Monday, April 26, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दहावा)अंकलेश्वर (रामकुंड आश्रम) ते विमलेश्वर (रत्नसागर) ०७.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दहावा)
अंकलेश्वर (रामकुंड आश्रम) ते विमलेश्वर (रत्नसागर)

०७.०१.२०२१

सकाळी अंकलेश्वर रामकुंड आश्रमातून प्रस्थान केले.  सव्वा तासात महर्षी काश्यप मुनींच्या तपोभूमीमध्ये आम्ही प्रवेश केला होता. भुरुडी-हजात गावाच्या पावनस्थळी "बलबला कुंड" हे जागृत स्थान आहे.

या आश्रमात निलकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील लिंगाला गोंडयांच्या फुलांनी अतिशय कलात्मक रीतीने सजविण्यात आले होते.

लिंगाभोवती नागदेवाची फणी पसरलेली... आणि त्यावर चांदीचे झुंबर... वातावरण भारावलेले होते... अतिशय स्वच्छ गाभारा... त्यासोबत "ओम नमः शिवाय" ची धून मनात आध्यत्मिक तरंग निर्माण करीत होते...

येथील बलबला कुंड अतिशय प्राचीन आहे. नर्मदे हर असा जयघोष करताच या कुंडातील पाण्यातून मोठया प्रमाणावर बुडबुडे पृष्ठभागावर येऊ लागले. जणूकाही उकळत्या पाण्यातून बुडबुडे यावेत तसे... या बुडबुड्यांमुळेच या कुंडाचे नाव बलबला कुंड पडले आहे.
याचे पाणी खारट आणि शीतल आहे. काश्यप ऋषींच्या तपसाधनेमुळे पावन झालेल्या या भूमीमध्ये त्याच्या तापाची ऊर्जा  जाणवते. त्या उर्जेलाच बरोबर घेऊन परिक्रमा करायची आहे. निळ्याशार आकाशाखाली हिरव्यागार पाण्यात पाय टाकून ध्यानस्थ बसलो. थंड आणि खारे पाणी त्यात नर्मदा मैयेचा सहवास... बुडबुड्याच्या या नैसर्गिक चमत्काराने जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन सापडला.

जीवन एक बुडबुड्या सारख आहे... हा बुडबुडा फुटण्या अगोदर जीवनाच्या भवसागराला पार करण्यासाठी अहंभाव, 'मीपणा' या कुंडात विसर्जित करा असा संदेश हे बलबला कुंड देते आहे... याची अनुभूती झाली..

हंसोट येथील सूर्यकुंड जवळ पोहोचलो. अतिशय शांत वातावरण...

सूर्यकुंडाच्या समोरच हंसेश्वर महादेवाचे मंदिर आहे... येथे महर्षी जबालि मुनींनी तपस्या केली होती. जबालिपुरम आणि आता जबलपूर हे शहराचे नाव जबालि मुनींशी जोडलेले आहे. नर्मदेच्या किनारी त्यांनी कित्येक वर्षे तपस्या केली होती. प्रकांड पंडित आणि चारही वेदांचे ज्ञान असलेले जबालि ऋषी नर्मदेचे निस्सीम भक्त होते.

हंसोट गावात आलो... येथे " मेथीना गोटा" अतिशय प्रसिद्ध आहे.

  थाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या भजी आल्या... सोबत आंबट गोड चटणी आली... बालभोग मनसोक्त झाला... सोबत चहा होताच... पुढच्या प्रवासासाठी  ऊर्जा भरून घेतली.

वाटेत अब्दुल वाडीवाला याची भेट झाली.  चहा पाजून अब्दूलभाई  सर्व परिक्रमावासीयांची सेवा करतात.

संत तुलसीदासजींचे दोहे त्यांना अवगत होत  "दया धरम का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये जब तक घट में प्राण" परोपकार हेच अब्दुलच्या जीवनाचे ब्रीद आहे.

वाटेत ऊसाची एक वेगळ्या जातीची शेती पाहायला मिळाली. या ऊसाच्या जातीला येथे 'दुक्कड' म्हणतात.

या उसाच्या डोक्यावर आलेले तुरे राजाच्या मुकुटासारखे भासत होते.  भरीव ऊसाचे खोड अतिशय कडक परंतु एकदम रसदार असते. हे कापायला कठीण असते. कारखान्यात याला चांगला भाव मिळतो.

पुढे दंतराई गावातील हनुमान टेकडी मंदिरात पोहोचलो. हनुमान मंदिर देवालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापित आहे.

   मारुतीरायचे दर्शन घेतले... त्यानंतर शनिदेवाच्या पायी नतमस्तक झालो... येथे नवग्रहांचे मंदिर सुद्धा होते. केेतू सोडला तर सर्व नवग्रह उग्र दृष्टीचे आहेत. केतूचे फक्त धड आहे.  मुंडके नसल्यामुळे त्याची उग्रता समजत नाही. सुंदर परिसर ... बरेच नर्मदा परिक्रमावासी येथे विश्रांती घेत होते.
 मोठया वडाच्या झाडाशेजारीच रामसेवक बाबाजींची कुटी होती. बाबाजींनी प्रथम चहा  आणि नंतर भोजनप्रसादी दिली. बाबाजी येथेच राहण्याचा आग्रह करीत होते. दुपारचे बारा वाजले असल्याने विमलेश्वर पर्यंत पोहोचण्याचे  लक्ष होते.

दोन तासात कठपोर येथील कोटेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो. कोटेश्वर महादेव मंदिरातील लिंग, वरच्या बाजूला शंकूकृती आहे.

येथेच कोटीतीर्थ आहे. या कोटीतीर्थ कुंडाच्या मधोमध छोटेसे शिवलिंग मंदिर स्थापित आहे. या कुंडात सहस्त्र तीर्थांचे जल समाविष्ट आहे.
रत्नसागराकडे जाणारा प्रत्येक परिक्रमवासी या कुंडाचे दर्शन घेतो.  कुंडाच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण नारळाच्या झाडांमुळे रत्नसागर (समुद्र) जवळ आल्याची चाहूल लागली होती. या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम मोठया प्रमाणावर चालू होते. बरेच परिक्रमवासी येथे विश्राम करत होते.

अर्ध्या तासात विमलेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो.

येथूनच पुढे बोटीरून प्रवास करून रत्नसागर पार करायचा होता. पावणे चार वाजले होते. विमलेश्वर मंदिर परिसरात परिक्रमावासीयांची खूप गर्दी होती. बसने, मोटरसायकलने, पायी आणि सायकलने प्रतिक्रमा करणारे (आम्ही दोघे) सर्वजण एका ठिकाणी जमा झालो होतो... सायकल व्यवस्थित बांधून; हॉलच्या एका कोपऱ्यात बस्तान टाकले. काही वयस्क मंडळींची मुलाखत घेण्याचे काम संजय करत होता... उद्या समुद्र पार करणार म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह विलसत होता.

मंदिर परिसर प्रशस्त होता. नर्मदा परिक्रमेमधील दक्षिण तटावरचे हे शेवटचे आणि महत्वाचे देवस्थान आहे. त्यामुळे रत्नसागर पार करण्यासाठी प्रत्येक परिक्रमवासी विमलेश्वर महादेवाच्या चरणी येतो.

देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले ते स्थळ नर्मदा मैय्या आणि सागर यांच्या संगमाचे आहे. तेथेच समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली होती. म्हणूनच या संगम स्थळाला रत्नसागर म्हणतात. 

केवट रामजीभाई सायंकाळी लॉन्च बुकिंगसाठी आले.  जे पायी किंवा सायकलने परिक्रमा करणारे आहेत त्यांच्या कडून १५० रुपये तर बस अथवा मोटारसायकल परिक्रमावासींसाठी २५० रुपये तिकीट होते. सायकलचे भाडे म्हणून प्रत्येकी एक तिकिटाचे पैसे घेतले.

मोटार सायकल पारिक्रमावासींसाठी उत्तर तटावर गाडी पोहोचविण्याची व्यवस्था होती. 

सायंकाळपर्यंत विमलेश्वर मंदिरात खूपच गर्दी झाली होती. दोन मोठ्या बस मधून जवळपास शंभर यात्रेकरू आले होते. धर्मशाळेच्या प्रांगणात पथाऱ्या मांडल्या गेल्या. गाडीवाल्या परिक्रमवासीं बरोबर जेवण बनविणारी मंडळी सुद्धा होती. बाकी पायी पारिक्रमावासींसाठी देवस्थानातर्फे भोजनप्रसादीची व्यवस्था होती.
स्नानसंध्या आटपून, मैयेची यथासांग पूजा केली. सोबत आणलेला प्रसाद मंदिरातील सर्व यात्रेकरूंना वाटला. विशेष म्हणजे सर्वांना देऊन प्रसाद उरला होता. मंदिराच्या पुजारींना प्रसाद देऊन त्याची सांगता केली. मैंय्येचा महिमा खरच अगाध आहे... कोणाला काहीच कमी पडत नाही...

भोजन प्रसादी घेऊन अंमळ लवकरच झोपी गेलो. पहाटे खाडीचा दक्षिण किनारा गाठायचा होता.

ओंकारेश्वरवरून सुरू केलेल्या रत्नसागरपर्यंतच्या परिक्रमेची  सांगता उद्या होणार होती. एकूण जवळपास ५०० किमी पारिक्रमा परिपूर्ण झाली होती.

नर्मदा मैयेला उजव्या हाताला ठेऊन केलेली दक्षिण ताटावरची एक स्वप्नवत सफर  पूर्णत्वाला गेली होती...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

8 comments:

  1. सुंदर ओघवती भाषाशैली. पुन्हा परिक्रमा करतो आहे असा अनुभव....

    ReplyDelete
  2. खूपच छान प्रवास वर्णन...
    भाषा शैली उत्कृष्ठ...

    आपण स्वतःच त्या ठिकाणी आहोत असा भास होतो

    आपले प्रवास वर्णन वाचंन करताना...

    परमेश्वर आपणास उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना.

    असेच नवीन नवीन प्रवास करत रहा

    आनंदी रहा मुक्त पाखरा...

    खुप खुप शुभेच्छा आपल्या पुढील नवीन नवीन प्रवासा साठी...

    ReplyDelete
  3. मित्र मोहनचे अभिप्राय

    नर्मदे हर ,हा प्रवास संपू नये असे वाटते 🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. अनिताचे अभिप्राय

    खूप छान लिखाण👌👌

    ReplyDelete
  5. गायक मित्र प्रकाशचे अभिप्राय

    सर..
    तुमचे नुसते प्रवास नाही तर पुर्ण
    प्रवास वर्णन सुद्धा खुप सुंदर
    असत।

    एक वेळा वाचायची शुरूआत केली
    की थांबायचा मन च होत नाही...

    What a feeling...

    मला स्वतः तिथे शब्दांनी घेऊन
    गेल्या बद्दल आपला खुप धन्यवाद।

    *नर्मदे हर...🙏🏼💐*

    ReplyDelete
  6. सुंदर लिखाण ...आपले नर्मदा परिक्रमा लेख आवर्जून वाचले आणि आम्हीसुध्दा परिक्रमा करण्यास उत्सुक झालो आहोत. नर्मदे हर ।।।

    -स्वप्निल नागरे

    ReplyDelete
  7. आपले लिखाण व फोटो पाहून परत एकदा नर्मदा परिक्रमा केल्याचे श्रेय पदरात पडल्या सारखे वाटले मस्त नर्मदे हर🙏

    ReplyDelete