Saturday, September 23, 2023

आतला आनंद...

मोगऱ्याचा गजरा...

मैत्रिणीने दिलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध दरवळत होता. ते वाऱ्यावर बांधले आणि मन भरून त्यांच्या भेटीचा आनंद अनुभवत राहिले. फार दिवसांनी एखादे जुने ओळखीचे, प्रेमाचे माणूस भेटावे तसा त्या फुलांच्या भेटीने मला विलक्षण उल्हास वाटत होता. 

पुण्यात फुलांना तोटा नाही. गुलाब, निशिगंधा पासून तो अगदी ग्लाडिओला, जर्बेरा पर्यंत नाक्यानाक्यावर फुलांचे तुरे मिळतात. समारंभात आदरणीय पाहुण्यांना, वक्त्यांना आदरपूर्वक दिले जाणारे गुच्छ प्रत्यक्ष बघते. पण का कोण जाणे, त्या गुच्छांना एक औपचारिकपणा असतो. सहज मिळणाऱ्या फुलांचा निर्भर आनंद ती सहसा देत नाहीत. फुले एकतर झाडावरून खुडून घ्यावीत किंवा कुणीतरी अलगद ती आपल्याला द्यावीत. तीही खासगी भेटीत. जाहीरपणे फुलांचे गुच्छ स्वीकारताना संकोच वाटतो.

फुले सारीच आवडतात; पण मोगाऱ्याशी माझे भावबंध बालपणापासून जुळलेले आहेत. गावी एके ठिकाणी पाठीमागच्या अंगणात मोगऱ्याची असंख्य झाडे होती. आजोळी असताना आजीने लावलेली, जोपासलेली मोगऱ्याची झाडे नातलागांइतकी जवळची वाटत. ती फुले हळुवार हाताने खुडताना एक अनामिक आनंद लाभे. 

शाळकरी वयात पुण्यामध्ये वसंत ऋतूत 'गजरा मोतियाचा' केव्हातरी मिळे. त्याची अपूर्वाई काही वेगळीच असे. पुण्यात 'हजारी मोगरा' नावाची मोगऱ्याच्याच नात्याची फुले पहिली. त्यांना मंद गोड सुवास असे. मुंबईला असताना मदनबाण, सुरंगी, सोनटक्का अशा फुलांचा परिचय झाला. ती आवडली ही; पण मोगऱ्याच्या फुलांसारखी जवळीक जडली नाही.  सुवासाने घमघमणारा सोनचाफा, देखणं रूप आणि सुवास ल्यालेल्या फुलांचा राजा गुलाब, दिमाखदार सौंदर्याने नटलेली, कुर्रेबाज दिसणारी फुलांची राणी शेवंती, हळव्या आर्त आठवणी जागवणारी बकुळीची फुले... सारीच हवी हवीशी वाटणारी; पण माझ्या मनातले मोगऱ्याचे स्थान त्यापैकी कुणीही कधी घेतलेले नाही. 

ज्ञानेश्वरांनी आपल्या मधुर ओव्यांचे वर्णन करताना   वसंतागमींचीं वाटोळीं |  मोगरीं जैसीं ||  अशी चित्रमय उपमा वापरली आहे !

शांताबाई शेळके यांच्या आतला आनंद या ललित लेखनमालेतून...

1 comment: