लेख नववा... काश्मिर ते कन्याकुमारी
दि. १७ ऑक्टोबर २०२४...
सकाळी मनाच्या त्या संमोहित अवस्थेत बसमध्ये असतानाच पावसाचा वर्षाव होऊ लागला... डोळे मिटले... आणि माझा सायकल (सखी) सोबत असलेला जीवनपट तरळला...
आनंद अन् खुशीचा मामला
सायकलवर जीव टांगला
पहाट झाली जाग आली
वाट फुटली सायकल चालली
सोबत सायकल साथीदार
निसर्गाची रंगत बहारदार
आज इथे तर उद्या तिथे
सायकल जाई हवी तिथे
सकाळी ५.४८ वाजता कन्याकुमारी ११०९ चा बोर्ड लागला... आता सायकल रेस अंतिम टप्प्यात आली होती...
पाऊस पडल्यामुळे रस्ता ओला झाला होता... संपूर्ण आसमंतात लालिमा पसरली होती... हळू हळू सूर्यनारायणाने दर्शन दिले... ते लालबुंद तेजोवलय डोळ्याच्या कॅमेऱ्यात साठवून घेतले... ऊर्जेचे संक्रमण होत होते..
वाटेत ६.१० वाजता चेंज ओव्हर झाले... अंबरीशच्या जागेवर ताजातवाना उल्हास आला... अजयच्या साथीला...
पुढील तासाभरात दोघांनी २२ किमी सायकल पळवली होती... हायवेला अजयच्या सीट खालील सायकलचा मागचा पेडल सैल झाला होता... तो घट्ट करून दिला...
सकाळी पावणे आठ वाजता...पुल्लार टोल प्लाझाच्या पुढे (राष्ट्रीय महामार्ग ४४) हैद्राबाद बंगलोर महामार्गावरील हॉटेल अतिथी मध्ये लखन नाष्टा करायला घेऊन आला... खास उडुपी पद्धतीची न्याहारी म्हणजे इडली वडा सांबार... एका मोठ्या भांड्यात दोन इडल्या आणि एक मेंदू वडा त्यावर झकास सांबार आणि एका छोट्या वाटीत चटणी.... जोडीला मोठ्या चौपात्रात भरभरून सांबार... हवे तेवढे घ्या... एका डिश मध्येच पोट भरले...
त्यावर पुष कॉफी... म्हणजे उकळत्या पाण्यात नुकत्याच कुटलेल्या चिकोरी कॉफीची पुरचुंडी धरल्यावर कॉफी अर्क पाण्यात उतरतो... त्या पाण्यात गरम दूध टाकल्यावर कडवट टिंच असलेली कॉफी तयार होते... एका पेल्यात आवश्यकते नुसार साखर घेऊन त्यावर हा कॉफीचा प्याला रीता केला जातो... प्याला आणि पेला यात कॉफी वर खाली केल्यावर फेसाळलेली ही पुष कॉफी पुढ्यात आली... प्रदेश बदलला कॉफीची रीत बदलली... स्वाद बदलला... आणि त्याचा आस्वाद घेणे... हे भटक्याचे कर्तव्य होते...
अतिथी उडुपी हॉटेलच्या बाहेर ताज पॅलेस हॉटेल मध्ये पत्र्याच्या ड्रम पासून बनवलेले टेबल आणि बसायचा सोफा बनविला होता... तसेच पत्र्यापासून बनविलेली मोठी नाव होती ज्यात बसण्याची सुध्दा व्यवस्था होती...
मोठी बस सकाळी अकरा वाजता सुरू झाली... पुढे गेलेल्या सायकलीला बॅक अप सपोर्ट आणि आवश्यक ती मदत देण्यासाठी सायकल स्वारांना गाठणे आवश्यक होते... पुल्लूर गाव सोडले आणि आता तेलंगणा मधून आंध्र प्रदेशात बसने प्रवेश केला... कृष्णा नदीच्या पुलावरून पार झालो... महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी कृष्णा नदी या दोन राज्यांना जोडते...
साडेअकरा वाजता दोन्ही सायकलिस्टना मोठ्या गाडीने गाठले... उल्हासला आणखी अर्धा तास पेडलिंग करायचे होते... मागे बसलेल्या अजय स्ट्रोकरच्या डाव्या पायाखालचा पेडल निखळून पडला होता... मागचा अर्धा तास अजय फक्त एका पेडलने सायकल चालवत होता...
मागील क्रॅंकच्या स्पिंडलचे थ्रेड स्लीप झाले होते... त्यामुळे दुसऱ्या सायकलचा क्रॅंक तातडीने काढला... तो लावला... त्यावर पेडल बसवला... खराब झालेली चेन बदलली... तसेच मागच्या चेनला ऑईलिंग केले... या सर्व कामासाठी माझ्यासह सुशिल आणि शिवम यांचे हात लागले...
सायकल अप टू डेट करून उल्हास आणि अजयच्या ताब्यात दिली... उल्हासने सायकलचे पेडल मारण्यास सुरुवात केली... आणि सायकल छान तयार झाली या आनंदाच्या भरात अजयने सायकलवर उडी मारली... परंतु त्याचा सीटवर बसण्याचा नेम चुकला आणि सायकलवर पुढे बसलेला उल्हास हडबडला... अजयचे सायकलवर उडी मारून बसणे हे आततायीपणाचे होते...
अकरा वाजता मोठी गाडी निघाली... पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती... वातावरणात गारवा आला होता... अशा वेळी सायकलिंग करणे मजेशीर असते... रायडर्सना थोड्याच वेळात गाडीने गाठले...
दुपारी १२ वाजता चेंज ओव्हर झाले... उल्हासच्या जागेवर शिवम पायलट म्हणून आला... सकाळी सहा पासून दुपारच्या बारा वाजेपर्यंत उल्हासची ८२ किमी राईड झाली होती... अजय आणि शिवमची राईड सुरू झाली आणि बराच वेळ दोन्ही गाड्या सायकलिस्टच्या मागे होत्या...
अजयच्या सूचनेनुसार आता मोठी गाडी २५ किमी पुढे जाऊन थांबणार होती... गाडी पुढे निघाली... वाटेत सव्वा बारा वाजता कन्याकुमारी १००५ बोर्ड लागला...
गाडी अम्माकथाडू टोल प्लाझा वरून पुढे निघाली... आता आम्ही आंध्र प्रदेशात होतो... धोने गावाच्या हायवे वर आरटीओने मोठी गाडी अडवली... ड्रायव्हर अमितकडे कागदपत्रे मागितली... महाराष्ट्र आरटीओ ने दिलेले परमिट त्या पोलीस शिपायाला दाखवले... तो कानडीत काही बोलत होता... आणि अमित हिंदीत... संकेत आणि सुशील खाली उतरले...आरटीओ पोलीस शिपायांचे काय म्हणणे आहे तेच कळत नव्हते... त्या शिपायाने धोने गावातील आरटीओ ऑफिस मध्ये गाडी नेण्यास भाग पाडले...
तेथील आरटीओ अधिकारी कुमार याने सांगितले... तुमची टुरिस्ट कमर्शिअल गाडी आहे... आणि तुमच्याकडे फक्त महाराष्ट्रात कोठेही फिरण्याचा परवाना आहे... महाराष्ट्र आरटीओ ने तुम्हाला इतर सर्व राज्यात जायला परवानगी दिली आहे परंतु प्रत्येक राज्यात गाडीने प्रवेश करण्या आधी त्या राज्याचा रोड टॅक्स भरणे हा नियम आहे... कन्नूर शहरापासून आंध्र प्रदेशची हद्द सुरू होते त्या आधी तुम्हाला ९००० टॅक्स भरणे आवश्यक होते... तो भरला नाही म्हणून पाच पट दंड रक्कम मिळून आता ६४७०० एव्हढा दंड आणि टॅक्स भरावा लागेल... तो पर्यंत गाडी डीटेंड करण्यात येईल...
सुशिल तसेच सागरने बरीच फोनाफोनी केली आंध्रप्रदेश जिल्हाधिकाऱ्याने पण कुमारला फोन केला... शेवटी आरटीओ अधिकारी कुमारने गाडी सोडली... पण एकच सांगितले... सिस्टिम मध्ये दंड रकमेची नोंद झाली आहे तेव्हा तुम्हाला ही रक्कम नंतर सुद्धा भरावीच लागेल...
गाडी घेऊन तेथून निघालो... पण या प्रसंगात दीड तास पोलीस स्टेशन मध्ये आम्ही अडकून पडलो होतो...
पावणे सहा वाजता रायडर बदलले अजय आणिl शिवम यांच्या बदल्यात सागर आणि सुशील यांनी चार्ज घेतला...
