete