Thursday, June 8, 2023

अनिल भोसले एक जिंदादिल माणूस...

अनिल भोसले एक जिंदादिल माणूस...

काल अनिलचा फोन आला... "सतीश, सायकल वर आहेस काय"

"मुंबईत आहे" 

हे ऐकताच अनिल म्हणाला... गॅगरीन झाल्यामुळे माझा उजवा पाय गुढग्यातून कापला आहे...

व्हील चेअरवर आहे...

सध्या एक दिवसा आड डायलिसिस करावे लागते...

सर्व दात काढल्यामुळे पातळ पदार्थांचे भोजन घेतो...

दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे...

हेवी डायबिटिजमुळे इन्सुलिनपण सुरु आहे...

काळजात धस्स झालं...

एव्हढ्या प्रचंड आजारपणात हा माणूस माझ्याशी हसत हसत बोलत होता...

हाडाचा ट्रेकर... मिश्किल स्वभावाचा... दिलदार... हरहुन्नरी... हसतमुख... YHAI चे हिमालयातील बरेच ट्रेक केलेला... दररोज भांडुप मुलुंडच्या डोंगरावर प्रभात फेरी करणारा... अमरनाथ यात्रा... लेह लडाख... आणि बऱ्याच कौटुंबिक सहलीत सहभागी असलेला माझा प्रिय मित्र अनील... अतिशय गंभीर आणि कठीण प्रसंगातून जात असताना सुद्धा... त्याच्या बोलण्यात कोणतीही खंत नव्हती... ना आजारपणा बद्दल दुःख होते...

अनिलला उद्या सकाळी भेटण्याचा निर्धार करून... गृपवर मेसेज टाकला... उद्या सकाळी साडेपाच वाजता मुलुंड सायकल राईड...

अंबरीश आणि शिवम यांनी होकार दिला...

आज सकाळीच राईड सुरु झाली...
  सायकलच्या चेनचे दाते खराब झाल्यामुळे वेग घेता येतं नव्हता... कॅसेट आणि चेन बदलणे आवश्यक होते... पण त्यापेक्षा अनिलला भेटणे अत्यावश्यक होते...

 कामावर लवकर जायचे असल्यामुळे शिवम  विक्रोळी  वरून यु टर्न घेऊन घरी परतला... दिड तासात  चेकनाक्याजवळील मुलुंड बोर्डाकडे पोहोचलो...
महेश दाभोळकर भेटायला येणार म्हणून त्याला फोन लावला... प्रतिसाद मिळाला नाही... काहीतरी कामात असावा... 

अनिल भोसलेला फोन लावला... 

सांगितले, "येतोय भेटायला"... 

अनिल एकदम खुश... 

म्हणाला... "सतीश एकदम सरप्राइज"... 

अनिल... तूच माझ्यासाठी सरप्राइज आहेस...

पत्नी अश्विनीने दरवाजा उघडला... आणि तडक अनिलचे बेडरूम गाठले... बेडच्या किनाऱ्यावर उघडा बंब बसलेला अनिल तुटका पाय हलवत हसत होता... 

हृदय हेलावले...

 दोन महिन्यांपूर्वी अंगठ्याला झालेली शुल्लक जखम डायबबिटिजमुळे चिघळली... गॅंगरीन झाले... प्रथम पायाचा अंगठा काढला मग बोटे काढली... गँगरीन वाढतच होते म्हणून उजवा पाय गुढग्यापासून काढावा लागला... गुढग्याचे टाके आता बऱ्यापैकी सुकले होते... सहा महिन्यात जयपूर पाय लावण्याचा विचार आहे... 

सर्व आजारांचा खजिना असलेला अनिल... अशा विपरीत परिस्थितीत...  प्रचंड सकारात्मक उर्जा असलेला आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला अवलिया भासला... 

आनंद मधील राजेश खन्नाचे सुप्रसिद्ध वाक्य आठवले...

 " बाबुमोशाय जिंदगी बडी होनी चाहिए... लंबी नही... 
 
खरोखरच कीती जगलास... यापेक्षा कसा जगालास... हेच महत्त्वाचे आहे ना !!!

सोबत असलेला अंबरीश दिक:मुढ होऊन दोघांचे संभाषण ऐकत होता... 

अनपेक्षितपणे  तातडीने  भेट घेतल्यामुळे अनिल जाम खुश झाला होता...  बॅगेतून काढून  सुदाम्या सारखी सोबत असलेली राजगिरा चिकी खायला दिली... बोळक्या तोंडाने अनिल आनंदाने चिक्की  खात होता... चिक्कीत असलेले शेंगदाणे चावता येत नाहीत म्हणून बाहेर काढून ठेवत होता...

 इतक्यात अश्विनीने चहा बिस्किटे आणली... या माऊली मुळेच अनिल हिमालयासारखा उभा आहे याची जाणीव झाली...

अनिलसह पत्नी अश्विनी, मुलगा बाळा यांच्याशी दिड तास मस्त गप्पा मारल्या... दुःखाची किनार असलेल्या त्या हसऱ्या घरात... आनंदाचे कारंजे फुलविले... बायको स्वप्नाला घेऊन पुन्हा भेटायला येण्याचे आश्वासन देऊन भोसले कुटुंबाची रजा घेतली...

 परममित्र अनिल जयपूर फूट लाऊन पुन्हा चालू फिरू लागणार... या साठी आजची ६३ किमीची सायकल राईड समर्पित...

विक्रोळी कन्नमवार नगर जवळ अंबरीशची सायकल पंचर झाली...
 
सोबत पंचरचे सर्व साहित्य असल्यामुळे भराभर सायकल ठीकठाक करुन  दोघे घरी परतलो...
 
मंगल हो !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...



11 comments:

  1. लेख आवडला....

    ReplyDelete
  2. मस्त साहेब

    ReplyDelete
  3. 🫡 Salute Sir आपणास व आपल्या मित्रास ही

    ReplyDelete
  4. I never knew that my friend is in such a dire state but mentally as strong as steel. Other people should imbibe his mental abilities

    ReplyDelete
  5. Ravindra Bhave

    ReplyDelete
  6. अप्रतिम सर

    ReplyDelete
  7. Best Wishes 🙏,Great msg to society from your blogs , hats of to you to Sir

    ReplyDelete
  8. मित्र काशिनाथचे अभिप्राय...
    चिरायू हो
    आनंद तुझा अनिल…
    “ इस क्षणकी ये सच्चाई है”
    हे सहज स्विकारात
    तो क्षण आनंदात जगणारा
    अनिल
    पवन तू
    असीम
    अवखळ
    दाही दिशातून
    मनसोक्त उधळणारा…
    तुला
    अनंत शुभेच्छा…

    ReplyDelete
  9. Salute Anil Dada🙏 When there is a will, There is a way👍 Life is worth living, Keep Smiling😊

    ReplyDelete
  10. Great आहेत भोसले. मला अमरनाथ यात्रा आठवली.एवढा जखमी,दुखणारा पायाने त्यांनी आपल्या बरोबर यात्रा केली.🙏🙏👍

    ReplyDelete