Wednesday, June 28, 2023

बेधुंद पावसाळी राईड


बेधुंद पावसाळी राईड

रंगबिरंगी  दिवस होता... वातावरण मदहोश करणारे होते... कारने बोरिवलीला लग्नाला जातानाच... पावसाचे प्रताप सुरू झाले... तेव्हाच ठरविले आज पावसात राईड करायची.. बेधुंद भिजण्यासाठी...

धुवाधार पावसाची सायंकाळ आली... आणि तेव्हढ्यात नवनीतचा फोन आला... चला पावसात सायकलिंग करायला... मनातले मित्राच्या ओठावर आले... आणि सखी निघाली भिजायला... पावसाचे गाणे गायला....

तुडुंब पावसात सखीवर स्वार झालो... सखी शिरशिरली... बावरली... मोहरली... आणि मग सरसावली... दिलं पाण्यात झोकून... 

नवनीतसह स्वारी निघाली नरिमन पॉइंटला... जलाधरांनी अंग अंग झाले ओलेचिंब... पाण्याचे फव्वारे काढत सुसाटत धावत होतो... चष्म्या वरून ओघळणाऱ्या जलबिंदूना जिभेच्या टोकावर घेऊन दिमाखात हवेत उडवत होतो... भन्नाट  गेलो NCPA कडे... बसलो कठड्यावर सागराची गाज ऐकत... पाऊस पडतच होता... किनाऱ्यावरून चालणारी मंडळी छत्र्या रेनकोटचे अस्तर घेऊन पावसाला थोपावत होते... भिजण्यात काय मजा असते... हे त्यांना कोण सांगणार... 

तिकडून निघालो गेट वे ऑफ इंडियाकडे... वरचे टप नसलेली मुंबई दर्शनची रिकामी बस सखीकडे टकमक पाहत होती... दीडशे रुपयात साऊथ मुंबई फिरविणारी बस आज ताज हॉटेलच्या समोर निवांत विसावली होती... 

भर पावसात फोटो काढले... आणि आलो ऑपेराहाऊसच्या तिवारी स्वीटकडे...नवनीतने मस्त ट्रीट दिली...दोघात एक स्टफिंग केलेली जंबो दही कचोरी खाताना सायकल मैत्रीण शुल्लुची आठवण झाली... 

नाना चौकातून हाजी अली कॉर्नरला आलो... स्कूटर वरच्या दोन तरुणांनी भिजताना पाहिले... पुढच्याने रेनकोट घातला होता तर मागचा छत्री घेऊन बसला होता... विचारले... "पावसात भिजताय"... होय सखिसह मस्त भिजतोय... ठरवूनच घरातून बाहेर पडलोय... बालपणीच्या आठवणी ताज्या करण्याचा हाच तर रामबाण उपाय आहे... 

सिग्नल सुरू होण्या अगोदर स्कूटरस्वाराने रेनकोट उतरवला... मागच्याने छत्री बंद केली... आणि रममाण झाले पावसात... 

आनंदाचा झरा कसा बेधुंद असतो... याची प्रचिती आली... आजची चौतीस किमी राईड सार्थकी लागली होती...

सतीश जाधव...



4 comments:

  1. छान लेख आहे..... अप्रतिम...सुंदर शब्द रचना... वाचत असताना प्रत्यक्ष भिजण्याचा अनुभव येत होता....

    ReplyDelete
  2. खूप अप्रतिम शब्दांकन.
    स्वतः पावसात भिजण्याचा अनुभव घेतला.
    आता लवकरच माझ्या सखीसह प्रत्यक्ष पण घेईन.

    ReplyDelete
  3. अप्रतिम सर. आठवण काढल्या बद्दल धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  4. तुमचा आनंद आम्हला पहोचला..😊

    ReplyDelete