Showing posts with label गाठी भेटी. Show all posts
Showing posts with label गाठी भेटी. Show all posts

Friday, April 11, 2025

शारदाश्रम 1974 मित्र भेट

18.08.2019

*शारदाश्रम 1974 मित्र भेट*

आज संध्याकाळी सर्व शाळकरी मित्रांची पुन्हा एकदा पार्क क्लब मध्ये भेट झाली. ही भेट  शाळेतील जुन्या आठवणींचा खजिना उघडण्यासाठी होती.  मी सायकल घेऊन क्लबवर पोहोचलो.

अशोक परब, आणि शरद शिंदे पहिल्यांदा उद्यान गणेश मंदिरात बाप्पाचे दर्शन घेऊन आले. मागोमाग सतीश कामेरकर, सतीश जोशी, विकास होशिंग,दिलीप काळे, नरेंद्र मोहिते चौपाटीवर आले. एवढ्यात संजीव पणशीकरचे आगमन झाले आणि सर्व लवाजमा पार्क क्लब मध्ये स्थानापन्न झाला.

 थोड्याच वेळात शिरीष देसाई आणि कैलास गौडचे सुद्धा आगमन झाले. पण आमचे उत्सव मूर्ती  शरद पाटील आणि कुणाल ठाकूर  अजून उपस्थित झाले नव्हते.  शरद  गणपती आगमनाच्या गराड्यात टिळक ब्रिज जवळ, तर कुणाल नातेवाईकाच्या दहाव्यात अडकला होता. सुहास राऊत आणि गिरीश उर्फ मकरंद चव्हाण रमत गमत आले. 
 
गोरा आणि तगडा दिनेश नाडकर्णीचे हसत हसत आगमन झाले. दिनेश नुकताच श्रीनगर-लेह-मनाली मोटरसायकल सफर करून आला होता. त्याच्या देहबोलीतून त्याचा आत्मविश्वास जाणवत होता. मोठी लढाई जिंकून आलेला राजा जसा आपल्या नगरात अभिमानाने प्रवेश करतो, तसेच छाती काढून दिनेशने आगमन झाले होते.

आज विकास होशिंग जाम खुशीत दिसत होता. अमेरिकेहून चॉकलेट्स आणली होती.  ती सर्वांना प्रेमाने वाटत होता. पांढऱ्या रंगाची आणि त्रिकोणी ढंगाची चॉकलेट्स तोंडात ठेवताच क्षणी विरघळत होती. या विकासची एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्याचे हास्य आणि लाघवी बोलणे. पठया घरातून निघताना चॉकलेट्सच आख्खे पाकिटच खाऊन आला असावा. 

एक कृश व्यक्ती  नरेंद्रच्या बाजूला बसला होता.  डोक्याला टक्कल पडलेले, भुवया पांढऱ्या झालेल्या आणि थकल्या सारखा वाटणारी ती व्यक्ती कोण, हे विचारताच तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला मी रामकृष्ण मुतालिक. ओ.... हो.. हो..  मी मुतालिकला ओळखलेच नव्हते. त्याला हर्षभराने मिठी म्हटली. माझा शाळेतील परम मित्र होता तो. रामकृष्ण पार्ट टाइम भिक्षुकी करतोय. आता तो सुद्धा सायकल घेऊनच आला होता. 

सतीश कामेरकर हातात इंपोर्टेड खाऊची पिशवी घेऊन आला होता. तो खाऊ संजीवच्या हातात दिला. दर्दी मंडळींचा खाऊ होता तो. पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. बाहेरचा खाऊ क्लब मध्ये खाण्यास मनाई होती.

आता मैफिलीला सुरुवात झाली तेव्हढ्यात शरद आणि कुणालचे आगमन झाले. गिरीश आणि सुहास राऊत पण आले. 

सतीश कामेरकर क्लबमध्ये पहिल्यांदाच आला होता. मागच्या वेळी तो अमेरिकेत होता. दोन पेग पोटात गेल्यावर सतीश कामेरकरने सगळ्या मैफिलीचा ताबा घेतला आणि शाळेतील आठवणींचा फुलबाजा तडतडू लागला.  

सतीशने कमेरकरने बापट बाईंच्या सायन्स पिरियडचा किस्सा सांगितला. सायन्स विषयाचा पुनरुत्पादन हा धडा शिकवून बाईंनी घरी वाचायला सांगितला होता. परंतु दुसऱ्या दिवशी मी (सतीश जाधव) तो धडा परत शिकवा असे बाईंना सांगितल्यावर, मला पट्टीने चोपले होते.  जीत बाई स्लीवलेस घालून यायच्या मराठीच्या तासाला बरीच मुले बाईंकडे टक लावून बघायचे. तळवलकर बाई इंग्रजी शिकवायच्या आणि सहदेव आंब्रेने उत्तर दिले म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना धडा समजला असा त्यांचा विश्वास होता. हे सगळं ऐकताना आम्ही शाळेच्या वर्गात पोहोचलो होतो.

शरद शिंदेने किस्सा सांगितला,  विद्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीला आलेल्या डॉक्टरांचा.  त्यांनी गुप्तांगाची  कातडी कशी वर करायची आणि त्याची निगा कशी राखायची याची माहिती दिली. पण डॉक्टरांनी प्रात्यक्षिक करून दाखवावे ही शरदची इच्छा होती. 

सतीश कमेरकरचे तंबाखू विडीचे दुकान शाळेजवळच होते.  त्यात तो उंचीने बुटका, त्यामुळे त्याला शाळेत "तोकडी विडी" म्हणायचे. 

मी लठ्ठ असल्यामुळे मला सर्वजण "डबी" म्हणायचे. पहिल्यांदा तळवलकर बाई वर्गात आल्यावर सुद्धा मी मस्ती करत होतो आणि मुले मला डबी म्हणून चिडवत होते, ते नाव बाईंनी ओझरते ऐकले, त्यांना माझे आडनाव वाटले आणि मला "डबीर" इकडे ये, असे म्हटल्यावर सर्व वर्ग जोरजोरात हसला होता. मुले का हसतात हे बाईंना कळलेच नाही. मी मात्र केविलवाणा चेहरा करून, मान खाली घालून उभा होतो. हा किस्सा कैलासने सांगितला.

सतीश कामेरकर पुढे सांगत होता, "मी दारू प्यायला कसा शिकलो". तर मकरंद चव्हाणने पहिला बियरचा ग्लास माझ्या हातात दिला. मला ती कडवट लागली, पण थोड्याच वेळाय झिंग आली, तेव्हा मजा आली. त्यानंतर पानाच्या गादीच्या गल्ल्यातून  दहा रुपये लंपास करून घरातील नोकराला घेऊन चार रुपयांची बियर हॉटेलमध्ये जाऊन सतीश प्यायला होता. मला दारू प्यायला शिकविणारा मकरंद 1997 पासून व्यसन मुक्त झालाय. पण मी अजूनही पितोय, असे सतीश म्हणाला.

दिनेश  आणि उमेश नाडकर्णी हॉस्टेल मध्ये राहत होते. त्याच्या हॉस्टेलचे किस्से तर औरच होते. 

सतीश जोशी म्हणाला परीक्षेला मी नेहमी सतीश जाधवच्या मागच्या बेंचवर असायचो, कारण दोघांच्या वडिलांचे नाव विष्णु होते.

दिलीप काळे चेउलकर बाईंबरोबर केलेल्या पिकनिक बद्दल हिरीरीने सांगत होता. तर शरद शिंदे  171 नंबर बसचे किस्से सांगत होता. वरळी वरून दादरला शाळेत येणारी ती एकमेव बस होती. 

कुणाल ठाकुरने सुद्धा सांगितले, मकरंदने माझ्या दारू पिण्याचा श्रीगणेशा केला.

शालेय जीवनात केलेले प्रताप आणि त्याची आठवण सर्वांना विद्यार्थी दशेत घेऊन गेले.

