Sunday, December 31, 2023

एका अपघाताची गंमत

एका अपघाताची गंमत

तेजुमध्ये मौशूमी दिदी,जयश्री ताई,  शिवांगी आणि प्रियाल यांना टाटा करून आज सकाळी सव्वा सहा वाजता राईड सुरू झाली... मौशूमी दिदीनेच करूणा ट्रस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती... 

आज पासून एक्सपिडिशन मधला महत्त्वाचा टप्पा सुरू झाला होता... किबीतू आणि हेल्मेट टॉप हे बकेट लिस्ट मधील हॉट स्पॉट होते... दिड महिन्यात त्रिपुरा, मिझोराम, मेघालय आणि आसाम पादाक्रांत करून शेवटच्या पंधरा दिवसात अरुणाचल मध्ये पेडलींग करायचे होते.

मागच्या दिड महिन्यात प्रचंड मित्र परिवार मिळाला होता तसेच शाळेतले बालगोपाल दोस्त झाले होते... या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊन  या वर्षाच्या शेवटच्या दिवसाची रम्य सकाळी राईड सुरू केली होती.

सकाळचे थंड वारे हिरव्या विड चीटर मधून सुद्धा अंगाला बोचत होते... थोडा चाढाचाच रस्ता असल्यामुळे धीम्या गतीने सायकल रायडिंग सुरू होते... दोन्ही बाजूची वनराई आणि धुकटलेले वातावरण मनाला उभारी आणत होते...  पानांची सळसळ आणि पक्षांचा किलकीलाट... या निसर्ग संगीतात धुंद होऊन अलगदपणे पेडलींग सुरू होते...

चकचकीत निवांत रस्ता लोहित नदीच्या किनाऱ्याने पुढे पुढे सरकत होता...


डीमवे गावा नंतर खडी चढाई सुरू होणार होती... तिथेच न्याहरी करून  चढाईला सुरुवात करणार होतो... आज अमलियांग पर्यंत ८१ किमीची सफर पूर्ण करायची होती... मनात एक अनामिक ओढ होती... किबीतु पर्यंत पोहोचून भारतीय सैनिकांना सदिच्छा भेट देण्याची...

डीमवे गाव चार किमी राहिले होते... एव्हढ्यात मागे जोरदार बॉम्ब स्फोटासारखा ढुंम आवाज झाला... दोन फूट पुढे फेकला गेलो... माझ्या अंगावर सखी... दोन मिनिटे काय झाले मलाच कळले नाही... स्वतःला सावरले... पाय सायकलच्या सीट मध्ये अडकला होता... आणि मागचे चाक फ्रेम मधून निखळून तीन चार ठिकाणी वेडेवाकडे झाले होते...


ट्युब फुटून जोरदार धमाका झाला होता... मोटारसायकलने मागून येऊन जोरदार धडक मारली होती...
 

मोटार सायकल रायडर धावत आला... माझा अडकलेला पाय बाहेर काढून हिरवळीवर बसविले... डोक्यात हेल्मेट आणि हातात ग्लोव्हज असल्यामुळे हेड इंज्युरी आणि हात सोलपटण्यापासून बचावलो होतो... कुल्याला मुका मार लागला होता... 

मोटार सायकलस्वार रडत पाया  पडू लागला... त्याला म्हणालो अरे रडू नकोस... आपण दोघेही बचावलो आहेत... मला पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटलमध्ये न्यायची जबाबदारी आता तुझी आहे... मागे असलेल्या वळणावरून तो पुढे आल्यावर सूर्याची किरणे त्याच्या हेल्मेटच्या विंड शिल्डवर पडली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली... त्यामुळे वेगात तो सायकलवर धडकला होता...

विवेकानंद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक चंपक काकोती सरांना फोन लावला... तातडीने शाळेचा सदस्य प्रशांता पोलिसांची गाडी घेऊन आला. पोलिस स्टेशन मधून आम्हा दोघांनाही तडक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस घेऊन आले... डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी केली अंगावर कुठेही काळेनिळे डाग नव्हते... दुखऱ्या कुल्यासाठी मलम आणि गोळ्या दिल्या... आज दिवसभारासाठी आराम करण्याचा सल्ला दिला...

पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये आलो... मोटार सायकलस्वार  दिलबहाद्दुरचे रडून डोळे लाल झाले होते... मजुरी करणारा दिलबहाद्दुर ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी बायकोमुलांना खाऊ-मिठाई घेऊन घरी  निघाला होता... लोहित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितले "मला कंप्लेंट किंवा FIR करायचा नाही... याला सोडून द्या"... दिलबहाद्दुर पैसे देत होता... त्याला सांगितले "तू माझ्या मुलासारखा आहेस... तुझी बायको मुले घरी वाट पाहत असतील... लवकर घरी जा..."

पोलिस स्टेशनच्या बाहेर  आल्यावर बायको आणि मुलीला अपघात झाल्याचे कळविले... तसेच सर्व गृपवर व्हॉट्स ॲपवर कळविले... 

जवळच सायकलचे दुकान होते... त्याला सर्व घटना सांगून काय मदत करता येईल ते विचारले... याचे रीपेअरींग तीनसुखिया येथे होईल याची माहिती मिळाली... गुगल वर तीनसुखियाच्या किला सायकल शॉपीचा नंबर मिळाला... फोन करून आणि सायकलचा फोटो पाठवून परिस्थिती सांगितली... मालक ऋषभने आश्वासन दिले आणि  सांगितले.."सर उद्या सकाळी सायकल घेऊन या... तुम्हाला टकाटक करून देतो...

आजचा अपघात हा अनपेक्षितपणें घडलेली घटना होती...  हेल्मेट  ग्लोव्हज  गॉगल  हे सेफ्टी गियर्स आणि अल्युम्यूनियम अलॉयच्या MTB  सायकलचा दणकटपणाच या अपघातातून काहीही इजा न होता मला वाचवू शकला... खरं तर सखीने माझ्यावर आलेला कठीण प्रसंग स्वतःवर घेतला होता... आता माझे कर्तव्य आहे तिला टकाटक करण्याचे होते...

तसेच तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद... या सफरीत सर्वांनी दिलेले सहकार्यच... परमेश्वराच्या चरणी रुजू झाले होते...

म्हणूनच म्हणतात ना... "देव तारी त्याला कोण मारी"

हा अपघात म्हणजे...  एखाद्या सस्पेन्स चित्रपटात घडणाऱ्या घटनां सारखा होता... पुढे काय होणार याची काडीची ही कल्पना नाही... पण डोकं शांत ठेऊन निर्णय घेणे... हीच आजच्या घटनेची गंमत होती...

मंगल हो... !!!

21 comments:

  1. Thank God ur safe sir

    ReplyDelete
  2. Great Gladiator never loose ,he know only victory,जय हो,मंगल हो.

    ReplyDelete
  3. Take care sir you & Sakhi

    ReplyDelete
  4. Kaka hope you are doing well and all the best for your further journey 👍

    ReplyDelete
  5. Kaka hope you are doing well and all the best for your future journey👍

    ReplyDelete
  6. खरंच तुमचं वागणं कौतुकास्पद आहे कारण त्या मोटार सायकल स्वाराचाही दोष नव्हता हे तुम्ही त्याला आणि पोलिसांना नीटपणे समजून सांगितलंआणि तुम्ही खूप शांतपणे परिस्थिती हाताळली. तुमच्यासारख्या विचारांची माणसं आजच्या युगात दुर्मिळ होत चालली आहेत. सर काळजी घ्या.

    ReplyDelete
  7. Great aaahat sir take care

    ReplyDelete
  8. मित्र सुरेश सपकाळ चे अभिप्राय...

    सतिश मित्रा, तू *'सुपर ह्युमन'* आहेस यार. दु:खद क्षणात सुध्दा आनंदाची झालर निर्माण करण्याची कला तुझ्यात आहे यार ? जवाब नहीं

    ReplyDelete
  9. मित्र सचिन पालकर चे अभिप्राय...

    अपघातात ही गंमत सापडणे हे दुर्मिळच आहे.
    पण अशी दुर्मिळ मनाची तयारी च सायकल वारी घडवते असे म्हणण्यास हरकत नाहीं,
    सर तुम्ही सुखरूप असून सायकल ही वारी पूर्ण करण्याच्या तयारीत आहे हे समजल्याने आणखी आनंद होतो आहे
    असो पुढील प्रवास आणखी आनंद दायी होवो हीच प्रार्थना तसेच तुमच्या अनुभवाचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे🙏🏼
    स्वारी आनंदात व सुखरूपपणे पूर्ण करावी हीच शुभेच्छा🙏🏼

    ReplyDelete
  10. अपघातामध्ये देखील गंमत शोधणारा खरंच तू अविश्वसनीय आणि अवलिया आहेस काळजी घे

    ReplyDelete
  11. मित्र काशिनाथ याचे अभिप्राय...

    ह्यात सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे तू सुखरूप यातून सालामत बाहेर पडणं आणि अप+घात हा कसा कोणत्याही तर्कात बसत नाही म्हणून तो अपघात…त्यात तो बिचारा सायकलस्वार त्यालाही काही कळायच्या आधीच हे घडणं यात सर्व प्रसंगात जी भावली ती तुझ्या मनाची समता, जे घडत ते तसच साक्षी भावान स्विकारण…ज्याच्या हातून घडलं त्याबद्दलही ही मैत्री कणव…एक खरा विपश्यी प्रसंगाला कसा समोर जातो त्याचा हा एक आदर्श वस्तूपाठ… यातून खूप काही शिकण्यासारखं…त्यास तू दिलेल्या नावही खूप अर्थपूर्ण…
    एका अपघाताची गंमत…
    मंगल हो सतीश
    🙏😊🙏

    ReplyDelete
  12. सतिश मित्रा तुला काही न होऊ देता सुखरूप ठेवल्या बद्दल तुझ्या सखीचे आभार मानतो तसेच सखी तुझ्या जीवनात आली तेव्हा पासुन नव चैतन्य तुझ्यात पाहिलेले आहे तु सखीच्या सोबतीने प्रवास करून सुखरूप घरी यायचे आहे तुला नवीन वर्षाच्या मंगलमय आरोग्यमय मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा
    नरेश

    ReplyDelete
  13. आशा पाटील हिचे अभिप्राय...

    OMG🙏Devak Kalaji🙏
    या घटनेला "एका अपघाताची गंम्मत " हे नाव तुमच्यासारखी अतिशय सकारात्मक विचारांची व्यक्तीच देऊ शकते.
    Take care, stay safe👍

    ReplyDelete
  14. Jadhavsaheb , take care

    ReplyDelete
  15. मित्र लक्ष्मण याचे अभिप्राय...

    💐🙏😊 नमस्कार गुरुदेव.

    काल अतुल भाई कडून समजले. (माझेअलिकडे WhatsApp messages कडे जरा दुर्लक्षच झाले आहे.) क्षणभर काळजी वाटली एवढेच. कारण तुम्ही डगमगून जाणारांपैकी नाहीत हे माहीत आहे.
    देवाचे आभार, कारण 'संकट फार जवळ आले होते पण त्याच्याच कृपाशीर्वादाने ते चाकाकडे गेले '.
    पुढील सफरीसाठी भरपूर शुभेच्छा.
    🙏 नमस्कार.

    ReplyDelete
  16. सर नमस्कार, मी प्रत्यक्ष तुम्हाला काही भेटलो नाही किंवा तसा आपला परिचय नाही. पण तुमचे ब्लॉग्स वाचत असतो नियमित पणे. आणि त्यातून तुमच्या बद्दल एक गोस्ट नक्की सांगू शकतो की तुम्ही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असणारे असणार. प्रसंग कसा हि असो आपण त्याला कसे सामोरे जातो यावरच त्याचा फलित ठरत असते. तुम्ही सुखरूप आहेत ऐकून बरे वाटले. देवाचे आभार.

    ReplyDelete