Monday, September 8, 2025

ट्रॉम्बेच्या किनाऱ्यावर सापडला मायेचा खजिना...दि. ०८ सप्टेंबर २०२५...

ट्रॉम्बेच्या किनाऱ्यावर सापडला मायेचा खजिना...

दि. ०८ सप्टेंबर २०२५...

काल फोन आला विकासचा...‌ ट्रॉम्बेच्या ताईकडे खेकडे आले आहेत म्हणून... आणि ठरले उद्या सकाळी विकासची बहीण विद्याकडे ट्रॉम्बेला सायकलिंग करत जायचे... 

आज सकाळी सुरू झाली राईड ट्रॉम्बेकडे... प्रियदर्शिनी इमारतीजवळ मी हाय कोली... चा स्टॅच्यु लागला... 

योगायोग होता कोळीवाड्यात चाललो होतो... आणि कोळ्यांच आणि खेकड्याच दर्शन व्हावं...

पुढे चेंबूरला किसन भेटला... सायकलिंग करत सकाळच्या रपेटला चालला होता... डोक्यात ना हेल्मेट... ना हातात ग्लोव्हज... त्याला सांगितल्यावर म्हणतो कसा... आज छोटी राईड आहे ना... सांगितले राईड छोटी असो वा मोठी "सेफ्टी फर्स्ट"... आनंदाने कबूल झाला... 

बोलता बोलता त्याने हाताच्या मसाजचे टेक्निक दाखवले... इंटेन्स सायकलिंग करताना हात सुन्न पडले की जोरदार टाळी कशी वाजवायची हे शिकविले... माझ्या हातावर प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले... 

 ठेंगणा ठुसका... बोलण्यात चटपटीत... गाणी गाण्यात हुशार... मॅरेथॉन रनर...  शरीरशास्त्राची बारकाईने जाण असलेला प्रशिक्षित मालिशवाला... असा अष्टपैलू  आविष्कार असलेला किसनचा हात अतिशय तगडा होता... आणि त्यावरूनच जाणवलेले हस्तकौशल्य अफलातून... निव्वळ दहा मिनिटांच्या भेटीत त्याचे व्यक्तिमत्व अक्षरशः मोहित करून गेले...

आपल्याकडे आहे ते इतरांना देत राहावे” हेच त्याचे ब्रीद... किसनच्या त्या दिलखुलास स्वभावाने मन तर जिंकलेच… आणि त्याला मालिशसाठी घरी बोलवायचे मनोमन नक्की केले...

इतक्यात विकासाचा फोन आला... तो BARC गेट जवळ वाट पाहत होता... सकाळी पाच वाजता खांदेश्वर वरून पेडलिंग करत निघालेला विकास माझ्या भेटीसाठी थांबला होता... 

MTB सायकल घेऊन आला होता विकास... तेथून तडक ट्रॉम्बे जेटीवर गेलो...

ओहोटी असल्यामुळे मासेमारी बोटी जेट्टी पासून दूर अंतरावर उभ्या होत्या... 

जाळ्यात सापडलेले मासे छोट्या बोटीत टाकून किनाऱ्याकडे ढकलत आणण्याचे काम कोळी बांधव करत होते... ओल्या वाळूत होडीच्या ढकलण्यामुळे पाणवाट तयार झाली होती...

समोरून उगवणारा सकाळचा सूर्य मनात नीरव शांतता निर्माण करत होता... 

सोन्याच्या किरणांनी समुद्राचे दर्पण उजळले होते...आणि नवी उमेद घेऊन पहाटेचे आकाश खुलले होते... निसर्गाचे हे असंख्य रंग अनुभवत, त्यात मन हरपून जाण्याचा क्षण हिच संपन्नता असते... आणि त्या लयीत विरघळणे म्हणजेच अखंड आनंदाचे अविनाशी निधान होते...

तेथून अटल सेतूचे दर्शन झाले...  

सेतूच्या ह्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईचे दळणवळण आणि जनजीवन खूप सुसह्य झाले आहे...

तेथून मागे परतत ट्रॉम्बे कोळीवाड्यात विकासाच्या बहिणीकडे विद्याताईकडे जायला निघालो तर वाटेत विकासाची सायकल पंचर झाली... ती तशीच ढकलत विद्याकडे आलो... प्रथम पंचर काढले... आता विकास पंचर काढण्यात एकदम पटाईत झाला आहे... 

घरात शिरताच तव्यावर तळण्याचा खमंग सुगंध नाकात शिरला... हात धुण्याच्या बहाण्याने किचन मध्ये गेलो असता तळत असलेली भरली कारली सूरमयीच्या तुकडी सारखी भासली... तांदळाची लुसलुशीत भाकरी आणि हिरवी चटणी भरलेली कारली खाताना मन तल्लीन झाले...

ठक्कर बेकरीची बिस्किटे, ड्रायफ्रुट लाडू, आणि फक्कड चहा... विद्याताईच्या घरातली शाकाहारी मेजवानी एकदम भारी होती... विकासचे भाऊजी आणि भाचा यांची भेट झाली... दोघेही कामावर जाण्याच्या लगबगीत होते... भाच्याचे लग्न ठरल्यामुळे संपूर्ण घर खुशीत दिसत होते... 

आणि मग सुरू झाला मेजवानीचा दुसरा भाग... विद्या ताईने हसत हसत दोन पिशव्या हातात दिल्या. एका पिशवीत होते लाख भरलेले जिवंत खेकडे, तर दुसऱ्या पिशवीत खाडीची टवटवीत, फडफडीत कोळंबी... खास घरी न्यायला... पैसे घ्यायचं नावही नव्हतं... विद्या ताईला म्हटलं,  या पुढे मला पुन्हा ट्रॉम्बेत बोलवायचं असेल तर पैसे घ्यावेच लागतील...

एक मात्र हृदयात ठसले... मुंबईचे हे भूमिपुत्र एकदा का कुणाला आपलंसं मानतात... तेव्हा त्यांचं दिल खोलके प्रेम... पैशापेक्षा हजारपट श्रीमंत भासतं... आणि त्या निखळ मायेपुढे जगातील प्रत्येक व्यवहार क्षणात लहान ठरतो...

 विकाससह विद्याताईचा निरोप घेतला... BARC नाक्यावर विकास वाशीकडे वळला... त्याचा रामराम घेऊन भरभरून मिळालेल्या प्रेमाच्या सागरावर विराजमान होऊन परतीची सफर सुरू झाली...

आजची चाळीस किमी राईड मुंबईच्या समस्त भूमिपुत्रांना सादर अर्पण...

सतीश जाधव

7977690693

18 comments:

  1. आम्हालाही वाचताना ट्रॉम्बे किनाऱ्यावरून फिरून आल्यासारखं वाटलं...😅🚴👌👌

    ...Dnyanesh Kulkarni 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. ज्ञानेश... मुंबईला ये ... मग मारू एक रपेट ट्रॉम्बे आणि अटल सेतूवरून

      Delete
  2. सतीश जी, खूप छान लिहिलेत..

    ReplyDelete
  3. आहा हा
    सतीश सर आगरी कोळ्यांच्या हिरव्या मसाल्याची आठवण ताजी केलीत. गरमागरम तांदळाची थापलेली भाकरी आणि नुसता हिरवा मसाल्याचं वाटण जरी खाल्लं तरी मन भरून पावते. अर्थात मी शाकाहारी आहे म्हणून तेवढंच खाल्लंय पण बाकी लेख उत्तमच.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अतुल... तांदळाची भाकरी तर माझी फेवरीट आहे...

      Delete
  4. Excellent Satish sir.Wonderful

    ReplyDelete
  5. छान वर्णन...😍

    ReplyDelete
  6. मस्तच. मी आपला खेकड्याच्या कालवणाचे वर्णन वाचायला मिळेल या आशेने आलो...😂

    ReplyDelete
  7. विकास कोळीSeptember 8, 2025 at 5:33 PM

    खुप छान लिहिलंय खुप खुप धन्यवाद सर 🙏

    ReplyDelete
  8. फारच सुंदर लेख 👌

    ReplyDelete
  9. फारच सुंदर लेख 👌

    ReplyDelete
  10. खेकड्याचे कालवण खायला घरी ये... प्रशांत

    ReplyDelete
  11. हे सगळ वाचल्षावर वाटत दादर परेळ भागात आपलही छोट घर असावं, तुमच्या सोबत सायकलवर मनोसक्त रायडींग करांव अस्सल मुंबई डोळ्यात व कॅमेरॅत टिपून घ्यावी व मग भान हरपून पेंटिंगद्वारे कॅनव्हासवर व्यक्त व्हाव!
    दीपक साळी

    ReplyDelete
  12. खूप सुंदर लिहिलय ..एक नंबर ..

    ReplyDelete