Friday, September 15, 2023

*प्रयत्नांची पराकाष्ठा... एकवीरा राईड...*


प्रयत्नांची पराकाष्ठा... एकवीरा राईड...

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे... या उक्तीचा पुरेपूर अनुभव आज घेतला... उत्तराखंड हिमालयात या महिना अखेरीस सायकल राईडसाठी जातोय... हिमालयात दहा हजार फुटांवर सायकल चालविणे... हे एक वेगळे चॅलेंज असते... त्याचे मुख्य कारण म्हणजे प्राणवायूची असणारी कमतरता... त्यासाठीच आज नॉन स्टॉप खंडाळ्याच्या घाट चढण्याचे चॅलेंज स्वीकारले होते... सोबतीला विजय आणि नवनीत सुद्धा होते... पुढील काळात त्यांची सुद्धा हिमालय राईड साठी तयारी कारणासाठी आज त्यांची ट्रेनिंग होती...

सकाळी खोपोली मध्ये मटकीची उसळ, विजयने आणलेली तांदळाची भाकरी आणि केळे असा जोरदार नाष्टा केला... त्या नंतर बरोबर आठ वाजता खंडाळ्याच्या बोरघाट चढाची सुरुवात करतानाचा... दोघांनाही टास्क दिले... आज शिंगरोबा मंदिराजवळ स्टॉप नाही... सलग न थांबता संपूर्ण घाट चढायचा आहे... सीट वरून खाली उतरायचे नाही... की सायकल थांबवायची नाही... स्वतःच्या मनाशी अधिष्ठान करा... निग्रह करा... आणि राईड सुरू करा... 

आजचे टास्क तसे खडतर होते... शरीराचा आणि मनाचा कस लावणारे होते... खोपोलीच्या मुख्य रस्त्यापासून एकदम चढाला सुरुवात होते... अतिशय निर्धाराने आणि एका विशिष्ट गतीने तिघांची राईड सुरू झाली... विजय आणि नवनीतने मला फॉलो करायचे ठरविले होते... सुरुवातीलाच  वळणाचे दोन अवघड चढ लागले... त्यात मागून गाड्यांची रहदारी सुध्दा होती... एकमेकांना ओव्हरटेक करणाऱ्या गाड्यांना सांभाळत सायकलचे पेडल सतत चालू ठेवणे... हे एक मोठे दिव्य होते... कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन... न डगमगता मार्गक्रमण करायचे होते... अशा वेळी चित्त स्थिर ठेऊन... कोणतेही नकारात्मक विचार मनावर स्वार होणार नाहीत... हेच सांभाळायचे असते... त्या मुळेच अतिशय संथ गतीने परंतु दमदारपणे सायकलिंग सुरू होते...  

सकाळच्या वातावरणात दमटपणा होता... त्यामुळे थोड्याच वेळातच घामाच्या धारा वाहू लागल्या... कपाळावरचा घाम भुवयामधून डोळ्यावर उतरू पाहत होता... चष्मा आणि हेल्मेट डोक्यात असल्यामुळे  घाम पुसणे सुध्दा अवघड झाले होते... परंतु जेव्हा मनापासून निग्रहाने आपण एखाद काम हाती घेतो तेंव्हा निसर्ग सुद्धा आपणाला मदत करतो... वाऱ्याच्या एका जोरदार झुळकिने सायकलच्या दांडीला रुमाल लावला आहे याची जाणीव करून दिली... एका हाताने सायकल सावरत... रुमालाने कपाळावरचा सर्व घाम पुसून काढला...

शिंगारोबाचा टप्पा आवाक्यात दिसू लागला... नेहमीचा हायड्रेशन पॉइंट... मंदिराचे पुजारी थांबण्यासाठी हात करत होते... परंतु त्यांना टाटा करून... दमदारपणे आम्ही तिघांनी ही पुढे प्रस्थान केले... पुढची दोन हेअर पिन वळण आणि खडी चढण... आमची परीक्षा घेणारी होती... गियर एक - एक करून सुद्धा झिकझ्याक करण्याशिवाय गत्यंतर नव्हते... वळणावर खालून चढणाऱ्या गाड्या लांबून वळण घेत असल्यामुळे... त्या गाड्यांच्या मागील भागापासून सावध राहून पेडलींग करणे... अतिशय कसबीच काम होत... चढावर दमछाक झाली असेल तर सायकलचे हॅण्डल सुद्धा डगमगू लागते... अशा वेळी सायकलचा तोल सांभाळणे सुद्दा जिकरीचे होते... मानसिक बळ आणि लक्ष गाठण्याचा दृढ निश्चय हेच अशा प्रसंगातून तारून नेऊ शकते...

अमृतांजन पुलावर पोहोचलो... उजव्या बाजूला नागफणी कडा आमच्या स्वागताला उभा होता... कड्यावराचे वातावरण एकदम हिरवेगार होते... या ठिकाणी खंडाळ्याचा थंडावा जाणवू लागला... वाहणाऱ्या घामाच्या धारांना ही थंडी सुखावत होती... आता शेवटची  दोन चढाची वळणे शिल्लक होती... प्रचंड दमछाक झाली होती... पण मन अतिशय कणखर होते... दमदारपणे आणि  संथ गतीने शेवटचा टप्पा सुरू झाला... पहिले वळण पार केले आणि नवनीतच्या अंगात विद्युल्लता संचारली... तो भराभर पेडल मारू लागला... त्याच्या पाठोपाठ विजय सुद्धा जोशात आला... दोघांनी हा हा म्हणता  वाघजाई मंदिर गाठले... मागोमाग माझा निश्चय सुद्धा तडीस गेला होता... तिघेही घामाने थबथबून गेले होते... 
एक संकल्प... एक अधिष्ठान पूर्ण झाले होते... 

बऱ्यापैकी विश्रांती घेऊन नारायणी धाममध्ये येऊन दुपारच्या जेवणाची कूपन काढली... आता पुढील नियोजन नवनीतकडे होते... 
एकवीरा आईचे दर्शन घेण्याअगोदर टोल प्लाझा ओलांडून वाघजाई गावाकडे वळलो... येथे एकवीरा आईच्या भावाचे... भैरव बाबाचे मंदिर आहे... मंदिरात निवांत दर्शन घेतले... हिरवाईने नटलेला अतिशय नितांत सुंदर परिसर आणि लांबच्या  डोंगरात दिसणारे एकवीरा आईचे मंदिर पाहून मन मोहून गेले... 

तेथल्या सायकल चालविणाऱ्या मुलांनी एकवीरा डोंगराकडे जाणारा शॉर्टकट रस्ता दाखविला... परंतु त्या रस्त्यावर खूप चिखल असल्यामुळे हायवे वरून कर्ल्या पर्यंत गेलो... एकवीरा आईच्या पहाडाच्या अर्ध्या रस्त्यावर गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे... तेथे जाणारा रस्ता अतिशय तंग आणि खडी चढाईचा आहे... दोघांनाही या रस्त्यावरून सायकलिंगसाठी उद्युक्त करण्यासाठी मागे न पाहता कार्ला घाटात सायकल घातली... माझ्या मागे येण्याशिवाय विजय आणि नवनीत कडे पर्याय उरला नाही... आणि हो !!! दोघांनीही तो अतिशय कठीण कार्ला घाट बघता बघता पार केला... वर गाड्या पार्किंगमध्ये पोहोचल्यावर दोघांच्या चेहऱ्यावराचे तेज पाहण्यासारखे होते... जणूकाही हिमालय चढून गेल्याचा आनंद दोघांच्या देहबोलीतून जाणवत होता... 

प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर जे यश प्राप्त होते... त्याचा आनंद अवर्णनीय असतो... हेच या राईड ने सिद्ध केले होते...

एकवीरा आईच्या दर्शनाने पुन्हा ऊर्जा मिळाली... ती परतीच्या सायकलिंगसाठी...

मंगल हो... !!!

1 comment: