Wednesday, April 19, 2023

मनपा गुरू डोंगरे साहेबांची भेट आणि सायकल निष्ठांची मांदियाळी

मनपा गुरू डोंगरे साहेबांची भेट आणि सायकल निष्ठांची मांदियाळी

 ठरविल्याप्रमाणे सायकल वरुन एका दमात कुंभार्ली घाट पादाक्रांत करून काल चिपळुणातून मुंबईकडे प्रस्थान केले...

वाटेत  महापालिका जल विभागाचे माझे गुरु श्री डोंगरे साहेब यांचा फोन आला... त्यांनी आठवण काढली होती... त्यांना सांगितले सायकलिंग करत उद्या सकाळी तुमच्या घरी येतो... मग निवांत गप्पा मारुया...

आज सकाळची सायकल रपेट सुरू झाली... वांद्रे लिंकींग रोड वरुन राईड करत असताना... एक सरदार सायकलिस्ट पापाजी ओव्हरटेक करून पुढे गेला... "एकसे भले दो" या नात्याने छोटी स्प्रिंट मारून पापाजीला गाठले... गप्पा सुरू झाल्या...

 अंगात घातलेल्या टीशर्ट बद्दल पापाजीने विचारले... एकट्याने, सेल्फ सपोर्ट "आदी कैलाश ओम पर्वत" सायकल वारी केल्याबद्दल तसेच सायकल वरुन भारत भ्रमंती बद्दल कळल्यावर... जुहू जवळ थांबवून आपल्या सर्व सायकलिस्ट मित्रांना बोलावले... सायकल भ्रमंतीचे काही किस्से सांगितल्यावर सर्व मित्रांच्या मनात सायकल टूरींग बद्दल जिज्ञासा निर्माण झाली ...   दहा मिनिटापूर्वी भेटलेले सर्व सायकलिस्ट माझे जिगरी दोस्त झाले होते... सरदारजी अंबरीर सिंग यानी फोन नंबर शेअर केला... तर सायकलिस्ट पटेल यानी MTB घेण्याचे नक्की केले... पुन्हा भेटण्याचे ठरवून सर्व मित्रांची रजा घेतली...

आता सुरू झाली राईड... अंधेरी चारबंगल्या जवळील डोंगरे साहेबांच्या घराकडे... बरोबर सकाळी आठ वाजता साहेबांच्या घरात आलो... झक्कास चहाने कडक स्वागत झाले आणि सुरू झाली गप्पांची मैफल... लडाख सायकल सफर... नर्मदा सायकल परिक्रमा... स्पिती व्हॅली सायकल वारी... मुंबई कन्याकुमारी... मुंबई दिल्ली... पंढरपुर पंजाब ईत्यादी सायकलिंगच्या सुरस कथांचा ओघ सुरू झाला...

लता वहिनी नर्मदा सायकल वारीच्या गोष्टी तल्लीन होऊन ऐकत होत्या... त्यांच्या मनात बसने नर्मदा परिक्रमा करण्याचे विचार घोळू लागले...

 "आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले... आता स्वतःसाठी जगता आले पाहिजे"  हे म्हणणे वहिनींना तंतोतंत पटले... तसेच सायकलिंग करण्यासाठी डोंगरेना आडकाठी करणार्‍या वहिनी... त्यांनी सायकल घ्यावी यासाठी  तयार झाल्या... ओघाओघाने खुप दिवस सायकलसाठी मागे लागलेल्या नातू अथर्वला सुद्धा सायकल घेण्याचे नक्की झाले... 

सायकलिंगद्वारे करत असलेली निसर्ग भ्रमंती... खुप मोठ्या लोकांशी होणार्‍या भेटीगाठी... नितांत सुंदर आणि जीवनात आमूलाग्र बदल घडविणारे अनुभव...   सूनबाई अदिती आणि आजी शांताबाई मनःपूर्वक ऐकत होत्या... मुलगा नीलेशचे वर्क फ्रॉम होम चालू होते... त्याच्याशी सुद्धा बोलणे झाले...

आज एका सुखी आणि समाधानी कुटुंबाच्या संपर्कात आलो होतो... सायकलिंगचे आणि निसर्ग भ्रमंतीचे स्फुलिंग सर्व कुटुंबाच्या मनात रुजवीले होते... याचा खुप आनंद होत होता...

 ८६ वर्षाच्या डोंगरेंच्या सासू... आजी शांताबाईंच्या चेहर्‍यावरील सकारात्मक सुहास्य भाव एकदम भावले... त्यांना म्हणालो "तुमच्या शंभरीला फोटो काढायला येणार आहे... तसेच माझ्या शंभरीला तुम्ही आवर्जून यायचे आहे" या बोलण्यावर आजी खळखळून हसल्या... अजूनही खडानखडा वर्तमानपत्र वाचणार्‍यां आजींनी... ईमारतीच्या पटांगणात चालायला जाण्याचे कबूल केले...

हे सर्व कामकाज चालू असताना; मस्तपैकी चटपटीत पावभाजीवर ताव मारला... गप्पांच्या ओघात अदितीच्या फक्कड चहाची चव सुद्धा चाखली... आणखी एक पाव घेऊन... चहात बुडवून पाव खाल्ला... आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला...

 गप्पांमध्ये दोन तास कसे गेले कळलेच नाही... सर्वांचा निरोप घेऊन ईमारतीखाली उतरलो... ७८ वर्षाच्या डोंगरेंनी भन्नाट सायकलिंग केले... त्यांच्या चेहर्‍यावरचा सुखद भाव... आनंदी जीवनासाठी अनमोल ठेवा सापडल्याचे सांगत होते...

अदिती म्हणाली, "काका खुप खुप धन्यवाद... सर्व कुटुंबाला नवसंजीवनी दिल्याबद्दल" 

सर्वांचा निरोप घेऊन आनंद लहरीवर तरंगत अंधेरीच्या सोसायटीमध्ये गेलो...  पान दुकान चालविणारा भाडेकरू प्रमोद ऊर्फ छोटूला  भेटलो... बोरिवलीच्या एका पान दुकानात बरीच वर्ष काम करणार्‍या छोटूने दुकान भाड्याने घेऊन आलिशान पानाचे दुकान थाटले आहे... 

 मेहनतीने आणि सचोटीने काम करणार्‍या छोटूचा भविष्यकाळ अतिशय उज्वल आहे... याची जाणीव त्याच्याशी बोलताना जाणवली... एकदम कलात्मक पद्धतीने सजवलेले दोन मीठा पान छोटूने घरच्यांसाठी बांधुन दिले... नवीनच दुकान थाटलेल्या छोटूला शगून म्हणुन पैसे दिले... छोटूला सुद्धा पानाची डिलीव्हरी करायला सायकल हवी आहे... 

आज सकाळची विविध रंगांनी नटलेली ४८ किमीची सायकल राईड... क्वालिटी टाईमचे प्रतिक होती...  डोंगरे साहेबांच्या सर्व कुटुंबियांची भेट... नवीन सायकलिस्ट मित्रांची सोबत... आणि मोठा आवाका असलेला भाडेकरू छोटूची गाठ... ही माऊलीच्या उक्ती प्रमाणे प्रेमाच्या एका समान धाग्यात गुंफलेली मांदियाळीच होती... 

घराकडे परतताना आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला... "बाबू मोशाय... जिंदगी बडी होनी चाहिये... लंबी नही".... त्याच धर्तीवर सायकल सखी हसली आणि तिच्या विचारांचे तरंग उमटले...

  "किती किलोमीटर सायकल चालवली... यापेक्षा किती लोकांना भेटलास... त्यांच्या मनात जगण्याचे... नवीन विचारांचे स्फुलिंग निर्माण केलेस... यालाच सुख म्हणतात ना !!! 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

Sunday, April 2, 2023

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

दौलत दादा कोंडकेंची... या कार्यक्रमाची अभिरुची संपन्न निवेदिका... व्यासंगी आणि मराठी भाषेच्या सौंदर्याची जाणकार... सूत्रसंचालिका गीता डांगे...

शाहीर दादा कोंडके यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्ताने मराठी भाषा पंधरवड्यात दौलत दादा कोंडकेंची हा युगुल गीतांचा बहारदार कार्यक्रम दिनांक १८ मार्च रोजी पार पडला. या कार्यक्रमाची संकल्पना, रचना आणि दिग्दर्शन मुंबई महापालिका कर्मचार्‍यांच्या सोगो संगीत संस्थेने केले होते. महापालिकेच्या आजीमाजी  ३२ गायक कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमात होता. 

अतिशय अप्रतिम आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला... या कार्यक्रमामधील प्रत्येक युगुलगीत... कलाकार जोडीने सादर करताना दादा कोंडके आणि त्यांच्या चित्रपटातील नायिका यांचा पेहराव परिधान केल्यामुळे या कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली होती. 

या कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवलेली आणि भावलेली एक गोष्ट म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन... 

सर्वसाधारणपणे गीतसंगीताच्या कार्यक्रमात प्रत्येक गाणे साडेतीन चार मिनिटांचे असते..  तसेच दोन गाण्यामध्ये  सूत्रसंचालकास  एक ते दीड मिनिटाची वेळ दिली जाते... परंतु  आजच्या या कार्यक्रमात सूत्रसंचालिकेने आयोजकांकडून दोन गाण्यामध्ये तीन मिनिटांचा वेळ मागून घेतला होता... सोगो आयोजकांनी पण ते मान्य केले होते... 

कार्यक्रम सुरू झाल्यावर दोन गाण्याच्या मधल्या वेळात सूत्रसंचालिकेने दादांचा जीवनपट उलगडायला सुरुवात केली... आणि जाणीव झाली की दादा कोंडकेंसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा जीवनपट इतक्या कमीवेळेत, अचूक अन् मोजक्या आणि आक्षेपविरहित शब्दांत मांडण्यासाठी  सूत्रसंचालिकेने प्रचंड अभ्यास केला आहे...

 युगुलगीताला साजेशा वाक्यरचनेतून गीतांबरोबरच, चित्रपटाचा अभ्यास... तसेच दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालकाने भरपूर वाचन केलं आहे...  

अतिशय मार्मिक आणि दखलपात्र निवेदन करण्यासाठी भाषेवर तितकच प्रभुत्व असणं आवश्यक असते... ते पदोपदी निवेदिकेच्या शब्दांमधून जाणवत होते... त्यामुळे गाण्याबरोबरच दादांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकाधीक  बळावत होती.....

दादांचा जीवनपट उलगडून दाखविण्यासाठी सूत्रसंचालिकेने दादांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून गाण्याला अनुरूप आणि विषयाला साजेसे असे वेचक मुद्दे निवडून ते तारतम्यतेने आणि मनोवेधकपणे सादर केले होते... 

सूत्रसंचालिकेची जिज्ञासू वृत्ती आणि विषयाचा व्यासंग यामुळेच सूत्रसंचालनाची  कला अतिशय उत्तमपणे आत्मसात केल्याचे तिच्या निवेदनातून पदोपदी जाणवत होते...

 सूत्रसंचालिकेच्या या प्रशंसनीय कामगिरी मुळेच तिच्या कामाची दाखल घेऊन शाबासकी देण्यासाठी आणि दादांच्या चित्रपट जीवनासाठी हा पत्रप्रपंच आहे...

एकापाठोपाठ एक अशा सलग नऊ चित्रपटांचा रौप्य महोत्सव  साजरा करून गिनीज बूक मध्ये जागतिक विक्रमाची नोंद करणारे दादा... आपल्या विनोदाने सार्‍या महाराष्ट्राला हसवणारे दादा... आपल्या स्वतःच्या आयुष्यात कसे एकटा जीव सदाशिव होते... याचा प्रत्यय सर्व रसिक प्रेक्षकांना येत होता...

दादांनी आपल्या चित्रपटांतून तात्कालिक समाज आणि राजकारणातील  वैगुण्यांवर नेमके भाष्य केले होते...

द्व्यर्थी संवादफेकीचा बादशहा ...  विनोदाची मर्मभेदी जाण असणारा.. नेमक्या ठिकाणी पॉज घेऊन हशा घेणारा विनोदवीर... निर्माता... लेखक... दिग्दर्शक... गायक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले दादा वैयक्तिक जीवनात एकटा जीव सदाशिव होते...   याची जाणीव झाली... 

दादांच्या जीवनात घडलेला प्रत्येक प्रसंग अंतर्मुख करणारा होता... किंबहुना दादांची जीवन कहाणी ऐकताना हसू आणि आसू यांचे संमिश्र भाव  मनात येत होते... 

अतिशय भोळा भाबडा नायक... नायिकेला का भावतो... याचे समर्पक उत्तर प्रत्येक चित्रपटात आपल्याला मिळते... याच वैशिष्टयपूर्ण खासियतीमुळे ग्रामीण प्रेक्षकांबरोबर शहरी प्रेक्षकांना सुद्धा दादांचे चित्रपट पसंतीला उतरत.. 

त्यांच्या जीवन चरित्रपटातील ठळक वैशिष्ठ्यांचा आढावा सूत्रसंचालकाने प्रत्येक गाण्याच्या मध्ये घेतला होता... त्याची झलक खालील प्रमाणे... 

समाजातील  रुढी, परंपरा, बुवाबाजी यावर उपहासात्मक किंवा व्यंगात्मक चित्रण म्हणजे सटायर चित्रपटातून सादर करणे ह्यात दादांचा हातखंडा होता... त्यामुळे त्या काळातील प्रस्थापित बुवाबाबांचा रोष सुद्धा दादांनी ओढावून घेतला होता... 

शांताराम बापू आणि दादा कोंडके यांच्यातील चित्रपट शीतयुद्ध जगजाहीर होते... बापूंच्या असला नवरा नको ग बाई  या चित्रपटावर कडी म्हणून  ह्योच नवरा पाहिजे  ह्या  चित्रपटाचे नाव दादांनी जाहीर केले... त्यावेळी त्यांच्याकडे चित्रपटाचे कोणतेही कथानक सुद्धा नव्हते... पण प्रचंड जिगर मात्र होती... 

सेवादलाच्या सांस्कृतिक विभागात काम करताना सदानंद वर्दे, वसंत बापट, नाथ पै अशा नामवंत मंडळींच्या ओळखी झाल्या.. तसेच सेवादलाच्या कार्यक्रमात निळू फुले, राम नगरकर हे कलाकार दादा सोबत एकत्र आले... येथून त्यांची पथनाट्य कारकीर्द सुरू झाली... 

विच्छा मधील दादांचे काम पाहून चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांनी तांबडी माती या चित्रपटात दादांना काम दिले. हा चित्रपट अपयशी झाला. त्याचे खापर पत्रकारांनी दादांवर फोडले... परंतु पेंढारकरांनी ते अपयश आपल्या माथ्यावर घेतले आणि दादांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन वर्तमानपत्रात येणार्‍या बर्‍यावाईट बातम्यांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला... 

वसंत सबनीस, दादा आणि भालजी यांनी सोंगाड्याचे पटकथा लेखन केले. या चित्रपटाचे   यश  तुझे असेल तर अपयश पूर्णतः माझे असेल आणि   हा चित्रपट अपयशी झाला तर संपूर्ण खर्च मी उचलेन असे भालजींनी दादाला आश्वासन दिले...  त्यामुळे साकार झाला दादांचा सोंगाड्या  चित्रपट... आणि तो तुफान यशस्वी झाला... शून्यातून विश्व निर्माण करण्याचे दादांचे प्रयत्न फळाला आले... विच्छा मधील माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी आणि  काय ग सखू काय ग साखू ही दोन गाणी दादांनी सोंगाड्या मध्ये घेतली होती... 

चांगले कथानक असलेला  ये रे माझ्या मागल्या हा भालजींचा चित्रपट आपटला... त्यावर दादांनी रिमेक बनविला आली अंगावर...  हा चित्रपट सिल्वर ज्युबिली झाला. चांगल्या कथानकाबरोबर चित्रपटाचे शीर्षक आकर्षक आणि विनोदी असेल तर रसिक प्रेक्षक आपोआप खेचला जातो... याचे हे उत्तम उदाहरण आहे.. 

दादांचा सडेतोडपणा खालील प्रसंगात दिसतो...

 येऊ का घरात या चित्रपटात दादांनी उषा नाईक या अभिनेत्रीला नायिका म्हणुन घेतले होते... हसताना तिचा चेहरा रडवेला दिसतो... हे दादांच्या लक्षात आल्यावर... हसताना आपण कशा दिसतो याचे निरीक्षण करण्यास  तिला सांगितले... आणि नीट हसा असा सल्ला दिला... 

माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दादांच अतिशय सुंदर मैत्रीच नातं होत... बाळासाहेबांना कलेविषयी आणि कलाकारांबद्दल वाटणारा आदर... झटपट निर्णय घेण्याचा स्वभाव, स्पष्टवक्तेपणा यामुळे दादांना बाळासाहेबांबद्दल खूप आदर होता... दादांच्या चित्रपटातील एखादी गोष्ट आवडली नाही की बाळासाहेब ती परखडपणे सांगत... त्यामुळे दादा आपला चित्रपट सेन्सॉरला पाठविण्या अगोदर बाळासाहेबांना दाखवत असत... 

अनेक राजकारणी व्यक्तींसोबत सुद्धा दादांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते... तात्कालिक मुख्यमंत्री वसंत दादा पाटीलांच्या आग्रहाखातर पंतप्रधान इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमावर गंगाराम वीस कलमे हा चित्रपट दादांनी बनविला... पण चित्रपट प्रदर्शित होताना इंदिरा गांधीची राजवट जाऊन जनता दलाचे राज्य आले होते...

एकटा जीव सदाशिव मधील राणी नावाची बकरी दादां सोबत प्रसिद्ध पावली... तिला कॅडबरी खूप आवडायची... एका सीनमध्ये दादा वडिलांबरोबर जायला निघतात तेव्हा बकरी पळत येते आणि दादांचा सदरा धरते. राणीने सदरा पकडावा म्हणून दादांनी सदऱ्यात कॅडबरी लपविली होती... राणी बकरीच्या सदरा सीनला प्रेक्षक आवर्जून टाळ्या द्यायचे... या बकरीला दादांनी मरेपर्यंत सांभाळलं... 

चित्रपटातील नायिका  दादांसारख्या  बावळट, गबाळा, लांब नाडीवाली हाफपँट  घालणाऱ्या नायकावर का भाळते?  या बाबत पटकथाकार मुजूमदार यांच्याशी बराच खल व्हायचा... त्यामुळेच  प्रेक्षकांना पटेल असे कारण चित्रपटात असे... 

त्याकाळी रंगीत चित्रपट बनविण्यासाठी खुप खर्च यायचा... सकस कथानक, कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, काटेकोर दिग्दर्शन तसेच गाणी आणि संगीत दमदार असेल तर कृष्णधवल चित्रपट सुद्धा पाहायला प्रेक्षक येतात... यावर दादांचा विश्वास होता... रंगीत चित्रपटापेक्षा कथानकात आणि कलाकाराच्या अभिनयात रंग असले की प्रेक्षकांना ते भावतात... असे दादा म्हणत... म्हणुनच पांडू हवालदार हा चित्रपट कृष्णधवल बनविला होता. 

दादांच्या बोट लावीन तेथे गुदगुल्या  या भरपुर हास्यमय पंचेस असलेल्या चित्रपटावर पत्रकारांनी कथा नसलेला चित्रपट अशी टीका केली होती... दादांचे म्हणणे होते की विनोदी चित्रपटात कथानक रंगवत नेले की पंचेस कमी होतात... त्यासाठी चार्ली चॅपलीनच्या चित्रपटाचे उदाहरण द्यायचे... 

सर्व लोकांना आपल्या द्व्यर्थी संवादाने खिळवून ठेवणारे दादा आपल्या कुटुंब सौख्याबाबत मात्र अपूर्णच राहिले... लग्नानंतर चौथ्या वर्षीच त्यांचा घटस्फोट झाला... त्यांचा पुतण्या विजय कोंडके यांनी  आर्थिक बाबीत दादांना अडचणीत आणले... विजय कोंडकेंच्या माहेरची साडी या चित्रपटाला तोडीस तोड असा  सासरचं धोतर हा चित्रपट दादांनी काढला... 

चित्रपटाच्या नावात द्व्यर्थी मिनींग नसलेला दादांचा सातवा चित्रपट बोट लावीन तिथ गुदगुल्या  हा होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर... पुण्यातील झाडून सर्व पत्रकारांनी दादांचा "सातवा मजला कोसळला" असं मोठ्या हेडिंग मध्ये वर्तमानपत्रात लिहिले होते... पण गुदगुल्या सुपरहिट झाला... पुण्याच्या एका चित्रपटगृहात तर तो पंच्याहत्तर आठवडे चालला... ह्या चित्रपटाच्या ज्युबिली समारंभात पत्रकारांना दादांनी आवर्जून बोलावले होते... आणि सांगितले "तुमच्या लिखाणाचा माझ्या चित्रपटावर काहीच परिणाम होत नाही"... "प्रेक्षक माझा आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे"... तुम्ही आणखी पेपर छापा... लहान मुलांना नक्कीच कामाला येतील... 

प्रत्येक माणसाने अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केले तर यश आपोआपच येतं... दादांचे सुद्धा असंच होतं... त्यांचा कुठलाही गाजलेला चित्रपट काही काळानंतर त्यांनी पाहिल्यावर त्यांना वाटायच हा सीन जास्ती चांगला करू शकलो असतो... एखादा विनोदी प्रसंग थोड्या वेगळ्या पद्धतीने केला असता तर प्रेक्षकांचा आणखी हशा मिळवू शकलो असतो...  त्यामुळेच चित्रपट पूर्ण झाल्यावर सुद्धा नवनवे सीन दादा चित्रपटात टाकत असत.. 

शांताराम बापू आणि दादा यांच शीतयुद्ध असायचं... पिंजरा चित्रपटात बापूंनी दादांना खूप टोमणे मारले होते... त्यानंतर दादांनी एका चित्रपटात नायक गटारातून मोडका पिंजरा बाहेर घेऊन येताना दाखविला होता... 

परंतू दोघांना एकमेका बद्दल नितांत आदर होता... बापू दादांचे सर्व चित्रपट राजकमल स्टुडिओत प्रिंट मागवून पाहत असत... 

राजेश मुजूमदार आणि दादा पांडू हवालदार च्या निमित्ताने एकत्र आले. दादांनी एखादा पंच सांगितला की मुजुमदार पुढचा पंच तयार करायचे.. अशा प्रकारे कथानक तयार व्हायचे... 

राम कदम यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत द्यायला नकार दिल्यावर... दादांना नव्या संगीतकाराची गरज होती...  एकॉर्डीयन प्लेअर लक्ष्मण पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे यांनी कलातरंग ऑर्केस्ट्रा सुरू केला होता.. दादांनी त्यांना आपल्या काही गाण्यांना चाली करायला दिल्या... त्यांच्या चाली भावल्यामुळेच दादांनी त्यांना रामलक्ष्मण हे नाव दिले आणि पुढे रामलक्ष्मण यांनी दादांच्या चित्रपटांना संगीत दिले. 

*एकटा जीव* च्या यशानंतर शुल्लक कारणावरून दादांची जुनी टीम दादांना सोडून गेली... त्यामुळे  आंधळा मारतो डोळा या चित्रपटात दादा सोबत सर्व नवी मंडळी काम करत होती. हा सुद्धा चित्रपट ज्युबली झाला... याचे कारण म्हणजे दादा स्वतःच एक चित्रपट इंडस्ट्री होते... 

त्यांच्या चित्रपटात काम करण्याऱ्या नायिकांमुळे दादांना खुप अडचणींना सामोरे जावे लागले..  परंतु कितीही त्रास झाला, संकटे आली तरी दादा कधीच डगमगले नाहीत... 

 दादांचं सेन्सॉर बोर्डाशी असलेले हाडवैर जगजाहीर होतं.. सेन्सॉर बोर्डाने द्व्यर्थी संवादाबद्दल दादांना खूप त्रास दिला... पण दादा नमले नाहीत... ते आपला मुद्दा नेटाने मांडत... तुमच मन मलीन असल्यामुळे शब्दांचे अश्लील अर्थ तुम्ही लावता... पुढेपुढे तर सेन्सॉरशी वाद घालता यावा म्हणुन दादा मुद्दाम द्व्यर्थी संवाद टाकू लागले...
 
 दादा एक गोष्ट प्रांजळपणे मान्य करतात की सेन्सॉर बोर्डामुळे माझ्या चित्रपटांची खूप चर्चा व्हायची... त्यामुळेच चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळायची... म्हणूनच माझे चित्रपट तुफान चालल्याचे दादा कबूल करतात.... 

दादांना  शिकारीचा प्रचंड नाद होता... शिकारीसाठी जनावर शोधण्यात ते एव्हढे मग्न व्हायचे की सार जग विसरून जायचे... शिकारीला गेल्यावर ते खुप रिलॅक्स होत असत... त्यामुळे चित्रपटातील जास्तीत सीन, गाणी दादांनी जंगलात  लिहीली आहेत... 

शिकारीत असताना एखादा अचानक वळवाचा जोरदार पाऊस आला... म्हणुन सर्वजण एका झाडाखाली थांबले... पाऊस थांबल्यावर झाडातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांना पाहून तिथल्या तिथे एक गाणे तयार केले... ते म्हणजे अतिशय प्रसिद्ध झालेलं  ढगाला लागली कळ... पाणी थेंब थेंब गळ... हे गाण होय... दादांची कलासक्ती जंगलात बहरून यायची याचेच हे उदाहरण आहे... 

नववा ज्युबिली चित्रपट आली अंगावर  मुळे दादांचे खूप कौतुक झाले... सलग नऊ ज्युबिली चित्रपट म्हणुन जागतिक विक्रम झाला... पण दादांना आनंद वाटत नव्हता... त्यांनी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला... विच्छाच्या अफाट यशामुळे आता मिळणार्‍या यशाचे दादांना महत्त्व वाटत नव्हते... या मानसिक दोलायमान परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दादांनी खूप उपचार केले पण फारसा उपयोग झाला नाही... त्यांची निरीच्छ वृत्ती वाढत गेली... 

अमाप पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर, मानसन्मान मिळून सुद्धा दादा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात एकटा जीव  राहिले... 

पुढचा जन्म देवाकडे मागताना "मला पैसाअडका काहीही नको फक्त जिवाभावाची माणस दे" हेच दान मागितले... 

मित्रांनो... 

दादांचा हा सर्व जीवनपट उलगडून सांगितला सूत्रसंचालिका गीता डांगे यांनी... दादांचे आत्मचरित्र एकटा जीव सदाशिव तसेच इतर लेखकांनी सांगितलेल्या माहितीचे समग्र रसग्रहण करून गीता ताईंनी मेहनतीने संकलित केलेली माहिती रसिक प्रेक्षकांना  सादर केली... त्याबद्दल निवेदिकेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. 

खरं तर गीता ताईंनी लिहिलेलं दादांच्या जीवन चरित्राचे रसग्रहण कोणत्याही वर्तमानपत्रात दादांच्या आत्मचरित्राची समीक्षा म्हणुन सुद्धा प्रसिद्ध करता येईल... 

दादांचा माहितीपट उलगडताना गीता ताईंची संवादफेक, शब्दांतील चढउतार, देहबोली यातून दादा एकदम मनाला भिडले... त्यांच आत्मचरित्र वाचण्यासाठी मन अधीर झाले ... 

तसेच गीता ताईंच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सुद्धा सविस्तर  मनोगत लिहावे ही उर्मी जागृत झाली... 

मंगल हो !!! 

सतीश जाधव 
9869560266