कैलासने ड्रिंक अँड ड्राइव्हचा किस्सा सांगितला. त्याचे वडील भाऊ ना म जोशी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये सिनियर इंस्पेक्टर होत.  तेथूनच "जीवन आणि कैलास" शाळेत यायचे. 

शरद प्रत्येकाच्या टेबलवर जाऊन हवे नको ते विचारत होता तर कुणाल, 74 आणि 75 बॅच मधला  फरक सांगत होता. गृप मध्ये गोंधळ घालणाऱ्या दोस्तांना शरदने डिलीट केले होते. संजीव पणशीकर माझ्या सायकलिंगची तारीफ भरभरून करत होता. कैलासने मला ड्रिंक ऑफर करताच, मी म्हणालो " आज नाही घेणार उद्या घेईन" परंतु तो उद्या  माझ्या जीवनात अजूनपर्यंत आलेला नाही. 

कुणालची तऱ्हा तर औरच आहे, जेवणानंतर त्याला प्यायला आवडते. तर शरद पाटील जन्मल्या पासून प्याला नाही. अशोक परबने दोन पेग झटक्यात संपवले होते आणि तल्लीन झाला होता.

सतीश कमेरकरला ड्रिंक्स घेताना सिगारेटची तलफ आली होती. त्यातच त्याने चार सिगारेट ओढल्या.  तर कैलास आल्या पासून सिगारेट ओढत होता. दिनेश आणि संजीवची पिण्याची जुगलबंदी लागली होती. तर शिरीष देसाई आणि सतीश जोशी त्यांना साथ देत होते. खाण्यापिण्याचे टिपण मी करत होतो.

मधेच शिरीष मला म्हणाला सतीश तू काहीच बोलत नाहीस, मी म्हणालो " कोणीतरी ऐकणारा पाहिजे ना"

रामकृष्ण, सुहास, मकरंद, नरेंद्र आणि शरद कोपऱ्यातील टेबलवर बसले असल्यामुळे त्यांचे बोलणे ऐकायला येत नव्हते. 

मी सायकलने मनाली - रोहतांग पास - लेह  केल्याबद्दल दिनेश माझी खूप तारीफ करत होता. लेह सायकलिंगचे किस्से मला सांगायचे होते. पण आज सर्वच जोशात होते, भरभरून बोलत होते. म्हणून पुढील मिटिंग मध्ये मनाली लेह किस्से सांगायचे मी ठरविले.

सतीश जोशी, " सिद्धी शिवाय प्रसिद्धी" कामाची नाही हे सांगत होता. पण पूरग्रस्तांना मदत करण्याचा मूळ उद्देश त्यामुळे बाजूला पडला होता. शरद शिंदेच्या चेहऱ्यावर म्हणून नाराजी पसरली होती.

आज खाण्यापेक्षा पिण्याचे बिल जास्त झाले होते. पण खाण्याबरोबर सर्वजण पोट भरून बोलले होते. एकमेकांना भेटल्याचे समाधान त्यापेक्षा जास्त होते. 
मैत्रीची नशा सोबत घेऊनच प्रत्येक जण पार्क क्लबच्या बाहेर पडला.

एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली, ती म्हणजे या वयात कोणाच्या सवयी बदलणे कठीण काम आहे. परंतु साठी नंतरचे बोनस आयुष्य मस्त मजेत जगायचे असेल तर,  ज्या सवयी आपल्या शरीराला घातक आहेत. तसेच पुढील उतार वयात त्याचा जास्त त्रास होऊ शकतो, त्यांना आवर घालणे आवश्यक आहे. याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मरेपर्यंत मस्त मजेत जगायचं असेल तर कुणालची, शरदची, दिनेशची लाईफ स्टाईल पहावी.

या वयात अंथरुणात खिळून राहणे कोणालाही आवडणार नाही. त्याची काळजी आताच घेणे महत्वाचे आहे.

*जीवन अनमोल आहे आणि ते उपभोगण्यासाठी शरीर संपदा राखणे आवश्यक आहे.*

प्रत्येक जण सुज्ञ आहे !!!

मंगल हो !!!


सतीश विष्णू जाधव