काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी मध्ये भेटलेली व्यक्तिमत्वे...
हापूस आंब्यासारखी मधुर आणि मधाळ कोकणची माणसं... दि. १३ फेब्रुवारी २०२५
कुणकेश्वरचे महादेवाचे दर्शन घेऊन पुढे निघालो... मेहुणा महेश बागवेचा मित्र गोविंद सावंत हे मुणगे येथे वाट पहात थांबले होते... त्यांनी भगवती देवीच्या मंदिरात श्रीफळ आणि प्रसाद देऊन सन्मान केला... कोकणातील टिपिकल हॉटेलातील पिठाचे, खोबऱ्याचे, शेंगदाण्याचे लाडवांचा आस्वाद घेतला... तो सावंतांचे पाहुणे म्हणूनच...
डोंगरातून येणाऱ्या गोमुख जलाचे आणि भगवती देवीचे दर्शन घेतले... मंदिराजवळ मेहुणा संतोष आणि भाचे कंपनी श्री आणि श्रीकांतची भेट झाली... कोकणचे स्पेशल खडखडे लाडू मिळाले... मुणगेकरांनी झकास आदरतिथ्य केले होते... संतोषाचा मेहुणा मुणग्यात रहाण्यासाठी आग्रह करत होता... पण आज पुढचा पल्ला गाठायचा होता...
राईड करताना अर्ध्या तासात सूर्य अस्ताला गेला... त्यामुळे रहाण्याची व्यवस्था पाहणे आता आवश्यक होते... महेश कडून आचरे येथील डॅफोडिल रिसॉर्टच्या निलेश सरजोशीचा नंबर मिळाला... त्याला फोन करून रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली...
मुणगे घाट चढलो... आणि वरच्या सड्यावरून पेडलिंग करत आचरा तिठा पार केला आणि डॅफोडिल रिसॉर्टवर पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता... आज या रिसॉर्ट वर कोल्हापूरच्या शाळेतील मुलांची सहल आली होती... मुलांचा चिवचिवाट ऐकून एकदम मस्त वाटले... सायंकाळी पक्षी घरट्यात येताना किलबिलाट करतात त्याची आठवण झाली... लहान मुलांबरोबर बालपणात जाता येते... मुलांच्या या खळखळाटाने सायकलचे श्रम एकदम नाहीसे झाले... त्याच बरोबर हिरव्यागार निसर्गाचे आसमंतात पसरलेले आवर्तन आवाक्यात आले ... आणि ऊर्जेत परावर्तित झाले...
आडिवरे येथील तावडे वाड्यातून सकाळी आठ वाजता सुरू झालेली सायकल वारी रात्री साडेआठ वाजता आचरा येथील डॅफोडिल रिसॉर्ट मध्ये पोहोचली होती... रिसॉर्टवरच सात्विक जेवणाचा आस्वाद घेतला...
रात्री रिसॉर्टचे मालक निलेश सरजोशी बरोबर बोलणे झाले... फोन वर बोलतानाच जाणवले... नीलेशच्या आवाजात मार्दवता आणि हळुवारपणा आहे... मनोमन त्याला भेटण्याची इच्छा जागृत झाली...
पाच पाच बेडचे दोन मोठे रूम आम्हा पाच जणांना उपलब्ध करून दिले निलेशने ... ते निव्वळ आम्ही पर्यावरण प्रेमी सायकलिस्ट आहोत आणि सकाळी लवकर निघण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून होते...
सकाळी आश्चर्याचा सुखद धक्का बसला... उपमा चहा नाष्टा करतानाच निलेश सरजोशी रिसॉर्ट वर हजर झाला... पांढऱ्या शुभ्र सदरा झब्ब्यात असणारा... अतिशय साधी राहणी असलेला निलेश प्रथमदर्शनीच भावला...
तुझ्या आडनावात काय विशेष आहे... निलेश म्हणाला आमचे घराणे पुरोहितांचे आहे... बारा पंचक्रोशीच्या पुरोहित जोशींचे मुख्य म्हणून सरजोशी...
पर्यावरण प्रेमी निलेशने आपल्या दहा एकर जमिनीत फक्त जंगल वाढविले आहे... ते निव्वळ वन्य प्राणी, पक्षी, पाने, फुले, जमीन आणि पर्यावरण यांचे संवर्धन आणि संगोपन होण्यासाठीच...
वेदांचा गाढा अभ्यास असणाऱ्या निलेशला पर्यावरण पुरक सायकल यात्रे संबंधात बोलण्यास सांगितले...
आपले प्राचीनतम शास्त्र ऋग्वेद हे निसर्गाशी निगडित आहे... आणि आपण सुद्धा निसर्गाचा एक भाग आहोत... म्हणूनच निसर्गाची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य आहे... आणि याच उद्देशाने समाज प्रबोधनासाठी तुम्ही वरिष्ठ तरुण प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन प्रदूषणमुक्त वाहन सायकल वरून काश्मिर ते कन्याकुमारी या साहसी वारी वर निघाला आहात... याचे कौतुक वाटते आहे... सरजोशी कुटुंबीय आणि डॅफोडिल परिवारातर्फे या पर्यावरण वारीला प्रचंड शुभेच्छा.... तुम्ही ही सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण करणार याची खात्री आहे...
निलेशचे ते विद्वतप्रचूर कवन ऐकून धन्य झालो... या पुढे सायकल सफर करणारे माझे सहकारी... सायकल क्लब यांना निलेश सरजोशीचा संदर्भ देण्याची मनोमन ठरवून डॅफोडिलचा निरोप घेतला...
कोकणातील मन मोहून टाकणाऱ्या मधाळ माणसांच्या भेटीगाठी वारीच्या सफलतेसाठी अतिशय पूरक होत्या...
सतीश जाधव
सायकलिस्ट...टीम लीडर
7977690693