दोघांनी पाच किमी वरील टोल प्लाझा ओलांडल्यावर घाटाचा रस्ता लागला... तो त्यांनी सहज पार केला...
अर्ध्या तासात गाडी अनंतपुर शहरातील टाईम स्टेशनकडे आली... या ठिकाणी आराम करण्यासाठी खोली होती... तेथे शिवमची रगडून मालिश केली... जवळपास पाऊण तास त्याची मालिश आयुर्वेदिक तेलाने केली... आता शेवटच्या टप्प्यातील सायकलिंग मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती... त्याचे सर्व स्नायू मुलायम झाले... हे त्याला ताबडतोब लागलेली झोप यावरून लक्षात आले...
सुशीलने सागरला ७१ किमीची साथ दिली.... त्यानंतर
अंबरीश ने १०१ किमी ची साथ दिली... सागरने तर कमालच केली बारा तासात १७२ किमी सायकल चालवली होती... आता सर्व लवाजमा बंगलोर जवळ फक्त ३० किमी अलीकडे पोहोचला होता... तेथून कन्याकुमारी शहर ७०० किमी अंतरावर होते...
पुढे अजय आणि उल्हासने सायकल रामरथ हाकण्यासाठी हॅण्डल रुपी दोरी हातात धरली... वाटेत सात घोड्यांच्या रथावर स्वार झालेल्या सूर्य नारायणाचे दर्शन झाले होते... त्याचेच हे रूपक होते...
वरील सर्व अंतरावरून एक लक्षात आले होते... ही सायकल रेस पूर्ण करण्यासाठी परवा १९ ऑक्टोबरची पहाट उजाडणार होती... माझे आणि महेश दाभोलकरांच्या विमानाचे तिकीट १८ ऑक्टोबर सायंकाळीं ८.२० वाजताचे होते... रत्नागिरीच्या रोलर कोस्टर सायकल शर्यतीचा ब्रँड आयकॉन संयोजकांनी मला बनविले असल्यामुळे १९ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत रत्नागिरी येथे पोहोचणे अगत्याचे होते...
म्हणूनच या काश्मीर कन्याकुमारी रेस मधील सर्व सहकार्यांना प्रचंड शुभेच्छा देऊन... त्यांची रजा घेऊन आज बंगलोर वरून मुंबईला येतोय... त्यामुळे तिरुअनंपुरमचे ते मुंबई चे विमान तिकीट रद्द केले...
माझ्या टीम बरोबर शेवटचे आणि अतिशय उत्कंठा वाढविणाऱ्या दोन दिवसात मी नसणार याचे खूप वाईट वाटत होते...
पण माझी टीम जागतिक विक्रम करणारा आहे हे निश्चित होते...
निसर्गाच्या ओढीने आणि दोन दूरदृष्टी असणाऱ्या तरुणांचे स्वप्न साकारण्या साठीच हा प्रचंड प्रवास करत होतो...
गेल्या सोळा दिवसात सर्वांबरोबर अकृत्रिम जिव्हाळा आणि स्नेह यांचे बंध निर्माण झाले होते... आणि सर्वांच्या या निरपेक्ष प्रेमामुळेच मैत्रीचा खरा अर्थ समजला होता ...
आज सर्वांचा निरोप घेताना... अनामिक हुरहूर लागली जीवाला... त्यामुळे चाललो कुठे तें... पायांना कळत नव्हतें...
बालपणी शाळकरी मित्रांच्या गराड्यात रंगलेला मी आजही माझ्या सेकंड इनिंगमध्ये माझ्यामध्ये मुक्काम करून आहे... हे या सायकल रेसमुळे कळले...
मालिशवाला, सायकल मेकॅनिक, आचारी, हायड्रेशन सपोर्टर, वृत्तलेखनकार, गायक आणि समन्वयक म्हणून एका अंतरंगाच्या रंगपटावर माझ्यातले किती मी रंगले आहेत... याचे आकलन करण्यात गर्क झालो... आणि बंगलोर विमानतळाच्या गराड्यात एकांतात गेलो...
एक नवा मार्ग, नवी दिशा आणि प्रफुल्लित झालेल्या चिरंतन आशा... हे काश्मीर ते कन्याकुमारी रेसने मला दिलेले प्रमाणपत्र होते...
जय श्री राम...
सतीश विष्णू जाधव
सायकलिस्ट, मुंबई
7977690693
9869570266