Thursday, May 7, 2026

भेट मिलिंद सोमणची... दिनांक ०७ मे २०२६

भेट मिलिंद सोमणची... दिनांक ०७ मे २०२६


नरिमन पॉईंटला आज एक भन्नाट लूप मारला…समुद्राच्या साक्षीने जितेंद्र, जयेश, विजय, रवी आणि रणजीत यांची बहारदार भेट झाली… मैत्रीच्या गप्पांनी सकाळ आणखी उत्साही बनली…

त्यानंतर जितेंद्र आणि जयेशसोबत वरळी सीलिंक मार्गे हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत सफर झाली... जितेंद्राला तेथे टाटा करून शिवाजी पार्कच्या दिशेने सायकल वळली…

आणि मग घडला एक अविस्मरणीय क्षण…

शिवाजी पार्कच्या रस्त्यावर समोरून धावत येताना दिसला फिटनेस आयकॉन आणि सेलिब्रिटी  मिलिंद सोमण...

क्षणाचाही विलंब न करता सायकल वळली… जवळ जाऊन म्हटले…

“सर… तुमच्यासोबत एक सेल्फी हवा…”

मोबाईल हातात घेताच मिलिंद हसला… आणि म्हणाला…

“20 Push Ups…” 

क्षणभर आश्चर्य वाटले… पण पुढच्याच क्षणी मिलिंदच्या हातातील मोबाईलचा व्हिडिओ मोड ऑन झाला होता…

शिवाजी पार्कच्या फूटपाथवर… डोक्यात हेल्मेट… अंगात उत्साह… मिलिंद काउंटिंग करत होता... उत्साह वाढवत होता... आणि सलग 20 पुश अप पूर्ण झाले… 

दररोज करत असलेल्या सूर्यनमस्कारांनी शरीरात भरलेली ऊर्जा आज कामी आली… एकही क्षण जड गेला नाही…

पुश अप पूर्ण झाल्यावर मिलिंदने विचारले…

“How do you feel…?”

उस्फूर्त उत्तर आले…

“एकदम झकास…!” 

पुढचा प्रश्न…

“आज किती किमी सायकलिंग केले…?”

उत्तर दिले…

40 किमी… आणि दोनदा काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग पूर्ण… 69 वर्षांचा तरुण…

हे ऐकताच मिलिंदच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचे भाव एकत्र उमटले…

आणि त्याच्या तोंडून आलेला एक शब्द… “Wow…!”

खेळाडूने खेळाडूला दिलेली ही शाबासकी म्हणजे आयुष्यभर जपून ठेवावे असे मानाचे प्रशस्तीपत्र होते… 

आजचा हा क्षण…

पुढील मनाली  लेह   खारदुंगला सायकल वारीसाठी नव्या ऊर्जेचा, नव्या जिद्दीचा आणि नव्या प्रेरणेचा स्रोत  ठरणार  आहे...

सतीश विष्णू जाधव

सायकलिस्ट

📞 7977690693

No comments:

Post a Comment